विषय «इतर»

पुदुकोट्टाई – एक अनुभव

पुदुकोट्टाई हा एक तामिळनाडू राज्यातील जिल्हा. हा भारताच्या अगदी आग्नेयेला, बंगालच्या उपसागराला लागून आहे. अत्यंत मागासलेला जिल्हा. गरिबी, निरक्षरता अगदी भारतीय परिमाणानेही भरपूर. सामाजिक व आर्थिक विकासाला पूर्ण पारखा! अशा या जिल्ह्यात १९९० नंतर प्रौढ साक्षरतेसाठी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
प्रौढ साक्षरतेचा कार्यक्रम भारताच्या अंदाजे ४७० जिल्ह्यांत १९९० च्या सुमारास सुरू केला गेला. त्या अन्वये वेगवेगळ्या जिल्ह्यांनी प्रौढ म्हणून वेगवेगळे वयोगट कार्यक्रमाखाली घेतले. कोणी ९ ते ३५ वयोगट, कोणी १५ ते ३५ वयोगट, तर पुदुकोट्टाईमध्ये ९ ते ४५ वयोगट साक्षर करण्यासाठी निवडला.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षतेला आव्हान!

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? यासंबंधी स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाच्या व्यक्ती आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये मतभेद आहेतच. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे ज्यांना सांप्रदायिक समजतात त्या सांप्रदायिक जातिवादी शक्तीही स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात. यापुढे जाऊन त्यांचा तर असा दावा आहे की भारतातील स्वतःला पुरोगामी व धर्मनिरपेक्ष समजणारेच ‘स्युडो सेक्युलरिस्ट’ असून आपणच तेवढे खरेखुरे राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष आहोत. यापुढे धर्मनिरपेक्षतेवरील चर्चा आपणाला पुन्हा पुन्हा त्याच आवर्तात अडकलेली दिसते. म्हणून या लेखात पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेची तात्त्विक व व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टिकोणातून चर्चा करण्याचे ठरविले आहे.
भारतीय राज्यघटनेला धर्मनिरपेक्षतेचा जो अर्थ अभिप्रेत आहे तशा अर्थी आज भारतीय लोकजीवनात धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे काय?धर्मनिरपेक्ष

पुढे वाचा

आमच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट

काही दिवसापूर्वी आमच्या मुलीचेलग्नझाले. विवाहसमारंभअगदी सुटसुटीत घरगुती पद्धतीने केला. परंतु आप्तेष्टांना मुलामुलीची माहिती, लग्नाची खबर देऊन त्यांच्या शुभेच्छांची, आशीर्वादाची आवर्जून मागणी केली. हे विवाहसूचनेचे पत्र आमच्या एका स्नेहातल्या बाईंना इतके आवडले की त्यांनी त्याचा गोषवारा एका सांजदैनिकात प्रसिद्ध केला. परिणामी पाच-सहा फोन व चार-पाच पत्रे आली, काहींनी छापील पत्राची प्रतही मागितली. माझ्या एका मित्राने ही पत्रिकाच पुढे करून आपल्या मुलाचा विवाहही साधासुटसुटीत व्हावा यासाठी प्रयत्न केला! या सर्वांवरून लक्षात आले की आपल्या समाजात साधा सुटसुटीत विवाह हीसुद्धा समाजसुधारणा गणली जाते! विवाह ठरवितानाही आम्ही काही एक निश्चित विचारधारा डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

आठवे वर्ष

हा आठव्या वर्षाचा पहिला अंक. तो वाचकांकडे रवाना करताना आम्हाला बरेच समाधान वाटत आहे. सात वर्षांपूर्वी आम्ही ज्या गोष्टी करण्याचे जाहीर केले त्यांपैकी काही थोड्याबहुत प्रमाणात आम्ही साध्य केल्या आहेत अशी आमची समजूत आहे.
आजचा सुधारक हे महाराष्ट्रातील एकमेव विवेकवादी मासिक तेव्हा होते आणि आजही ते एकटेच पाय रोवून उभे आहे. कोठल्याही प्रकारच्या तडजोडी न करता विवेकवादाचे निशाण फडकत ठेवावयाचे ही आमची प्रतिज्ञा आम्ही बर्या्चप्रमाणात निभावली असे आम्हाला वाटते. वाचकांचीही आम्हाला बर्यानपैकी साथ मिळाली आहे. एकूण वर्गणीदारांची संख्या साडेसहाशेच्या घरात गेली ही गोष्ट फारशी उत्साहवर्धक नाही हे खरे; पण ती संख्या हळूहळू का होईना वाढत आहे, कमी होत नाही.

पुढे वाचा

परंपरा आणि आधुनिकता

प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत व्होल्टेअर म्हणत असे, `If you want to talk with me, please define yourself.’ शब्दांच्या व्याख्या करून बोलले पाहिजे. हेमचन्द्राच्या कोशात ‘अविच्छिन्नधारायां परंपरा’ अशी परंपरेची व्याख्या आहे. परंपरा हा एक प्रवाह आहे. ती वाहती धारा आहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ती बदलती आहे. मनुष्यजीवनाइतकी गतिशील आहे. तिचा प्राचीनतेशी संबंध आहे. ती वर्तमानात आहेच आणि तिचे दुसरे टोक भविष्यात आहे. रूढी हे साचलेले पाणी आहे. डबके आहे. आधुनिकतेचा विरोध रूढीशी राहू शकतो, परंपरेशी नाही. जी केवळ वर्तमानातच असते, जिला भूतकाळ नसतो ती फॅशन.

पुढे वाचा

श्री. मा. गो. वैद्यांचे परंपरासमर्थन

गेल्या महिन्यात इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या संघपरिवारातील संस्थेच्या वतीने नागपूरला एक परिसंवाद झाला. विषय होता ‘परंपरा आणि आधुनिकता’. या प्रसंगी परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून श्री. मा. गो. वैद्य यांनी जो समारोप केला ते भाषण याच अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. मा. गो. वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार-प्रमुख आहेत. त्यापूर्वी बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आणि जवळजवळ तेवढाच काळ ते नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे संपादक होते. त्यांचे विचार जितके गंभीर तितकेच सुस्पष्ट आणि लेखनशैली जशी प्रासादिक तशीच मार्मिक असते असा लौकिक आहे.

पुढे वाचा

आजचा सुधारकची सात वर्षे

आजचा सुधारकचा मार्च १९९७ चा अंक हा या मासिकाच्या आयुष्याची सात वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत आहे. बुद्धिवादाने उद्बोधन या दृष्टीने चालविलेल्या मराठी मासिकाला सात वर्षे पूर्ण करता आली हीही एक उपलब्धी आहे. स्वच्छ व शुद्ध मुद्रण करण्याचा प्रयत्न, विज्ञापनांचा अस्वीकार, प्रायः नियमित प्रकाशन, पृष्ठसंख्या अल्प असली तरी विशिष्ट विचारांचा प्रचार व्हावा म्हणून दिला जाणारा भर – ही या मासिकाची वैशिष्ट्ये लक्षात राहण्यासारखी आहेत. ही सारी वैशिष्ट्ये स्वतःत दाखविणारा फेब्रुवारी १९९७ चा अंक नमुनेदार आहे. त्यात गेली सात वर्षे सामाजिक विचार आपल्या पद्धतीने चिकाटीने मांडणारे श्री दिवाकर मोहनी आहेत.

पुढे वाचा

के. रा. जोशींच्या लेखातील काही मुद्द्यांविषयी

(१) श्री. मोहनींच्या प्रतिपादनाने श्वेतकेतूचा दंडक उलथवला जातो. असे केल्याने समाज श्वेतकेतूच्या आधीच्या (प्रागैतिहासिक) पद्धतींकडे ढकलला जाईल. सोबतच स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य स्वैर कामाचाराकडे नेईल, व एडजचा धोका वाढेल. (इति के. रा. जो.)
मानवांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो की गर्भारपण व त्यानंतर अपत्ये ‘सुटी’ होणे यासाठी माणसांना जेवढा दीर्घ काळ लागतो तेवढा इतर कोणत्याच प्राण्याला लागत नाही. या सर्व काळात स्त्री असहाय असते. जर या दीर्घकाळच्या असहायतेसोबतच साहाय्य देणारी यंत्रणाही उत्क्रांत झाली नसती, तर मानववंश घडलाच नसता. असहायतेच्या काळात स्त्रीला पुरुषाने मदत करावी व संरक्षण द्यावे यासाठी पुरुषाला अमुक स्त्री ही आपल्या अपत्याची आई आहे, व आपली’ आहे, याची जाणीव असायला हवी.

पुढे वाचा

माहितीचा महापूर आणि संगणकाची दादागिरी

सध्याचे युग हे माहितीचे युग आहे – This is an age of information असे म्हटले जाते. आणि माहिती म्हणजे सामर्थ्य आणि सामर्थ्य म्हणजे सत्ता असे आहे. एक प्रसंग आठवतो. दहाबारा वर्षे झाली असतील. एका अमेरिकन माणसाला मी विचारत होतो, “तुम्हाला काळजी नाही वाटत आमच्या औद्योगिकीकरणाची? एकदा आम्ही पूर्णपणे ह्यात आलो की तुमचा माल कोण घेणार?तुमची श्रीमंती मग कोठे राहील?” तो हसला. म्हणाला, “ आम्ही मुळी माल विकणारच नाही. आम्ही विकू माहिती. आम्ही विकू आमची तज्ज्ञता. आमच्या आजच्या बाजारपेठांपेक्षाही ती मोठी बाजारपेठ असेल.

पुढे वाचा

वैज्ञानिक आणि आस्तिकता

अनेक वैचारिक प्रकाशनांप्रमाणेच ‘आजचा सुधारक’ मध्येही विज्ञान आणि ईश्वर यावर न संपणारी चर्चा चालू आहे. प्रा. एकल्स यांच्या आस्तिकतेविषयी “आ. सु.’ मध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेले प्रा. ठोसर आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे लेख, याच चर्चेचा भाग आहेत.

विज्ञान आणि ईश्वरासंबंधी आस्तिकता यात सामान्यतः तीन मतप्रवाह आढळतात. (१) बुद्धिप्रामाण्यावर आणि प्रयोगनिष्ठेवर आधारलेली व ईश्वराचे अस्तित्व न मानणारी प्रामाणिक वृत्ती, (२) विज्ञानासाठी विज्ञान अशी व्यावसायिक वृत्ती, परंतु विज्ञानाच्या पलीकडेही अगम्य असणारी शक्ती मानण्याची प्रवृत्ती, आणि (३) ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून वैज्ञानिक क्षेत्रात कार्य करणारी पोटार्थी वृत्ती.

पुढे वाचा