मला भीती वाटते….
माझे डोळे पुसणार्यांची
तसाच अंग चोरून उभा असतो!
अंग शहारतं….
डोळे पुसणार्याच्या डोळ्यातील फायदा उचलणार्या क्रूर कपटी हालचालींमुळे!
माहिती असतं..
या अश्रूंची किंमत आता भलताच कुणीतरी उचलेल
आणि विरून जातील या वेदना
तुकडपट्टी झालेल्या शेताच्या मातीत!
अजून एक तुकडा..
आणि शेवटचा श्वास
एवढंच शिल्लक आहे शेतीचं
आणि शेतातच माती होणार्या जीवाचं अस्तित्व!
उरणार आहेत फक्त फुशारक्या-
पूर्वजांकडे असलेल्या शेकडो एकर शेताच्या
आणि वांझोट्या रुबाबाच्या
फडफडत राहतो,
प्रत्येक लग्नानंतर
शेतीचा कमी होत गेलेले एक एक श्वास….
आणि लुळा पडत जातो
शिक्षण, आरोग्य खर्चातून
आखडत गेलेला हात
किती वाचावे
खर्चाच्या ओझ्याखाली
तोकड्या वावरातील दबलं गेलेलं तोकडं उत्पन्न
आणि हाल अपेष्टांचे शंभर पाढे!