वासांसि जीर्णानि यथा विहाय…….
हे खूप लहानपणी कानावर आले. माणसाला आत्मा असतो. तो अमर असतो. शरीर मेले तरी तो मरत नाही. पहिली वस्त्रे काढून नवी घालावीत तसे आत्मा नवीन शरीर धारण करतो. या जन्मी केलेल्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म कुणाचा येणार ते ठरते. असे ऐकले अगदी पहिल्यापासून.
या सगळ्या कल्पना, खऱ्या असोत वा नसोत, त्यांचे मूळ काय असेल? माणसाला आत्मा असतो असे प्रथम कुणाला तरी का वाटले असेल? मूळ शोधणे तसे जवळपास अशक्यच आहे. पण या ना त्या स्वरूपात माणसाला आत्मा असतो असे जगातले सर्व समाज मानत आले आहेत.