सर्व पालकांना वाटते की आपली मुले आज्ञाधारक असावीत. त्यांना सिगरेट, दारू, अमली पदार्थ यांचे व्यसन असू नये. त्यांनी बाहेर मारामारी किंवा दंगेखोरपणा करू नये. त्यांनी नातेवाईकांशी व मोठ्यांशी आदराने वागावे. परंतु यासाठी नेमके काय करावे हे पालकांना समजत नाही. सदाचाराने कसे वागावे यासाठी कोणतेही नीतिनियम नाहीत. शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ गिरवून अनैतिक वर्तणुकीस आळा बसतोच असे नाही. मुलांना सारखे ‘हे कर’ आणि ‘ते करू नकोस’ असे सांगितल्याने मुलांमध्ये सदाचाराचा विकास होत नाही. मुले लहान असताना धाकाने एक वेळ ऐकतील. परंतु मोठे झाल्यावर लादले गेलेले नीतिनियम ती झुगारून देतात.
पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग २)
“माती धरून ठेवा, पाणी अडवा आणि जमिनीत मुरवा” हा आजकालचा मंत्र झाला आहे पण त्याला म्हणावा तसा जोर येत नाही. पाणलोटक्षेत्र संवर्धन (Catch- ment area Management) आणि वनीकरण (Afforestation) यांनाही जोर येत नाही याला कारणे आहेत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे एक प्रमुख कारण आहे. वनवासी गिरिजनांनी वृक्षसंपत्ती जपावी पण लाभ मात्र मैदानी लोकांचा अथवा जंगल खात्याचा व्हावा, हे बरोबर नाही. जपणाऱ्यांनाही समृद्धीचे आयुष्य का जगता येऊ नये? मुंबईने शहापूर तालुक्याचे पाणी ओढून आणावे पण शहापूर तालुक्यातील पाणलोटक्षेत्रांच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊ नये, उलट धरणे गाळाने भरताहेत म्हणून ओरड करावी हे कितपत सयुक्तिक आहे?
माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ!
31 ऑक्टोबर 2002 ला एका जनहित याचिकेवर निर्णय देताना भारताचे तेव्हाचे सरन्यायाधीश बी.एन. किर्पाल यांनी केंद्र सरकारला नद्या-जोडणी लवकर करण्याचा आदेश दिला. नद्या-जोडणी अत्यंत निकडीची आहे आणि ती लवकरात लवकर करण्याचा आमचा निर्धार आहे, अशा अर्थाची विधाने राष्ट्रपती व पंतप्रधानांनी केली. त्यासाठी (माजी मंत्री व शिवसेनेचे खासदार) सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली एक कृतिदल (Task Force) घडवले गेले. मधल्या काळात किर्पाल यांनी आपण केवळ सूचना केली, आदेश दिला नाही, असे सांगितले. राष्ट्रीय जनआंदोलन संघटन (NAPM), मेधा पाटकर व इतरांनी नद्या-जोडणी चुकीची असल्याचे सांगितले.
पत्रसंवाद
एस. पी. देशपांडे
लेखांचे विषय जरी त्या-त्या विशेषज्ञांनी निवडले असले आणि जगदीशचंद्र बसूंच्या मुखपृष्ठावरील उताऱ्यावरून एकच सर्वसमावेशक विज्ञान असले तरी त्याच्या विविध उपांगांचा ह्या अंकात समावेश करण्याची घेतलेली खबरदारी स्पृहणीय आहे. ज्यांना पानपूरके म्हणतात ती किंवा ज्यांना अवतरणे किंवा चौकटी म्हटले आहे त्या, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि संशोधकांच्या विज्ञानविषयक निबंधांतून उद्बोधक विचार डोळसपणे निवडून मधून मधून अंकात पेरल्याने ह्या अंकाच्या गुणवत्तेला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे.
एका अत्यंत महत्त्वाच्या विज्ञानशाखेची गैरहजेरी तीव्रतेने जाणवते, ती म्हणजे रसायनशास्त्र शाखेची. मानवी जीवनावर प्राचीन काळापासून परिणाम करणारा व त्याच्या साहाय्याने विज्ञानाच्या शाखोपशाखात भर टाकणारा, विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा औषधशास्त्रात रसायनशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व असताना, अशी महत्त्वाची शाखा कशी सुटली?
संपादकीय
विज्ञान विशेषांकासाठी आलेल्या दोन लेखांचे उत्तरार्ध जागेअभावी या अंकात येत आहेत.
आजचा सुधारकचे स्नेही व सल्लागार डॉ. विश्वास कानडे यांचे नुकतेच निधन झाले. प्रा.प्र.ब. कुलकर्णीचा पुढील अंकातील लेख वाचकांना कानड्यांची ओळख करून देईल. कानड्यांनी आसुमधून विचारलेला प्रश्न, “प्राचीन भारतीय साहित्यात समाजरचनेबाबत काही चिंतन आढळते का?’ हा मात्र आजही अनुत्तरित आहे.
मोहन कडू व मधुसूदन मराठे या आमच्या लेखक-वाचक स्नेह्यांचेही नुकतेच निधन झाले. कडूंचे इट कांट हॅपन हिअरचे परीक्षण आम्हाला एक नवा, सक्षम लेखक मिळाल्याचा आनंद देत असतानाच अवघ्या 50 च्या वयात कडू वारले.
पत्रसंवाद
विज्ञानाचे स्वरूप सांगणारा विशेषांक फारच चांगला झाला आहे. त्यात दिलेली माहिती प्रत्येक सुविद्य माणसाला माहीत हवीच.
सामान्य माणसाच्या जीवनात मात्र विज्ञान फारसे शिरत नाही. त्यातले काही न समजताही तो फोनची बटने दाबून, स्कूटरला किक मारून, कम्प्यूटरचा ‘उंदीर’ चालवून आपला कार्यभाग साधत असतो. त्याची बुद्धी स्थल-काल, द्रव्यगुण या पारंपारिक संकल्पनांशी जुळलेली असते. या सर्वच कल्पना जिथे विलय पावतात, ऊर्जेचा पुरावा असतो पण द्रव्याचा पुरावा नसतो, तरीही गुरुत्वाकर्षण शक्ती असते, स्थल-काल हे स्वतंत्र पदार्थ नसून ते एका जटिल गणिती संबंधाने जुळलेली कशाचीतरी रूपे असतात अशा ‘नेति, नेति’ कल्पना सामान्य मनुष्याच्या पचनी पडत नाहीत.
पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग १)
पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगर दऱ्यात . . . सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते, आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते, म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे व्यवस्थापक, अभियंते, धरणे, कालवे, नळ, जलशुद्धीकरणाच्या सोयी, पंप, डिझेल, वीज या गोष्टी फुकट मिळत नाहीत. हा एक पूर्वनियोजित प्रचंड खटाटोप असतो, म्हणून ही व्यवस्थापनयंत्रणा उभी करावी लागते.
सारे काही समतेसाठीच
परस्परावलंबन आणि नव्या पद्धतीचे अर्थकारण ह्या विषयीच्या मी लिहीत असलेल्या लेखांची सुरुवात अंदाजे दोनअडीच वर्षापूर्वी झाली. ही लेखमाला लांबत चालली आहे आणि ती तुटकपणे प्रकाशित झाल्याने तिच्यातील संगती राखणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे ह्या एका लेखानंतर ही लेखमाला थांबवावी आणि ह्या विषयावर एक मुद्देसूद आणि बांधेसूद पुस्तक लिहून तयार करावे, असा विचार माझ्या मनात दृढमूल होऊ लागला.
श्री. भ. पां. पाटणकर, डॉ. चिं. मो. पंडित, श्री. मधुकर देशपांडे, आणि श्री. फाळके ह्या मंडळींनी ही माझी लेखमाला साक्षेपाने वाचली. आणि त्यांचे माझ्याशी असलेले मतैक्य आणि मतांतर नोंदवले ह्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
गणिताचे समाजातील स्थान आणि कार्य (उत्तरार्ध)
गणिताचे महत्त्व किती याची जाणीव व्यापक समाजाला आहे का? गणित विषयात काम करणाऱ्याला समाज कशा प्रकारची वागणूक देतो? एकूण सर्वच विज्ञानक्षेत्र आणि खास करून गणित यांची चांगली कदर पाश्चात्त्य समाजाला निदान आधुनिक काळात तरी, असल्याचे दिसते. 19 व्या शतकाची सुरुवात होईपर्यंत केवळ गणितालाच वाहून घेतलेल्यांची संख्या फारच तुरळक होती. त्यानंतर मात्र गणितज्ज्ञांना, अगदी गणितासाठी गणित करणाऱ्यांनाही, पाश्चात्त्य समाजाने बऱ्यापैकी पाठिंबा दिल्याचे दिसते. अनेक विद्यापीठांची तसेच इतर विद्याकेंद्राची स्थापना, आणि काही गणितज्ज्ञांना तेथील राजेरजवाड्यांनी केलेले साहाय्य यावरून याची चांगली खात्री पटते. अर्थात काही अत्युत्कृष्ट व्यक्तींना जरूर तो पाठिंबा न मिळाल्याच्या घटना आहेत.
विज्ञान ही काय चीज आहे? (उत्तरार्ध)
थॉमस कून यांचा वैज्ञानिक क्रांतींची संरचना (The Structure of Scientific Revolutions) हा ग्रंथ 1962 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत या ग्रंथावर जगात हजारो शोधनिबंध लिहिले गेले असतील. या ग्रंथामुळे विज्ञानाकडे बघण्याच्या एकूणच दृष्टिकोनात क्रांती घडून आली. विज्ञान म्हणजे काय हा विचार करताना कूनपूर्व आणि कूनोत्तर असे दोन कालखंड पडतात. अर्थात ते अगदी काटेकोर कालगणनेनुसार नव्हेत. कारण इ.स. १९६२ नंतरही कूनपूर्व कालखंडातील दृष्टिकोनाचा पाठपुरावा करणारे अनेक तत्त्वज्ञ आढळतात. किंबहुना कून यांच्या प्रबंधाने सुरू झालेली चर्चा अजूनही संपलेली नाही. एवढे मात्र खरे की १९६२ नंतर ज्याला कूनीय वा कूनोत्तर दृष्टिकोन म्हणता येईल तो रुजत गेला आणि सध्याचा विज्ञानाच्या अभ्यासाचा प्रचलित, अधिकृत, वर्चस्वी दृष्टिकोन तोच आहे.