माणूस प्राणी नामशेष होणार का?
अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे. परंतु आता आपल्याला वैयक्तिक मृत्यूबद्दलचा (स्वार्थी!) विचार करायचा नसून संपूर्ण मानववंशाच्या अस्तित्वाबद्दल काळजी करायची आहे. विशिष्ट दिवशी हा मानव वंश नामशेष होणार, मानवासकट जगातील समस्त प्राणिवंश नष्ट होणार, महाप्रलय येणार, याबद्दलची भाकिते अधूनमधून वाचायला मिळत असतात. आजकाल असल्या अवैज्ञानिक भाकितांची भीती वाटेनाशी झाली आहे. आजच्या मानवाऐवजी दुसरा एखादा मानवसदृश प्राणी उत्क्रांत होत असल्यास त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही.