विषय «इतर»

न सुचलेले प्रश्न

शिक्षणाच्या प्रक्रियेत म्हणे दोन वेगवेगळ्या भूमिका वठवणाऱ्या गटांचा सहभाग असतोः शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान घेतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक खुल्या मनाच्या शिक्षकाला हेही जाणवते की विद्यार्थीही शिक्षकांना ज्ञान देतात. कधी हे ज्ञानदान शिक्षकाच्या भूमिकेच्या गृहीततत्त्वांना आह्वान देण्यातून घडते, तर कधी शिक्षकाला न सुचलेले प्रश्न विचारून.
मी विद्यार्थ्यांना ईस्टर आयलंडचे समाज कसे कोलमडले ते सांगितले. विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाची व्यामिश्रता माझ्या तोपर्यंत ध्यानात आलीच नव्हती ज्या झाडांवर आपले अस्तित्व आवलंबून आहे ती सर्व झाडे कापून टाकण्याचा आत्मघातकी निर्णय एखादा समाज कसा घेऊ शकतो ?

पुढे वाचा

विचारदर्शन आणि त्याचं जागतिकीभवन

जगभरचं होणं आणि जगभरचं करणं
‘विश्व’ म्हणजे सगळं काही. ‘जगत्’ म्हणजे माणसाचं विश्व, माणसाच्या हालचालींना, जगण्याला संदर्भ देणारं सगळं काही. ‘जागतिक’ म्हणजे जगभरचं. ‘जागतिकीभवन’ म्हणजे जागतिक होऊन जाणं, केवळ स्थानिक न राहणं. हे आपोआप जागतिक होणं असेल किंवा कुणी हेतुतः जागतिक केलेलं असेल. मानवजातीच्या इतिहासात अगोदरपासून संथपणे चालू असलेल्या ‘जागतिकीभवना’ ची अलीकडची मुद्दाम गतिमान केलेली अवस्था म्हणजे ‘जागतिकीकरण’.(जाता जाता सांगायचं म्हणजे ‘ग्लोबलायझेशन’साठी योजलेला हिंदी भाषेतील ‘वैश्विकीकरण’ शब्द तेवढा योग्य नाही. ‘भूमंडलीकरण’ त्यापेक्षा थोडा बरा एवढंच.)
जागतिकीभवन या अधिक दीर्घकालीन आणि अधिक व्यापक घडामोडीचा विचार करताना व्यापार आणि उद्योग यांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या जगण्याच्या सगळ्याच बाजूंचा विचार करायला लागतो.

पुढे वाचा

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (१)

गेलनर ह्यांनी राष्ट्रवाद हा औद्योगिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या आवश्यकतेतून जन्मल्याचे मांडले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे व तिचा जन्म औद्योगिकीकरणापासून झाला असा त्यांचा सिद्धान्त त्यांनी Nations & Nationalism ह्या १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात मांडला आहे. औद्योगिकीकरणाची परमसीमा गाठली आणि भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर काय परिणाम होतील हा त्यावेळी त्यांच्यापुढे संभाव्य (हायपोथेटिकल) प्रश्न होता.१ पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज जग अशा एका टप्प्यावर आहे की त्यांचा संभाव्य प्रश्न आज खराच आपल्यापुढे उभा आहे. राष्ट्राचे सार्वभौमत्त्व आणि राष्ट्राच्या सीमा हे दोन आधुनिक राष्ट्राचे निकष मानले जातात.

पुढे वाचा

रोजगार हमी योजना: महाराष्ट्रातील अनुभव

लोकसभेने भारताकरिता रोजगार हमी योजनेचा कायदा करू घातला व भारतातील सर्व गरजूंना रोजगाराची हमी देण्याचे ठरविले. त्यासाठी मोठीच रक्कम मंजूर झाल्याचे समाधान लाभले. परंतु याच सुमारास सोलापूर जिल्ह्यात ९.१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने भारताची हजारो कोटींची रक्कम अशीच उधळली जाण्याची कोणालाही भीती वाटल्याशिवाय राहिली नाही व आज गेल्या तीस वर्षे महाराष्ट्रात चालू असलेल्या रोहयो कडे इतर राज्यांना धडे देण्याची कितपत कुवत आहे याकडे लक्ष वेधले गेले.
महाराष्ट्रात रोहयो १ मे १९७२ सालीच राबविण्याचे ठरले होते. राज्यात जलसिंचन विशेष मर्यादित असल्याने शेतीचा विकास होत नव्हताच.

पुढे वाचा

विवेकवाद-भाग १०ः (प्रथम प्रकाशन मार्च१९९१ अंक १.१२, लेखक : दि. य. देशपांडे)

श्रद्धेचे दोन प्रकार विधानांवरील आणि मूल्यांवरील
‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’ हा शब्द दोन वेगळ्या अर्थांनी वापरण्यात येतो. एका अर्थी श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे असा दृढविश्वास, तर दुसऱ्या अर्थी श्रद्धा म्हणजे एखाद्या मूल्यावरील निष्ठा. ह्या दुसऱ्या अर्थी ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे श्रेयस्कर आहे, कारण तो व्यर्थी नसल्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज होण्याची भीती नाही. अमुक गोष्ट मूल्य आहे म्हणजे ती स्वार्थ १. वांछनीय आहे अशी दृढनिष्ठा. याच्या उलट पहिल्या प्रकारची श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे अशी पक्की खात्री. या विश्वासाला ‘श्रद्धा’ म्हणण्याचे कारण असे की त्याला पुराव्याचा आधार नसतो.

पुढे वाचा

आरसा

टीव्ही हे माध्यम आज पत्रकारितेच्या अर्थाची व्याख्या बदलत आहे. तटस्थ विश्लेषण, समतोल, सत्याबद्दल पावित्र्याची भावना, हे सारे मागे पडत आहे. बातम्या रंजक करून प्रेक्षकांना सतत उत्तेजित करणे, हा नवा गुरुमंत्र आहे. आज टीव्ही हे साठमारीचे रक्तरंजित मैदान झाले आहे मग ते झी-न्यूज ने गुडियाबद्दल सहानुभूती जागवणे असो की बिशन बेदीच्या स्टार न्यूज वरील कार्यक्रमाची आज किस की मौत आई है शैली असो. पत्रकारिता, वार्ताहरांचे काम आणि अभिव्यक्तीची इतर माध्यमे यांच्यातल्या सीमा पुसल्या जात आहेत. सत्य आणि कल्पित यांच्यात फरक उरलेला नाही मध्ये अमिताभ आणि अभिषेक यांनी त्यांच्या बंटी और बबली रूपात टीव्हीवर बातम्या दिल्या.

पुढे वाचा

विवेकवाद-भाग ९(ब): नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (प्रथम प्रकाशन फेब्रुवारी १९९१ अंक १.११, लेखक : दि. य. देशपांडे)

याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारक च्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही काय करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.

पुढे वाचा

एकास एक, एकास दोन

आज प्रत्येक ग्रामीण व्यक्ती स्वतःसोबतच एका शहरी व्यक्तीपुरतेही अन्न पिकवते आणि जगभरात शेतीची कामे मुख्यतः स्त्रिया करतात. जर शहरांमध्ये परसबागांची पद्धत सार्वत्रिक झाली नाही, तर पन्नास वर्षांच्या आत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला स्वतःसोबत दोन शहरी माणसांपुरते अन्न पैदा करावे लागेल. शहरे अन्नाची मागणी उत्पन्न करतील आणि नवे तंत्रज्ञान पुरवतील. जर ग्रामीण शेती जास्त सघन झाली तर या मागणी-तंत्रज्ञान जोडीने शेतकरी दारिद्र्यातून बाहेर पडेल श्रीमंत देशांत आज हे झाले आहे. पण जर ‘सघन शेती’ याचा अर्थ फक्त रासायनिक खते आणि तृण-कीटकनाशके असा करून शेतीची उत्पादकता वाढवायचा प्रयत्न झाला, तर पर्यावरणावर प्रचंड ताण येतील.

पुढे वाचा

धर्म आणि विज्ञान

मानवजातीच्या हातून ज्या कृती व विचार घडून आलेले आहेत त्या सर्वांचा संबंध सदोदित खोलवर जाणवणाऱ्या मानवी गरजांचे समाधान करणे व वेदनांचे शमन करणे यांच्याशी निगडित राहिलेला आहे. पारमार्थिक चळवळी व त्यांची वाढ समजून घ्यायची असेल तर ही गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे. मानवाचे सर्व कष्ट व सर्जनशीलता यांच्यामागील मूलस्रोत हा मानवी भावना व इच्छा-आकांक्षामध्ये आहे, भले मग कितीही तरल व उच्च स्वरूपात ती सर्जनशीलता आपल्यापुढे प्रकट होवो.

व्यापक अर्थाने धार्मिक विचार व श्रद्धा यांच्याकडे माणसाला नेणाऱ्या या भावना व गरजा कोणत्या आहेत ?

पुढे वाचा

आइनस्टाईन: उत्कट साहसवीर

‘ते आमचे प्राध्यापक आइनस्टाइन’ टॅक्सीचालकाने ममत्वपूर्ण अभिमानाने सांगितले. उर्मटपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अमेरिकन टॅक्सीचालकांच्या जातीत हे दुर्मिळच होते. डिसेंबर १९४८ मधील एका मरगळलेल्या दुपारी प्रिन्स्टनमधील पदपथावरून उत्साहाने चालत असेल्या व्यक्तीकडे त्याचा रोख होता. आता पांढरी आणि विरळ झालेली ती सुप्रसिद्ध केसांची आयाळ त्या हवेतही हॅटखाली झाकलेली नव्हती. अंगावर शर्ट-आणि-टायऐवजी खलाशी वापरतात तशी विणलेली जर्सी होती, आणि बूट मोज्यांशिवायच घातलेले होते.

ज्याच्या सिद्धांतांनी चेष्टा आणि टिंगलटवाळीपासून ते परमोच्च स्तुतीपर्यंत सर्वप्रकारच्या प्रतिक्रिया ओढवून घेतल्या होत्या त्या माणसाचे कधीही न विसरण्याजोगे पहिले दर्शन हे असे होते.

पुढे वाचा