(विदर्भातील तत्त्ववेत्ते व विचारवंत दि.य. देशपांडे ह्यांनी आपल्या विदुषी पत्नी मनू गंगाधर नातू ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ह्या जगावेगळ्या दांपत्यावरील, लोकमत २०१४ च्या दिवाळी अंका पूर्वप्रकाशित झालेला हा लेख – का.सं.)
गोष्ट खूप जुनी आहे. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची म्हणजे जवळजवळ गेल्या जन्माची वाटावी अशी. पण मला अद्यापही तो काळ विसरता येत नाही. लहानशा खेड्यातून मी विदर्भ महाविद्यालयात शिकायला आले होते. शहरात छोटीशी खोली घेऊ न राहात होते आणि सायकलने कॉलेजात येत होते.