Category Archives: स्त्रीवाद

‘फिरून एकदा स्त्रीमुक्ती’ च्या निमित्ताने….

२०२० च्या सुधारकच्या अंकासाठी घेतलेला ‘लैंगिकता’ हा विषय ठरला तेव्हा ‘आजचा सुधारक’मध्ये याविषयाबद्दल आधी काय लिहून आले आहे ते पाहण्याची उत्सुकता वाटली. हा विषय बऱ्याच वर्षांपूर्वी ‘सुधारक’मध्ये गाजला होता हे माहीत होते. त्यासाठी ‘सुधारक’चे ह्या विषयावर आधारलेले जुने अंक वाचले. हे भूतकाळात जाणे फारच रंजक ठरले. साधारणतः १९९३ ते २००१ दरम्यानच्या ‘सुधारक’चे बरेच अंक स्त्रीमुक्तीविषयीच्या उलटसुलट चर्चांनी गाजलेले आहेत. (‘सुधारक’च्या जुने अंक आता आंतरजालावर उपलब्ध आहेत.) ‘साधना’च्या मे १९९४च्या अंकामध्ये शांता बुद्धिसागर यांनी ‘चारचौघी’ नाटकाची चर्चा करत असता ‘खरी स्त्रीमुक्ती कोठे आहे?’ हा लेख लिहिला. त्यावर दिवाकर मोहनींनी ‘खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?’ हा प्रतिक्रियात्मक लेख ऑगस्ट १९९४च्या ‘आजचा सुधारक’मध्ये लिहिला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून इतर मान्यवरांचे लेख, त्यावर पुनःप्रतिक्रिया म्हणून इतरांचे लेख किंवा प्रत्युत्तर, खंडन वा शंकानिरसन म्हणून पुन्हा दिवाकर मोहनींचे लेख अशी ती लेखमाला अनेक भागांमध्ये येत राहिली. विषयच तसा ज्वलंत होता….! स्त्रीमुक्ती ..! स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य .. !

‘खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?’ हा प्रश्न विचारत दिवाकर मोहनी स्वतःच त्याचे उत्तर देतात. त्यांच्या मते स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय (ते तिला हवे किंवा नको असेल तरी.. ) ती खरी मुक्त होऊच शकत नाही…… प्राचीन संस्कृती लाभलेल्या भारतीय उपखंडात, मागील शतकाच्या नव्वदीच्या दशकात, म्हणजे पंचवीस अठ्ठावीस वर्षांपूर्वी हे धाडसाचे विधान केल्यानंतर काही समाजधुरीणांचे पित्त खवळले नसते तरच नवल… त्यानंतर बऱ्याच शाब्दिक चकमकी झडल्या. चर्चा झाली. शास्त्रार्थ घडले. जणू काही स्त्रियांना लैगिक स्वातंत्र्य कोणाकडूनतरी मिळाले आहे आणि ते त्यांनी त्वरित वापरायला सुरुवात करण्याचा अनर्थ घडणार आहे असे गृहीत धरून बऱ्याच शक्यताही वर्तविण्यात आल्या. कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले तर होणाऱ्या भीषण परिणामांच्या धोक्याची घंटा वाजविण्यात आली….संस्कृती भ्रष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. म्हणजे एकूण काय तर संस्कृती वाचवायची असो वा कुटुंब, सगळी मदार स्त्रीच्या शुद्ध चारित्र्यावर..! चारित्र्य शुद्ध केव्हा तर योनिशुचिता पाळल्यावर ….! म्हणजे शेवटी सगळे स्त्रीच्या लैंगिकतेभोवतीच फिरत राहणार. शुचितेचा मक्ता फक्त स्त्रियांचा. पुरुषांचे बहुपत्नीकत्व मात्र सर्वसम्मत. (यात गंमत अशी की येथील योनिशुचितेचा दुराग्रह धरणाऱ्यांना मोहनींनी मांडलेली बहुपत्नीकत्वाची कल्पना मात्र फारच पसंत पडली होती.)

मोहनींनी त्या सगळ्यांना प्रत्युत्तर देताना मात्र त्यांच्या पद्धतीप्रमाणे शांतपणे, (त्यांच्या शब्दात ‘अहिंसक व विधायक’ मार्गाने) पण ठामपणे स्वतःच्या विचारांची पाठराखण केली आहे. सर्व प्रश्नांचे, शंकासंशयांचे व गैरसमजुतींचे त्यांनी प्रसंगी योग्य दाखले देऊन निवारण केले आहे. स्त्रीच्या दुःखाची कारणे आणि त्या दुःखांचे निराकरण करण्याचे उपाय ते एवढ्या तर्कशुद्ध पद्धतीने मांडतात की आपण हतबुद्ध होतो. संस्कारांचे लोढणे आपल्याला तर्क वापरण्यास आडकाठी करते आहे हे उमजून कधी निराशा देखील वाटते. दिवाकर मोहनी मात्र आज वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षीदेखील तेवढेच आशावादी आणि सहानुभूत आहेत. त्यांचे म्हणणे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला मात्र जुने सगळे लेख वाचणे अनिवार्य आहे. पंचवीस वर्षांपूर्वी ‘आजचा सुधारक’चा वाचकवर्ग मर्यादित असल्याने तेव्हा समाजदेखील मर्यादितपणेच ढवळला गेला असावा. बऱ्याच पुरुषवाचकांनी हे लेख कुटुंबात रमलेल्या आपल्या स्त्रियांपर्यंत पोहोचू दिले नसावेत याची मला खात्री आहे. त्या बिचाऱ्या अज्ञानातच सुखी असोत. हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल ?

मुळात लैंगिकतेविषयी बोलणेही आत्ताआत्तापर्यंत थिल्लरपणाचे मानले जात होते. त्यात स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या लैंगिकतेविषयी बोलणे म्हणजे निर्लज्जपणाची कमालच. अश्या परिस्थितीत मोहनींनी विवाहित, अविवाहित, विधवा, कुमारी, परित्यक्ता, कुरूप, अपंग, मतिमंद अशा सर्व स्त्रीपुरुषांच्या लैंगिकतेवर संवेदनशीलपणे केलेली निर्भीड भाष्ये म्हणजे एखादे मानसशास्त्रीय विवेचनच वाटते. माणसाच्या विचारांचा फार मोठा भाग व्यापून असलेली कामप्रेरणा अभिव्यक्त होताना हीन दर्जाची का ठरते याचे कारण मोहनींना कळत नाही. ‘सुसंस्कृत स्त्री कोणती, तर जिच्यामधली कामप्रेरणा नष्ट झाली आहे ती व ज्या स्त्रिया आपल्या सहजप्रेरणांना प्रतिसाद देतात त्या अनीतिमती’ हे आपल्या समाजाचे स्त्रीच्या चारित्र्याविषयीचे आकलन त्यांना अत्यंत अस्वस्थ करते. स्त्रीमुक्तीच्या त्यांच्या संकल्पनेचे विस्तृत वर्णन करताना ते म्हणतात की, ‘स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांचे स्वातंत्र्य! पूर्ण स्वातंत्र्य! कोणत्याही पुरुषाच्या मागणीला नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य! कोणत्याही पुरुषाच्या मागणीला हो म्हणावे लागले तर ते स्वातंत्र्य नव्हे. ती गुलामीच झाली. कोणालाही नाही म्हणताना कसलेही दडपण त्यांच्या मनावर नको. त्यांच्या नाही म्हणण्याचा आम्ही सर्वानी आदर केला पाहिजे.’ (No means no हे जे विधान ‘पिंक’ या चित्रपटातील अमिताभने साकारलेल्या वयोवृद्ध व्यक्तिरेखेने लोकप्रिय करून ठेवले आहे, त्याचे मूळ मला ह्या तेवीस वर्षे जुन्या लेखमालेमध्ये आढळते आहे.) याउपर मोहनी म्हणतात की, ‘यच्चयावत सर्व स्त्रीपुरुषांचा सामाजिक दर्जा समान ठेवल्याशिवाय खऱ्या अर्थाने कोणीच मुक्त होणार नाहीत; कारण स्वातंत्र्याची समानता आणि मुक्ती ही एकच गोष्ट आहे.’

जुने लेख वाचताना असे वाटत होते की आता एवढ्या वर्षांनंतर परिस्थिती बदलली असेल. तशी परिस्थिती बदलली आहेच आणि आपल्या जाणिवांचाही विस्तार झाला आहे. कारण आपली देशी अभिव्यक्तिमाध्यमेदेखील आता ह्या विषयावर सेन्सॉरमर्यादित भाष्य करू लागली आहेत. सेन्सॉरचा बडगा नसलेल्या शुद्ध भारतीय वेबसिरीज मधून काही चांगल्या दिग्दर्शकांनी स्त्रियांचे नाजूक विषय प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतील अशा तरलपणे मांडले आहेत. त्यांनी रेखाटलेल्या स्त्रिया आपल्या लैंगिकतेविषयी विचार करताना दिसतात. स्वतःचा आनंद, सुख किंवा समाधान म्हणूया हवे तर, ह्याबाबतीत त्यांना काही संभ्रम नाहीत. त्यासाठी लागणारी प्रयोगशीलता त्यांच्याकडे आहे. त्या प्रयोगांच्या परिणामांची जबाबदारी घेण्याची कुवतदेखील त्यांच्याकडे आहे.

दिवाकर मोहनींच्या मनातील तेव्हाची स्त्रीमुक्ती आता पंचवीस तीस वर्षांनंतर थोडी तरी साध्य झाली असावी असे वाटत असताना आजच एका सर्वेक्षणाचा अहवाल वाचनात आला. काही मोठ्या महानगरांमधील तरुण युवकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार चाळीस टक्क्यांच्यावर मुलांना, कुटुंब टिकविण्याची जबाबदारी केवळ स्त्रियांची वाटते व त्यासाठी त्यांना कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागत असेल तर स्त्रियांनी तो सहन केला पाहिजे असे वाटते. सामाजिक काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांच्या मते त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या सत्तर टक्क्यांहून अधिक महिला, तरुण मुली ह्या विविध प्रकारच्या हिंसेच्या बळी असतात. त्यातून आलेले नैराश्य त्यांची कार्यक्षमता हिरावून घेते व आत्मविश्वास खच्ची करते. दुर्दैवाने असा कौटुंबिक हिंसाचार करण्यात घरातील स्त्रियांचा (सासू, नणंदा इ.) देखील समावेश आहे. तसेच, केवळ स्त्री आहे म्हणून समाजातील अनोळखी लोकांकडून होणाऱ्या छळवणुकीला वा हिंसेला तर कोणताही तर्क लागू होत नाही. यांत छेडखानीपासून ते एवढ्यातच घडलेल्या बलात्कार करून जाळून टाकण्यासारख्या अक्षम्य गुन्ह्यापर्यंत काहीही असू शकते.

आजही मध्यपूर्वेतील काही देश, आफ्रिका आणि आशिया खंडातील भारतासह काही देशांतील मुस्लिम समाजामधील स्त्रियांना खतना (female genital mutilation or FGM) ह्या अमानवी प्रकाराला सामोरे जावे लागते. सुमारे ५ ते १० वर्षे वयाच्या मुलींच्या योनिभागातील clitoris हा लहानसा भाग चाकूने किंवा ब्लेडने कापून टाकला जातो. कारण काय तर तो अवयव तिला मोठेपणी लैंगिक आनंदाचा (orgasm)अनुभव देणार असतो. स्त्रियांनी असा आनंद मिळविणे हे त्यांच्या धर्माच्या दृष्टीने पाप आहे. अप्रशिक्षित स्त्रियांकडून हे ‘हराम की बोटी’ कापण्याचे काम अत्यंत अघोरी पद्धतीने पार पाडले जाते. परिणामस्वरूप मुलींना भयंकर वेदना, प्रमाणाबाहेर रक्तस्राव आणि जंतुसंसर्ग ह्यांना सामोरे जावे लागते. याविरोधात आता कुठे थोडी समाजजागृती होऊ लागली आहे.

याचा एक अर्थ असा निघतो की समाज म्हणून याबाबतीत आपण अद्याप फार पुढे आलेलो नाही. गेल्या पाव शतकात आपण फक्त काही पावलेच चाललेलो आहोत. आपले राहणीमान वा जीवनमान आधुनिक झाले असेल पण विचारांना मात्र आधुनिकतेचा बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. नवी तरुण पिढी मात्र संस्कृतीच्या बाबतीत फारशी पूर्वग्रहदूषित नाही असे वाटते. त्यांचे तसे असणे त्यांना लैंगिक समानतेबाबत निखळ विचार करण्यासाठी अनुकूल ठरेल अशी आशा आहे.

‘आजचा सुधारक’मधील ‘खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?’ ह्या अनेक भाग असलेल्या दीर्घ लेखमालेचा धांडोळा घेणारा लेख दिवाकर मोहनी यांनी जून १९९७च्या अंकात ‘फिरून एकदा स्त्रीमुक्ती’ ह्या मथळ्याखाली लिहिला. तो लेख ह्या अंकात पुनःप्रकाशित करीत आहोत. दोन तपांपूर्वीची परिस्थिती आणि आजची स्थिती ह्यात काही फरक पडला का हे ह्या निमित्ताने तपासून पाहता येईल. तेव्हा क्रांतिकारी वाटणारे दिवाकर मोहनींचे स्त्रीमुक्तीविषयीचे विचार मला तरी आजही तितकेच क्रांतिकारी वाटतात. त्यांचे द्रष्टेपण असेच वेळोवेळी सिद्ध होत राहील याची मला खात्री आहे.

माधुरी कानेटकर, नागपूर

फिरून एकदा स्त्रीमुक्ती

फिरून एकदा स्त्रीमुक्ती … 

गेली कमीतकमी १० वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणूया की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तीविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत. 

बहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलीकडे जात नाही. ( वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधांमध्ये पुरुष बेजवाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करायची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजवाबदारीने वागू नये; आपले शील संभाळावेअसे सांगतात.) पण एवढ्याने खरोखर स्त्री मुक्त होईल? 

स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची कौटुंबिक किंवा वैवाहिक बंधनातून मुक्तता नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीपासून मुक्तता. 

स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची घरकामापासून मुक्तता नव्हे, तर पुरुषांच्या , पुरुषजातीच्या अंकित राहण्यापासून मुक्तता. 

स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची जी घुसमट होते, त्यांचा जो मनांतल्या मनांत इतरांशी मूक संवाद चालतो त्यापासून मुक्तता. 

आणि, स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची भयापासून मुक्तता. 

भय पुरुषांच्या बलात्काराचे; भय बापाला आपल्या लग्नात त्याच्या ऐपतीबाहेर मोठा हुंडा द्यावा लागेल ह्याचे; भय सासरची मंडळी आपला छळ करतील याचे; त्यांच्या छळाची मजल आपल्याला जाळून मारून टाकण्याइतपत जाईल ह्याचे; भय उपासमारीचे; भय नवरा टाकून देईल ह्याचे; भय नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेईल, त्याच्यावर केव्हाही शिंतोडे उडवील त्याचे, आपल्यावर खोटेच आळ घेऊन कोणी तिऱ्हाईत कुटिलपुरुष आपल्याला आयुष्यातून उठवील ह्याचे; भय नवरा आपला पदोपदी आपला अपमान करील ह्याचे; तो आपल्या उरावर सवत आणील ह्याचे; भय नोकरीमध्ये बॉस नको त्या मागण्या करील ह्याचे; आणि सगळ्यात मोठे भय आपल्या अत्यंत स्वाभाविक अश्या भावना आणि नैसर्गिक अशा प्रेरणा, ज्यांना सहजप्रेरणा म्हणतात, ज्या सर्व प्राण्यांच्या ठिकाणी असतात असे सांगतात, त्या कधी चुकून, आपल्या नकळत प्रकट होतील ह्याचे. 

ह्या शेवटच्या भीतीपोटी सुसंस्कृत स्त्रीला सतत सावधानता बाळगावी लागते. त्या भीतीमुळे ती अकाली प्रौढ होऊन जाते. हसतमुख स्त्री फार क्वचित आढळते. सभासंमेलनात अशी स्त्री जेव्हा हसते तेव्हा ते हास्य बहुधा कृत्रिम असते, कृतक असते, अभिनीत असते. मानवप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण असलेले जे हास्य, तेच ती गमावून बसली आहे. ह्या अनेकविध भयांतून भारतातल्या कोणत्याही धर्माच्या सुसंस्कृत स्त्रीची सुटका झालेली नाही. 

स्त्रियांच्या ठिकाणी फक्त एकच सहजप्रेरणा असावी अशी आमच्या समाजधुरीणांची अपेक्षा आहे. ती आहे भीतीची. आदर्श स्त्री कशी असावी? — आधी ती भीरु असावी. ती नम्र असावी, तिच्या ठिकाणी अमर्याद तितिक्षा असावी, म्हणजे तिने आपल्या शरीरधारणेसाठी आवश्यक असलेल्या क्षुधातृषेसारख्या सहजप्रेरणादेखील मारून टाकलेल्या असाव्या अशी जेथे अपेक्षा आहे तेथे कामप्रेरणेचा तर तिला वाराही लागू नये असे आमच्या समाजधुरीणांना वाटत असणे अगदी स्वाभाविक आहे. 

स्त्रीच्या ठिकाणी, त्यातून पतिव्रता आर्य स्त्रीच्या ठिकाणी, भारतीय कुलीन कुमारिकेच्या ठिकाणी कामप्रेरणा ! अब्रह्मण्यम् ! असे ‘विषय’ उच्चकुलीन स्त्रीपुरुषांच्या अधःपाताला कारणीभूत होतात हे काय मोहोनीला माहीत नाही? एकान्तात, त्या वैध आणि पूर्णपणे आश्वस्त अशा वातावरणातल्या एकांतातसुद्धा, सुसंस्कृत म्हणजे घरंदाज, खानदानी  स्त्रीने आपला विनय न गमावणे, आपल्या सहजप्रेरणा दाबून टाकणे आणि ‘आलीया भोगासी असावे सादर’ अशी निरिच्छ आणि उदासीन वृत्ती धारण करून आपला देह पुरुषाच्या अधीन करणे हेच तिचे परम कर्तव्य आहे हे दिवाकर मोहोनीला माहीत नाही काय?

“मुळात स्त्रीच्या ठिकाणी बुद्धीच कमी, किंवा आहे ती प्रलयंकरा. त्यामुळे तिने एकांतात वागावे तसेच ती सर्व लोकांसमक्ष वागली तर केवढी आपत्ती ओढवेल! कोणत्याही स्त्रीला काळवेळाचे भान राहणे शक्य नाही. त्याकरिता तिने उदासीन, सर्वतोपरी विरक्त अशी वृत्ती सदासर्वकाळ धारण करावी हे बरे.” थोडक्यात तिने सजीव यंत्रासारखी, एखाद्या बोलक्या बाहुलीसारखी आपली वागणूक ठेवली पाहिजे. किंवा तहानभूक नसलेल्या निर्जीव यंत्रमानवासारखे सतत कार्यतत्पर असले पाहिजे. नवऱ्याने कितीही छळ केला तरी तो सोसला पाहिजे. ही त्यांनी निमूटपणे सोसण्याची अपेक्षा नवीन नाही. कविकुलगुरू कालीदासांच्या शाकुन्तलात जो उपदेशपर श्लोक आहे —’शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्ति सपत्नीजने’ व त्यापुढे ‘भर्तुर्विप्रकृतापि  रोषणतया मा स्म प्रतीपं गमः’ वगैरे, त्यामधून त्या अपेक्षेचे प्रतिबिंब उमटले आहे. आणि तत्कालीन समाजमधले उच्चवर्णीय स्त्रियांचे स्थान त्यांच्या आजच्या स्थानाहून वेगळे नव्हते हे स्पष्ट आहे. 

स्त्रिया  ह्या आदर्शापासून स्वतःहून जोपर्यंत विचलित होत नाहीत — ढळत नाहीत– तोपर्यंत त्या स्वतः आपल्याकडे पुरुषांची उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात असे म्हणणे भाग आहे. आणि म्हणून पुरुषांनी त्यांच्याकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नये असे म्हणणें म्हणजे आम्ही स्वतः पुरुषांच्या उपभोगासाठीच आहोत, पण पुरुषांनी मात्र आम्हाला तसे वागवू नये असे म्हटल्यासारखे आहे व त्यामुळे व्यर्थ आहे. 

स्त्रीपुरुषांनी  एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका जोपर्यंत घेतलेल्या नाहीत तोपर्यंत त्यांना कोणी जाब विचारू नये हे स्वाभाविक नाही काय ? पण सध्या काय परिस्थिती आहे? एखाद्या मुलीला पसंत करणारा पुरुष जर आयुष्यभर भेटला नाही तर तिला आपल्या इच्छा कायमच्या मारून टाकाव्या लागतात. कोणत्या तरी अनाम पुरुषाच्या नावाने आपले शील सांभाळण्यासाठी जन्मभर झुरावे लागते. ही त्यांची स्थिती त्यांचा आपल्या समाजातला दर्जा दाखवते. त्या जणू ज्यांच्यावर ‘ do not use if seal is broken’ असे लिहिलेले आहे अशा दुकानात मांडलेल्या मोहोरबंद बाटल्या आहेत ! हे त्यांचे बाटलीपण आमच्या भारतीय समाजाला सन्मानास्पद आहे की अपमानास्पद आहे?  पण आमचा पुरुषप्रधान संवेदनशून्य परंपराभिमानी समाज आपल्या श्रेष्ठ संस्कृतीच्या अभिमानापोटी त्यांचे तसेच असणे योग्य आहे असे समर्थन करतो. आणि आमच्या मूढ व त्याचबरोबर अनन्यगतिक असलेल्या स्त्रिया त्यांच्या अशा स्थितीला आपला ललाटलेख मानून चालतात ! ह्या विसाव्या शतकाच्या शेवटी सुशिक्षित स्त्रियांचे असे करणे कितपत योग्य आहे हे त्यांनीच ठरवावे. मागच्या शतकामध्ये उच्चवर्णीय विधवांची घोर विटंबना होत असे. त्यावेळी त्या त्यांच्या पूर्वजन्मीच्या पातकामुळे हे असे घडत आहे असे मानून स्वतःला भगवत्कोपभाजन आणि दैवहत समजत होत्या. आज दुरून, तटस्थपणे त्या घटनांकडे पाहून आपल्याला, आणि मुख्यतः तरुण स्त्रियांना हे समजावयाला हवे की त्या विधवांवर दैवाचा कोप झालेला नव्हता, तर त्या काळाच्या समाजधुरीणांच्या स्त्रियांच्या पावित्र्याविषयी ज्या कल्पना होत्या — मानवी समजुती होत्या — त्यांच्या त्या बळी होत्या. 

एकपतिपत्नीकत्व (monogamy) ही  गोष्ट व त्यातून उद्भवणारी ‘ जन्मोजन्मी हाच पती मिळावा ‘ ही शिकवण अत्यंत कृत्रिम अशी गोष्ट आहे. तसेच ब्रह्मचर्य , पातिव्रत्य म्हणजे थोडक्यात  योनिशुचिता ही कृत्रिम असल्यामुळे मानवी दुःखाला जन्म देणारी आहे. परंतु ह्या गोष्टींमुळे काहींचे वर्णश्रेष्ठत्व सिद्ध होत असल्यामुळे, त्या श्रेष्ठत्वभावनेमुळे मनाचे एकप्रकारचे समाधान होत असल्यामुळे, ह्यांचा पापाशी संबंध जोडल्यामुळे आणि आपले सुखदुःख किंवा पूर्ण जीवनच दैवाधीन आहे असा आपला समज तथाकथित धर्ममार्तंडांनी करून दिल्यामुळे ही दुःखमूलक गोष्ट नागरित  ( civilized ) समाजाने स्वीकारली आहे. पण त्याचबरोबर आपल्या वर्तनात अतिशय मोठा दंभ देखील आलेला आहे. ह्या दंभाला आणि दुःखाला आपण ‘सुसंस्कृतता’ म्हणत आहोत. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे. 

मुळात आदर्श भारतीय स्त्री ही मानवप्राणी नाहीच. तो अतिमानुष योनीतला प्राणी आहे. अशा अतिमानुष व्यक्तींना स्वतःच्या इच्छा नसतात. त्या फक्त पुरुषांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या भूतलावर अवतरलेल्या असतात. तेवढ्या साठीच स्त्रियांची देहधारणा असते. त्यामुळे अशी स्त्री स्वतःमधल्या मानवी मर्यादांचा आढळ इतरांना सहसा होऊ देत नाही. तिच्यामध्ये मानवी सद्गुणांचा कसा अतिरेक आहे हे तिला सतत दाखवावे लागते. ते तिने नेहेमीच दाखवत राहावे ह्यासाठी आमच्या भारतीय संस्कृतीला तिच्यामधल्या माया, ममता, निरलसता, सहिष्णुता, निष्ठा, अहिंसा, त्याग अशा गुणांचा  सतत उदोउदो करावा लागतो. 

स्त्रियांचा एकीकडे देवी म्हणून गौरव करावयाचा, त्यांतल्या काहींना ब्रम्हवादिनी म्हणून आत्मगौरवाची अफू पाजावयाची, तर दुसरीकडे पुरुषांच्या मानाने त्यांचे स्थान नीच कसे आहे ते त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी त्यांच्या आर्तवकाळी त्यांना अस्पृश्य मानावयाचे, असा दुटप्पीपणा आमच्या परंपरांच्या नावाखाली चालतो. सोवळ्यात असलेल्यांना त्यांच्या शब्दाचा देखील विटाळ होतो. आजसुद्धा काही धर्मनिष्ठ, संस्कृत्यभिमानी समाजधुरीणांच्या घरी हा प्रघात टिकून असेल.

एकपतिपत्नीकत्व  हा पतिपत्नींचा एकमेकांवरचा विशेषाधिकार  (privilege) तर योनिशुचिता हा सर्व पुरुषांचा सर्व स्त्रियांवरचा स्वत्वाधिकार किंवा एकाधिकार  (monopoly) आहे. त्यांचा आम्ही आमच्या पूर्ण बळानिशी प्रतिकार केला पाहिजे. कारण हे अधिकार स्वामित्व देणारे अधिकार आहेत व स्वामीसेवक संबंध हा समतेला मारक आहे. 

योनीची व पावित्र्याची जी सांगड आमच्या मनामध्ये कायमची घातली गेली आहे ती मोडून काढण्याची, त्यांची फारकत करण्याची गरज मला वाटते, कारण मी पूर्ण समतेचा चाहता आहे. माझ्या मते समता आणि पावित्र्य ह्या दोन्ही एकत्र, एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. एका वस्तूला कायमची पवित्र म्हटले की दुसरी कोणतीतरी नेहमीसाठी अपवित्र ठरते. म्हणजेच एक श्रेष्ठ व दुसरी कनिष्ठ ठरते. आणि समतेच्या तत्वाला बाधा येते. समतेच्या तत्वाला बाधा आणणारे कोणतेही वर्तन त्याज्य आहे ह्या मतावर मी ठाम आहे. 

हे जे योनीचे पावित्र्य आहे ते गंगेसारखे किंवा अग्नीसारखे पावित्र्य नाही. गंगा किंवा अग्नी स्वतः विटाळत नाहीत, उलट आपल्या स्पर्शाने अशुद्ध वस्तूला शुद्ध करतात. स्त्रीयोनी हे स्त्रीचे शक्तीस्थान नसून मर्मस्थान आहे. अत्यंत नाजूक असे मर्मस्थान आहे. ते शक्तीस्थान व्हावे असे वाटत असेल तर त्याला इतर अवयवांसारखे लेखले पाहिजे. त्याचे पावित्र्य नष्ट झाले की  ते मर्मस्थान राहणार नाही. 

योनिशुचिता किंवा योनीपावित्र्य ह्या विषयाने आमच्या भाषेवरसुद्धा खोल ठसा उमटवून ठेवला आहे. तो फक्त शिव्या म्हणून वापरल्या जाणाऱ्या शब्दांतूनच व्यक्त होत नाही. कोणत्याही स्त्रीचा उल्लेख करताना तिच्या नावामागे सुश्री, कुमारी, सौभाग्यकांक्षिणी, सौभाग्यवती, गंगाभागीरथी अशी उपपदे लावताना तिच्या योनीची स्थिती व त्या स्त्रीचे पुरुषसापेक्ष स्थानच आम्ही स्पष्ट शब्दात एकमेकांना सांगत असतो. हा आमचा प्रघात तिला स्वतःला कोणत्याही आकांक्षा कश्या नाहीत हे आणि ती पुरुषांच्या नजरेला कशी दिसते तेच प्रकटपणे सांगतो. एखादी स्त्री कुमारी म्हणजे अक्षतयोनी आहे की नाही ह्याची उठाठेव पुरुषांनी का करावी? स्त्रियांनी आणि मुलींनी आपण स्वतःचा उल्लेख तसा  करणे म्हणजे आपण स्वतः पुरुषांच्या उपभोग्य वस्तू आहोत असा कबुलीजबाब देण्यासारखे आहे हे ज्या दिवशी त्यांना उमजेल तो सुदिन .

आपल्या स्त्रियांचे नखसुद्धा परपुरुषाच्या दृष्टीस पडू नये म्हणून मुसलमान लोक त्यांना कापडी बुरखा पांघरायला लावतात. आणि सुसंस्कृत हिंदु — ते आपल्या स्त्रियांना कापडी बुरख्यात गुंडाळत नाहीत. ते त्यांना लपवीत नाहीत. ते आपल्या मुलींची इच्छा असो व नसो, त्यांना विरक्तीचा बुरखा पांघरण्याची सक्ती करतात. हा वैराग्याचा अदृश्य बुरखा अतिशय तंग असतो व तो काढून ठेवण्याची सोय नसते. त्यामुळे तो आमच्या स्त्रियांच्या शरीराशी एकजीव होतो. त्यांच्या रोमरोमांत तो भिनून जातो. ह्या जुलमाच्या  वैराग्यामुळे त्यांच्या ठिकाणची इच्छाशक्ती खच्ची करणें, त्यांच्या निरुपद्रवी, सालस गाई बनविणे किंवा त्यांचे work horses बनविणे, त्यांना गुलाम बनविणे अगदी सोपे होते. तसे करता यावे ह्यासाठी काही धर्मांनी त्यांना पापाची खाण मानले तर काहींनी विकारांची जननी !

स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य फक्त तत्वतः मान्य झाले — सर्वांकडून मान्य झाले — तर हुंडाबळीच नव्हे तर सगळी अनाथालये व निवारागृहे बंद पडतील. परित्यक्तांचे प्रश्न सुटतील. कारण मुलींना विवाहवाचून राहण्याचे स्वातंत्र्य राहील. त्यांचे विवाहबाह्य यौन वर्तन लांछनास्पद मानले जाणार नाही. तरुण मुलींनाच नव्हे तर प्रौढ स्त्रियांनाही नमविण्याचा–त्यांना नामोहरम करण्याचा–हमखास मार्ग आज जर कोणता असेल तर तो त्यांच्या ‘शीला’विषयी, ‘चारित्र्या’विषयी अफवा उठविण्याचा. प्रत्यक्ष बलातसंभोगामधील क्रौर्यापेक्षाही जर स्त्रिया कशाला घाबरत असतील तर त्या आपल्या दुष्कीर्तीला घाबरतात; इतकेच नव्हे तर त्या लोकापवादाच्या भयाने क्वचित खरोखरच्या बलातसंभोगाला एकदा नव्हे तर पुनःपुन्हा बळी पडतात. (हे जळगाव प्रकरणाने आपल्या नजरेला नुकतेच आणून दिले आहे.) म्हणून सर्व स्त्रिया भयमुक्त व्हाव्या असे जर आपल्याला खरोखर वाटत असेल तर त्यांच्या ‘चारित्र्या’ची चर्चा ताबडतोब बंद करावयाला हवी. स्वतः तश्या चर्चेत भाग न घेता दुसऱ्यांनी केलेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करावयाला हवे. आणि मुख्यतः स्त्रियांनी आपल्या शुद्ध चारित्र्याची शेखी मिरवावयाची नाही. 

तर स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांची विविध भयांतून मुक्तता. त्यांची खोट्या गौरवातून त्याचप्रमाणे जुलमाच्या  वैराग्यातून मुक्तता. ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांना बेजबाबदार स्वैराचारी व्हावयाचे आहे. नव्हे. त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या पेलावयाच्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्या उभय स्त्रीपुरुषांच्या राहणार आहेत; त्या सामूहिक असणार आहेत. सगळ्या क्रीडा करावयाच्या आहेत आणि त्या क्रीडाही उभय स्त्रीपुरुषांच्या राहणार आहेत. स्त्रिया पुरुषांच्या हातातले खेळणे राहणार नाहीत. एका खेळण्याचा कंटाळा आला की ते टाकून द्यावयाचे व दुसरे घ्यावयाचे असे यापुढे पुरुषांना करता यावयाचे नाही. कोणाच्याही गरज तुच्छ न लेखता स्त्रीपुरुषांनी  परस्परांच्या गरजा समजून घ्यावयाच्या आहेत. पुरुषांना विधुरत्वचा डाग लागत नाही. स्त्रियांना वैधव्याचा लागतो. तो डाग पुसावयाचा आहे. 

हे काम एका रात्रीतून होण्यासारखे नाही. म्हणून ते सावकाश, नेटाने, धीर न सोडता आणि समाजप्रबोधनाच्या अहिंसक आणि रचनात्मक मार्गाने करावे लागणार आहे. ह्या बाबतीतली उतावीळ अंगाशी येईल हे जाणून ते अत्यंत सावधपणे करावे लागणार आहे. आणि हे सर्व करीत असताना कुटुंबाचा पाय मजबूत ठेवावयाचा आहे. त्यासाठी स्त्रीपुरुषांनी  आपल्या प्रेमाच्या कक्षा रुंद करावयाच्या आहेत. (आणि मुख्यतः पुरुषांनी आपली सहिष्णुता वाढवावयाची आहे. ) कारण प्रेमाचा संकोच व असहिष्णुता ही दुसऱ्या पक्षाला बहुधा अन्यायकारक व सर्वांना दुःखकारक होत असतात. 

एक मुद्दा मांडावयाचा राहिला. त्यांचा नकाराधिकार पुरुषांनी मान्य करावा असे स्त्रियांना वाटत असेल तर स्त्रियांना आपली इच्छा व्यक्त करावीच लागेल. कारण त्यांना स्वतःच्या इच्छा आहेत हे अजून पुरुषांना माहीतच नाही. आजवर त्या क्वचित –काही समंजस पुरुषांजवळ आपली अनिच्छा व्यक्त करू शकत होत्या. पण इच्छा व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य उच्चवर्णीय स्त्रियांनी अनेकानेक पिढ्यांपासून उपभोगलेलेच नाही. त्यामुळे पुरुषांसमोर त्यांची प्रतिमा एखाद्या बाहुल्यासारखी किंवा खेळण्यासारखी आहे. त्याकरिता आता समस्त पुरुषजातीला स्त्रियांना इच्छा आहेत आणि वैराग्य आणि अनिच्छा ह्यांत फरक आहे हे जाणवून द्यावे लागेल. हे कार्य अतिशय कुशलतेने करावे लागेल. आम्हा स्त्रीमुक्तीवाद्यांची खरी कसोटी येथेच लागणार आहे.

पूर्वप्रसिद्धी: आजचा सुधारक / जून १९९७

नव्या समजुतीची गरज

नवरा-बायको, आई-बाप, नातेवाईक व शेजारी मित्रांचे समूह ही नाती, वर्ग, धर्म व राज्य या संस्था आणि त्या सार्‍यांच्या जोडीला कायदा, परंपरा आणि नीतिनियमांची बंधने या सार्‍यांनी मिळून स्त्रीपुरुष संबंधाविषयीच्या आजच्या भूमिका घडविल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एवढ्या जीवनव्यापी आणि मजबूत की त्यांच्या वजनदार सर्वंकषतेने या संबंधातली वैयक्तिक कोवळीक पार चिरडून टाकली आहे.

सगळ्या विचारसरणी, मग त्या मनूच्या असोत नाहीतर मार्क्सच्या, माणसाच्या सहजसाध्य संबंधांना एका घट्ट चौकटीत ठामपणे फिट्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना अपरिहार्यपणे येणार्‍या अपयशासाठी विचारसरणीला दोषी न ठरवता माणसालाच दोषी ठरवून निकालात काढतात. या वैचारिक अट्टाहासाचे बळी खूप आहेत. स्त्रीपुरुषसंबंधातली सहजता आणि त्या सहजतेतून येणारी सौंदर्यासारखी विलोभनीय मूल्ये यांचा या बळींच्या यादीत समावेश होतो.

भूमिकांनी स्वभावाचा बळी घेणे ही बाब राजकारणापासून समाजकारणापर्यंत आता आपल्या चांगल्या परिचयाची झाली आहे. सगळा अभिनिवेश, सगळे तणाव आणि म्हटलीच तर या संबंधातली सगळी ढोंगबाजी या अवस्थेतून जन्माला येते आणि भूमिकांचे स्वभावावरील हे वर्चस्वच स्त्रीपुरुष संबंधातल्या आजच्या खोट्या व्यवहाराला कारणीभूत होत असते. प्रत्यक्ष जीवनाहून भूमिकांच्या बांधिलकीला महत्त्व आल्याने मुखवटे म्हणजे आयुष्य नव्हे याचे गेलेले भान एक जीवनव्यापी विसंवाद उभा करते. सगळी नाती आणि त्यांना जोडलेली नीति यांत आज हा विसंवाद उभा आहे.

एक आणखी महत्त्वाचा आणि सर्व स्तरावर जाणवणारा (पण ज्याची पुरेशी दखल विचारवंतांना घ्यावीशी वाटलेली नाही असा) दुसरा महत्त्वाचा विसंवाद, कायद्याने मान्य केलेले व्यक्तीचे स्वातंत्र्य व त्यातून तिला मिळणारे अधिकार आणि व्यवस्थेच्या बंधनांनी चालविलेला कालबाह्य नीतिमूल्यांचा बडिवार यांचेतील आहे. जगातल्या सर्व प्रगत देशातील कायदे आणि घटना स्वातंत्र्याचा अधिकार व्यक्तीला बहाल करतात. आपल्या मूलभूत अधिकारांवरचे स्वामित्व व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. पण सगळ्या परंपरागत आणि काही नव्या विचारसरणीदेखील सगळा विचार समूहाच्या संदर्भात करणार्‍या आहेत. त्यामुळे विचारसरणी व परंपरा समूहगत तर कायदा व अधिकार व्यक्तिगत असे ह्या विसंवादाचे स्वरूप आहे.

कुमारी मातेचा बाळंतपणाची रजा मागण्याचा हक्क आपल्या न्यायालयांनी आता मान्य केला आहे. व्यवस्थेला तो मान्य व्हायला आणखी किती काळ जावा लागेल हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. स्त्री व पुरुष यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याला मान्य असले, तरी समूहाला व परंपरेला ते अमान्य आहे हा ह्या विसंवादाचा दृश्य परिणाम आहे.

एक पुरुष आणि एक स्त्री यांना नवरा बायको ठरवून दिले किंवा त्यांनी स्वत:हून तसे ठरवून घेतले की मग त्यांना संबंध ठेवायला हरकत नाही ही समाजाची व सर्वच संबंधितांची भूमिका असते. ह्या प्रकारात संबंधांच्या स्वरूपाहून ठरावाचे महत्त्व मोठे असते आणि हा ठराव किंमत म्हणून आयुष्य मागतो ही बाब कुणी फारशी विचारणीय वा मनावर घेण्याजोगी मानत नाही. अमेरिकेत ह्या संदर्भात झालेले एक सर्वेक्षण अतिशय बोलके आहे.

‘तुमच्यासमोर एक बटन ठेवले आहे. ते दाबल्याने तुमचा आजचा विवाह कधी झालाच नव्हता अशी स्थिती निर्माण होणार आहे. तुम्ही हे बटन दाबाल काय?’ असा एकच प्रश्न या सर्वेक्षणात तिथल्या स्त्रियांना विचारण्यात आला. ६७ टक्क्यांएवढ्या स्त्रियांनी ह्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले. त्या देशात असलेले घटस्फोटाचे प्रमाण लक्षात घेतले तर हा आकडा नव्वद टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. भारतात असले सर्वेक्षण करण्याची बुद्धी अद्याप समाजशास्त्रज्ञांना होत नाही हे आपले राष्ट्रीय सुदैवच मानावे लागेल. जर कधी असे सर्वेक्षण झाले तर ते विलक्षण क्रांतिकारी असेल याविषयी कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही.

स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक आणि विवाहबाह्य अशा दोन्ही संबंधांचे स्वरूप आपापल्या भूमिका बाजूला सारून तपासण्याची व समजून घेण्याची गरज म्हणूनच आज निर्माण झाली आहे. ह्या संबंधाविषयीचे सगळे भ्रम आणि अपसमज त्यांच्या मूळ स्वरूपामुळे निर्माण न होता समाजाने त्याविषयी स्वीकारलेल्या भूमिकांमुळे निर्माण झाले आहेत. म्हणूनच ते भूमिकानिरपेक्ष पातळीवर समजून घेण्याची आणि नव्या परिस्थितीच्या संदर्भात त्याविषयीची समजूत नव्याने प्रस्थापित करण्याची गरज आहे.

स्त्री-पुरुषातले सहज संबंध, त्याला मैत्री म्हणा वा प्रेम, ही नियमांनी वा नात्यांनी बांधून टाकता येणारी गोष्ट नाही. आपल्याकडे विवाहपूर्व प्रेमाचा प्रकार तसा कमीच आढळतो. विवाहोत्तर सहवासातून निर्माण होणार्‍या प्रेमाविषयीचा भरवसा आपल्यात फार मोठा आहे आणि ती बिनभरवशाची बाब आहे, हे सिद्ध करायला पुराव्यांची गरज नाही. सहवासातून प्रेमच निर्माण होईल असे नाही, भांडण ही देखील सहवासाचीच देणगी आहे.

विवाहानंतर पुरुषाच्या मनात पत्नीखेरीज आणखी कुणा स्त्रीविषयीचे आकर्षण उत्पन्न होऊ नये, हा आपला आदर्श विचार झाला आणि पत्नीच्या मनात कुठल्याही परपुरुषाचा विचार डोकावू नये, ही आपली मागणी झाली. एकपत्नीव्रताच्या आणि पातिव्रत्याच्या कल्पनांनाही आपण एका पातळीवर राखले नाही. पुरुषांनी मोडलेले आदर्श आपण क्षम्य मानतो. काहीवेळा तर आदर्श मोडणारांनाच मोठे मानतो. आम्हाला राम पूज्य आणि कृष्णही पूज्य. पण स्त्रीच्या बाबतीत असला अपराध आम्ही नेहमीच अक्षम्य मानला. हिंदू, बौद्ध, मुस्लिम वा ख्रिश्चन कोणत्याही धर्माचा इतिहास ह्या पक्षपातापासून मुक्त नाही.

ह्या सगळ्या आदर्श म्हणविणार्‍या पक्षपाती परंपरांनी एक मूलभूत सत्य सदैव कठोरपणे नाकारले आहे. प्रेम ही एक सहज भावना आहे आणि ती खरी असेल तर ती केव्हाही आणि कोणत्याही संदर्भात निर्माण होणारी आहे. विवाह हे विजेचे बटन नव्हे की त्यामुळे वाहणारा प्रेमाचा प्रवाह बंद करून थांबविता येईल. स्त्री-पुरुषांना विवाहाच्या बंधनाबाहेरही ते वाटू शकेल. आजची स्त्री ही तुलनेने आपल्या पतीहून परपुरुषांच्या सहवासात अधिक काळ राहते. पुरुष तर पत्नीच्या सहवासाहून इतरांच्या सहवासात कधीचाच अधिक काळ राहत आलेला आहे. अश्यावेळी विवाहाबाहेर नाजुक संबंधांना सुरुवात झाली तर तो नीतितत्त्वाचा भंग वा विवाहसंस्थेचा र्‍हास मानण्याचे कारण नाही. बदलत्या वास्तवाची ती अपरिहार्य परिणती मानली पाहिजे.

ज्या काळात ह्या तत्त्वांचा वा संस्थांचा पाया घातला गेला त्या काळात आजचे नवे वास्तव लक्षात घेण्याची गरज नव्हती आणि तेव्हाच्या माणसांना याचे भान असण्याचे कारणही नव्हते. शिवाय ज्या काळात ह्या तत्त्वाची व संस्थांची बंधने कडक होती त्याही काळात त्यांचेकडे कानाडोळा करणार्‍या बहाद्दरांचा वर्ग नव्हता असेही नाही. असा कानाडोळा करणारांचे अत्यंत गौरवशाली उल्लेख आपल्या सगळ्याच आदरणीय ग्रंथांमधून आलेले आहेत.

विवाहबाह्य संबंधांतून जन्माला येणार्‍या संततीला सन्मानाने जगू देण्याचे जे औदार्य प्राचीन समाजाने दाखविले व त्यासाठी त्याकाळी जे मार्ग त्यांनी शोधून काढले ते पाहिले की आपला वर्तमान समाजच तुलनेने अधिक बंदिस्त वाटू लागतो.

श्वेतकेतूच्या आईला त्याच्या बापासमक्षच एक अतिथी भोगासाठी ओढून नेऊ लागला तेव्हा श्वेतकेतूने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याच्या बापाने त्यालाच थांबवून जे घडत आहे तो अतिथिधर्माचा भाग असल्याचे सांगितले. त्यावर श्वेतकेतूने विवाहाची मर्यादा जाहीर केली व विवाहित स्त्रीने पतीखेरीज इतर पुरुषांशी संबंध ठेवू नये, ते पातक होय, असे घोषित केले.

दीर्घतमसकाम हा जन्मांध ऋषी अतिशय कामाचारी होता. त्याच्या अतिचाराला आणि अंधत्वामुळे उघड्यावर चालणार्‍या कामुक चाळ्यांना कंटाळून त्याच्या पत्नीने त्याला सोडून दुसर्‍या कुणाजवळ जाऊन राहण्याची धमकी दिली. तेव्हा पतिव्यक्तिरिक्त दुसर्‍या पुरुषाचा विचार मनात आणणार्‍या स्त्रीला भ्रूणहत्येचे पातक लागेल असा नियम ह्या दीर्घतम्याने सांगितला. (पुढे त्याच्या चाळ्यांना कंटाळून त्याच्या पत्नीने आपल्या मुलांच्या मदतीने त्याला दोरांनी बांधले आणि वाहत्या गंगेत सोडून दिले अशी ही कथा आहे) हा दीर्घतमसकाम ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाचा रचयिता आहे.

महाभारताच्या आदिपर्वात विवाहमर्यादांची उत्पत्ती सांगणार्‍या ह्या दोन कथा विस्ताराने सांगितल्या आहेत. मुळात ह्या कथाच फारशा नैतिक नाहीत. त्या कथांतील व्यवहार आणि अन्याय (विशेषत: दीर्घतम्याच्या कथेतला) उघड आहे. अश्याच कथा ख्रिश्चन, ज्यू आणि इतरही सर्व धर्मांत आहेत आणि त्यांचेही स्वरूप फारसे नैतिक नाही.

ह्या कथा शब्दश: खर्‍या मानण्याचे वा त्यांनीच सध्याच्या व्यवस्था घडविल्या असे मानण्याचे कारण नसले तरी त्या तत्कालीन समाजमनाचे दर्शन घडविणार्‍या आहेत हे नाकारण्याचे कारण नाही. कोणे एके काळी समाजाच्या विशिष्ट अवस्थेत त्याला जे नियम (कुणाच्या सोयीसाठी वा व्यवहारासाठी का असेना) घालून देणे उचित वाटले ते आज हजारो वर्षांच्या बदलानंतर जसेचे तसे कायम टिकविण्याचा अट्टाहास दुराग्रही तर आहेच शिवाय तो टिकणाराही नाही. हे निर्बंध मुळात पूर्वीही फारसे टिकले नव्हते हेही महत्त्वाचे आहे.

राजा, प्रधान, सेनापती, राज्यातील धनवंत, जमीनदार व सरदार इत्यादींना हे निर्बंध प्लेटोच्या आदर्श राज्यातल्या कायद्याप्रमाणे कधी लागूच झाले नाहीत. कवी, कलाकार, प्रतिभावंत आणि समाजातील इतर मान्यवर यांनाही त्यातून नेहमीच सूट मिळत राहिली. हा प्रकार थोड्याफार फरकाने आजही आहेच. एखाद्या सिनेनटीने वा नटाने एखाद्या विवाहितेशी वा विवाहिताशी लग्न लावले की आमची नीतिमान वृत्तपत्रेदेखील त्या लग्नाचे कौतुक करणारी छायाचित्रे छापणार. अश्यावेळी द्विभार्याप्रतिबंधक नावाचा कोणता कायदा देशात अस्तित्वात आहे याचा सरकारसकट सार्‍यांना विसर पडणार आणि विचारवंत म्हणविणारी माणसे ह्या प्रकाराच्या समर्थनासाठी आपली बुद्धी झिजवणार. माझा ह्या प्रकाराला आक्षेप नाही. फक्त हे स्वातंत्र्य समाजातल्या सामान्य माणसाने घेतले तर त्याचे असे समर्थन मांडायला कुणी धजावत नाही वा त्यासाठी आवश्यक ते समाजमन घडविण्याची कुणाची तयारी असत नाही, हा यातल्या दुबळ्या पक्षपाताचा भाग आहे एवढेच.

आपली एक परंपरा तर विवाहबाह्य संबंधांचे नुसते कौतुकच नव्हे, तर धार्मिक पातळीवरून तशी गरज प्रतिपादन करणारीच आहे. कौतुकाच्या पातळीवरचे परंपरेतले लाडके नाव ‘राधा’ तर धार्मिक पातळीवरचे नाव ‘भैरवी’ हे आहे. नवव्या शतकाच्या सुमारास महाकवींच्या प्रतिभेने जन्माला घातलेली राधा ही प्रेमाच्या क्षेत्राला भारताने दिलेली अपूर्व अशी देण आहे. ही राधा अनलाची पत्नी असून कृष्णाची प्रेयसी आहे आणि त्यांच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाने गेले एक हजार वर्ष कवींना कविता, चित्रकारांना चित्रे, नृत्यकारांना नृत्याचे विषय, प्रतिभावंतांना प्रेरणा आणि प्रेमिकांना पाठबळ मिळवून दिले आहे. राधा-कृष्णाच्या ह्या प्रेमात वासना वर्ज्य नाही, पण वासना हा प्रेमाचा आधार नाही. शरीर, नाव, सहवास, प्रतिष्ठा यापैकी कशाचाही आग्रह न धरणारी राधा कृष्णावर मनोमन प्रेम करते. हा उत्कट प्रेमाचा आम्ही सर्वश्रेष्ठ अविष्कार मानला.

ह्या उलट आपल्यातल्या शाक्तांनी राधेला शारीर पातळीवर नेऊन भैरवी बनविले. मैथुन हा पूजेचा श्रेष्ठ विधी ठरविला आणि मैथुनातला आनंद हाच ब्रह्मसुखाचा सहचर मानणार्‍या वामाचार्यांनी भैरवीच्या भूमिकेसाठी स्वस्त्रीपेक्षा परस्त्री श्रेष्ठ ठरविली. पत्नीशी केलेले मैथुन धर्मदृष्ट म्हणून विशेष आनंदाचे ठरत नसल्याने प्रेमदृष्ट असलेला परस्त्रीसमागम अधिक आनंदाचा ठरविला. परस्त्रीशी करावयाच्या या समागमाला हिंदूतल्या वामाचार्यांप्रमाणेच बौद्धांच्या वज्रयान आणि सहजयान पंथांनी आपलेसे केले. जगातल्या अनेक धर्मात आलेल्या ह्या वामाचाराने अशा परस्त्रीसमागमनाला धार्मिक प्रतिष्ठा मिळवून दिली आणि वामाचार म्हणताना देखील हा आचार समाजाच्या मोठ्या वर्गाला धार्मिक विधीतला महत्त्वाचा भाग वाटत आला.

जगातल्या सगळ्या सभ्य समाजांनी स्त्रीपुरुषसंबंधांची, मग ते वैवाहिक असले तरी, चर्चा, चिकित्सा टाळण्यावरच भर दिला. धर्म, समाज, परंपरा ह्या साऱ्यांचे मूळ कुटुंबात आणि कुटुंबाची उभारणी स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांच्या नियमावर बेतलेली आहे. परिणामी, सनातनी राहोत नाहीतर सुधारक, ही व्यवस्था अशीची अशीच राखू इच्छिणार्‍यांना ह्या आधाराची चर्चाही नको अन्‌ चिकित्साही नको. असल्या चिकित्सेने ही आधारव्यवस्था कोलमडून जाण्याचीच त्यांना चिंता वाटत आली.

ह्या संबंधांभोवती म्हणूनच गूढ वा गूढरम्य म्हणा हवे तर, वलये उभी करण्यात सार्‍यांनी आपली प्रतिभा खर्ची घातली. ह्या संबंधांची उघड चर्चा पापमूलक ठरविली. त्याबाबतची सूचकता हा त्यातल्या त्यात कमी असभ्य प्रकार मानला. स्वाभाविकच पति-पत्नीच्या शयनगृहाचे दार कायम बंद राहिले. प्रत्येक शतकाने ह्या दाराला नवीनवी आणि मोठमोठी कुलुपे ठोकली. त्याभोवती प्रतिष्ठा, सभ्यता आणि संकोचाच्या भिंती उभ्या केल्या आणि समाजाचे सारे व्यवस्थापक ह्या भिंतींबाहेरचे अदृष्य पहारेकरी बनले. स्त्रीच्या मनाभोवती आणखी एक अदृष्य पहारा उभा राहिला तो तिचाच स्वत:चा. हा पहारा पातिव्रत्याच्या कल्पनेचा होता अन् आहे. परिणामी नवर्‍याच्या असल्यानसल्या यशाची गाणी म्हणणे हा पूजेचा आणि अपयशाची वाच्यता हा पापाचा भाग ठरला. नवर्‍याचा अहंकार अर्थातच ह्या वाच्यतेविरुद्ध राहिला आणि ह्या अहंकारामागे सारी धर्मपरंपरांची व्यवस्था पाठिंब्यासाठी उभी राहिली.

परिणामी पति-पत्नीची शय्या हा चित्तचक्षुकुतूहलाची, चित्रविचित्र कल्पनांची आणि समर्थ वा दुबळ्या, कधी निकोप तर बहुदा विकृत प्रतिभेचा विषय बनली. त्यातून अनेक खुळ्या व मूर्ख कल्पनांचा जन्म झाला. ही शय्या श्रांत मनाला आणि शरीराला रिझवणारी सुखाची शय्या ठरली. मनाचे, शरीराचे तणाव घालवणारी आणि त्यांचे सुखद सैलपण आणणारी बाब ठरली. नव्या उमेदीचे अंकुर फुलविणारी, जोम जागविणारी, नव्या पिढ्या, नव्या रचना जन्माला घालणारी व्यवस्था बनली.

ही व्यवस्था चिकित्सेचा विषय मात्र कधी झाली नाही. परिणामी सगळ्या भाबड्या समजुती कायम झाल्या आणि बंद दाराआडच्या व्यथा, किंकाळ्या, तणाव आणि बलात्कार कोंडलेलेच राहिले. अनेक संशोधकांनी ह्या बंद दाराआडची दु:खे प्रथम बोलकी केली तेव्हा ह्या शय्येबाबतच्या आपण जपलेल्या समजुतींच्या खोटेपणाचा साक्षात्कार समाजाला झाला. ही शय्या निव्वळ सुखाची नाही, ती कुठे क्रौर्याची आणि विटंबनेची, घृणेची आणि तिरस्काराची, फसवणुकीची आणि दुटप्पीपणाची, अहंता गोंजारण्याची आणि त्यासाठी विकारांचा आश्रय घेणारी, कुठे कायम भीतीची तर कुठे निव्वळ वासनेच्या शमनाचीही शय्या आहे ह्या जाणिवेने जुन्या गोंडस कल्पनांना धक्का दिला. पण व्यवस्थेने आपल्या लवचिक अस्तित्वात हे सारे सामावून पुन्हा हसरा मुखवटा धारण केला.

‘स्त्रीच्या लैंगिकतेचा प्रवास आत्म्याच्या अधिष्ठानांशी सुरू होऊन संवेदनेच्या पातळीकडे जातो, पण त्या पातळीवर तो क्वचितच पोहोचतो, तर पुरुषाच्या लैंगिकतेचा प्रवास संवेदनेच्या पातळीवर सुरू होऊन आत्म्याच्या दिशेने जातो. मात्र तो आपल्या मुक्कामावर कधीच पोहचत नाही’ असा एक अभिप्राय ॲलन् के ह्या संशोधनकर्तीने फार पूर्वी नोंदविला आहे आणि तो अनेक भाबड्या विचारवंतांना (त्यात महाराष्ट्रातले स्वत:ला संशोधक मानणारे काही अभ्यासूही सामील आहेत) अतिशय पसंत आहे. पूर्वीच्या ताराबाई शिंद्यांपासून आजच्या प्रोमिला थापरपर्यंत ह्याबाबत एक भाबडे एकमत आहे. ‘पुरुष प्रेम करतो ते संभोगासाठी तर स्त्री संभोग करते ते प्रेमासाठी. केवळ शारीरिक गरज म्हणून स्त्री पुरुषाशी संबंध ठेवूच शकत नाही. उलट पुरुषाला मात्र भावनिक गरज नसतानाही स्त्रीचे शरीर हवे असते’ अशा आशयाच्या कविता याच भाबडेपणातून जन्माला येतात.

ह्या क्षेत्रात संशोधक म्हणविणारांचा वर्गच जर ह्या बाळबोध पातळीवर असेल तर सामान्य माणसांकडून ह्या संबंधांच्या वास्तविक जाणिवांची अपेक्षा करणे हाही चुकीचा प्रकार ठरेल.

महाभारतात शरपंजरी पडलेल्या भीष्माला युधिष्ठिर विचारतो, ‘समागमाचा आनंद पुरुषाला अधिक होतो की स्त्रीला’ (आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी एक नातू आपल्या मरणासन्न आजोबाला हा प्रश्न विचारतो ही बाबही येथे लक्षणीय आहे) भीष्म ह्या प्रश्नाचे उत्तर देताना स्वच्छपणे सांगतो, ‘समागमाचा आनंद स्त्रीला अधिक होतो’ पुढे आपल्या उत्तराच्या स्पष्टीकरणार्थ तो एक कथाही सांगतो.

ह्या क्षेत्रातल्या संशोधनात अग्रपूजेचा मान असलेल्या हेवलॉक एलीसने अॅलन के चा अभिप्राय पुराव्याच्या पातळीवर टिकणारा नसल्याचे स्पष्टपणे नोंदविले आहे. स्त्री-पुरुषांमधील (लैंगिक) संबंधांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि जैविक बाजूंसोबत सामाजिक व नैतिक मूल्यांचेही परिमाण आहे. त्या संबंधांचा क्षमतेएवढाच संस्कारांशी संबंध आहे. म्हणून ह्या संदर्भात एखादे कायम सर्वमान्य सूत्र तयार करणे वा ते तसे असल्याचा आभास निर्माण करणे हीच मुळात अशास्त्रीय बाब आहे.

‘कामतृप्तीचे महत्त्व जितके पुरुषाला वाटते तितके ते स्त्रीला वाटत नाही, कामतृप्तीशिवाय ती वर्षानुवर्षे राहू शकते’ हेही याच संदर्भातले मराठी संशोधकांचे मत बरे असले तरी, खरे नाही. शिवाय ते पुरुषांएवढेच स्त्रियांवरही अन्याय करणारे आहे. असे पुरुष वा स्त्रिया नाहीत असे नाही. परंतु सगळे पुरुष वा सगळ्या स्त्रिया अश्या आहेत वा असतात असे म्हणणे धार्ष्ट्याचे होणार आहे. वयाच्या विसाव्या, तिसाव्या, बत्तिसाव्या वर्षी विधुरत्व आल्यानंतर ते तसेच पत्करून उरलेले आयुष्य वैराग्याने काढणार्‍या पुरुषांची नावे मोठी झाली नाहीत, पण अशा पुरुषांच्या कहाण्या गावोगावी आणि जागजागी आहेत. याउलट पाच पती असतानाही सहाव्या पुरुषावर मन जाणार्‍या स्त्रीच्या गौरवाच्या कहाण्याही (प्रक्षिप्त स्वरूपात का असेना) आपल्यात आहेत. पुरुषांना पुनर्विवाहाची मोकळीक असल्याने ते मोठ्या प्रमाणावर पुनर्विवाह करीत. अशी संधी अकाली वैधव्य आलेल्या स्त्रियांना नव्हती. म्हणून तिच्यावर लादल्या जाणार्‍या एकाकी जगण्याचे परंपरेने पूजनीय स्तोम माजविले. पण समाजाच्या ज्या वर्गात स्त्रियांनाही पुनर्विवाहाचे स्वातंत्र्य होते तेथे ते होतच असत आणि त्याचा उगाच बडिवारही कुणी मिरवीत नसत. मुख्य म्हणजे हेच वर्ग समाजात बहुसंख्येने होते हेही ध्यानात घेतले पाहिजे.

मात्र ह्या संदर्भात नोंदवायचा मुद्दा वेगळा आहे. वर उल्लेखिलेली सहाव्या पुरुषावर मन जाणारी स्त्री ही तमाम स्त्री वर्गाची प्रतिनिधी नसते. तसे वर उल्लेखित शरीरलोभी पुरुषही सर्व पुरुषांचे प्रतिनिधी नसतात. स्त्री व पुरुष यांचेतील शारीरिक स्वरूपाचा भेद नैसर्गिक असला तरी मन व संवेदना यांचेबाबत आढळणारा फरक संस्कारांचाच असतो आणि संस्कारभेद जपणे, वाढवणे, मिरवणे हा सामाजिक प्रक्रियेचाच भाग असतो. आजचा नित्याचा ज्ञात संस्कार झुगारून देणारी स्त्री लैंगिक बाबतीत पुरुषांएवढीच आक्रमक होऊ शकते व तशी शेकडो उदाहरणे शास्त्रज्ञांनी नोंदविली आहेत. पुरुषांनी स्त्रियांवर केलेल्या बलात्काराच्या कथा शेकड्यांनी छापून येतात, पण स्त्रियांनी अल्पवयीन मुलांवर केलेल्या बळजोरीच्या कितीश्या कथा प्रकाशित होतात? एलीसच्या मते दुसर्‍या प्रकारच्या कथांची संख्या पहिल्या प्रकारच्या कथांहून मोठी आहे. त्यांना वाचा नाही एवढेच. मात्र हे सुद्धा स्त्रीचे वा पुरुषाचे खरे किंवा पूर्ण चित्र नव्हे. हे त्यांच्यातील काहींचे चित्र आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

मुळात ह्या संबंधांकडे निकोप दृष्टीने पाहण्याएवढे सकस मन कितीजणांकडे आहे हाच यातला मुख्य प्रश्न आहे. लैंगिकता आणि पाप हे दोन शब्द समानार्थी मानणार्‍या समाजव्यवस्थेत स्त्रीविषयीच्या भावना पूर्णपणे विकारहीन राहणे मुळातच अशक्य आहे. परिणामी ह्या विषयाची सगळी चर्चाच पोरकट, किरटी, विकारवश, अपराधी आणि अपुरी असते.

काही वर्षांपूर्वी कोलकात्याच्या सरकारी कार्यालयात काम करणार्‍या काही महिला कर्मचार्‍यांनी ‘इलस्ट्रेटेड विकली’ला पत्र लिहून ‘अर्धनग्न स्त्रियांची चित्रे किती छापाल, आता जरा अशी पुरुषांची चित्रेही छापा’ अशी जाहीर मागणीच केली होती. ह्या मागणीची संसदेपासून सर्वत्र निलाजरेपणाची मागणी म्हणून हेटाळणी झाली होती. यातली मुख्य बाब अशी मागणी करण्याचे धाडस ही नसून तशी इच्छा असणे, ही आहे. क्रोध, मोह, महत्त्वाकांक्षा इ. सर्व क्षेत्रांत स्त्री पुरुषाएवढाच पुढाकार घेताना दिसते. सर्वच क्षेत्रांत तशी ठळक उदाहरणेही आहेत. अशी स्त्री ‘काम’ ह्या एकाच क्षेत्रात वेगळी आहे असे भासविण्याचा प्रयत्न हा पुन्हा आपल्या पुरुषप्रधान संस्कारांचाच प्रकार असतो. आपल्या व्यवस्थेत पुरुषांना जेवढी संधी उपलब्ध आहे तेवढी ती स्त्रियांना नाही. संधीची कमतरता हे स्त्रीच्या वेगळेपणाचे कारण आहे, परिणाम नव्हे हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे.

संरक्षणाच्या गरजेपोटी स्त्रीचा वेगळेपणा निर्माण होतो, सुरक्षा व भयमुक्ती यासाठी पुरुषाचा आधार ही तिची गरज होते, हा एक निराधार मुद्दाही ह्या संदर्भात अनेकांकडून ऐकायला मिळतो. वास्तव असे की, संरक्षण ही फक्त स्त्रीची गरज नसून ती प्रत्येकालाच लागू होणारी बाब आहे. असुरक्षिततेच्या भयापासून स्त्रीएवढाच पुरुषही मुक्त नाही, हेही येथे नोंदविणे आवश्यक आहे.

स्त्री-पुरुषांच्या मैत्रीसंबंधांचे स्वरूप काय असावे, विशेषत: या संबंधांच्या मर्यादा कोणत्या असाव्या हा सर्वांना नेहमीच पडत असलेला प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी कल्पनाविलासाचा आश्रय घेण्याचे कारण नाही. खुल्या मैत्रीचा मुक्त व्यवहार असलेल्या अनेक मागास जमाती आणि अतिशय प्रगत समाज आज एकाचवेळी जगात अस्तित्वात आहेत. त्यांच्यावर एक नजर टाकली तरी ह्या प्रश्नाचे उत्तर गवसणारे आहे. विवाहपूर्व लैंगिक स्वातंत्र्य देणारे आदिवासींचे अनेक समूह भारतात व भारताबाहेर आहेत. वयात आलेल्या व येऊ पाहणार्‍या मुलामुलींना लग्नाआधी रात्रीचे एका मध्यवर्ती निवारागृहात (घोटुल) ठेवण्याची व तेथे त्यांना लैंगिक शिक्षणासह जीवनाचे सगळे व्यवहार शिकविण्याची व्यवस्था ह्या समूहांत आहे. मध्यप्रदेशातील बस्तर ह्या महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यांतील बडा माडिया व माडिया जमातींत ह्या व्यवस्थांचे अवशेष अजून टिकले आहेत आणि लैंगिक स्वातंत्र्य असतानाही ह्या समाजातील मुलामुलींत अनाचार बोकाळल्याचा पुरावा नाही. शिवाय या समाजात बलात्कार, सक्ती यांचे प्रमाणही दखलपात्र नाही. मुलींना नवरा निवडण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या फसवणुकीचाही प्रकार नाही.

विवाहानंतर हे स्वातंत्र्य संपते, पण घटस्फोट, काडीमोड घेऊन नवे घरठाव करण्यावर मात्र निर्बंध नाही. (माझा ह्या जमातींशी बराच काळ संबंध राहिला. त्यातल्या विवाहित स्त्रीला विवाहपूर्व/ विवाहबाह्य संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नांची तिने दिलेली उत्तरे येथे महत्त्वाची ठरावी. आपल्या नवर्‍याशिवाय वस्तीतल्या अनेकांशी तिचा लग्नाआधी संबंध घडल्याचे तिने सांगितले. आज त्या पुरुषांकडे पाहताना मनात काय येते असे विचारता ती म्हणाली, काही नाही. त्या सार्‍यांमधूनच मी माझा नवरा निवडला आहे.)

पाश्चात्त्य औद्योगिक समाजातून स्त्री-पुरुषांच्या अधिक मुक्त संबंधांचे चित्र पाहत असतानाच त्या समाजातून घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याची आणि घटस्फोटित मातापित्यांच्या मुलांची आबाळ होत असल्याची चर्चाही आपण ऐकत असतो. मात्र हे समाज त्यामुळे मोडून गेल्याचे चित्र नाही. साहित्य, कला, संगीत, क्रीडा यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांची प्रगती तेवढीच गतिशील आहे. औद्योगिकीकरण आणि त्याच्या जोडीने येणारे व्यक्तिस्वातंत्र्य यांचा हा परिणाम अटळ म्हणूनच त्याकडे पाहावे लागणार आहे.

एखाद्या समाजात २५ टक्क्यांएवढे घटस्फोट होतात याचा अर्थ न पटल्यामुळे तेवढ्या कुटुंबातील स्त्री-पुरुषांनी कुढत जगण्यापेक्षा वेगळे होण्याच्या निर्णय घेतला असाही करता येतो. उरलेली ७५ टक्के कुटुंबे पटवून घेत वा एकमेकांना सावरून आहेत असाही हा अर्थ होऊ शकतो. पटो वा न पटो, माणसे आपली कुढत जगत आहेत ह्या आपल्या चित्राहून पाश्चात्त्यांचे खुले चित्र एकाएकी टाकावू ठरविण्याचे कारण नाही. शिवाय आपल्याकडील परित्यक्त्यांचे प्रमाण पाश्चात्यांच्या घटस्फोटांच्या संख्येप्रमाणेच तपासून पाहण्याजोगे आहे. पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक तालुक्यात प्रत्येकी किमान पाचशेवर परित्यक्तांचा प्रश्न उभा आहे. याची कारणे वेगळी असली तरी आपल्याही समाजात हा बेकायदा घटस्फोटाचा प्रकार आता दुर्लक्षिण्याजोगा राहिलेला नाही हे येथे नोंदवायचे आहे.

समतेप्रमाणेच स्वातंत्र्याचे मूल्यही माणसांना काही मोल मागत असते. काही सोडायला भाग पाडत असते. ज्यांनी ही तयारी दाखविली त्या सगळ्यांना अनैतिक व स्वैराचारी ठरवून मोकळे होण्याचा ठोकळेबाज प्रकार करण्याचे कारण नसावे. मार खात, खस्ता काढीत आणि मनाचा सदैव कोंडमारा सहन करीत (आणि तो कोंडमारा आहे याची खूपदा जाणीवही नसणारी) जगणारी आपल्या समाजातील स्त्री आणि स्वत:च्या स्वातंत्र्याचा आग्रह धरीत त्याविरुद्ध जाणार्‍या व्यवस्था नाकारणारी पाश्चात्त्य स्त्री यातले कोणते चित्र अधिक आदरणीय आहे हा विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे. कारण ह्या चित्रापासून आपणही आता फारसे दूर नाही.

बालविवाहांचा आणि संयुक्त कुटुंबाचा काळ आता मागे पडला आहे. अल्पवयीन मुलामुलींत समज येण्याआधीच त्यांचे पति-पत्नींचे नाते निर्माण झाल्याने येणारी मानसिकताही आता राहिलेली नाही. प्रौढ आणि अतिप्रौढ विवाहांच्या आजच्या काळात स्त्री-पुरुषांच्या परस्परांबाबतच्या व्यक्तिगत पसंतीला न्याय्य महत्त्व आले आहे. याच काळात विवाहपूर्व मैत्री रुजू लागली आहे आणि ती सहजगत्या घेण्याइतपत मानसिकताही वाढू लागली आहे. सारांश आपल्याकडे अश्या मैत्रीला पूर्वी नव्हता तो अनुकूल काळ व वातावरण आता निर्माण होत आहे.

पती व पत्नी दोघेही नोकरीत असतील तर दोघांचा सगळा दिवस वेगवेगळ्या सहकार्‍यांच्या सोबत जातो. या ठिकाणची एक चमत्कारिक मानसिकताही लक्षात घेण्याजोगी आहे. पती व पत्नीत (सुद्धा) एकमेकांना गृहीत धरून वागण्याचा जो बेफिकीर प्रकार असतो तो ह्या सहकार्‍यांत अभावानेच आढळतो. आपल्या पत्नीच्या बाबतीत बेफिकीर असणारा नवरा त्याच्यासोबत काम करणार्‍या स्त्रियांशी आदराने वागतो. हाच प्रकार स्त्री-कर्मचार्‍यांबाबतही खरा आहे. जागा नोकरीची असेल नाहीतर पंचतारांकित क्लबातली, हॉटेलातली किंवा रोजगार हमी योजनेच्या कामाची, हा प्रकार सर्वत्र अनुभवाला येतो. यातून विवाहपूर्व मैत्रीएवढीच विवाहबाह्य मैत्रीलाही अनुकूलता लाभली आहे. पुढल्या काळात ती आणखी वाढत जाणार आहे. ती रोखणे वा थांबवणे हा त्यावरचा उपाय नसल्याने (व तो अंमलात येणेही अशक्य असल्यामुळे) ही मैत्री नव्या संदर्भात निकोप मनाने समजून घेणे हीच आजची व उद्याची गरज आहे. ह्या मैत्रीला असणार्‍या मर्यादांबाबतही काही अटळ गोष्टी स्पष्टपणे नोंदविण्याची गरज आहे. समाजाने ह्या संदर्भात घालून दिलेल्या पूर्वापार मर्यादांचा पुढील काळात कुणी आदर करील असे समजण्याचे कारण नाही. आपली सामाजिक बंधने आणि त्यामागे असणारे समाजमनस्कतेचे वजन हे सारेच आता बर्‍यापैकी शिथिल आणि दुबळे झाले आहे.

सगळ्या समाजाची वाटचालच समूहमनस्कतेकडून व्यक्तिकेंद्री व्यवस्थेकडे सुरू आहे. (ते प्रगतीचे लक्षण तर आहेच, शिवाय ते कायदा व अधिकारांच्या व्यवस्थेलाही सुसंगत आहे) परिणामी ह्या मर्यादांचा विचार संबंधित व्यक्तींनाच करावयाचा आहे. त्यातून येणार्‍या परिणामांची जबाबदारीही व्यक्तींनीच आपापल्या पातळीवर स्वीकारायची आहे. ह्या जबाबदारीची जाणीव हीच ह्या संबंधांची खरी मर्यादा असेल. अशी समर्थ जाणीव सर्वच स्त्री-पुरुषांत निर्माण होऊ शकेल काय? तशी ती नसली तर स्वैराचार, अनाचार यांना ते निमंत्रण ठरेल काय? असे प्रश्न याबाबत विचारले जाऊ शकतात. त्याचे उत्तर एवढेच, व्यक्तिगत जबाबदारीच्या जाणिवा याही आजच्या सामाजिकतेच्या जाणिवेप्रमाणेच असणार नाहीत. तशा कोणत्याही जाणिवा सार्वत्रिक नसतात व तशा अपेक्षा बाळगणेही व्यर्थ आहे.

कायद्यासह सगळी सामाजिक बंधने त्यांच्या जाणिवांसकट असतानाही अनाचार, स्वैराचार, बलात्कार, बळजोरी ह्या गोष्टी आज आहेतच. उद्याच्या अवस्थेत आजच्या बंधनांसोबत व्यक्तिगत जबाबदारीच्या जाणीवेचे प्रभावी स्वयंशासन असेल. ते मर्यादा असेल आणि स्वातंत्र्याचाही तो भाग असेल. शिवाय ज्या समाजांनी स्त्रीपुरुषांचे स्वातंत्र्य मान्य केले तेथे केवळ अनाचारच माजला असाही पुरावा नाही. आदिवासींच्या ज्या जमातीत विवाहपूर्व लैंगिक स्वातंत्र्य आहे तेथेही स्वैराचार नाही. पसंती, मैत्री, समानता, आदर हा मानवी भाग मागास समजल्या जाणार्‍या ह्या वर्गातही आहेच.

सुशिक्षित, स्वयंपूर्ण आणि आत्मभान असणार्‍यांना असा निर्णय स्वत: घेण्यात अडचण येणार नाही. (शिवाय उद्याचे स्त्रियांचे वर्ग पुरुषांएवढेच आर्थिकदृष्ट्याही स्वयंपूर्ण असतील) त्यामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीत कुटुंबाचे आजचे रूप बदलेल पण ते तुटण्याची शक्यता असणार नाही. नवर्‍याने कमवायचे, संरक्षण द्यायचे आणि घरातल्या इतरांनी त्याच्या कलाने जगायचे ही कुटुंबाची आजची आपली अवस्था आदर्शही नव्हे. परस्परांच्या स्वातंत्र्याला मान देत, बरोबरीच्या नात्याने चालणारे स्त्रीपुरुषांचे सहजीवन हा येणार्‍या काळातील लोकशाही कुटुंबाचा आदर्श आहे व त्याच्या स्वागताची मानसिकता तयार करणे हे आमचे काम असेल.

शिवाय ह्या चर्चेला (व एकूणच समस्येला) फार दिवसांचे आयुष्य नाही, हेही येथे नोंदविणे आवश्यक वाटते. गेल्या काही वर्षात ह्या संदर्भातले समाजाचे जुने आग्रह लोपू लागले आहेत व त्यांची जागा कुठे उदासीनतेने, तर कुठे बेफिकीरीने घेतली आहे. काही जागा अश्याही आहेत की जेथे ह्या संबंधांकडे तटस्थपणे वा समजुतीने पाहिले जाऊ लागले आहे. नव्या पिढीची मानसिकता उदार आहे. आजच्या पिढीला जाणवणारे ह्या संदर्भातले तणाव हेही ह्या बदलत्या वास्तवाचेच द्योतक आहेत. समाजाचे, कुटुंबाचे व नीतिनियमांचे आग्रह यांचे स्वरूप बदलत असल्याचे हे लक्षण आहे. म्हणून हे तणाव पुढल्या किती पिढ्यांपुढे उभे राहतील हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारून पाहण्याजोगा आहे.

स्वातंत्र्य की सुरक्षितता हा एक सनातन वाद आहे. सुरक्षितता स्थैर्य देते, तर स्वातंत्र्य प्रगतिशील गतिमानता. यापैकी काय घ्यायचे ह्या प्रश्नाचे इतिहासाने दिलेले उत्तर ह्या दोहोतल्या समन्वयाचे आहे. आम्हाला स्वातंत्र्यासोबत स्थैर्यही हवे.

स्वातंत्र्याच्या प्रत्येक पावलागणिक आपण सुरक्षिततेच्या व स्थैर्याच्या नव्या व्यवस्था निर्माण करीत असतो. स्थैर्याला झेपेल असे स्वातंत्र्याचे पाऊल पुढे टाकायचे आणि स्वातंत्र्य पेलून धरणारी सुरक्षितता उभी करायची असा हा प्रवास आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या ह्याच गरजेतून संयुक्त कुटुंबाची सुरक्षित व्यवस्था मागे पडली व त्याची जागा लहान कुटुंबांनी घेतली. विम्यासारख्या सुरक्षेच्या योजना ह्या नव्या अवस्थेची गरज म्हणून पुढे आल्या. वृद्धाश्रमासारख्या योजनाही याच सुरक्षेचा भाग म्हणून निर्माण झाल्या. व्यक्तिस्वातंत्र्याचे नवे उन्मेष मरू न देण्याची खबरदारी प्रत्येक पिढीने प्रसंगी फार मोठे मोल चुकवून घेतली आहे.

स्त्रीपुरुषसंबंधांची आजची अवस्था व्यक्तिस्वातंत्र्याला व विशेषत: स्त्रीच्या स्वातंत्र्याला फारशी अनुरूप नाही. शिक्षण व त्यामुळे येणारे आत्मभान या दोहोंच्या अभावी स्त्रीने ही अवस्था आजवर चालवून घेतली. ती पुढेही अशीच चालेल ह्या भ्रमात कोणीही राहण्याचे कारण नाही. शिवाय संख्येने पन्नास टक्क्याएवढा असलेला समाजाचा हा मोठा घटक तसा ठेवण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे व म्हणूनच त्याचे अपयशही अटळ असेच आहे.

स्वातंत्र्याच्या नव्या वातावरणातल्या मैत्रीचा आधार परस्पर समजूत आणि परस्परांविषयीचा आदर हा असेल आणि दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रभाव ह्या संबंधाचे स्वरूप निश्चित करणारा असेल.