“म्हणजे एकंदरीतच वेदान्त हा मानवी कल्याणाचा विचार दिसतो. तिथे ‘हिंदू’ ‘इस्लाम’ या लेबलांना स्थान नाही. हे पाहता सतत मनात येणारा एक प्रश्न तुला विचारतो, ‘संघपरिवाराला विवेकानंद एवढे जवळचे कसे काय वाटतात व डाव्या पुरोगामी मंडळींना ते निदान कालपर्यंत तरी जवळपास पूर्णत: अस्पृश्य होते हे कसे काय?’
‘हे बघ मित्रा, समाजातील उच्च स्थान, प्रभाव व कर्तृत्व यांनी फार मोठ्या असलेल्या व एरवी अत्यंत आदर वाटावा अशा अनेक व्यक्ती विचारांच्या उदारतेच्या प्रांतात त्या त्या परिस्थितीच्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत असे दुर्दैवाने घडताना अनेकदा दिसते खरे.