गेली कित्येक वर्षे मी स्वतःला rationalist म्हणवत आलो आहे. पण ‘rationalist’ या शब्दाच्या अर्थाची फोड मी अजून पुरेशी करू शकलो नाही असे मला वाटते. ती करण्याचा आणखी एक प्रयत्न मी करणार आहे.
त्या शब्दाची व्युत्पत्ति पाहता तो शब्द लॅटिन भाषेतील ‘ratio’ या शब्दापासून बनलेला आहे असे लक्षात येते. ‘Ratio’ म्हणजे reason; पण ‘reason’ म्हणजे काय हे सांगणे बरेच कठीण आहे. कारण ‘reason’ चे इंग्रजीत अनेक अर्थ आहेत, आणि त्या सर्वांच्या अर्थाचा शब्द मराठीत (किंवा संस्कृतात) नेमका सापडत नाही. ‘Reason’ च्या अर्थाचा चटकन् सुचणारा शब्द म्हणजे बुद्धि.