मासिक संग्रह: मे, १९९२

कामवासना आणि नीती

जेथे जेथे दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परसंबंध येतो तेथेच नीतीचे प्रश्न उपस्थित होतात, व कामवासना नैसर्गिक रीतीने तृप्त करण्यास प्रत्येकास अन्यलिंगी व्यक्तीची जरूर असते, यामुळे याबाबतीत नीतीचे प्रश्न नेहमीच येतात. अर्थात एवढ्याच दृष्टीने पाहिल्यास असे म्हणता येईल की दोन व्यक्तींची जर संमती असेल, व एकापासून दुसर्‍यास कोणत्याही रोगाचा नकळत संसर्ग होण्याचा संभव नसेल, तर त्यांच्या समागमास हरकत नाही. नकळत म्हणण्याचे कारण कित्येक वेळा दुसर्‍यापासून संसर्गाचा संभव आहे हे माहीत असताही लोक समागमास उद्युक्त होतात, परंतु ते आपले स्वतःचे नुकसान करून घेतात व यात कोणावरही अनीतीचा आरोप करता येणार नाही.

पुढे वाचा

वाचक मेळावा

मुळात ‘ नवा सुधारक’ या नावाने सुरू झालेले आमचे हे मासिक किती दिवस चालेल याची खात्री नव्हती. ‘सर्वारम्भास्तण्डुलाः प्रस्थमूलाः’ हे खरे आहे. पण नुसती तांदुळाची सोय असली तरी अशी कार्ये शेवटाला जात नाहीत. लोकाश्रय नसेल तर सारे व्यर्थ. ह्या भीतीमुळे सुरुवातीला चालकांना ‘आजीव वर्गणीदार’ ही पद्धत जाहीर करायचादेखील संकोच वाटला ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’ दोन वर्षे चालला आणि तो वाढत आहे ही गोष्ट चालकांना समाधानाची वाटते. अधूनमधून वाचकांच्या पत्रांद्वारे आमच्या कामाबद्दल भल्याबुर्‍या प्रतिक्रिया मिळतात. पण त्याने पुरेसे प्रतिपोषण होत नाही.

पुढे वाचा

टिपण-हसावे की रडावे?

आजच्या सुधारकच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अंकातील संपादकीयात म्हटले आहे की “आगरकरांनी शंभर वर्षापूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली. पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षानंतरही ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इत्यादी गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे.

पुढे वाचा

दाऊदी बोहरांना न्यायालयाचा दिलासा

धर्माच्या नावाखाली संविधानाने सर्व नागरिकांना धर्मनिरपेक्ष वृत्तीने दिलेले नागरी स्वातंत्र्याचे व मानवी अधिकार दाऊदी बोहरा धर्मगुरु सैयदना हे हिरावून घेत असताना त्यांच्या हातात त्यासाठी दोन शस्त्रे आहेत. एक रजा आणि दुसरे बारात. रजा म्हणजे अनुमती. अशी अनुमती असल्यावाचून नवरा-नवरी राजी असूनही लग्न करू शकत नाहीत. सैयदनांना भली मोठी खंडणी पोचवली म्हणजे अनुमती मिळते. बोहरा दफनभूमीत प्रेत पुरायलासुद्धा धर्मगुरूंची अनुमती लागते आणि त्यावेळीही पैसे उकळले जातात! जातीबाहेर टाकण्याची तलवार प्रत्येक बोहर्‍याच्या डोक्यावर टांगलेलीच असते. बारात म्हणजे जातीबाहेर घालविणे. बोहरा धर्मगुरूंनी अध्यात्माच्या क्षेत्रात आपली मनमानी खुशाल चालवावी, पण भारतीय गणराज्याला धार्मिक पोटराज्याचे आव्हान उभे करू नये, ही सुधारणावादी बोहर्‍यांची साधी मागणी आहे.

पुढे वाचा

कालचे सुधारकः ताराबाई मोडक (पूर्वार्ध)

१९ एप्रिल १९९२ रोजी, ताराबाई मोडकांची जन्मशताब्दी झाली. ताराबाई थोर शिक्षणतज्ज्ञ, विशेषतः पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दलचे त्यांचे कार्य फार मोठे आहे. पण लक्षात आले की, ताराबाईंचे कार्यच काय, नावही असावे तितके प्रसिद्ध नाही. लोकांचे अशा गोष्टींकडे लक्षच कमी आहे का? असेल. महाराष्ट्राचे सामाजिक सुधारणेसाठी थोडेबहुत नाव आहे. हे कौतुक ऐकायला बरे वाटते. पण त्याच्या मागे शेदीडशे वर्षांचे काम आहे, हे विसरायला होते. सुधारणावाद्यांची महाराष्ट्रात एक परंपरा आहे. ती क्षीण असेल, पण अजून खंड नाही. अशा कार्याच्या बाबतीत ताराबाईंनी म्हटले आहे, हा खटाटोप कशाला करायचा, हा प्रश्न … खुर्चीवर बसून विचार करण्याच्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणार्‍यांना जास्त वेळा बोचतो.

पुढे वाचा

अध्यात्म की विज्ञान

आधुनिक विज्ञान हे अध्यात्माच्या जवळ चालले आहे असे मत अनेक वेळा प्रदर्शित करण्यात येते; अशा अर्थाची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. परंतु खरोखर अशी वस्तुस्थिती आहे काय याविषयी आज विचार करणे आवश्यक झाले आहे.

अध्यात्मातील काही संकल्पना :अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध! त्याचे प्रयोजन म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे तादात्म्य प्राप्त करणे, व अशा रीतीने मोक्ष मिळविणे. या ध्येयाला मुक्ती प्राप्त करणे, निर्वाणाप्रत जाणे, साक्षात्कार होऊन परमेश्वराची प्राप्ती होणे, अशा विविध प्रकारे व्यक्त करण्यात येते.

पुढे वाचा

गीता – ज्ञानेश्वरी आणि वर्णव्यवस्था

गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहिता, सामाजिक विषमतेवर आधारलेल्या जन्मजात वर्णव्यवस्थेचा निखालस पुरस्कार करणार्‍या आहेत. या दोन्ही संहितांमध्ये ठायीठायी आढळणारा या संदर्भातला पुरावा स्पष्ट आहे.
गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहितांतील पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन या महाभारतकार व्यास यांच्या पात्राने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांमध्ये कुलक्षयानंतरचा स्त्रियांमधील स्वैराचार या नैतिक प्रश्नाबरोबरच त्यालाच जोडून येणारा पुरातन जातिधर्म, कुळधर्म उत्सन्न होऊन वर्णसंकर होईल हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न दोनही ग्रंथसंहितांच्या मुखाध्याया’मध्येच उपस्थित केला आहे. अर्जुन या पात्राच्या मुखाध्यायातील सर्वच प्रश्नांची रीतसर उत्तरे देण्यासाठी पुढील १७ अध्यायांचा प्रपंच आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १९)

आपल्या चर्चेतून आपण काही निष्कर्षाप्रत आलो आहोत. यांपैकी काही निष्कर्ष ऐतिहासिक आहेत, तर काही नैतिक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता आपल्याला असे आढळले की आज नागरित समाजात लैंगिक नीती ज्या स्वरूपात आहे, ते स्वरूप तिला दोन भिन्न स्रोतांमधून प्राप्त झाले आहे. एका बाजूला पितृत्व निश्चित करण्याची पुरुषांची इच्छा, आणि दुसर्‍या बाजूला प्रजननाखेरीज अन्यत्र लैंगिक संबंध पापमय आहे. हा तापसवादी विश्वास. ख्रिस्तपूर्व काळातील नीती, तसेच सुदूर पूर्वेत आजतागायत आढळणारी नीती यांच्या मुळाशी फक्त पहिलाच स्रोत होता. याला अपवाद होता इराण आणि हिंदुस्थान यांचा, कारण तापसवृत्तीचा प्रसार या दोन क्षेत्रातून झालेला दिसतो.

पुढे वाचा

आता नवविवेकवादाची गरज आहे

‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.
ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान मोक्षशास्त्रालाही बुद्धीच्या आवाक्यात आणीत आहे याची उदाहरणे मी दिली आहेत. हा प्रयत्न पुरेसा निर्णायक होईपर्यंत मोक्षशास्त्राबद्दल पूर्णविश्वास किंवा पूर्ण अविश्वास व्यक्त न करणे हेच विवेकवादाशी सुसंगत होईल असे मी म्हटले आहे.

पुढे वाचा

प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद!

गीतेवरील माझ्या लेखावर प्रा. श्री. गो. काशीकर यांनी घेतलेल्या आरोपांना मी जे उत्तर दिले ते त्यांना पटले नसून त्यांनी आता नवविवेकवादाची गरज आहे’ या शीर्षकाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. हे प्रत्युत्तर या अंकात अन्यत्र छापले असून त्याबद्दलची माझी भूमिका येथे देत आहे.
प्रथम मी प्रा.काशीकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले आणि माझा एक गैरसमज दूर केला. माझी अशी समजूत होती (आणि अजूनही बर्या च प्रमाणात आहे) की विश्वाची उत्पत्ती हा विषय वैज्ञानिक पद्धतीच्या आटोक्यात नाही. काही वैज्ञानिक विश्वरचनेच्या (cosmology) क्षेत्रात काम करीत आहेत हे मला माहीत होते.

पुढे वाचा