विषय «इतर»

ऊर्जेचे नियमन

ऊर्जा म्हणजे निसर्गातल्या शक्तीचेच एक रूप आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये. उष्णता, वीज, पाण्याचा साठा हे ऊर्जेचे अविष्कार आहेत. ऊर्जेचा संचय (concentration) जर प्रमाणाबाहेर होऊ लागला तर ती विध्वंसक आणि प्रलयकारी होऊ शकते. त्यासाठी तिचे विरेचन किंवा नियमन होणे आवश्यक असते. उष्णता प्रमाणाबाहेर वाढली तर तिच्या भक्ष्यस्थानी काय काय पडेल ते सांगता येत नाही. नद्यांना पूर आले किंवा धरणे फुटेपर्यंत पाणी साठले तर हाहाकार होतो. तसाच प्रकार विजेच्या लोळाचा! ऊर्जेचे विरेचन (वाटप) होऊन प्रलय टळण्यासाठी जी प्रक्रिया होते तिचाही काही निसर्गनियम आहे.

पुढे वाचा

स्फुट लेख -आजचा सुधारक हा आपला सुधारक कसा वाटेल? (२)

श्री. खिलारे आणि श्री. नानावटी यांची मागच्या म्हणजे नोव्हेंबर १८ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली पत्रे वाचून मनात काही विचार आले ते सगळ्या वाचकांपुढे ठेवीत आहोत.
लेख कोणी लिहिला आहे ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे आणि केवळ त्यातील विधानांचा, मतांचा आणि सूचनांचा परामर्श घेणेच योग्य होईल असे जे आम्ही पूर्वी म्हटले होते त्या आमच्या मतांत फरक झालेला नाही. पत्रलेखकांनी पाषाणच्या डॉ. कांबळे ह्यांच्या दवाखान्याचे उदाहरण दिले आहे. डॉ. कांबळे ह्यांच्या ठिकाणी आवश्यक ते वैद्यकीय कौशल्य असेल तर त्यांचा दवाखाना कोणत्याही वस्तीत नीट कसा चालेल हे आम्ही सर्वांनी बघितलेच पाहिजे.

पुढे वाचा

नागवणुकीचे धार्मिक तंत्र

गुलामगिरी, पुरोहितशाही, वसाहती, साम्राज्यशाही व भांडवलशाही हे ऐतिहासिक अनुक्रमाप्रमाणे मानवांनी मानवांच्या केलेल्या नागवणुकीचे चार प्रकार इतिहासास ओळखीचे आहेत. यांत गुलामगिरी व वसाहती साम्राज्यशाही निदान प्रथमावस्थेत तरी पाशवी बळावरच आधारलेल्या असतात. लोकशाही जन्मास येण्याच्यापूर्वीच भांडवलशाही अस्तित्वात आल्याकारणाने, भांडवलशाही व शासनसत्ता या दोघांची प्रेरकशक्ती एकाच वर्गात एकवटली होती असे चित्र कालपरवापर्यंत नजरेस पडत असे. इतरांच्या मानाने पुरोहिती नागवणुकीच्या तंत्राची वाटचाल जरा निराळी आहे. धर्म आणि पुरोहित या संस्थांचा उगम प्राचीन मानवाला अदृष्ट शक्तीबद्दल वाटणारे भय आणि पूज्यबुद्धी ह्यांत असतो. यामुळे जी नागवणूक इतर क्षेत्रांत बहुतांशी पाशवी शिरजोरीवर चालत असते ती धार्मिक क्षेत्रात मानसिक शिरजोरीवरच पुरोहितवर्गास साधावी लागते.

पुढे वाचा

विवेकवाद्याच्या नजरेतून आध्यात्मिक शिक्षण

भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासूनच ते शिक्षणपद्धतीत किंवा त्याच्या आशयात फरक करणार अशी चिह्न दिसत होती. उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांच्या सरकारने त्या दिशेने काही पावले पूर्वी टाकली होती. शिक्षणविषयक धोरण ठरविणे हे कोणत्याही एका पक्षाचे कामच नव्हे. राजकीय पक्षांचा अधिकार ज्यावर चालणार नाही अशा एखाद्या स्वायत्त मंडळाकडे हा विषय सोपविण्यात आला पाहिजे. राज्य कोणत्याही पक्षाचे असो, शिक्षणाच्या धोरणात बदल करून चालणार नाही असे देशाने ठरविले पाहिजे. नाहीतर दहा-पंधरा दिवसांसाठी एखाद्या पक्षाचे सरकार येणार आणि ते धोरण बदलणार ! भाषेतील व्याकरणाचे नियम जसे पुन्हा पुन्हा बदलता येत नाहीत, त्याप्रमाणे शिक्षणाचे धोरणसुद्धा राज्यकर्त्या पक्षाच्या लहरीवर सोडता येत नाही.

पुढे वाचा

ऐसी कळवळ्याची जाती विरोध असुनी कायम भक्ती

यदुनाथ थत्ते यांचे कुमारसाहित्य मी पौगंडावस्थेत वाचले. त्या वयात प्रभाव टाकणारया साने गुरुजी, खांडेकर यांचे साहित्य आवडावे असा तो काळ होता. याच परिवारातले यदुनाथ थत्ते हे नाव त्यांच्या लेखनामुळे लक्षात राहिले. त्या काळी मी कुमार साहित्य-चळवळीत भाग घेत होतो; राष्ट्रीय वृत्तीच्या कुमार लेखकांच्या चळवळीकडे माझा ओढा होता. त्यामुळे त्याच प्रकारचे साहित्य अधिक वाचले जायचे. यदुनाथजींचे नाव माझ्या लक्षात राहिले ते याच संदर्भात. विशेषतः त्यांचे ‘‘पुढे व्हा’ हे पुस्तक त्या वयात मला फार परिणामकारक वाटले. त्या वयातील कुमारांना या पुस्तकाने उमलत्या अवस्थेतच त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन मिळवून दिले.

पुढे वाचा

जातधंद्याची काटेरी कुपाटी नाहशी…

सध्यां जातिधर्माप्रमाणे कुणबिकीच्या आउतापैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा एवढेच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेगवेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारे किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तन्हा होते. त्यामुळे त्यांतली व एकमेकांच्या ध्यानात येत नाहींत व सर्वच आउते अगदी निकृष्ट अवस्थेत पोहचली आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेत शिकविले तर हत्यारें एकाच्या देखरेखीखाली तयार होऊन ती सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बघून त्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल.

पुढे वाचा

विवेकाचे अधिकार

विवेकाचे, म्हणजे reason चे, दोन अधिकार सर्वमान्य आहेत असे म्हणायला हरकत नाही. (१) एखादे विधान स्वयंसिद्ध (self evident) आहे हे ओळखणे. उदा. ‘दोन राशी जर तिस-या एका राशीबरोबर असतील, तर त्या परस्परांबरोबर असतात (२) अनुमाने करणे, म्हणजे एक विधान जर खरे असेल, तर त्यापासून निगमनाने व्यंजित होणारी विधानेही खरीच असतात असे ओळखणे. उदा. सर्व मनुष्य मर्त्य आहेत आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे हे संयुक्त विधान जर खरे असेल, तर ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे हे विधानही खरेच असले पाहिजे, ते असत्य असू शकत नाही.

पुढे वाचा

माफ करा! माझे मत बदलले आहे — माझी वर्तमान भूमिका

‘स्वतोमूल्य’ या विषयावरील माझे मत बदलले आहे हे वाचकांना कळविण्यासाठी मुद्दाम हे टिपण लिहिले आहे. चार-सहा महिन्यांपूर्वी स्वतोमूल्य विषयनिष्ठ, म्हणजे objective आहे, ते जाणणारी सारी मने, सर्व ज्ञाते, नाहीसे झाले तरी ते अबाधित राहणार आहे, असे मी मानीत असे. थोडक्यात स्वतोमूल्याविषयी मी G.E. Moore चे मत स्वीकारीत असे. मूर म्हणतो की स्वतोमूल्यवान वस्तू म्हणजे आपल्याला केवळ तिच्याखातर अभिलषणीय वाटावी अशी वस्तू, तिच्यामुळे आपल्याला हवे असलेले अन्य काही प्राप्त होते म्हणून नव्हे. आता मूरचे म्हणणे असे होते की जगातले सर्व विषयी (किंवा ज्ञाते) नाहीसे झाले तरी स्वतोमूल्यवान वस्तूचे स्वतोमूल्य अबाधित राहते.

पुढे वाचा

दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (२)

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश प्रशासकांच्या जागी भारतीय प्रशासक आले पण प्रशासनाचे स्वरूप जवळपास तेच राहिले. ब्रिटिश आराखड्यावर भारतीय संसदीय लोकशाहीचे स्वरूप आखले गेले. भारतीय प्रशासकीय सेवा, न्यायसंस्था, सैन्यदल, शिक्षणपद्धती सगळे जवळपास त्याच स्वरूपात पुढे चालू राहिले. वर्माच्या मते हे सातत्य टिकले कारण मध्यमवर्गाची स्वातंत्र्याची कल्पनाच ती होती. ब्रिटिशांची हकालपट्टी त्यांना हवी होती पण राज्यकारभाराची पद्धत तीच हवी होती.
१९४७ च्या सुरुवातीचा हा मध्यमवर्ग संपूर्ण लोकसंख्येच्या १०% सुद्धा असेल नसेल. वरती मूठभर अतिश्रीमंत उद्योजक, भांडवलदार, जमीनदार आणि राजघराण्यातले काही लोक आणि खालती प्रचंड संख्येचे शेतमजूर, कष्टकरी, कामगार, चतुर्थ श्रेणीतील नोकरवर्ग वगैरे.

पुढे वाचा

स्फुट लेख

(१) फक्त शेतक-यांनाच वीज मोफत का?
शिवसेनाप्रमुखांनी शेतक-यांना दिल्या जाणा-या विजेबद्दल त्यांच्याकडून कोठलाही मोबदला घेऊ नये असे फर्मान काढल्याबरोबर आमच्या शासनाची तारांबळ उडाली. महाराष्ट्र राज्य विद्युन्मंडळाच्या कर्जबाजारीपणाची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेली आहेत. थोड्या थोड्या रकमांसाठी त्याला बँकांकडे याचना करावी लागत आहे. सार्वजनिक मालकीकडून खाजगीकरणाकडे आपल्या समाजाची वाटचाल होत असल्याची चिह्न दिसत असताना शिवसेनाप्रमुखांच्या आदेशामुळे शासन चांगलेच पेचात सापडले आहे.
जोपर्यंत खाजगी मालकी कायम आहे, खाजगी मालकीवर आपला विश्वास आहे तोपर्यंत कोणालाही कोणतीही वस्तु फुकट न मिळणे योग्य नव्हे काय? आपली खाजगी मालमत्ता वाढविण्यासाठी ज्या-ज्या वस्तू आणि सेवा आपण वापरतो त्या दुस-याकडून घेतल्या असल्यास त्यांचा मोबदला ज्याचा त्याला मिळाला पाहिजे.

पुढे वाचा