Category Archives: चिकित्सा

पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे या लेखकद्वयांचा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊ या ’ हा प्रतिसादवजा लेख वाचत असताना डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या लेखातील मुद्द्यांचा त्यांनी केलेला प्रतिवाद हा आताच्या प्रचलित राजकारणातील वितंडवादासारखा आहे की काय असे वाटू लागते. काँग्रेसने केलेल्या चुका आम्हीही (पुनःपुन्हा) केल्या तर बिघडले कुठे? याच तालावर ॲलोपॅथीतही  दोष असताना (पर्यायी) देशी औषधोपचार पद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे का करतात हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे व त्यासाठी संविधानातील वाक्यांचा आधार ते घेत आहेत.  

Continue reading पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

पत्रोत्तर (अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे ह्यांच्या प्रतिसादावर डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचे उत्तर)

स. न.

माझ्या, ‘या मार्गानेच जाऊया’ (सुधारक, मे २०२०) या लेखाचा प्रतिवाद करणारे डॉ. शेवडे व अंबुजा साळगावकर यांचे टिपण वाचले.

पारंपरिक आणि पूरक उपचार हे आपोआप जसे उपयुक्त ठरत नाहीत तसे ते निरर्थकही ठरत नाहीत. पण ते उपयुक्त आहेत हा दावा करायचा तर त्याला सबळ पुरावा हवा. जी औषधे/शस्त्रक्रिया शास्त्रीय कसोटीवर उतरतात ती आपोआपच आधुनिक औषधशास्त्राचा भाग बनतात. आयुर्वेदाधारीत रिसरपीन हे औषध, भगेंद्रासाठी सूत्रचिकित्सा किंवा चिनी वनस्पतीचे अरटेमेसुर हे मलेरियासाठीचे औषध अशी काही मूळ ‘देशी’ औषधे आता आधुनिक वैद्यकीचा भाग आहेत.     अॅस्प्रिन, अॅट्रोपिन, स्कॉलीन, क्वीनीन ही औषधे आधुनिक वैद्यकीत रोज वापरली जातात. ही सर्व एकेकाळची  ‘झाडपाल्याची’ औषधे आहेत. ही काही माझ्या महितीतील उदाहरणे. आणखीही कितीतरी असतील. आधुनिक वैद्यकीने देशोदेशीच्या ‘देशी’ औषधांवरच बरेचसे संशोधन करत करत आपले कपाट भरले आहे. मुद्दा एवढाच की औषध ‘प्राचीन’, ‘नॅच्युरल’, ‘हर्बल’, ‘पारंपरिक’, ‘होमिओ’, ‘चिनी’ वा ‘आयुर्वेदिक’ असणे हा त्या औषधाच्या वापराचा  आणि उपयुक्ततेचा  निकष नाही. कोणत्याही पॅथीच्या, कोणत्याही औषधाचा स्वीकार हा शास्त्रीय मापदंडावर आधारित असावा एवढीच अपेक्षा आहे. असं म्हटलं की पर्यायीवाल्यांची एक ठरलेली पळवाट असते. आम्ही इतके थोर आहोत की शास्त्रीय मापदंडाच्या पट्ट्यांनी आमची ऊंची मोजलीच जाऊ शकत नाही; असं त्यांचे म्हणणे असते. एफ्.डी.ए.चे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत. ‘अ’ हे औषध ‘ब’ या आजारांसाठी उपयुक्त आहे असं म्हणायचं झाल्यास, ‘जुन्या ग्रंथातील संदर्भ’ एवढाच पुरावा ‘आयुष’कडून अपेक्षित असतो. याउलट आधुनिक वैद्यकीचे दावे अत्यंत काटेकोर निकष लावून सतत तपासले जातात; आणि हेच योग्य आहे.

…शिवाय जागतिक आरोग्य संघटना पारंपरिक, पूरक वैद्यकीस ‘नीटस’पणे पुढे आणण्यास प्रयत्नशील आहे.

हे योग्यच आहे. पण तिथेही प्रस्तावनेतच, ‘दर्जाची खात्री, सुरक्षितता, योग्य वापर आणि परिणामकारकतेचा’ आग्रह आहेच. (To strengthen the quality assurance, safety, proper use and effectiveness of T&C M by regulating products, practices and practitioners) मी तेच म्हणतो आहे.  

‘या संकेतस्थळावर चायनीज मेडिसिन्समध्ये आर्सेनिकसारखे जड किंवा विषारी धातू आणखीही काही असते, जे रुग्णासाठी काही समस्या निर्माण करू शकते’ इतके म्हटले आहे.

हा ‘’ जाचक आहे. इतके‘!’ म्हटले आहे, असं असायला हवं. घातक ठरू शकतील अशी रसायने अनेक देशी औषधात असतात. त्याबाबत कोणतीही माहिती लेबलवर नसते. (लेबलबाबतचे नियम वेगवेगळे असल्याने हे नियमातही  बसते.) इतकेच काय ‘पारंपरिक व पूरक’ म्हणून दिलेल्या औषधात, लेबलवर काहीही न छापता मिसळलेली, स्टीरॉईडसारखी    ‘आधुनिक औषधे’ही आढळली आहेत. जगभर आढळली आहेत. हे गैरच आहे.

पुढे असेही म्हटलेले आहे की, ‘याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या संशोधनातून काही ठोस उत्पन्न झाले नाही. गंमत म्हणजे अशा प्रकारच्या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही म्हटल्याचे तेथेच दिसेल.’

यातही आक्षेपार्ह काहीही नाही. अमुक औषध, तमुक आजाराला उपयुक्त आहे असं कोणी म्हटल्यास, आणि त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळल्यास, संशोधन गरजेचेच आहे. तरच त्या दाव्याचा शहानिशा शक्य आहे. नाही तर नुसतेच ‘आमची परंपरा’ एवढ्याच शक्तीवर शड्डू ठोकणे चालू राहील. जे कुणाच्याच हिताचे नाही. उलट मन आणि डोळे उघडे असल्याचे हे लक्षण आहे.

आता काही प्रश्नोत्तरे..

प्रश्न :- ‘म्हणजे ॲलोपॅथीलाही ते (औषध) मिळालेले नाही हे त्या बिचार्‍यांनी स्पष्ट सांगितलेले आहे.’ मग फक्त चायनीज मेडिसीनसंदर्भातला अभ्यास परिपूर्ण नाही असे का लिहावे?

उत्तर :- ह्याचे कारण असे की अपुऱ्या पुराव्यानिशी हे चिनी उंच उंच उड्या मारत आहेत. तुम्हाला तो अभ्यास परिपूर्ण आहे असं सुचवायचं आहे का?

प्रश्न :- “कोरोना रोखण्यास कोणत्याही औषधाची शिफारस नाही” यात ॲलोपॅथी औषधांचा समावेश आहे की नाही? 

उत्तर:- अर्थातच आहे.

प्रश्न :- इराणच्या दारूबाधित ४४ जणांच्या मृत्यूची केस जरूर द्यावी, सोबत ॲलोपॅथीचाही फेल्युअर रेट द्यावा.

उत्तर :- तो तर रोज वर्तमानपत्रातून दिला  जातो आहे.

प्रश्न :- झटपट फॉर्म्युला नाहीच आहे म्हणजे तो ॲलोपॅथीकडेही नाही असे स्पष्ट करायचे तेवढे राहिले आहे.

उत्तर :- ते तर स्पष्टपणे म्हटलेले आहे. असा फॉर्म्युला असूच शकत नाही, असा दावा भोंगळ आहे हे लेखात, साखर आणि पाण्याची ‘शालेय’ उदाहरणे देऊन, स्पष्ट केले आहे.
वरील  प्रश्नात आधुनिक वैद्यकीला औषध सापडलेले नाही हाच मुद्दा उगाळला आहे. हे मान्यच आहे. पण आधुनिक  वैद्यकीकडे औषध नाही म्हणजे ते इतरांकडे आहे असा अर्थ होत नाही!! आमच्याकडे औषध नाही असं म्हणायला लाज कसली? उलट भोंगळ, अवैज्ञानिक दावे करणे लज्जास्पद आहे. आपले अज्ञान आणि मर्यादा आधुनिक वैद्यकीने मान्य केल्या आहेत. अज्ञान मान्य करणे ही ज्ञानाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. त्यात शरम ती कसली? उलट प्रामाणिकपणा आहे. परवा परवापर्यंत आधुनिक वैद्यकीकडे एकाही जिवाणूविरुद्ध, विषाणूविरुद्ध औषध नव्हते. आज अनेक आहेत.

प्रश्न :- आयुष-उपचारांनी प्रतिकारशक्ती वाढल्याचा दावा सर्वोच्च नेत्याने केला आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याची गुस्ताखी करता आहात का?

उत्तर :- हो. कारण कोणा नेत्याचे मत हा पुरावा कसा काय होऊ शकतो? त्यांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी या आधीही असे अचाट दावे करून स्वतःचे हसे करून घेतले आहे. प्लॅस्टिक सर्जरी, लांडोरीचे अश्रु, इंटरनेट, उत्क्रांती वगैरे बाबतची त्यांची विधाने त्यांची विज्ञानविषयक समज स्पष्ट करतात.
आयुष उपयोगी नाही असे सरसकट विधान मी केलेले नाही. मुळात आयुष म्हणजे कोणता एकच एक वैद्यकविचार नसून आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशी ती सरमिसळ आहे. उपयुक्तता ही त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांनी सिद्ध करून दाखवायची आहे. ती मी किंवा कोणी नेत्यांनी सर्टिफाय करण्याची गोष्ट नाही.  

भारतात आयुषची गळचेपी चालू आहे असाही सूर आहे.

असेल बुवा. पण केंद्रीय संशोधन संस्था, त्यांना मिळणारा सरकारी निधी, शेकड्याने कॉलेजेस्‌, खाजगी औषधकंपन्यांचे संशोधनविभाग वगैरे वर्षानुवर्षे कार्यरत आहेत की. पण गेल्या सत्तर वर्षांत दखलपात्र संशोधन झाल्याचे दिसत नाही. होमिओवाल्यांचे सरकारी ऑनलाइन जर्नल तर गेली काही वर्षे निपचित पडून आहे.

आमच्याकडे औषध नाही तरी आम्हीच तुमच्यावर उपचार करणार आणि काय येईल तो बरा-वाईट निकाल तुमच्या पुढ्यात ठेवणार असेच चाललेले नाही का ॲलोपॅथीचे?

आधुनिक वैद्यकीचं जे काय चाललं आहे ते येणेप्रमाणे… 
रोग ‘बरा करणारे’, म्हणजे कोविडबाबतीत तो विषाणू नष्ट करणारे औषध आज नाही. पण त्यामुळे होणारे त्रास सुसह्य करणारे अनेक उपचार आधुनिक वैद्यकीकडे आहेत. तापासाठी आहेत, श्वसन-सुलभतेसाठी औषधे आहेत, फुफ्फुसाची सूज आटोक्यात रहावी म्हणून आहेत, क्षार आणि रक्तद्रव संतुलनासाठी आहेत, किडनीचे कार्य सुलभ करणारी आहेत,   उलटी, मळमळ, खोकला यांसाठी आहेतच आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी डायलेसीस, व्हेंटीलेटर असे उपचार आहेत.   हे आणि असे सर्व प्रकार वापरून रुग्णांवर लक्षण-लक्ष्यी उपचार केले जातात. उपचारांनी जंतू मरत नाहीत. उपचार सहाय्यभूत तेवढे ठरतात. यातून बरेचसे पेशंट बरे होतात. उपचारांची सामर्थ्यस्थळे आणि मर्यादा यांचे भान येत जाते. हे सारे संशोधन आज झालेले नाही. ही वैज्ञानिक विचारसरणीची इतक्या वर्षांची पुण्याई आहे.
हे सारे नाकारून एखाद्या अन्य-पॅथीय दवाखान्यात जायचे रुग्णाचे स्वातंत्र्य अबाधित आहे.

‘पूर्वग्रहविरहित, अभिनिवेशरहित राहून स्वत:ला पटेल अशा पद्धतीचा अवलंब करण्याचा’ अधिकार रुग्णाला आहेच.  अमुक औषध घेऊ नका असं कायदा कुठेही सांगत नाही. साथ पसरू नये म्हणूनची खबरदारी घेणे मात्र कायद्याने  बंधनकारक आहे. याचा अर्थ ‘आयुष’ची गळचेपी असा मात्र नाही.

एकदा बाजारात आणून, लोकांना देऊन मागे घेतलेल्या लसींची उदाहरणे गेल्या पाच वर्षांत २४ आहेत.
प्रत्येक औषधाच्या चांगल्या-वाईट सगळ्याच परिणामांचा अभ्यास करायचा चंग अॅलोपॅथीने बांधलेला आहे. बाजारात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरही असा अभ्यास निरंतर चालू असतो. अशा परिणामांच्या आंतरराष्ट्रीय रजिस्ट्री (अभिलेखागार, नोंदवह्या) आहेत. ऑनलाइन आहेत. तेंव्हा मीदेखील यात माझ्या अनुभव नोंदवू शकतो. काही कमतरता आढळली तर मग औषध बाजारातून मागे घेतलं जातं. अॅलोपॅथीची मूठ झाकलेली नाही. त्यामुळे तीत सव्वा लाख रुपये आहेत की सव्वा रुपया आहे हे तुम्ही पाहू शकता.
‘आयुष’ने असे अभ्यास केले आहेत का? अशी रचना तयार केली आहे का? मी तर उलट प्रश्न विचारेन, एकदा बाजारात आणून परत घेतलेली आयुष औषधे किती? अशी जर अजिबातच नसतील तर ते अशुभचिन्ह नाही का? 

… तेव्हा ॲलोपॅथीत सगळे योग्यच चालले आहे असे समजण्याचे कारण नाही. 

अर्थातच नाही. पण तो वेगळा विषय आहे.

वैज्ञानिकतेचा मार्ग आपल्याला तारू शकतो एवढं खरं.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊया – अंबुजा साळगांवकर आणि परीक्षित शेवडे

(डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या “या मार्गानेच जाऊया” या लेखाच्या पुन:प्रसिद्धीनिमित्ताने)

२४ एप्रिल २०२०च्या महाराष्ट्र टाइम्समधील डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा “या मार्गानेच जाऊया” हा लेख ‘सुधारक’च्या १ मे २०२०च्या कोरोना विशेषांकांत पुन:प्रकाशित झाला. तेव्हा म.टा.ला कळवायची राहून गेलेली प्रतिक्रिया ‘सुधारक’च्या सुजाण वाचकांसाठी सत्वर पाठवत आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना’ पारंपरिक-पूरक वैद्यकांस नीटसपणे पुढे आणून, येणार्‍या काळात प्रत्येक देशाचा आरोग्यांक वाढावा यासाठी प्रयत्नशील आहे. [https://www.who.int/traditional-complementary-integrative-medicine/strategy/en/] असे असता लेखाच्या सुरुवातीपासून इतक्या कडवटपणे देशी औषधांचा तिरस्कार करण्याचे कारण कळत नाही. 

कोण्या उच्चविद्याविभूषित म्हणविणार्‍याने एका सामाजिक व्यासपिठावरून केलेली मांडणी ही भाषेचाही दर्जा सोडून झाली की तेथेच काही काळेबेरे असावे अशी शंका येते. चीनचे नेमके दावे काय होते, त्यांपैकी अमेरिकेने नेमके कोणत्या माहितीआधारे, म्हणजे संख्याशास्त्रीय पुराव्यांसह, कोणते खंडून काढले हे देण्याऐवजी चिनी औषधांबाबत “अमेरिकेने चिन्यांच्या दाव्याला धू धू धुतला” असे सरधोपट विधान खटकते. प्रत्यक्षात  [https://www.nccih.nih.gov/health/traditional-chinese-medicine-what-you-need-to-know] या संकेतस्थळावर चायनीज मेडिसिन्समध्ये आर्सेनिकसारखे जड किंवा विषारी धातू आणखीही काही असते, जे रुग्णासाठी काही समस्या निर्माण करू शकते इतकेच म्हटले आहे. पुढे असेही म्हटलेले आहे की याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या संशोधनातून काही ठोस उत्पन्न झाले नाही. गंमत म्हणजे अशाप्रकारच्या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही म्हटल्याचे तेथेच दिसेल. [https://directorsblog.nih.gov/2020/04/17/pursuing-safe-effective-anti-viral-drugs-for-covid-19/] या अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालकांच्या ब्लॉगमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की ॲलोपॅथी घेऊन आम्ही धडपडतो आहोत, शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेले औषध लवकर एकदाचे मिळो. म्हणजे ॲलोपॅथीलाही ते मिळालेले नाही हे त्या बिचार्‍यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. मग फक्त चायनीज मेडिसीनसंदर्भातला अभ्यास परिपूर्ण नाही असे का लिहावे?  लेखातील, “कशालाच पुरेसा पुरावा नाहीये. बरीचशी वेडी आशा आणि काहीशी राजकीय अभिलाषा यामागे आहे” हे विधान खरेतर जगभरातील ॲलोपॅथीच्या उपचारांनाच अधिक ठळकपणे लागू होते.

चिनी किंवा कोणत्या औषधांची बाजू घ्यायची असा हेतू नाही. आणि सध्या फक्त सामान्यांच्या जवळचा महत्त्वाचा विषय म्हणून औषधयोजना या विषयापुरतेच लिहिणार असल्याने सॉफ्टपॉवर नि त्यासारख्या मुद्द्यांना हात लावणार नाही.

आजीबाईचा काहीसा उपयोगी, बराचसा संदिग्ध आणि काही निरुपयोगी वस्तूंचा, बरं वाटल्यासारखे भासवणारा पण बरं होण्याची खात्री नसलेला बटवा, ऋषीमुनींचा वारसा इत्यादी ‘चिन्यांस बोले, भारतीयांस लागे’ थाटात का लिहिले आहे? “कोरोना रोखण्यास कोणत्याही औषधाची शिफारस नाही” यात ॲलोपॅथी औषधांचा समावेश आहे की नाही? इराणच्या दारूबाधित ४४ जणांच्या मृत्यूची केस जरूर द्यावी, सोबत ॲलोपॅथीचाही फेल्युअर रेट द्यावा. गेले काही महिने जगभर करोडो रुपयांचा चक्काचूर झाल्यावरही कोणताही खात्रीचा इलाज तिथे मिळालेला नसून अनेक जीवांची बाजी लागल्यानंतरसुद्धा भारतात आयुषवैद्यकांकडून क्लिनिकल ट्रायल्स किंवा रुग्णचिकित्सेचे अधिकारच काढून घेतले जातात आणि संशोधनाचा अधिकार फक्त ॲलोपॅथीचा असल्याचे घोषित होते यात “वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे” कोण दिसतात? आयुषच्या उपचारांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याचा दावा हा सर्वोच्च नेत्यांकडून जाहीरपणे होतोय त्याला लेखकाने या लेखात आव्हान दिले आहे का हाही एक प्रश्न विचारायला हवा. उलट प्रतिकारशक्ती वाढवणे हाच जर सध्या कोरोनावर इलाज आहे आणि ती जर आयुषवैद्यकातील उपचारांनी वाढतेय असे सरकार सांगत आहे तर आयुषवैद्यक उपयोगी नाही असे म्हणणे हा विरोधाभास नाही का?

बाकी, या दाव्यात अर्थ नाही असे सांगण्यास दिलेली उदाहरणे मात्र एखाद्या शिक्षकाला लाजवतील इतकी दर्जेदार आहेत. शिवाय चौरस आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि निर्व्यसनी राहणे ही प्रतिकारशक्ती वाढवण्याची चतु:सूत्रीही लाजवाब! झटपट फॉर्म्युला नाहीच आहे म्हणजे तो ॲलोपॅथीकडेही नाही असे स्पष्ट करायचे तेवढे राहिले आहे.

आयुषचे उपचार घेण्यास निर्बंध असू नये या आयुषवैद्यकाच्या मागणीवर, ते घ्यायचे असल्यास आधुनिक उपचारकेंद्रात तेथील अधिकार्‍यांच्या परवानगीनेच घेता येतील हे अलिकडच्या सरकारी फतव्यात स्पष्ट केले गेले याची लेखकांस वार्ता नाही बहुतेक. यशापयशाची जबाबदारी घेण्यास तयार असल्याशिवाय २००० आयुषवैद्यांनी यासंदर्भात आपापले संशोधन प्रकल्प सादर केले असतील का यावर वाचकांनी विचार करावा. “जेमतेम असलेला पैसा अनिश्चित आणि तापदायक उपचारात घालवून योग्य उपचारांपासून परावृत्त होणे आणि उपचार चालू आहेत या भ्रमात राहणे हा तोटाच आहे” हे किती खरे! त्याला समाजमान्यता मिळते की नाही हे सांगण्याचे परिमाण आपल्याकडे नाही, पण असे पैसे ॲलोपॅथीमध्ये घालवण्याला राजमान्यता आणि माध्यममान्यता मिळालेली दिसते. परिवर्तनाचा वाटसरू [www.pvatsaru.com] किंवा सुधारक [www.sudharak.in] असे विचारमंच सोडता, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार्‍या वृत्तपत्रांत, असेच, केवळ ॲलोपॅथीची तळी उचलून थांबणारे नव्हे तर बाकी सगळे भंपक, असे ठसठशीतपणे लिहिलेले लेखच दिसत आहेत. आता मूळ लेखात लिहिल्याप्रमाणे तसे होणे हे अधिक धोकादायक, म्हणून हा लेखनप्रपंच!

आमच्याकडे औषध नाही तरी आम्हीच तुमच्यावर उपचार करणार आणि काय येईल तो बरा-वाईट निकाल तुमच्या पुढ्यात ठेवणार असेच चाललेले नाही का ॲलोपॅथीचे? दुसर्‍यांना संशोधनाची आणि रुग्णचिकित्सेची संधी जर एपिडेमिक ऍक्टमध्ये योग्य त्या सुधारणा न करता नाकारलेली आहे तर ते कुठून आणतील अनुभव नि अनुभवांची देवाणघेवाण केल्याची उदाहरणे? गावेच्या गावे ओस पाडणार्‍या रोगांच्या साथी हजारो वर्षांपूर्वीही होत्या, जनपदोध्वंस असे त्याला नावही दिलेले आढळते. तेव्हाही काही उपचारपद्धती होत्या. शे-दोनशे वर्षांत म्हणजे आधुनिक वैद्यकाच्या उदयकाळात आयुर्वेदिक वैद्यांनी रुग्णचिकित्सा केल्यास हात तोडले जातील असे फतवे होते असे सांगतात. अशातही एखाद्या राजवैद्यानी राजाला बरे केले नि फक्त त्यांना रुग्णचिकित्सेचा परवाना मिळाला अशीदेखील उदाहरणे आहेत. शाहूमहाराजांनी प्लेगमध्ये होमिओपॅथीचा शासकीय दवाखाना सुरू केल्याचे उदाहरण आहे. आता तिकडे लक्षच न देता “आम्हीच सगळे केले” असे कुणी म्हणत असतील तर ‘वर्‍हाड निघाले लंडनला’मधल्या शेजारच्या अमकीला पोर झालं ते बी माझ्याचमुळं… या विनोदाची आठवण होते, दुसरे काय?

तेव्हा इतकेच म्हणायचे आहे की पूर्वग्रहविरहित, अभिनिवेशरहित राहून स्वत:ला पटेल अशा पद्धतीचा अवलंब लोकांना करू द्या. एकदा बाजारात आणून, लोकांना देऊन मागे घेतलेल्या लसींची उदाहरणे गेल्या पाच वर्षांत २४ आहेत [https://www.fda.gov/vaccines-blood-biologics/safety-availability-biologics/recalls-biologics], तेव्हा ॲलोपॅथीत सगळे योग्यच चालले आहे असे समजण्याचे कारण नाही. सद्सद्विवेक वापरून सर्व प्रकारच्या वैद्यकांनी हातात हात घालून जगाच्या कल्याणासाठी उभे राहण्याची वेळ आहे. “माझेच बरे, बाकी झूठ” हा विचार सोडून देऊन देशाच्या संविधानात सांगितलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्याच मार्गाने जाऊया…

सर्वेऽपि सुखिन: सन्तु। सर्वे सन्तु निरामया:।

(अंबुजा साळगांवकर या मुंबई विद्यापिठामध्ये संगणकशास्त्र विभागप्रमुख असून भारतीय शास्त्रांचे आधुनिक काळात उपयोजन हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. परीक्षित शेवडे हे मुंबईस्थित प्रथितयश आयुर्वेदतज्ज्ञ, वैद्य, असून सामाजिक मंचांवरून दिलेली त्यांची हजारो व्याख्याने गाजलेली आहेत.)