विषय «जीवनशैली»

पैशाने श्रीमंती येते का?

जगातल्या अनेक देशांपैकी भ्रष्टाचार ज्या देशांमध्ये अधिक आहे त्यांपैकी आपला एक देश आहे. जे भ्रष्टाचार करतात ते स्वतः श्रीमंत व्हावे म्हणन करतात. भ्रष्टाचाराने श्रीमंती आली नसती किंवा आपल्याला श्रीमंती येते असे वाटले नसते तर भ्रष्टाचार कोणी केला असता काय?

श्रीमंती दोन प्रकारची असते; पहिली असते वैयक्तिक श्रीमंती आणि दुसरी असते सार्वजनिक श्रीमंती. वैयक्तिक श्रीमंती म्हणजे धन, दौलत, इस्टेट वगैरे. पण वैयक्तिक श्रीमंती असलेली व्यक्ती दरिद्री असू शकते. मला एक कुटुंब माहीत होते. ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती. पण दोन वेळेच्या जेवण्याचेसुद्धा त्यांना वांधे होते.

पुढे वाचा

इतिहासजमा ?

(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार)

सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.

पुढे वाचा

‘व्हॉटेव्हर’

मध्ययुग – अंधकारयुगानंतर आपण विवेकाचे युग (The Age of Reason) घडवून आपले जग बदलून टाकले. अधूनमधून आपण रक्तलांच्छित युद्धेही लढलो, पण सोबतच साहित्य, कला, विज्ञान, वैद्यक यांत उत्तम कामेही केली. कायद्याचे राज्य बऱ्याच पृथ्वीतलावर प्रस्थापित झाले. बऱ्याच जागी लोकशाही व्यवस्थाही घडल्या. आपल्या एका पिढीत ऐहिक दारिद्र्याचे परिणाम ज्या प्रमाणात कमी झाले, तेवढे आधीच्या संपूर्ण मानवी इतिहासात झाले नव्हते. राजकीय व आर्थिक व्यवस्थांच्या वापराने आपण नात्झी व सोविएत हुकुमशाह्यांवर मात केली. हे सारे असूनही आज आत्मविश्वासाचा अभाव, आपल्या कृतींच्या परिणामकारकतेवरचा विश्वास क्षीण होणे, निराशावाद, अशाने आपला समाज ग्रस्त आहे.

पुढे वाचा

हवामानबदलाचे नीतिशास्त्र

हवामानबदलाबाबत आपण काय करावे, हा नैतिक प्रश्न आहे. विज्ञान, त्यात अर्थशास्त्रही आले, हे आपल्याला हवामानबदलाची कारणे आणि परिणाम सांगू शकेल. आपण काय केल्याने काय होईल, हेही विज्ञान सांगू शकेल. पण काय करणे इष्ट आहे, हा मात्र नीतीच्या क्षेत्रातला प्रश्न आहे.

अशा प्रश्नांच्या विचारी उत्तरांत वेगवेगळ्या मानवसमूहांच्या इच्छा-आकांक्षांमधल्या संघर्षांचा विचार करावा लागतो. जर हवामानबदलाबाबत काही करायचे असेल तर आजच्या माणसांपैकी काहींना (विशेषतः सुबत्ता भोगणाऱ्यांना) त्यांच्यामुळे होणारी हरितगृहवायूंची (यापुढे GHG उर्फ ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जने कमी करावी लागतील नाहीतर भावी पिढ्यांना सध्यापेक्षा गरम जगात भकास जिणे जगावे लागेल.

पुढे वाचा

मानवी स्वभाव व डार्विनवाद (१)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), या इंग्लंडमधील मुक्त विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्या होत्या. सध्या त्या जैवनीतिशास्त्र (Bioethics) या विषयाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन, येथे प्रपाठक (Reader) आहेत. त्यांचे द स्केप्टिकल फेमिनिस्ट हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत.

पुढे वाचा

आहेरे / नाहीरे

@ सिलिकन व्हॅली, कॅलिफोर्निया
(सॅन फ्रान्सिस्कोपासून आग्नेयेकडे पसरलेला शहरी पट्टा म्हणजे सिलिकन व्हॅली. विसाव्या शतकाच्या शेवटी ही जगाची तंत्रवैज्ञानिक राजधानी होती.)

कॉनी टॉर्ट २५ वर्षांची अविवाहित माता आहे, चार मुलांची. ती एका कुबट वासाच्या, भेगाळलेल्या भिंतींच्या, खिडक्यांना घोंगड्या लटकवलेल्या खोलीसाठी महिना ४०० डॉलर्स देते. शेजारची ॲडोबी सिस्टिम्स इं. ही सॉफ्टवेअर कंपनी वर्षाला एक अब्ज डॉलर्सची कमाई करते. “सिलिकन व्हॅली? नाही ऐकलं हे नाव,” कॉनी म्हणाली. तिला महिना ५०० डॉलर्स अपंगत्व भत्ता मिळतो. “इथले सगळेच जण तंत्रवैज्ञानिक पेशात नाहीत. आम्ही खूपसे लोक पोरांना जेमतेम जगवतो.”

पुढे वाचा

वैजनाथ स्मृती

(कालचे सुधारक : डॉ. श्री. व्यं. केतकर)

आजच्या जगातील अनेक चालीरीती मनुष्यप्राण्याच्या जंगली काळात उत्पन्न झाल्या आहेत. त्या चालीरीती व त्यांचे समर्थन करणारे कायदे नष्ट झाले पाहिजेत. आणि त्यासाठी जी नवीन नियममाला स्थापन व्हावयाची त्याचा प्रारंभयत्न ही वैजनाथ स्मृती होय.

जगातील प्रत्येक मानवी प्राण्याच्या इतिकर्तव्यता आत्मसंरक्षण, आत्मसंवर्धन आणि आत्मसातत्यरक्षण या आहेत. आत्मसंरक्षण मुख्यतः समाजाच्या आश्रयाने होते. आत्मसंवर्धन स्वतःच्या द्रव्योत्पादक परिश्रमाने होते व आत्मसातत्यरक्षण स्त्रीपुरुषसंयोगाने होते; तर या तिन्ही गोष्टी मानवी प्राण्यास अवश्य आहेत. आत्मसंरक्षण आणि आत्मसंवर्धन यासाठी शास्त्रसिद्धी बरीच आहे. कारण, रक्षणसंवर्धनविषयक विचार दररोज अवश्य होतो.

पुढे वाचा

जाती आणि आडनावे

नोव्हेंबर २००० चा आजचा सुधारक अनेक विवाद्य विषयांनी रंगलेला आहे. ‘जातींचा उगम’, ‘आडनाव हवेच कशाला?’ हे सांस्कृतिक विषयांवरील लेख, ‘सखोल लोकशाही’, ‘दुर्दशा’, ‘फडके’ आदी राजकीय व आर्थिक विषयांवरील लेख विचारपरिप्लुत, वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. त्यांचा परामर्श दोन भागात घ्यावा लागेल.

‘गांवगाडा’ हे त्रिंबक नारायण आत्रे यांचे पुस्तक १९१५ साली म्हणजे पंचाऐंशी वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. त्यातील विचारांशी आ.सु. सहमत नसल्याची टीप लेखाच्या शेवटी आहे. [हा गैरसमज आहे —-संपा.] ते योग्यच आहे. आज जातिसंस्था विकृती उत्पन्न करीत आहे, यातही शंका नाही. पण जातींच्या उगमाची आत्र्यांनी केलेली मीमांसा रास्त म्हणावी लागेल.

पुढे वाचा

विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती

[कॅनडामधील एकताच्या जानेवारी १९९९ अंकामध्ये ‘सुधारकाची सात वर्षे’ हा प्राध्यापक प्र. ब. कुलकर्णी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. प्रा. प्र.ब. कुळकर्णी ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे सहसंपादक असून संस्थापक प्रा. दि. य. देशपांडे यांचे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. आजचा सुधारक’ मासिक विवेकवाद किंवा बुद्धिवादी विचारसरणीचे, इंग्रजीत “रॅशनॅलिझम”चे म्हणून ओळखले जाते. ह्यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आणि समतावादी दृष्टिकोन समाविष्ट आहे. प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा लेख, तसेच ‘आजचा सुधारक’चे काही अंक वाचनात आले. प्रा. प्र. ब. कुळकर्णी कामानिमित्त अमेरिकेत आले असताना त्यांच्याशी या विषयावर चर्चात्मक गप्पा करायची संधी मिळाली.

पुढे वाचा

मी आस्तिक का आहे?

कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.

पुढे वाचा