नवरा-बायको, आई-बाप, नातेवाईक व शेजारी मित्रांचे समूह ही नाती, वर्ग, धर्म व राज्य या संस्था आणि त्या सार्यांच्या जोडीला कायदा, परंपरा आणि नीतिनियमांची बंधने या सार्यांनी मिळून स्त्रीपुरुष संबंधाविषयीच्या आजच्या भूमिका घडविल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एवढ्या जीवनव्यापी आणि मजबूत की त्यांच्या वजनदार सर्वंकषतेने या संबंधातली वैयक्तिक कोवळीक पार चिरडून टाकली आहे.
सगळ्या विचारसरणी, मग त्या मनूच्या असोत नाहीतर मार्क्सच्या, माणसाच्या सहजसाध्य संबंधांना एका घट्ट चौकटीत ठामपणे फिट्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना अपरिहार्यपणे येणार्या अपयशासाठी विचारसरणीला दोषी न ठरवता माणसालाच दोषी ठरवून निकालात काढतात.