‘आजचा सुधारक’ (जाने-फ्रेबु 2004) मधील श्री. वि. शं. ठकार यांचा वरील विषयावरील लेख बराच चिंतनीय पण विवाद्य वाटला. त्या विषयाची दुसरी बाजू सांगण्याचा हा प्रयत्न.
दोन भिन्न ज्ञानशाखा :- ज्ञानाचा शोध कसा चालतो ते प्रथम पहावयास हवे ज्ञाता (जाणणारा), ज्ञेय (जे जाणावयाचे ते, जाणावयाचा विषय) व ज्ञान ही त्रिपुटी सर्वपरिचित आहे. माणसाच्या ज्ञानार्जनातच त्याचे अज्ञान उघडे पडते आणि शेवटी माणसाला आपल्या ज्ञानापेक्षा अज्ञानाची खात्री पटते. हा एक विरोधाभास आहे. ज्ञानाचा शोध दोन दिशांनी चालतो. ज्यावेळी ज्ञेयाला प्राधान्य देऊन ज्ञानाचा शोध चालतो, त्यावेळी विज्ञानाची प्रचंड वाढ होते व जडवादी (विज्ञानवादी) दर्शनाला महत्त्व येते.