Category Archives: चित्रपट परीक्षण

थप्पड – पितृसत्ताक व्यवस्थेवर

‘थप्पड’ चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि आम्ही सर्व स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी तो बघण्याचा निश्चय केला. संध्याकाळी पाचच्या शोचा ‘थप्पड’ बघण्यासाठी आम्ही सिनेमागृहात प्रवेश केला तेव्हा सिनेमागृहात मोजून ३० ते ४० प्रेक्षक होते. त्यांत महिलांचे प्रमाण अधिक होते. बहुतेक प्रेक्षक हे तरुण व मध्यमवयीन होते तर काही बोटावर मोजण्याइतक्या पन्नाशीपुढच्या महिला होत्या. प्रेक्षकांमधील पाच-सहा तरुण तर चित्रपट सुरू असताना मध्येच उठून गेले. बहुदा त्यांना चित्रपट आवडला नसावा. सदर चित्रपटातील मोलकरणीला तिचा नवरा मारतो हे दृश्य आले तेव्हा बहुतेक तरुण मुली-मुले हसली. परंतु नायिकेला तिच्या नवऱ्याने ‘थप्पड’ मारल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटले हे त्यांच्या स्तब्धतेतून कळाले. चित्रपट संपल्यानंतर सिनेमागृहातून बाहेर पडताना मात्र त्यांच्या प्रतिक्रिया होत्या, “चांगला संसार होता, किती प्रेम करायचा तिच्यावर; एका फटक्याने काय होते!” “एवढा आकांडतांडव करण्याची काय गरज होती?” काही वयस्क स्त्रिया होत्या. त्यांचे म्हणणे होते, “बई, आम्हीतर किती मार खाल्ला. ह्या आताच्या मुली थोडंही सहन करत नाही.” वगैरे…

प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे स्त्रीहिंसा ही किती सामान्य बाब आहे हे वास्तव पुढे येते असे मला वाटते. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ हा चित्रपट भारतीय कुटुंबातील स्त्रीहिंसा ह्या वास्तवाचे अनेक पदर उलगडण्याचा प्रयत्न करतो. ह्या चित्रपटातून अनुभव सिन्हा ह्यांनी चित्रपटाची नायिका अमृता, तिच्या घरची मोलकरीण, अमृताची आई व सासू, तिच्या भावाची मैत्रीण, तिची शेजारीण व नेत्रा (अमृताची वकील), ह्या सर्व स्त्रियांच्या जीवनपटातून घरगुती हिंसा कशी घडते व स्त्रियांनाच ती सामान्य बाब वाटल्याने समाजमान्य कशी होते, हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

चित्रपटातील नायकाने नायिकेला थप्पड मारल्यानंतर चित्रपटातील वेगवेगळ्या पात्रांकडून आलेल्या प्रतिक्रिया अशा प्रकारच्या हिंसेच्या सामान्यिकरणाची साक्ष देतात. जसे, नवऱ्याची प्रतिक्रिया – “अमू, घडले… होत असते.. ह्यातून पुढे चल (Move on).” नायिकेची सासू – “थोडा बरदाश्त करणा सिखणा चाहिये बेटियोंको” “थोडी बहुत मारपीट तो होतीही रहती है, यही तो प्यार हैं ना सर?” ऑफिसमधील सहकारी – “थप्पड ही तो मारा है, बस इतनीसी बात है।” नेत्रा (वकील) – “कुटुंबातील काही समस्या आहे? नवऱ्याचे प्रेमसंबंध आहेत? तुमचे प्रेमसंबंध आहेत? मग केवळ थप्पड मारल्यामुळे घर सोडायचे?”

माझ्या नात्यातील कुटुंबात, शेजारील कुटुंबात, चळवळीतील स्त्री कार्यकर्त्यांच्या कुटुंबात जेव्हा मी डोकावते व चाचपडण्याचा प्रयत्न करते तेव्हा नवऱ्याने एकही चापट न मारलेली स्त्री सापडणे अवघड बनते. पण स्त्रीवादी म्हणून मी जेव्हा उलटा विचार करते व स्त्रियांना विचारण्याचा प्रयत्न करते की त्यांनी त्यांचा राग वा टेंशन कधी नवऱ्याला थप्पड मारून काढला आहे का? नवऱ्याच्या प्रेमापोटी कधी त्यांनी त्याला मारले आहे का? अथवा नवऱ्याचे चुकले म्हणून बायकोने नवऱ्याला कधी मारले आहे का? तेव्हा, खूप शोधूनही अशी उदाहरणे फारशी सापडत नाहीत. हिंसेबाबतचे हे जे स्त्री-पुरुष व्यस्त प्रमाण आहे त्याचा अर्थ म्हणजे स्त्रियांवरील हिंसाचार ही सर्वसामान्य बाब असून समाजातून तिला फारसा आक्षेप घेतला जात नाही.

चित्रपटातील वरील संवाद स्त्रीहिंसेसंदर्भात पुढील निकषांपर्यंत पोहचतात. १. स्त्रियांनी त्यांच्यावर होणारी हिंसा सहन केली पाहिजे. त्या कारणाने घर सोडता कामा नये. २. तिच्यावर होणारी हिंसा ही तिच्या स्वाभिमान वा अस्तित्व ह्यावरील हल्ला नसून पतीचे पत्नीवरील प्रेम आहे ३. थप्पड ही तर फारच किरकोळ बाब आहे व ती घर सोडण्याचे प्रभावी कारण असू शकत नाही.

स्त्रियांवरील हिंसा ही सामान्य बाब आहे आणि ती व्यवहारात सर्रास घडत असते. तिला समाजमान्यता कशी मिळते ह्याचे राजकारण समजून घेण्यासाठी समाजातील स्त्री-पुरुष विषमतावादी व्यवस्था म्हणजेच जातपितृसत्ताक समाजव्यवस्था समजून घ्यावी लागेल. भारतीय जातपितृसत्ताक समाजात स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, पितृसत्ताकतेला हिताचा असलेला विवेकवाद जपण्यासाठी अपरिमित अशा हिंसेचा व क्रौर्याचा वापर केला जातो. हिंसा ही दोन प्रकारे केली जाते. १) पाशवी बळाच्या माध्यमातून २) विचारप्रणालीच्या सहाय्याने

स्त्रियांनी पुरुषांचे प्रभुत्व स्विकारावे म्हणून विचारप्रणालीच्या सहाय्याने तिच्यावरील हिंसेला अधिमान्यता मिळवून दिली जाते. म्हणून थप्पड चित्रपटातील नायिकेची सासू, नायिकेची आई, वकील, नायिकेचा पती (विक्रम), विक्रमचा सहकारी मित्र, नायिकेचा भाऊ ह्या सगळ्यांनाच, नायकाने (विक्रम) नायिकेला (अमृता) थप्पड मारल्याने काही चुकले असे वाटत नाही. त्यामुळे अमृता जेव्हा कुटुंब नावाची व्यवस्था नाकारते तेव्हा एकटी पडते. कारण कुणालाच तिच्यावर झालेली हिंसा ही फारशी गंभीर बाब वाटत नाही. हजारो वर्षांपासून स्त्री-पुरुष विषमता ही कुटुंबातील संस्कार, समाजातील रुढी-परंपरा, सण-उत्सव, धर्मग्रंथ आणि आता शाळा-महाविद्यालयातील अभ्यासक्रम, इत्यादिंच्या माध्यमातून पोसली गेली. स्त्रीहिंसा ही कुटुंबातून आई, सासू, सासरा अथवा वरिष्ठ बुजूर्ग, तसेच शाळा महाविद्यालयातील शिक्षक, ह्या सर्वांनी संस्कारीत करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली. ही हिंसा केवळ विचारप्रणालीच्या माध्यमातून झाली नाही तर त्यासाठी वेळप्रसंगी पाशवी बळाचादेखील वापर केला गेला. उदा: चित्रपटातील नायिकेच्या गालावर पडलेली थप्पड! चित्रपटातील नायिका अमृता सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत नवऱ्याची व घरची सर्व कामे हसतमुखाने करते. उदा. सकाळी उठल्याबरोबर झाडांना पाणी टाकणे, नास्ता तयार करणे, घरातील सर्व स्वच्छता करणे, सासूची शुगर मोजणे वगैरे!! ही सगळी तिची नित्याची कामे झाली आहेत. विक्रमने मारझोड करून काही सांगण्याची वेळ अमृतावर किंवा तिच्यासारख्याच इतर गृहिणींवर येत नाही. कुटुंबातील रोजच्या संस्कारांतून, पाठ्यपुस्तकांतून, धार्मिक ग्रंथ, करमणुकीची साधने ह्यांतून तिच्यावर ते संस्कार केले जातात. परंतु कोणतीही विषमतावादी व्यवस्था केवळ संस्कारांतून म्हणजेच विचारप्रणालीतून दीर्घकाळ स्वतःचे अस्तित्व टिकवून धरू शकत नाही म्हणून वेळप्रसंगी पाशवी बळाचादेखील वापर केला जातो. उदा. स्वतःच्या कुटुंबातील सर्व पारंपरिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मोलकरणीला नियंत्रित करण्यासाठी तिचा नवरा तिला रोज रात्री मारझोड करतो. असेच अनेक नवरे छोट्या-छोट्या कारणांवरून आपल्या बायकांना मारताना दिसतात. बहुदा व्यसनी वडील, मुलगा अथवा नवरा त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांवर क्रूर अशा हिंसेचा वापर सर्रास करतात.

सिमॉन दि बोव्हा ह्या स्त्रीवादी अभ्यासिका “द सेंकड सेक्स” ह्या त्यांच्या पुस्तकात असे मत मांडतात की, “स्त्री ही जन्मत नाही तर ती घडविली जाते.” स्त्रीचे स्त्रीत्व व पुरुषाचे पुरुषत्व घडविणारी ही प्रक्रिया विचारप्रणालीच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडली जाते. म्हणून चित्रपटातील नेत्रा, सासू, अमृताची आई, ही सगळी स्त्री पात्रे असली तरी त्यांच्यावरील संस्कार हे स्त्री-पुरुष विषमतेला पोषक राहिलेले आहे. परिणामतः ह्या सर्व स्त्रिया नायिकेने पुन्हा कुटुंबात परतावे ह्यासाठी प्रयत्नरत असलेल्या दिसतात. त्यांच्या तोंडून वदविलेले संवाद हे स्त्रीहिंसेच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करणारे व घरगुती अत्याचाराचे समर्थन करणारे ठरतात. जशा स्त्रिया घडतात तसेच पुरुषदेखील घडत असतात म्हणून आपल्या बहिणीशी तिच्या नवऱ्याने केलेली हिंसक वर्तणूक भावासाठी गंभीर, बहिणीच्या आत्मसन्मानाची बाब बनत नाही.

कल्पना कन्नबिरन त्यांच्या ‘The Voilence of Normal Times’ ह्या पुस्तकात म्हणतात की, मारझोड करणे, बलात्कार करणे, केवळ ह्या अर्थाने हिंसेकडे न पाहता स्त्रियांप्रती समाजामध्ये असलेला विषम व्यवहार हादेखील हिंसेचाच एक प्रकार आहे असे मानले पाहिजे. हिंसेच्या स्वरुपाकडे व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. स्त्रियांना त्यांचे हक्क-अधिकार नाकारणे, त्यांना वारंवार दुय्यमत्वाची जाणीव करून देणे, त्यांना निर्णयप्रक्रियेतून वगळणे, त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करणे, त्यांना घालून-पाडून बोलणे हीदेखील न दिसणारी मानसिक अशी हिंसाच आहे. नेत्राच्या नवऱ्याने तिला तिचे कर्तृत्व नाकारून केवळ स्वतः व स्वतःचे वडील यांच्या वर्चस्वाखाली ठेवणे, तिची इच्छा नसताना उपभोग घेणे हीदेखील हिंसाच आहे. कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना बगल देणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. चित्रपटातील नायिका तिला आवडणाऱ्या नृत्यकलेत गोल्ड मेडलिस्ट असूनही कुटुंबाला अग्रक्रम दिल्याने त्यात करियर करू शकलेली नाही. तिच्या आईने स्वतःच्या गाण्याच्या आवडीला अशीच मुरड घातली आहे. स्वतःच्या इच्छा-आकांक्षाना कुटुंबासाठी सोडून देणे हीदेखील पितृसत्ताकतेतून सतत घडणारी एकप्रकारची हिंसा आहे, हे अतिशय अचूकपणे हेरण्याचे काम चित्रपटात केले गेले आहे.

समाजव्यवस्था ही स्त्री-पुरुष विषमतावादी, जातिव्यवस्थावादी व भांडवली असल्याने सर्व स्तरांत हिंसा होताना दिसते. ती धर्म, जात, वर्ग, भाषा ह्या सर्व क्षेत्रांत राजकारण, शिक्षण, रोजगार, संस्कृती, प्रशासन ह्या माध्यमातून वावरताना दिसते. फक्त हिंसेची तीव्रता कमी-अधिक राहिलेली दिसते. चित्रपटात दाखविलेली हिंसा ‘मोलकरीण’ ह्या कनिष्ठ वर्गात अधिक आहे तर उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात तिची तीव्रता तुलनेत कमी राहिलेली दिसते. हा चित्रपट स्त्रीसमस्येचा वेध घेताना जातीचे वास्तव घेण्याचे टाळतो. परंतु भारतीय जातपितृसत्ताक समाजात स्त्रीशोषण हे जातिव्यवस्था व पितृसत्ता यांच्या एकत्रितपणाचा पाक आहे. म्हणून ह्या चित्रपटात दोन्ही स्त्रिया ह्या जातपितृसत्तेच्या बळी राहिलेल्या आहे. दोघींचीही मुक्ती ही जातपितृसत्तेचा वेध घेवून व तिच्या अंताची व्यूहरचना आखूनच केली जाऊ शकते.

“उसने मुझे मारा पहली बार, नही मार सकता. इतनी सी बात है और मेरी पिटीशियन भी इतनी सी है.” हा नायिकेचा संवाद तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधाची ठिणगी बनतो. ‘थप्पड’च्या अनुषंगाने पूर्ण चित्रपट स्त्री-हिंसेभोवती फिरतो. चित्रपटाचा शेवट अतिशय चांगला आहे. बहुतेक चित्रपट, कथा, नाटके ही समाजातील स्त्री-पुरुष विषमतेवर उभ्या असणाऱ्या कुटुंबसंस्थेविरोधात भाष्य करतात, परंतु ती नाकारण्याचे धैर्य दाखवत नाही. उदा. प्र.के.अत्रे यांच्या एका नाटकातील नायिका (कमल) कुटुंब नावाची शोषणवादी चौकट ओलांडते; परंतु मुलांसाठी शेवटी पुन्हा कुटुंबात येते. म्हणजेच स्त्री कितीही क्रांतीकारी असली तरीदेखील ती कुटुंबाचे पाश तोडू शकते नाही, असं भ्रामक वास्तव अत्रेंचं नाटक पुढे आणतं. स्त्रीला कुटुंबाशिवाय पर्याय नाही. स्त्रियांच्या मुक्तीचे राजकारणाच्या दिशेने जाणारे नाटक शेवटी स्त्रियांच्या गृहिणीकरणावर येऊन थांबते. ‘थप्पड’ हा चित्रपट जातपितृसत्तेच्या पायावर उभ्या असलेल्या शोषणवादी कुटुंबांच्या विरोधात बंड करतो. चित्रपटातील नायिका अमृता व तिची वकील नेत्रा घर सोडून स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान व ओळख तयार करण्यासाठी नव्याने मुक्तपणे उभ्या रहातात.

हा चित्रपट स्त्रीहिंसेविरोधात एल्गार पुकारून कुटुंबव्यवस्था नाकारणारा असला तरीदेखील त्यातील एक बाब मला खटकली. ती बाब म्हणजे चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रश्नांवर बनलेल्या बहुतेक चित्रपटात शोषित स्त्रीच्या जाणीवा समजून घेणारा हिरो एखादा ‘पुरुष’च दाखवला जातो. ‘लज्जा’सारख्या हुंडा, स्त्रीहिंसा, स्त्रीचे दुय्यमत्व यांचा वेध घेणाऱ्या चित्रपटात मनिषा कोईरालाचा रक्षणकर्ता म्हणून अजय देवगण नावाचा पुरुष अचानक उपस्थित होतो. ‘थप्पड’ चित्रपटातदेखील अमूवर स्त्री म्हणून झालेल्या हिंसेची जाणीव सदर चित्रपटातील स्त्रियांपेक्षा (ज्या स्त्रिया नवऱ्याने रोज केलेला मानसिक व शारिरीक छळ सहन करतात) एका पुरुषाला, जो अमूच्या वडिलांच्या भूमिकेत आहे त्याला, अधिक असलेली दाखविली आहे. पुरुष दिग्दर्शकांची ही मर्यादा असावी.

ह्या चित्रपटात अमृताच्या भूमिकेतील तापसी पन्नू आणि माया सराओ, नायला ग्रेवाल, दिया मिर्झा, तन्वी आजमी, रत्ना पाठक, गितिका वैद्य ह्या इतर अभिनेत्रींच्या चांगल्या अभिनयामुळे स्त्रीहिंसेचा मुद्दा अधिक प्रभावीपणे व सविस्तरपणे प्रेक्षकांसमोर ठेवता आला.

आर्टिकल १५ – जातिव्यवस्थेचे व नोकरशाहीचे योग्य चित्रण

बड़े बड़े लोगन के महला-दुमहला
और भइया झूमर अलग से
हमरे गरीबन के झुग्गी-झोपड़िया
आंधी आए गिर जाए धड़ से
बड़े बड़े लोगन के हलुआ पराठा
और मिनरल वाटर अलग से
हमरे गरीबन के चटनी औ रोटी
पानी पीएं बालू वाला नल से
कहब त लगीजाइ धक से

डाव्या कम्युनिस्टांच्या या गाण्यानेच चित्रपटाची सुरुवात होते व लगेचच दिग्दर्शक अनुभव सिन्हा फारसा वेळ न दवडता दोन लहान दलित मुलींवरील अत्याचाराची दृश्ये दाखवून चित्रपट वेगवान असल्याची जाणीव करून देतो व प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कारांनंतर झाडावर टांगून फाशी दिलेल्या दोन दलित मुलींच्या हत्याकांडाच्या सत्यघटनेवर हा चित्रपट बेतलेला असला तरी हा सिनेमा जात-वास्तव, पोलीस दलातील जातीयवाद, गृहसचिव व सीबीआय, अश्या घटनांतील मिडियाची भूमिका, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या दलित नेत्याचे एनकाउंटर इत्यादी अनेक विषयांना वेगाने व नेमकेपणाने हात घालतो. त्यामुळे हा चित्रपट संपल्यानंतरही तुम्हांला अस्वस्थ करत राहील. अनेक प्रशिक्षित कलावंतांच्या अभिनयाने चित्रपट अधिकच उठावदार झाला आहे. अतिशय कौशल्यपूर्ण चित्रीकरणसुद्धा दृश्यांमध्ये श्वास ओतते. डुक्कर-तलावात पूजाला शोधण्यास उतरलेल्या समूहाचे चित्रीकरण तर अप्रतिम असेच आहे. परंतु यात संवादांचे सुद्धा मोठे योगदान आहे, ज्यात मुख्य नायक, अतिरिक्त SP म्हणतात, “आम्हां ब्राह्मणांनाही कधीतरी या चिखलात उतरावे लागणार आहे.”

आमचे मार्गदर्शक व थोर विचारवंत जस्टीस पी.बी.सावंत अनेक वर्षांपूर्वीच म्हणाले होते की सर्वत्र “पोलीस राज” निर्माण झालेले आहे. याचा प्रत्यय हा सिनेमा पाहिल्यावर जरूर येईल. आम्हांला पोलिसांचे नको तर कायद्याचे राज्य हवे आहे याची जाणीव सध्याच्या सत्ताधाऱ्यांना व वरिष्ठ नोकरशहांना वारंवार करून द्यावी लागत आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे, विचारसरणीचे असो – पोलिसांनी कायद्यानुसारच वागले पाहिजे. परंतु असे सहसा दिसत नाही. वरिष्ठ नोकरशहांनी ठरवले तर व्यवस्थेत ते जरूर चांगले बदल घडवून आणू शकतात. हा योग्य संदेशही हा चित्रपट आपल्याला देतो.

आपण हरिजन किंवा बहुजन लगेच बनतो, परंतु जन बनून “जन गण मन”चा भाग कधी बनणार? गेल्या सत्तर वर्षात घटनेने आपल्याला नेमके काय दिले आणि ‘घटने’शी सुरू असलेला हा ‘भारता’चा संघर्ष संपण्याच्या दृष्टिपथात आहे की नाही? सीमेवर मरणाऱ्या जवानांपेक्षा जास्त SC/ST गटर साफ करताना मरतात, परंतु त्यांच्यासाठी कुठे श्रद्धांजली वाहिली जात नाही. ‘रावण’फेम दलित नेत्याचे हे प्रश्न मुख्य भूमिका साकारणाऱ्या अतिरिक्त SP, आयुष्यमान खुरानाला निरुत्तर करतात. सव्वादोन तासांच्या चित्रपटात दोन विनोद सोडले तर त्यातील प्रत्येक मिनिट आपल्याला देशातील अधिकाधिक भीषण जात-वास्तवाकडे नेत राहते. जातिव्यवस्थेची व पोलीस-नोकरशाहीची गुंतागुंत अतिशय चांगली दाखवली आहे. हेच या चित्रपटाचे मोठे यश आहे. आर्टिकल १५ अधिक धाडसाने कुठेही बटबटीतपणा न करता, अतिशयोक्ती न करता अगदी मुळावर योग्य तर्‍हेने प्रहार करताना दिसतो. भारत देश संविधानानुसारच चालेल याची सकारात्मक हमी हा सिनेमा देतो. घटनेचे एक कलम १५ इथल्या जातीयवाद्यांना पचत नाही हेच युपी-बिहारमधील त्यांच्या विरोधावरून दिसते. मग जस्टीस सावंत म्हणतात त्याप्रमाणे “संविधानाची प्रभावी अंमलबजावणी हीच पर्यायी व्यवस्था आपण राबवायला सुरू केली तर काय गहजब करतील हे खरे अतिरेकी?”

जीपवर आगीचा गोळा फेकला जातो त्याच्या तपासात अतिरिक्त पोलिस अधीक्षक निषाद आपली प्रेयसी गौराला विचारतो तेव्हा ती म्हणते, “बहिर्‍यांना ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते हे भगतसिंगनी १९२९ सालीच म्हटले होते” हे मी नवव्या वर्गात नागरिकशास्त्रात वाचले आहे. परंतु निषादने जरा जास्तच वाचले आहे. याचा अर्थ त्याला हिंसेची गरज केव्हा भासते व तिचा वापर कसा करावयाचा याचे चांगले ज्ञान आहे. परंतु सरकार पुरस्कृत (नोकरशाही पुरस्कृत) हिंसाचार व दहशतवाद यावर भाष्य राहून गेले आहे.

घटनेचे कलम १५ सांगते की आपण जात, धर्म, जन्मस्थान, लिंग याबाबतीत कोणत्याही प्रकारे भेदभाव करता कामा नये. तीच चर्चा अख्ख्या चित्रपटात सुरू राहते आणि चित्रपट संपल्यानंतरही आपल्या मनात चालू राहते. संवेदनशील मनाला कृतिशील बनण्यास भाग पाडणारा, स्वतःला विचारी म्हणवणाऱ्यांना नव्याने चर्चेत ओढणारा आणि आपल्या स्वार्थी सुखासीन आयुष्यात व ‘अच्छे दिन’ची अफू पिऊन धुंदीत मग्न असलेल्यांना एक जोरदार कानाखाली वाजवून जागे करणारा हा चित्रपट आहे. ‘जात’ विषय केंद्रस्थानी असलेली कथा व उत्तम दिग्दर्शन यासाठी लेखक-दिग्दर्शकाचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.

सामाजिक-राजकीय नाट्य या जातकुळीत मोडणारा हा चित्रपट एका तरुण पोलिस अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतो. सुखासीन उच्चभ्रू असा हा तरुण IPS युरोपात शिकलेला असतो व दिल्लीत गृहसचिवांशी (Home Secretary) झालेल्या किरकोळ शाब्दिक चकमकीने बदली होऊन उत्तरप्रदेशातील एका गावात येतो. आतापर्यंत ज्या भारताबद्दल अभिमान बाळगला होता, ज्या भारतात येण्याची स्वप्ने पाहिली होती, तो भारत हाच का, असे वाटून शरमिंदा होण्याचे प्रसंग क्षणोक्षणी त्याच्या वाट्याला येतात. अंगावर सावलीही पडू न देणारे, अस्पृश्यता पाळणारे आणि “वो लोग” म्हणजे जणू दुसऱ्या ग्रहावरील लोक आहेत अशाप्रकारे दलितांना संबोधणाऱ्यांचा हा देश समजायला त्याला थोडा काळ लागतो. त्याला कळत नाही की आजच्या जमान्यात दोन हजार वर्षांपूर्वीचा भारत कसा काय वसलाय? त्यातील एक दृश्य खूप गमतीशीर आहे – त्यात त्याच्याच पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या पदावरील अधिकारी आणि सहाय्यक वर्ग हे आपण कुठल्या जातीचा आणि तो खालचा की वरचा, कोण कोणाच्या खाली व कोणाच्या वर अशी चर्चा घडते. ती केवळ दलित, ब्राह्मण आणि मंडलपुरती उरत नाही तर दलित, निम्नवर्गातील विविध स्तरांपर्यंत जाते आणि तेवढेच लोक भारताचेच प्रातिनिधिक रूप बनतात.

काही दृश्ये खरोखरच मनःपटलावरून पुसल्या गेलेल्या माहितीला जागवण्याचे कार्य करतात. बसप आणि भाजप यांची हातमिळवणी, आदित्यनाथांचे दलितांसोबत सहभोजनाचे ढोंगी प्रदर्शन, दलित नेत्यांसोबत हिंदू ऐक्याच्या नावावर केलेल्या मोहिमा, जातीवर होणारे मतदान, प्रत्येक समूहातील जातीय उच्च-नीचता या सर्व बाबींवर चित्रपट माहिती जागवणारे भाष्य करतो. हे वास्तव बदलण्यावर उत्तर काय, तर चित्रपट सांगतो संविधानाचे ‘आर्टिकल १५’.

भारतीय समाजात भिनलेली जातीय आणि धार्मिक विकृती सर्वांनाच त्रासदायक ठरून भारतीयत्व आणि माणुसकीचा कसा बळी घेते हे भाष्य कुठलेही आढेवेढे न घेता हा सिनेमा करतो. भारतीय म्हणून हा सिनेमा पाहिला तर आपल्या देशातील सडलेल्या जातीय आणि धार्मिक वास्तवाची लाज वाटून अस्वस्थ व्हायला होते. हा सिनेमा भारतीय समाजाला आरसा दाखवून आपली सत्यस्थिती नेमकेपणाने दाखवतोय. या सत्यस्थितीचे चटके सर्वांनाच बसतात हे भीषण वास्तव आहे. जो देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतो आहे, तेथे जर आजही आर्टीकल १५ चा अर्थ समजून घेऊन लोक जगत नसतील तर आपण कधी आणि कसे भारतीय बनणार हा प्रश्न आहे. मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या समतावादी, विवेकी तत्त्वज्ञानाचा हा देश आहे. या मानवीय मूल्यांचा जर पराभव केला तर सर्वांचेच जगणे सर्वार्थाने कठीण होणार आहे हे ध्यानात ठेऊन आपल्या जीवनात आर्टीकल १५ चा वापर करावा यातच सर्व भारतीयांचे हित सामावलेले आहे.

सिनेमात एक पात्र आहे निषाद, जी उत्तरभारतात दलितांची एक जातसुद्धा आहे. चंद्रशेखर आझादच्या समकक्ष हे पात्र. बंदुकीच्या जोरावर त्याचे अपहरण केले जाते तेव्हा तो म्हणतो, “मला काही झाले, तर तुम्हाला क्रोध येईल. त्याच क्रोधाला शस्त्र बनवायचं, परंतु त्याव्यतिरिक्त कोणतंही शस्त्र आड येता कामा नये मित्रांनो! कारण ज्या दिवशी आपण लोक हिंसेच्या मार्गावर वाटचाल करू, तेव्हा आपल्याला मारणं त्यांना आणखी सोपं होईल.” (व्वा, एक नंबर!) एका वर्षापूर्वी काश्मीरमधील युवकांना आपले लष्करप्रमुख अगदी असेच बोलले की दगड सोडून बंदूक हाती घ्या मग मजा येईल (तुम्हांला गोळया घालायला) – हाच सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे.

‘तुमची जात कोणतीही असू द्या, परंतु ही हिंदूंनी एकत्र येण्याची वेळ आहे… आणि खरा शत्रू ओळखण्याचीही वेळ आहे’ असे महंत सांगतो तेव्हा त्याच्याबरोबर दलितांचे गद्दार राजकीय पुढारीही असतात (आठवले, पासवान, उदितराज यांसारखे). एका दृश्यात नायक सीबीआय अधिकार्‍याला विचारतो, “हिंसा कोण करत आहे, सर? कधी कधी बाहेर दिसणार्‍या हिंसेमागे एक अशी हिंसा असते जिच्याबद्दल कोणीही बोलत नाही. ती आमच्या संस्कृतीचा भाग बनते. तिला आम्ही हिंसा म्हणत नाही… सामाजिक व्यवस्था म्हणतो.” “आग लागली असेल तर तटस्थ राहण्याचा अर्थ होतो की आपण त्यांच्यासोबत उभे आहोत जे आग लावत आहेत.” “तुमच्या कमोड्समध्ये आता जेट स्प्रे लागलेत…परंतु ‘ते लोक’ आजही सफाईसाठी मेनहोलमध्ये नग्न उतरतात.” असे कितीतरी संवाद प्रेक्षकांना सुखावतात. असे वास्तव मांडणारे चित्रपट फार कमी पाहण्यात आले, परंतु हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे याचे समाधान प्रेक्षकाला मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या BBC ला दिलेल्या ऐतिहासिक मुलाखतीत स्पष्टपणे म्हणतात, (युट्युब वर आहे) की ‘सर्व मार्ग बंद होतील तेव्हा “कम्युनिझम” हाच शेवटचा पर्याय (देशातील दलितांना) असेल’. परंतु आजचा बहुतांश दलित समाज या कम्युनिझमला समजून घ्यायलाच तयार नाही. केवळ दलितच नाही तर सर्व देशातील सर्व समस्यांवर केवळ फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ-शिवाजी-सावित्री यांच्या विचारांचा कम्युनिझम (यालाच काही जण समाजवाद ही म्हणतात) हेच एकमेव उत्तर आहे. त्यांनी सांगितलेल्या आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीअंत (Annihilation of Caste) हाच भारतातील कम्युनिझमचा मुख्य पाया धरून आपण यावर काम केले पाहिजे.

एकदा भेटीत नायक निषादला बाबासाहेबांच्या उल्लेखासह संवैधानिक तरतुदींचा गौरव करतो तेव्हा “त्याच बाबासाहेबांनी ‘हे संविधान जाळणारा मी पहिला माणूस असेन’, हे सुद्धा म्हटलेलं आहे” असं निषाद म्हणतो. नायकाची उच्चवर्णीय बायको एकदा त्याच्याबरोबर चॅट करते, हिरो बनण्याची गरज नाही, पण अशी वेळ हवी की लोकांनी हिरोची वाटच पाहू नये.

स्वतःचे निवेदन, आशय, अभिव्यक्ती आणि सौंदर्य घेऊन चित्रपट पुढे जातो. कोणत्याही प्रकारे विषयाला भिडताना आडपडदा ठेवलेला नाही. नेमके भाष्य, थेट मुद्याला हात आणि आव न आणता वास्तवाला भिडण्यावर भर दिलेला आहे. हा चित्रपट पाहताना एकाच वेळी संतापाने रक्त तापते आणि हताशपणे डोळ्यांत पाणीही उभे राहते. एकाच वेळी लाजही वाटते आणि त्याचवेळी आपला खूप मोठा माणूस म्हणून, भारतीय नागरिक म्हणून झालेल्या पराभवाने मान खालीही जाते.

नायक, अतिरिक्त SP ह्याचे पोस्टिंग होते तेव्हाच दोन तरुण दलित मुलींवर केवळ दोन रुपये अतिरिक्त मजुरी मागितली व दिली नाही म्हणून दुसरीकडे कामाला गेल्या म्हणून कंत्राटदार गुंड व त्याचे साथीदार सामूहिक बलात्कार करून त्यांना भर रस्त्यावर लटकवले जाते आणि तिसरी मुलगी गायब असते. सगळे पोलीस सोयीस्करपणे विसरत असताना तो मात्र त्या तिसऱ्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतो, ही त्याची कथा आहे. ते शोधत असताना, एका गावातील ‘संतुलित’ जातिव्यवस्थेपासून सर्व पातळीवर एकमताने ‘मान्य केलेली’ आणि ‘सामंजस्याने’ प्रस्थापित केलेली गल्लीपासून दिल्लीपर्यंतची व्यवस्थाही आपल्याला दिसते आणि या चित्रपटातील नायकासह आपणही दिङ्मूढ होऊन जातो. नायक अयान रंजन आणि त्याची पत्नी अदिती यांची दोन वेगळी जगे आपसूक दिसतात. तो गावातील घाण कचरा टाकलेल्या रस्त्यावरून चालत असतो, त्यावेळी त्याची मैत्रीण सिमेंटने बांधलेल्या जॉगिंग पार्कमध्ये धावत असते. तसेच त्यातील वर्गसंघर्षाला कचर्‍याची आणि गटारांची घाण या प्रतीकांतून दाखवलेले आहे. हरवलेल्या मुलीच्या छोट्या पोस्टरला विशाल राजकीय, धार्मिक पोस्टरने झाकणे हेही मोठे भाष्य आहे.

हा चित्रपट कोणत्याही प्रकारे कृत्रिम नाट्यमयता निर्माण करण्यासाठी वा भीषण जातवास्तवाचे भांडवल न करता नेमका आशयाला हात घालून त्यातल्या कथेला आवश्यक असलेल्या चौकटीत परंतु कथाविषयाच्या खोलवर जाऊन भाष्य करत राहतो. या अत्यंत गडद, दुःखद, उदास आणि काही प्रमाणात नैराश्य देणाऱ्या चित्रपटाला असलेली सकारात्मक बाजू म्हणजे असा चित्रपट आजच्या प्रतिक्रांतीच्या काळात बनू शकतो आणि या विषयावरची चर्चा नव्याने व उघडपणाने होऊ शकते ही आहे. सगळ्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. अन्यथा अश्या कलाकृती घडत नाहीत. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा! राज्यसरकारने व केंद्रसरकारने हा सिनेमा करमुक्त करून खरे भारतीय जातवास्तव तसेच नोकरशाहीचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा!!

`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’

सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात हाताळला आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे विषय या चित्रपटांचे मूळ विषय नाहीत. पण चित्रपटाच्या मुख्य विषयांच्या अनुषंगाने हे विषय अपरिहार्यपणे या चित्रपटात दाखल झाले आहेत आणि या प्रश्नांमुळेच या चित्रपटांना गांभीर्य आणि खोली प्राप्त झालेली आहे.
विशाल भारद्वाज यांचे चित्रपट नेहमीच शेक्सपियरच्या नाटकांवर आधारित असतात. या नाटकांची थीम घेऊन भारतीय तपशील त्यात भरून नवीन कलाकृती समोर आणतात. मग तो मकबूल असो, ओंकारा असो अगर आत्ताचा हैदर असो. हैदर शेक्सपियरच्या जगप्रसिध्द हॅम्लेट नाटकाच्या थीमवर बेतलेला आहे. काश्मीरमधील दहशतवादाची पार्श्वभूमी घेऊन त्यांनी ही थीम नवीन स्वरूपात सादर केलेली आहे. काश्मीरमधील दहशतवादाला अनेक पदर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असलेल्या मुस्लिम राष्ट्रातील घडामोडी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तालीबान यांचे राजकारण, भारतीय लष्कराच्या कारवाया हाही एक पदर त्या दहशतवादाला आहे. जरी असे अनेक पदर काश्मिरी दहशतवादाला असले तरी मूळ मुद्दा आहे काश्मिरी जनतेच्या विकासाचा आणि काश्मीर भारतात सामील होण्यासाठी राजा हरिसिंग बरोबर केलेल्या कराराचा. या सर्वातून काश्मीरमधील परिस्थिती उद्भवली आहे. त्यात भर पडली आहे गेल्या दोन दशकात काश्मीरसाठी असलेल्या 370व्या कलमाला सातत्याने विरोध करणाऱ्या हिंदू धर्मांध शक्तींच्यात होणाऱ्या वाढीची. आज या शक्ती सत्तेवर आहेत. हिंदू धर्मांध शक्ती आणि मुस्लिम धर्मांध शक्ती यांमधील राजकारण नेहमीच परस्परांना पोषक असते आणि त्यात बळी जातो तो दोन्ही बाजूंच्या निरपराध जनतेचा. काश्मीरमधील दहशतवादाला पाकिस्तानची फूस आहे असे सांगून मूळ मुद्दा बाजूला सारण्याचा केंद्र सरकारचा नेहमीच प्रयत्न राहीलेला आहे. त्यामुळे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून काश्मीरकडे पाहिले जाते आणि तेथे लष्कराला विशेष अधिकार देणारा कायदा लागू केला जातो.
हैदर चित्रपटाच्या पूर्वार्धात या लष्कराच्या विशेष अधिकार कायद्यामुळे दहशतवाद आटोक्यात येण्याऐवजी उलट कसा वाढत जातो याचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात आलेले आहे. दहशतवादी म्हणून सर्वसामान्य जनतेचालष्कराने जो अमानुष छळ चालवला आहे त्यामुळे लष्कराबद्दलचा अतोनात संताप काश्मीरी जनतेत साठून आहे आणि तो काश्मिरी तरूणांना दहशतवादाकडे ढकलत आहे. एखाद्या दहशतवाद्याला मारले की लष्करी जवानांना, अधिकाऱ्यांना बक्षिस, बढती मिळते. त्यामुळे अनेक तरूणांना मारून त्यांना दहशतवादी ठरवले जाते आणि बक्षिसे मिळविली जातात. हैदरमध्ये भारतीय लष्कराची ही काळी बाजू विशाल भारव्दाज यांनी खूपचगांभीर्याने पुढे आणली आहे. काश्मिरी जनतेला विश्वास देण्याची आणि विश्वासात घेण्याची गरज आहे. दहशतवादाच्या नावाखाली तिथे जे शिरकाण केले जात आहे त्यातून दहशतवाद कधीच संपणार नाही हेच त्यांना यातून सांगायचे आहे.
हैदरचा उत्तरार्ध मात्र पूर्ण घसरलेला आहे. सुरूवातीला सर्व समाजाच्या संदर्भात मांडणी करणारा हा चित्रपट हळूहळू एका कुटुंबावर आणि त्याच्या शोकांतिकेवर घसरत जातो आणि हे घसरणे एखाद्या गल्लाभरू हिंदी चित्रपटाला साजेसे आहे.
समृध्दी पोरे यांचा डॉ. प्रकाश आमटे हा चित्रपट तर सत्यकथाच आहे. त्यामुळे तेथे कल्पनेला वाव नाही आणि तेथे दिग्दर्शकाला स्वत:च्या मनातील काहीही टाकणे शक्यच नाही. डॉ. प्रकाश आमटे यांचे `प्रकाश वाटा ‘ नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. या पुस्तकाचा तोच आधार आहे. बाबा आमटे यांच्यासारखेच डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे हे जिवंतपणीच दंतकथा बनले आहेत. त्यांच्या जिवंतपणीच त्यांची जीवनकथासांगणारा हा चित्रपट जशी त्यांच्या त्यागाची, चिकाटीची, गोरगरीब जनतेबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची कहाणी आहे तसाच भारतीय स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतरही आदिवासी समजल्या जाणाऱ्या जनतेला साध्या आरोग्याच्या सुविधाहीनाहीत, ते जणू भारतीय नागरिकच नाहीत अशी त्यांची आजची अवस्था आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांचे कार्य सूर्यप्रकाशासारखे उठून दिसते. सुखासीन जीवनाची संधी नाकारून हे डॉक्टर जोडपे अतिशय खडतर अशा जंगलातील जीवनाशी सामना करीत आदिवासी समाजाला आधार देण्याचे, समाजात जागृती करण्याचे आणि त्याला आधुनिक समजल्या जाणाऱ्या समाज प्रवाहाशी जोडण्याचे काम निस्वार्थ पध्दतीने करीत आहे ही गोष्ट आजच्या चंगळवादी समाजाच्या पातळीवर अतिशय दुर्लभ अशी आहे. बाबा आमटे यांनी समाजाने कचऱ्यासारखे टाकून दिलेल्या कुष्ठरोग्यांना पुन्हा मानवी समाजात प्रतिष्ठा देण्याचे आणि त्यांच्या पूर्ण करपलेल्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम केले. त्यांचा वारसा डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांनी सार्थपणे पुढे चालविला आहे.
समृद्धी पोरे यांनी ही कथा चित्रपटीय भाषेत अतिशय समर्थपणे सादर केली आहे. कारण अशा कथा या माहितीपट म्हणून पुढे येतात तस त्यांनी होऊ दिलेले नाही. डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे हे कोणीतरी आकाशातून उतरलेले देवदुत आहेत अशी पूर्णपणे गौरवांकित मांडणी त्यांनी केलेली नाही. तर एक सर्वसामान्य माणूस आणि त्याची जडण घडण, त्याचे प्रेम, राग, लोभ, दु:ख हे सर्व त्यांनी छान टिपले आहे. त्यांच्या या सादरीकरणाला तितक्याच समर्थपणे अभिनयाची झूल चढवली आहे नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी. त्यामुळे हा चित्रपट चित्रपट म्हणून देखणा झाला आहे आणि हृदयाला भिडणारा झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची जी गर्दी होत आहे ती समाजात अजूनही संवेदनशीलता आणि शहाणपण शिल्लक आहे याची पावतीच आहे. प्रगतीशील मूल्ल्यांच्या आजच्या घसरणीच्या काळात ही गोष्ट आश्वासक आहे.
डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांचे काम भ्रामरागड, गडचिरोली या परिसरात असल्यामुळे त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध येणे अपरिहार्य आहे. त्यामुळे चित्रपटात त्याचे संदर्भ येणेही अपरिहार्य आहे. आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या या परिसरात माडिया या आदिवासी जनसमुहांची वस्ती आहे.आज जरी त्यांची थोडीफार प्रगती झाली असली तरी ते विकासाच्या अंगाने विकासाच्या मूळ प्रवाहापासून कोसो दूर आहेत. अगदी आदीम म्हणावे असे आयुष्य जगत आहेत. पोलिसयंत्रणा, फॉरेस्ट खाते. तेंदुपत्याचे ठेकेदार यांच्या अमानुष शोषणाची वर्षानुवर्षे शिकार झालेले हे आदिवासी जनसमूह नक्षलवादाची शिकार होणे स्वाभाविकच आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या सोबत काम करणारे विलास मनोहर यांनी `एका नक्षलवाद्याचा जन्म’ नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे. आदिवासी जनसमुहांच्या शोषणाचा बारकाईने धांडोळा घेताना त्यांनी सरकारी यंत्रणा नक्षलवादाच्या नावाखाली त्यांचा छळ करून त्यांना नक्षलवादी बनण्यास कशी भाग पाडते याचे चांगले चित्रण केले आहे. त्यामुळे जे लोक सामान्यपणे कष्ट करून आपले आयुष्य जगू इच्छितात तेही सरकारी यंत्रणांच्या विरोधी जाऊन पर्याय म्हणून बंदुक जवळ करतात. एकतर नक्षल समस्या ही कायदा सुव्यवस्थेची समस्या आहे हा सरकारी दृष्टीकोन, आदिवासी जनतेशी संबंधीत खात्याचे असणारे अधिकाऱ्यांचे आदिवासी जनतेबरोबरचे कायम अमानवी वर्तन, अगदी त्यांच्या हक्काचे राशन आदिवासी जनतेला मिळू न देणे, सातत्याने त्यांना अपमानित करून शिवीगाळ करणे यातूनच प्रतिकाराची भावना निर्माण होते आणि मग ते उपलब्ध असलेला नक्षल पर्याय स्वीकारतात. शेजारच्या आंध्र मधून येणारे अण्णा (नक्षल) याचा बरोबर फायदा उठवतात आणि नक्षल चळवळ फोफावते. पोलीस किंवा नक्षलविरोधी पोलीस दल निरपराध आदिवासी तरूणांना नक्षल म्हणून गोळ्या घालून ही चळवळ आणखी वाढवण्यास मदत करतात. जी गोष्ट आपण जम्मू-काश्मीरमध्ये पाहिली आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांची या प्रश्नावरची भूमिका तटस्थ आहे. अशा स्वरूपाचे काम करताना तशीच भूमिका असणे गरजेचे आहे. पण असे असले तरी त्यांची सहानुभूती पूर्णपणे आदिवासी जनतेला आहे. एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला नक्षल आंदोलन आणि यांच्या कोंडीत आदिवासी जनसमूह अडकलेला आहे. `बाप भीक मागू देईना आणि आई जेवू घालेना’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. यातूनच तो बंदुकीकडे वळतो किंवा बंदुकीला बळी पडतो. डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांनी त्यांच्यासाठी आरोग्यसुविधांबरोबर शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. अशा प्रकल्पांना सरकारने भरभक्कमपणे मदत करून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पण तीही बोंब आहेच. उदा. जंगलात जे प्राणी, पक्षी जखमी होतात असे प्राणी, पक्षी घेऊन आदिवासी लोक डॉ. प्रकाश यांच्याकडे येतात. डॉ. प्रकाश अशा प्राण्यांना औषधोपचार करून जगवतात. असे प्राणी, पक्षी परत जंगलातील जीवन जगू शकत नाहीत. अशावेळी त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी डॉ. प्रकाश यांनीच घेतली. असे अनेक प्राणी त्यामध्ये वाघ, बिबटे, तरस, अस्वल, रानगायी, रानकुत्रे, साप यांचा समावेश आहे. पण याची पार्श्वभूमी लक्षात न घेता सरकारच्या वन खात्याने असे प्राणी-पक्षी पाळण्यास बंदी घातली आहे, असे कारण देऊन ते जप्त करण्याचे ठरविले होते. हे प्राणी, पक्षी वाचविण्यासाठी डॉ. प्रकाश यांना खूपच धडपड करावी लागली होती.
म्हणजे सरकारी कारभाराचा हा एक नमुना आहे. असो. भारतातच नव्हे तर जगभरातच बाबा आमटे, विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, मंदा आमटे अभय बंग, राणी बंग असे किती तरी सहृदयी लोक आहेत की जे संतांचेच कार्य वेगवेगळ्या स्वरूपात करीत आहेत. मानवी विकास सरळ रेषेत जाणारी गोष्ट नाही. या विकासाला मानवी शोषणाची एक भयंकर बाजू आहे, ज्यामुळेच हे सर्व प्रयत्न उभे राहातात. मूळ मुद्दा आहे शोषणरहित विकासाचा, शोषणरहित समाजाचा. जो अंतिम उपाय आहे.
अंतिम ध्येयाच्या या खडतर प्रवासात वरील व्यक्ति मानवी जीवनात जेथे पूर्ण वाळवंट आहे अशा ठिकाणी थोडीफार हिरवळ निर्माण करण्याचे कार्य करतात ते कार्य मोठे आहे. अशा कार्यात आपल्यालाही काही हातभार लावता आला तर आनंदवन निर्माण करणाऱ्यांना हिंमत मिळू शकेल.

‘जीवनमार्ग’ च्या सौजन्याने

kiranm.subhasht@gmail.com