अग्नीला साक्ष ठेवून सध्याचे भारतवर्षीय त्रैवर्णिक हिंदू लोक विवाह-संपादन करतात. अग्नीची साक्ष नसेल, तर तो विवाह धर्म्य समजला जात नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, अग्नीचा व विवाहाचा संबंध काय? . . .
अशा प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे रानटी आर्यांची पुरातन काळी सामाजिक व भौम स्थिती काय होती ते पाहावे लागते.
ऋषींचे अतिप्राचीन पूर्वज वानरीय पाशवावस्थेत असताना, वानरांप्रमाणेच त्यांनाही झाडे, पर्वतांचे कपरे, गुहा वगैरेंच्या आश्रयाने राहून हिंस्र पशृंपासून, वादळांपासून व थंडीवाऱ्यापासून आपला बचाव मोठ्या संकटाने करावा लागे. . . . हरणे वगैरेंना बचावाकरिता शिंगे, दाढा, टापा वगैरे सहज शस्त्रे तरी असतात, मनुष्यांना तीही नाहीत.