विषय «कविता»

अजूनही येतोय वास फुलांना

नाहीतरी हवेवर उजेडावर स्वप्नांवर नियंत्रण थोडेच आलेले आहे
नाहीतरी शर्टाच्या खिशावर गुलाब लावून फिरता येते की घराबाहेर
नाहीतरी अजूनही सूर्य उगवतोच की नाही पूर्वेला पृथ्वीवर सकाळी सकाळी
नाहीतरी अजूनही न चुकता सकाळ संध्याकाळ होत राहतात की नाही दररोज
नाहीतरी अजूनही पुनवेला चंद्र फुलतोच की नाही आकाशात संपूर्ण
नाहीतरी पक्षी उडत राहतातच की नाही हवेत स्वतःच्या इच्छेने

मी म्हणतो विश्वास ठेवायला हरकत काय आहे
की आपण अजूनही जिवंत आहोत

नाहीतरी अजूनही दुःखाचा पूर थोडाच आला आहे घरभर
नाहीतरी पृथ्वी फिरतेच की सूर्याभोवती निरंतर
नाहीतरी सूर्यामुळे काळोख थोडाच गळतराहतो अंगावर
नाहीतरी उजेड सांडतच राहतो की सगळ्या पृथ्वीवर
नाहीतरीउजेडाने आपले डोळे थोडेच खुपत राहतात
नाहीतरी काळोखाने अजूनही डोळे थोडेच दिपत राहतात आपले

तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात
मी म्हणतो डोळे मिटून विश्वास ठेवायला
हरकत काय आहे
की अजूनही आपण मेलेले थोडेच आहोत

निरक्षर ईश्वर

जितक्या काही भाषा मी जाणतो
त्या सर्व मी आजमावून पाहिल्यात
ईश्वराला त्यातली एकही समजली नाही अद्याप

तो ना मान हलवत ना हुंकार भरत
वाटलं कदाचित देवदूतांकरवी तरी तो वाचून घेईल
चंद्राच्या पाटीवर कधी गालिबचा शेर लिहून ठेवला मी
तो धुवून टाकतो किंवा कुरतडून खाऊन तरी टाकतो 

शिकला सवरला असता जर आपला ईश्वर 
प्रेमाच्या गप्पागोष्टी नाही तरी  किमान
पत्रांची देवाण घेवाण तरी शक्य झाली असती

(हिंदीतूनअनुवादित)

विळा लावणारा जन्म

मांडवावर पसरलेली वेल
बुडापासून कापून घ्यावी विळ्यानं
सपकन
तसा
आईवडिलांच्या
मुलगा होण्याच्या प्रार्थनेला
विळा लावणारा तिचा जन्म
तिचा जन्म
तिच्या आईच्या स्तनांना
दुधाऐवजी भय फोडणारा …

ती जन्मली
अन् तिच्या आईच्या पाठीवर
मागच्या बाळंतपणातले
काळेनिळे वळ
पुन्हा जिवंत झाले

ती जन्मली
अन् कोपऱ्यात निपचित पडलेल्या
हिंस्र दुःखाने
पुन्हा डोळे उघडले …

पूर्वप्रसिद्धी : मीडिया वॉच  दिवाळी २०१६
संपर्क : ईमेल : vaibhav.rain@gmail.com

फेअर अँड लव्हली

फेअर अँड लव्हलीची वार्षिक विक्री आहे आठ हजार कोटी
कवितेच्या पुस्तकाच्या छापल्या जातात फक्त तीनशे प्रती

फेअर अँड लव्हली = गोरा रंग
गोरा रंग = सुंदर दिसणे
सुंदर दिसणे = स्त्री होणे

स्त्री जी कविता लिहिते
स्त्री जी कविता वाचते
ती या फॉर्म्युल्याच्या बाहेर आहे

कविता
जोडलेल्या असतात एकत्र मुंग्यांसारख्या
समाजाची रचना बदलण्यासाठी
फेअर अँड लव्हली
दाखवत असते अंगठा त्या श्रमाला !

– निर्मला गर्ग

भाबडी परिभाषा

‘जिथून सुरू होतं दुसऱ्याचं नाक
तिथेच माझ्या स्वातंत्र्याचा अंत होतो’

अशा तऱ्हेने स्वातंत्र्याला परिभाषित करताना
स्त्रियांचा विसर पडला
की
त्यांच्यापाशी नाकाहून अधिक
उन्नत जे काही आहे
त्याला तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्यात सामील करून घेतलं?

वात्सल्याचे तपशील

एकदा पाणभिजला ऋतु येऊन गेला म्हणजे
शिवारावर श्वासांची लागवड सुरू होते
पाखरे
ओठांच्या काठांवर झाडांची हिरवी पाने ठेवतात
पाखरांकडून
खुलेपणाने
कोरसपमध्ये
सूर्याचे गाणे गायिले जाते
सगळा आसमंत गणगोत होऊन
माणसांच्या भेटीला येतो
वासरांच्या वात्सल्याचे तपशील
गायींच्या डोळ्यांत; डोळाभर झालेले असतात
एवढेच
शील :
झाडांचे, शिवारांचे, पाखरांचे.

इतर

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना

साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला

सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला

कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टँकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टँकच बोलवा
टँक.

पुढे वाचा

दुखऱ्या मूळांपर्यंत

सकाळ झालीय
फुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्र जनावर काठीने
फुलांवर हल्ले करीत आहे.

बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हा
इथल्या झाडांना
फुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या
दुखऱ्या मूळांपर्यंत पोहचली असेल
***

अकल्पित, गजबंधन सोसायटी
सी के पी हॉलसमोर, राम गणेश गडकरी पथ

मुली

आता आणखी वाट नाही पाहणार मुली
त्या घरातून बाहेर पडतील
बिनधास्त रस्त्यांवरून धावतील
उसळतील, कुदतील, खेळतील, उडतील
मैदानांतून निनादतील त्यांचे आवाज
आणि हास्यध्वनी   

मुली थकल्याहेत
रांधावाढाउष्टीकाढा करून व रडून   
त्या आता नाही खाणार मार
नाही ऐकून घेणार कोणाचेही टोमणे
आणि रागावणे

ते  दिवस, जेव्हा मुली
चुलीसारख्या जळायच्या
भातासारख्या रटरटायच्या 
गाठोड्यासारख्या कोपऱ्यात पडून राहायच्या
केव्हाच संपले 

आता नाही ऐकू येणार दारांमागचे त्यांचे हुंदके
अर्धस्फुट उद्गार किंवा भुणभुण
आणि आता भिजणार नाहीत उश्यादेखील

दरी

नकाच पडू माझ्या भानगडीत
चालू देत माझं आपलं
वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी
तुम्हाला नाहीच कळणार
माझा आवाज तुमच्यापर्यंत नाहीच पोहोचणार
कारण आपल्यामध्ये एक दरी आहे
हां म्हणजे नातं आहेच, कचकड्याचं
तो डी एने पण आहे, जीन्स पण
पण या सगळ्याला व्यापून उरणारी
एक भली थोरली दरी आहे आपल्यात

या दरीत ते शेतकरी आहेत
ज्यांच्याविषयी तुम्हाला जराही कणव नाही
कारण ते टॅक्स भरत नाहीत
‘ती लोकं ‘ आहेत फँड्रीमधली
ज्यांची तुम्हाला किळस वाटते
ती आदिवासी लोकं पण आहेत
विकासाच्या मार्गातले धोंडे बनलेली
आणि ती विस्थापित लोकं पण
ते नाही का जे सिग्नल्स वर दिसतात
त्यांचे घाणेरडे हात आपल्याला , आपल्या गाडीला लावत
भीक मागतात
असं सगळं तुम्ही नाकारलेलं वास्तव या दरीत साचलंय
नदीतून वाहून आलेल्या गाळासारखं
दिवसागणिक थरावर थर साचाताहेत
घट्ट होत जाताहेत
भीतीदायक आहे सगळं
प्रलय येऊन पुनश्च सृजनाची सुरुवात असणारा
पिंपळाच्या पानावरचा तो बाळकृष्ण दिसेपर्यंत तरी
हे असंच चालणार
हा असाच अंधार असणार
गिळायला बघणारा

नकाच येऊ तुम्ही इथे
तुमचं चालू देत
हिंजेवाडी, नगरपट्टा , खराडी
ट्रॅफिक
पाचगणी की गोवा
टकिला की ओल्ड मॉंक
चिकन साटे की चिकन फलाणा
मी येते ना तुमच्याबरोबर
छान तयार होऊन
‘व्यवस्थित’ कपडे घालून
माझा नेहमीचा मुखवटा घालून
डिनरला मंगळागौरीची रांगोळी काढायला
साखरपुड्याला गणेशवंदना म्हणायला
गौरी जेवणाला
सगळ्याला
पण मनानी मात्र मी त्या दरीतच असते
मला नाही जमत तुमच्यासारखं
ते वास्तव नाकारत जगायला