डॉ. स. ह. देशपांडे ह्यांनी अत्यन्त अभ्यासपूर्वक लिहिलेला सावरकर ते भा. ज. प. हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख हा ग्रन्थ माझ्या नुकताच वाचनात आला. ग्रन्थ वाचल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ विचार आले. त्यांपैकी काही येथे संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करतो.
मुस्लिम विरोधात हिन्दुत्व
हिन्दुत्वविचाराचा आलेख मांडताना डॉ. देशपांडे (सहदे) ह्यांनी फक्त मुस्लिमविरोधात हिन्दुत्व अशी त्याची मांडणी केली असल्यामुळे ग्रंथ वाचून माझे तरी समाधान झाले नाही. लेखकाने मनाशी काही एक निष्कर्ष आधीच काढून ठेवला असून त्या निष्कर्षाला पूरक अशीच अवतरणे (उद्धरणे) त्यांनी प्रचुर मात्रेमध्ये जमविली आहेत असे मनात आल्यावाचून राहिले नाही.