दुष्काळी भाग, निरीक्षणे व चिंतन
खेड्यात राहणारी, विशेषतः दुष्काळी भागातील माणसे सभोवतालच्या परिस्थितीमुळे रुक्ष झालेली असतात असे आपल्याला अनेक गोष्टींतून प्रत्ययास येते. म्हणजे जेवण करणे, हा एक आवश्यक नैसर्गिक उपचार असतो. बाकी काही नाही. ज्यांना त्या क्रियेला ‘उदरभरण’ म्हणणेसुद्धा रुचत नाही त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. बऱ्याच वेळा खेडूत बंधू ‘तुकडा खाणे’ किंवा ‘तुकडा मोडणे’ म्हणतात; म्हणजे “चला पाव्हणं तुकडा खायला”, किंवा “झाला का तुकडा खाऊन ?” वगैरे.
दुष्काळी परिस्थिती व नदीकाठच्या काळ्या रानाची परिस्थिती खूप वेगळी असते. काळ्या जमिनीतील शेतकऱ्याला शेतीची खूप कमी काळजी असते असे म्हणतात.