विपश्यना, साक्षात्कार, वैज्ञानिक आकलन, मेंदूविज्ञान
——————————————————————————
‘आजचा सुधारक’च्या जून व जुलै 2016च्या भागामध्ये ‘साक्षात्कारामागील वैज्ञानिक सत्य’ व ‘साक्षात्कार : वैज्ञानिक स्पष्टीकरण’ ह्या दोन लेखांमधून डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी ‘साक्षात्कार’ची ह्या संकल्पनेचे वैज्ञानिक विश्लेषण केले होते. त्याच विषयाची दुसरी बाजू मांडणारा व त्याचबरोबर ध्यान, ईश्वर, भक्ती ह्या संकल्पनांचा गांधी-विनोबा परंपरेतला अर्थ विशद करून सांगणारा आणखी एका डॉक्टरांचा हा लेख, आजचा सुधारकची संवादाची परंपरा नक्कीच पुढे नेईल.
——————————————————————————
आपल्यालेखनात डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी साक्षात्काराची वैज्ञानिक विश्लेषणात्मक बाजू मांडताना खालील विधाने केली आहेत: ‘‘ध्यानावस्थेत देवांच्या विचाराचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्या अंतर्मनातून आलेले जे विचार असतात, त्यांनाच अंतिमसत्य मानून, त्यावर भाबडा विश्वास ठेवून, त्यांना साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हटले जाते.’’