Category Archives: इतर

आवाहन

स्नेह.

१ एप्रिलला ‘सुधारक’चा पुढील अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकासाठी विषयाचे बंधन नसून आपल्याला जवळचा वाटणारा कोणताही संवेदनशील विषय आपण घेऊ शकता. ‘सुधारक’ कथा, कविता, ललित, विनोदी, विडंबनात्मक, निबंधात्मक, परीक्षणात्मक अशा कुठल्याही स्वरुपातील लिखाणाचे स्वागत करते.

– सद्यःस्थितीचा आढावा घ्यायचा झाल्यास नागरिकत्व संशोधन कायद्याविषयीच्या समज-गैरसमजांवर तथ्यात्मक, विश्लेषणात्मक असे काही आपण घेऊ शकतो.
– करोनाच्या विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या/ होत असल्या भयावह स्थितीविषयी काही तथ्ये व काही उपाययोजना यांवरही काही वैज्ञानिक माहिती यावी असे वाटते.
– ‘महिला दिना’च्या निमित्ताने स्त्री-पुरुष समानतेविषयी विचार करताना ‘थप्पड’ सारखा एखादा चित्रपट किंवा ‘देवी’ सारखा नेटफ्लिक्सवरील लघुचित्रपट डोळ्यांत अंजन घालणारा ठरतो. त्याविषयी काही लिहिले गेले तर ते घेता येईल.
– ‘वाचलेच पाहिजे’, वा ‘बघितलेच पाहिजे’ ह्या वर्गवारीत टाकता येणारे एखादे पुस्तक, एखादी कलाकृती यांबद्दलचे परीक्षण आले तर रसिक आणि चोखंदळ वाचकांसाठी/ प्रेक्षकांसाठी ते अतिशय उपयुक्त ठरेल.

आपले सामाजिक संबंध अधिक दृढ व्हावेत यादृष्टीने वरील सगळेच विषय अतिशय महत्त्वाचे वाटतात.

आपले लेख २७ मार्चपर्यंत aajacha.sudharak@gmail.com  ह्या पत्त्यावर पाठवावेत. लेख युनिकोडमध्ये टाईप करून पाठवावा. हस्तलिखित असल्यास ते कोरियरने वा 09372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवले तरी चालेल.

‘सुधारक’चे हे आवाहन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे ही विनंती. 

प्राजक्ता अतुल
समन्वयक, सुधारक
09372204641

मानवजातीचे डोळस संमीलन

समाजातील तंत्रविज्ञानाचा व अधिकतम प्रावीण्याचा विस्तार जोवर चालू असतो, तोवर प्रत्येक समाज बाहेरच्या समाजांच्या दडपणाला समर्थपणे तोंड देतो. किंबहुना तो फारच रसरशीत असला, तर दुबळ्या समाजांचे शोषण करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. पण याउलट तो एकदा घसरगुंडीला लागला की, त्याचा अन्य समाजांशी चाललेला संघर्ष अधिकाधिक कष्टप्रद आणि अपयशी होऊ लागतो. जरा वेगळ्या भाषेत सांगावयाचे, म्हणजे एखादी संस्कृती अधिकतम प्रावीण्य प्राप्त करून घेईपर्यंत सतेज असते आणि तोपर्यंत ती जगातील एक उदयोन्मुख बलदंड सत्ता म्हणून मानली जाते. याउलट प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तिचे तेज मंदावत जाते व ती संस्कृती अन्य संस्कृतींचे भक्ष्य बनते. अशा रीतीने मानवी इतिहासात सत्ता व समृद्धीचे स्थलांतर अखंडपणे चालू आहे. म्हणून अंतर्गत व बाह्य़ घटकांचा व गतींचा एकत्र अभ्यास केला, तर असे दिसते की, आजवरचा सर्व मानवी इतिहास म्हणजे वर्ग व वर्ण यांची समाजांतर्गत अदलाबदल आणि  सामर्थ्य व समृद्धी यांचे एका संस्कृतीतून व प्रदेशातून दुसऱ्या संस्कृतीत व प्रदेशात होणारे बाह्य़ स्थलांतर यांचा इतिहास होय, असे दिसून येईल.

राम बापट

सहिष्णुतेची खरी कसोटी

समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रूजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रीया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याच्या बाबतीत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रध्दांच्यावर आघात करणाऱ्या लिखाणांच्या विषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणी कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रध्दा जपायच्या या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असते मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रध्दा कितीही दुखावली तरीही सहिष्णुतेने वागायचे, या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे. देशातील धार्मिक अंधश्रध्दा असणाऱ्यांच्या कोणत्याही श्रध्देय भूमिकेची चिकित्सा होताच जिथे निषेध होतात तिचे फारसे स्वातंत्र्य अस्तित्वात असू शकत नाही.

नरहर कुरुंदकर
‘अभयआरण्य’