मासिक संग्रह: फेब्रुवारी, २००९

संपादकीय

मंदीची कहाणी The Grapes of Wrath
आर्थिक मंदी म्हणजे एखाद्या समाजाने केलेली उत्पादने विकत घेण्याइतकी क्रयशक्ती लोकांकडे उपलब्ध नसणे. यातून बेकारी वाढते. लोकांची क्रयशक्ती आणखीनच घटते आणि मंदी अधिकच तीव्र होते. अशी एक महामंदी, द ग्रेट डिप्रेशन, १९२९-३९ या काळात अमेरिकेला त्रासून गेली. अमेरिकेला उत्पादने पुरवणाऱ्या देशांनाही याची झळ लागली. या काळाचे उत्कृष्ट वर्णन जॉन स्टाइनबेकच्या द ग्रेप्स ऑफ ऍथ (The Grapes of Wrath, १९३९) या कादंबरीत भेटते. आज पुन्हा एकदा अमेरिका हे केंद्र असलेली जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीजवळ आहे. जगाच्या बऱ्याच भागांत दोन हस्तक, एक मस्तक यांना काम मिळणार नाही, अशी धास्ती सर्व अर्थशास्त्रज्ञांना छळते आहे.

पुढे वाचा

विस्तारणारी क्षितिजे

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये दृश्यकलेचा एक अभूतपूर्व उत्सव साजरा केला गेला. “विस्तारणारी क्षितिजे’ नावाचे आधुनिक आणि समकालीन भारतीय दृश्यकलेचे एक प्रदर्शन त्या काळात नागपूरमध्ये भरले होते. ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आणि जणुकाही त्याच्या स्वागतासाठी म्हणून नागपुरातील सिस्फा आर्ट गॅलरीने शहरातील लहान-मोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये अनेक छोटी छोटी प्रदर्शने भरवली होती. आठवडाभर नागपुरातील चित्ररसिकांना कलेची एक मेजवानीच उपभोगायला मिळाली.
विस्तारणारी क्षितिजे’ हे प्रदर्शन प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन आणि बोधी आर्ट गॅलरी ह्यांच्या अथक प्रयत्नांतून आकारास आले. महानगरातच गोठल्या गेलेल्या समकालीन भारतीय दृश्यकलेची ओळख महाराष्ट्रातील इतर भागातील प्रेक्षकांनाही व्हावी ह्या हेतूने निवडक कलाकारांची चित्रे घेऊन आठ शहरांमध्ये हे प्रदर्शन त्यांनी फिरविले.

पुढे वाचा

‘आधुनिकतावादी’ या संज्ञेत प्रस्तुत लेखकास काय अभिप्रेत आहे? (नवपार्थहृद्गत ह्या पुस्तकामधील प्रास्ताविक विभागः चार)

खरे तर नवपार्थाने आत्मसात् केलेला आधुनिकतावाद, ही गोष्ट, ज्या भावनांनी तो गीतासंहितेला अनुसाद/प्रतिसाद देतो, त्या भावनांच्या अभिव्यक्तीतून वाचकांना जाणवल्याखेरीज राहणार नाही. किंबहुना हृद्गत-वाचनाच्या अनुभवातून आधुनिकतावादही उमगणे हे जास्त समृद्ध करणारे आहे. अगोदरच कोरडी व्याख्या देण्याने काहीसा रसभंगच पत्करावा लागेल. ज्या वाचकांना संज्ञेपेक्षा भाव जवळचा वाटतो त्यांनी खालील मजकूर आत्ता टाळून हृद्गतवाचनानंतर तो वाचण्यात त्यांना लाभ आहे.
परंतु लेखकास, त्याने काय करायला घेतले आहे याबाबत पारदर्शक राहण्याचे, कर्तव्यही बजावायला हवेच. म्हणूनच उपशीर्षकापासून वापरलेल्या ‘आधुनिकतावाद’ या संज्ञेची सूत्रमय, संक्षिप्त व पारिभाषिक संज्ञांनी संपृक्त अशी रूपरेषा येथे देत आहे.

पुढे वाचा

एका वैज्ञानिकाचा विवेकवाद

या संदर्भात फाईनमन या वैज्ञानिकाचे महत्त्वाचे वचन आठवणीतून उद्धृत करतो. “कुठल्याही वैज्ञानिक सिद्धान्ताच्या सत्यतेचा अंतिम निकष म्हणजे प्रत्यक्ष प्रायोगिक पडताळा. तुमचा सिद्धान्त कितीही तर्कसंगत व सुंदर असेल, पण जर त्याचे निष्कर्ष प्रायोगिक निरीक्षणांशी जुळत नसतील, तर तो सिद्धान्त चुकीचा आहे. मग तुमचे नाव काहीही असो, तुम्ही कितीही बुद्धिमान असा, तुम्हाला कितीही पारितोषिके मिळालेली असोत. तुमचा सिद्धान्त अनुभवांशी जुळत नसेल, तर तो निखळपणे असत्य आहे.’ केवळ विज्ञानातच नाही, तर कोणत्याही वास्तवाकडे बघताना ध्यानात ठेवावा, असा हा सावधगिरीचा इशारा आहे.
तत्त्वज्ञानाविषयी बोलायचे झाले, तर मी वेडेवाकडे वाचन बरेच केले.

पुढे वाचा

अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे ‘प्रत्युत्तर’ चुकीचे का होते

मूळ लेखक: पी. साईनाथ

मुंबईमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८०हून अधिक लोक ठार झाल्यानंतर दहशतवादाला रोखण्यासाठी जे अनेक प्रकारचे युक्तिवाद केले जात आहेत, त्यांपैकी सर्वांत चुकीचा व घातक युक्तिवाद आहे तो असाः
अशा प्रकारच्या दहशतवादास कसे प्रत्युत्तर (response) द्यायचे याचे धडे अमेरिकेकडून भारताने घेतले पाहिजेत. “जरा अमेरिकेकडे पहा- सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला झाला का?”
अशा प्रकारचा युक्तिवाद अनेक जणांकडून ऐकायला मिळतो. थोडक्यात त्यांचे म्हणणे असे असते की त्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या बुश प्रशासनाने जे उपाय केले त्यांमुळे पुन्हा दहशतवादी हल्ला करायचे धाडस कुणीही केलेले नाही.

पुढे वाचा

सैनिक आणि सेनापती

सैनिक आणि सेनापती हे एकाच एककातले उपप्रकार असतात ड्ड एक मुळातला आणि दुसरा परिवर्तित रूपातला. पण त्यांचा सुटा विचार करता येतच नाही. एकेकटे पाहता त्यांना ना संदर्भ असतात ना उपयुक्तता. हे समाजातही असते ड्र सैनिक आणि त्याचा सेनापती हे समाजाचेच लहानसे चित्र असते. सैनिकाची क्षमता आणि अस्तित्वही सेनापतीवरच अवलंबून असते. सेनापतीच सैनिकाला त्याची ओळख व त्याचे स्थान देत असतो. चांगले सेनापती कमकुवत सैनिकांपासून चांगले सैनिक घडवताना दिसतात. दुसऱ्या दिशेने चांगले सैनिक कमकुवत सेनापतींनाही पुढे नेतात. सक्षम सेनापती नेहेमीच चांगले सैनिक घडवतात.

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग २)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. अँडम स्मिथ, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल् यांच्या विचारांनुसार इंग्लंडात भांडवलवादी अर्थव्यवस्था कशी रुजली ते आपण पाहिले. आता त्यापुढे-]

परदेशगमन!
औद्योगिक क्रांतीनंतरच्या बदलाचा मागोवा घेताना वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विकासाचे टप्पे ठरवताना काही अडचणी येतात. प्रत्येक भाष्यकार सोईनुसार टप्पे पाडत आहे असे वाटते. एका बाबतीत मात्र ढोबळमानाने एकमत आहे. इस१७७६ ते इस १९१४, म्हणजे अमेरिका स्वतंत्र होण्यापासून पहिल्या महायुद्धाचा काळ, यात भांडवली व्यवस्थेचा बराचसा अनिर्बंध असा विकास झाला.

पुढे वाचा

पत्रसंवाद

टी.बी. खिलारे यांनी चर्चेला दिलेले उत्तर काही बाबतीत चांगले व पटणारे आहे. पण तीन बाबतीत ते पटणारे नाही, तिथे त्यांचा युक्तिवाद तोकडा आहे. दि. य. देशपांडे आ.सु.चे संपादक असताना कित्येक विषयांवर मनमोकळ्या चर्चा झाल्या होत्या. विरोधकांची ग्राम्य भाषेकडे झुकणारी पत्रेही त्यांनी छापली होती. ‘आम्ही श्रद्धेची चिलखते काढून टाकली आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलाही बाण वर्ण्य नाही’ असा तो बाणा होता. त्यामुळे केवळ विवेकवादी मजकूर हे आ.सु.च्या तत्त्वात बसणारे नाही तर अविवेकी विचार व त्याला दिलेले मुद्देसूद उत्तर हेही त्या तत्त्वात समाविष्ट असते.

पुढे वाचा