‘हसरी किडनी’च्या लेखिकेचे नागपूरशी नाते आहे. जन्माने. विचाराने ‘आजचा सुधारक’शी त्यांची माहेरची बांधिलकी आहे. पुस्तकाला आ.सु.च्या संस्थापक-संपादकांचा पुरस्कार आहे. तो त्यांनी आग्रहाने मिळवला आणि पद्मभूषणासारखा मिरवला आहे. ‘अशा प्रकारचे एकमेव पुस्तक’ ही त्यांची प्रशस्ती. विजय तेंडुलकर, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या नामवंत सारस्वतांनी तिला संमतिपूर्वक मान मोलावली आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन १६ जून २००१ या दिवशी झाले. लेखकाला आपल्या पुस्तकाचे जे जे व्हावेसे वाटते ते सर्व सोहळे त्याला लाभले आहेत अशा तेंडुलकरांच्या अभिप्रायासमवेत आलेली प्रकाशनसमारंभाची व्हिडियो कॅसेट अमेरिकेत लगेचच लेखिकेच्या सौजन्याने प्रस्तुत परिचयकर्त्याने पाहिली आहे.