मासिक संग्रह: मार्च, २००१

अवैज्ञानिक जनहितविरोध?

फेब्रुवारी २००१ (११.११) च्या अंकात मराठी विज्ञान परिषदेच्या एका स्मरणिकेचा डॉ. र. वि. पंडितांनी परामर्श घेतला आहे. विज्ञान परिषद आणि आजचा सुधारक यांची उद्दिष्टे एकमेकांशी जुळती आहेत, हे डॉ. रविपंचे निरीक्षण योग्यच आहे. ते पुढे नोंदतात की विवेकवाद, स्त्रियांचे समाजातले स्थान, धर्मश्रद्धा वगैरे विषय आ. सु.तल्या अती झालेल्या चर्चेने गुळगुळीत झाले आहेत. त्याऐवजी डॉ. रविपना सुधारणा आणि विकासाचे व्यवस्थापन यावर जास्त खल होऊन हवा आहे.
सुधारणेचा पाया सुशिक्षणात आहे, यावर दुमत नसावे. ‘प्रोब’ हा प्राथमिक शिक्षणावरचा अहवाल दाखवतो की स्त्रियांना महत्त्व न देणाऱ्या आणि जातीपातींच्या विळख्यातल्या ‘बीमारू प्रांतांमध्ये शिक्षणाचे चित्र भीषण आहे.

पुढे वाचा

संपादकीय अस्वस्थता!

अकरा वर्षांपूर्वी आजचा सुधारक सुरू झाले तेव्हा जागतिकीकरण—-खाजगीकरणही सुरू होत होते. त्यावेळी मनमोहनसिंगांनी परकीय मदत मिळवून विकासाचा दर सहा टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर नेला. तेव्हा एक प्रवाद असा होता की सहा टक्के विकास दर, ही प्रकाशाच्या वेगासारखी एक अनुल्लंघ्य मर्यादा आहे! तिला हेटाळणीने ‘हिंदू विकास दर’ म्हटले जाई. ही मर्यादा मोडणारे सिंग-राव सरकार अर्थातच कौतुकाचे धनी झाले.
जागतिकीकरण-खाजगीकरणावर टीका करणाऱ्यांना त्यावेळी सरसकट ‘कम्यूनिस्ट’ ही शिवी (!) देऊन डावलले जात असे. सिंग सांगत होते, की हा एक–दिशा मार्ग आहे. एकदा ही वाट धरायची तर ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको’ असे स्वतःला बजावत, अत्यंत शिस्तबद्धतेने वागावे लागेल.

पुढे वाचा

पत्रसंवाद

गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, IIIGII WYCOMBE, Bucks. IIP 11 1SE, UNITED KINGDOM

काही महिन्यांपूर्वी, अकस्मात वाढलेल्या टपालखर्चामुळे, काही आर्थिक मदत करण्याबद्दल आवाहन केले होते आपण वर्गणीदारांना. त्याला साद देण्यासाठी मी अेकदा संगणकापुढे बसलेलोही होतो. मधेच कसलेतरी खुसपट उपटल्याने स्थगित झाले ते लेखन. क्षमस्वमे. सोबत १० पौडांचा धनादेश जोडत आहे. कृपया, त्याचा स्वीकार व्हावा.

नोव्हेंबर २०००च्या अंकातील श्री. आत्रे यांचा जातींचा उगम—-एक दृष्टिकोन हा लेख वाचत असता सहज एक विचार मनीं आला व मला उत्तर सापडेना म्हणून आवर्जून हे पत्र लिहीत आहे मी आपणांस.

पुढे वाचा

खादी (भाग १)

: एक प्रकट चिंतन

आपल्या नोव्हेंबर २०००च्या अंकात खादी एका तत्त्वप्रणालीमधली कडी राहिली नसून तिचे आता फडके झाले आहे असे वाचले. पण त्यात संपादक नवीन काही सांगत नाहीत. खादीचे फडके कधीचेच झाले आहे. त्या गोष्टीला ५० वर्षे उलटून गेली आहेत. रिबेटची कुबडी ज्या दिवशी खादीने स्वीकारली त्या दिवशी किंवा त्या अगोदरच खादी निष्प्राण झाली होती. खादीचे फडके झाले आहे ही गोष्ट सर्व वरिष्ठ खादीवाल्यांना माहीत होती. अण्णासाहेब सहस्रबुद्धे खादीच्या क्षेत्रातले एक श्रेष्ठ कार्यकर्ते. त्यांना फार पूर्वीपासून निराशा आलेली होती आणि ‘खादी अ-सरकारी केल्याशिवाय ती असर-कारी होणार नाही’ असे मत विनोबाजी त्यांच्या लिष्ट शैलीत मांडत असत.

पुढे वाचा

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग ४)

प्राथमिक शिक्षणावरच्या प्रोबच्या अहवालावरील हा शेवटचा लेख. आत्तापर्यंतच्या तीन लेखांत त्यांतील पहिल्या पाच प्रकरणांचा जरा विस्ताराने आढावा घेतला. ह्या शेवटच्या लेखात उरलेल्या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे फक्त त्रोटक-पणे नोंदून हिमाचल प्रदेशामध्ये झालेल्या ‘शैक्षणिक क्रांतीची’ माहिती मात्र विस्तृतपणे देत आहे.
आतापर्यंत प्रोब अहवालात वरचेवर येणारे ‘निराशा’, ‘निरुत्साह’, ‘जबाबदारीची उणीव’ ह्या शब्दांऐवजी ‘प्रोत्साहन’, ‘उत्साह’, ‘जबाबदारीची जाणीव’ ह्या शब्दांनी ज्या शैक्षणिक व्यवहाराचे वर्णन करता येईल त्याची कदर करण्याचा हा प्रयत्न आहे, तसेच हिमाचल प्रदेशामध्ये हे का झाले हे सर्वांना समजणे अगत्याचे आहे म्हणून ही माहिती तपशीलवार देत आहे.

पुढे वाचा

नीरक्षीरविवेक?

ख्रिस्ती धर्माच्या उदयाच्या आधी यूनानी लोकांची मतेही हिंदूंच्या (सध्याच्या) मतांसारखीच होती. सुशिक्षित यूनानी लोक आज हिंदू करतात, तसाच विचार करत. सामान्य यूनानी लोकही हिंदूंसारखेच मूर्तिपूजक होते. पण यूनानींच्यात दार्शनिकही होते, आणि त्यांनी आपल्याच देशात राहून अंधविश्वासाला थारा तर दिला नाहीच, पण वैज्ञानिक तत्त्वांची पर्यायी मांडणी करून त्यांच्यावर समाधानकारक उत्तरे काढली.

हिंदूंमध्ये वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये परिपूर्णता आणायची क्षमता व इच्छा असलेले लोक नव्हते. यामुळेच हिंदूंमध्ये बहुशः असे दिसते की वैज्ञानिक प्रमेये तार्किक क्रम न लावता अस्ताव्यस्त झालेली आहेत. शेवटी तर अशी प्रमेये जनसमूहाच्या हास्यास्पद धारणांशी गल्लत झालेल्या स्पात दिसतात.

पुढे वाचा