आपल्या देशाची घटना सेक्युलर आहे असे सर्व पुरोगामी विचारवंत सांगतात; पण ती खरोखरच शंभर टक्के सेक्युलर आहे का?
सेक्युलर शब्दाचा अर्थ निधर्मी, धर्म न मानणारा किंवा ईहवादी असा आहे. आपल्या देशाला केवळ अधिकृत धर्म नाही म्हणून आपला देश/घटना सेक्युलर आहे असा याचा अर्थ होत नाही. तेव्हा नेमकी परिस्थिती काय आहे ते पाहू या.
ईहवादी (सेक्युलर) राज्याच्या संकल्पनेचा उगम
मध्ययुगात युरोपमध्ये राज्य आणि चर्च यांच्यामध्ये जो सत्तासंघर्ष झाला त्यात ईहवादी राज्याच्या संकल्पनेचे मूळ सापडते. ‘द मोनार्किया’ या पुस्तकात डान्टे याने आधुनिक काळातील ईहवादी राज्याची कल्पना प्रथमच मांडली.