गीतेच्या तिसर्या अध्यायातील बेचाळीसावा श्लोक आहे :
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।
मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स: ।(गीता 3.42)
अर्थ: (स्थूल शरीराहून) कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे. तर मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीच्याही पलीकडे सर्वश्रेष्ठ असा “तो” आहे. इथे तो या सर्वनामाच्या ठिकाणी आत्मा अभिप्रेत आहे.
या श्लोकात श्रेष्ठतेची जी चढती भाजणी दिली आहे ती अचूक आहे. इंद्रियांवर मनाचे नियंत्रण असायला हवे. तसेच मनावर बुद्धीचे. बुद्धीच्या पलीकडे असलेला आत्मा हा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे.