हिंदु धर्मात बरीच व्यंगें आहेत म्हणून यहुदी, महंमदी, क्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेंच, आमचे कांहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते.
उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरें नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणें हें केवढे मूर्खपण आहे बरें?