विषय «इतर»

धार्मिक अंधश्रद्धा धर्मः

अंधश्रद्धांचा एक मोठा स्रोत म्हणून धर्माकडे पाहता येते. बहुतांश अंधश्रद्धांचा धर्माशी संबंध दिसतो. धर्माचे वा धार्मिक अंधश्रद्धांचे तीन भाग करता येतात. परंपरागत, वैयक्तिक व संघटनात्मक असे ते तीन भाग करता येतील. प्रत्येक धर्माला मूलतत्त्व असते (जे विविध पंथांमध्ये समान असते पण दोन धर्मांत असमान असते). एक ज्ञानी वा पुरोहितवर्ग असतो आणि एक सामाजिक अस्तित्व असते. यातील मूलतत्त्व हे वैयक्तिक, सामाजिक हे परंपरात्मक तर पुरोहितवर्ग हे संघटनात्मक अशी वर्गवारी करता येईल. सर्वसाधारणपणे सुधारणा (अंधश्रद्धानिर्मूलन) या प्रथम सामाजिक वा परंपरागत नंतर पुरोहितवर्गविरोधी व शेवटी मूलतत्त्वविरोधी असतात.

पुढे वाचा

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींचा वेध

भाग तीनः कार्यकर्ते : व्यक्ती व संघटना
१९६७ ते १९८० दरम्यान आर्थिक, राजकीय घडामोडींना वेग आला होता. तरुणांची आंदोलने होत होती. नक्षलवादी चळवळीचा उगम, बिहार व गुजरातमधील आंदोलने याच काळातली. महाराष्ट्रात अशा अस्वस्थतेबरोबर, तरुण दलितांची चळवळ दलित पँथर, सामाजिक बदलाची चळवळ युक्रांद यांचे वारे वाहत होते. १९७४ मध्ये वरळीत दलित-सवर्ण दंगा झाला, यापुढे काहीच महिन्यांत दलित युवकांनी मराठवाड्यात सरकारी यंत्रणेविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. विविध पुरोगामी चळवळी यावेळी कार्यरत होत्या. ज्यांतील काही नावे पुढीलप्रमाणे : रॉयिस्ट, राष्ट्र सेवा दल, सर्वोदयी, सत्यशोधक समाज, आंबेडकरांचे अनुयायी, भूमिसेना, ग्रामस्वराज्य समिती, मागोवा, शहादा तळोदा गट, छात्र युवा संघर्ष वाहिनी, यूथ ऑर्गनायझेशन, क्रांतिकारी महिला संघटना.

पुढे वाचा

जोतीराव फुले यांचे अंधश्रद्धा-निर्मूलन कार्य

जोतीराव फुले यांनी विश्वमानवाच्या मुक्तीसाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या दोन निष्ठावंत अग्रणींच्या आयुष्यातील दोन प्रसंग प्रारंभीच नमूद केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्या चळवळीने संपादन केलेल्या यशाचा प्रत्यय येऊ शकेल. पहिला प्रसंग ना. भास्करराव जाधवांच्या आयुष्यातला आहे. वेदोक्त प्रकरणी दुखावलेल्या शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्र जगद्गुरूची प्रतिष्ठापना केली तेव्हा भास्कररावांनी त्या कल्पनेस विरोध केला होता. एवढेच नव्हे तर महाराजांसह सर्व श्रेष्ठींनी क्षात्रजगद्गुरूंना अभिवादन केले तेव्हा, आपण सत्यशोधक असल्यामुळे कोणत्याही धर्मपीठापुढे नतमस्तक होणे आपल्या विचारांत बसत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. सत्यशोधकी विचार केवळ ब्राह्मणी जगद्गुरूंनाच नकार देत नसून संपूर्ण पुरोहितशाही आणि जन्मनिष्ठ विषमतेवर आधारित वर्णव्यवस्था यांनाच नाकारतो.

पुढे वाचा

गाडगे महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य

गाडगे महाराजांना संत का म्हटले गेले हेच कोडे आहे. रूढार्थाने आपण ज्यांना संत म्हणतो, त्या संतांसारखी एखादीही कृती गाडगेबाबांनी केली नाही. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला आपण ‘बाबा’ म्हणतो या अर्थाने खेडुतांनी, गोरगरिबांनी त्यांना बाबा म्हटले आणि ते त्यांनी सहर्ष स्वीकारले असावे. पण महाराज ? हे काय प्रकरण आहे? कुणी आपल्या सोयीसाठी त्यांना महाराज बनविले ? कारण त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितले आहे ‘मी कोनाचा गुरु नाही अन् माझे कोनी शिष्यई नाहीत-‘ आपल्या भोवतीच्या सामाजिक दुःस्थितीचे अवलोकन करीत, त्यातून मार्ग शोधीत गाडगेबाबांचे लोकोत्तर आणि इहवादी तत्त्वज्ञान आकारले आहे, हे कुणी लक्षातच घेत नाही.

पुढे वाचा

बाबासाहेब आंबेडकर व अंधश्रद्धा निर्मूलन

डॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याचा वेध घेताना त्यांच्या धर्मचिकित्सेचा आणि धर्मांतर चळवळीचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. महाराष्ट्रात अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीची व्याप्ती प्रामुख्याने बुवाबाजी, चमत्काराचा दावा करणारे स्वामी, साक्षात्कारी असल्याचा प्रचार करणारे महाराज, झपाटणे, भानामती, वशीकरण विद्या, पुनर्जन्म, भावातीत ध्यान इ.च्या संदर्भातील प्रबोधनाची आहे. या सर्व अंधश्रद्धांची मुळे धर्माच्या तात्त्विक वा व्यावहारिक स्वरूपात आहेत. अंधश्रद्धानिर्मूलनाचा कार्यकर्ता मर्यादित उद्दिष्टाने व्यवहारातील उघड व बोचक अंधश्रद्धेच्या विरोधात कृती करीत असतो तर धर्मसुधारक आणि धर्मपरिवर्तक अंधश्रद्धांचे शक्तिसामर्थ्य असलेल्या ईश्वरवाद, आत्मवाद, अवतारवाद, पुनर्जन्मवाद, कर्मवाद या अध्यात्मवादी प्रवृत्तींची मूलगामी चिकित्सा करीत असतो.

पुढे वाचा

भाग चारः सर्वेक्षण श्रद्धांचे सर्वेक्षण

सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक श्रद्धाळू झाले आहेत असे म्हणणारे विवेकी, तर लोकांना कसची चाड राहिली नाही असे म्हणणारे धार्मिक आपल्याला भेटत असतात. ही त्यांची मते दिखाऊ श्रद्धा वा अश्रद्धा जाणवल्यावर प्रगट होत असतात. म्हणजे अमक्या मेळ्याला काही लाख माणसे जमली, मोठा अपघात झाला त्यात सर्व यात्रेकरू होते, असे काहीसे ऐकू आले की विवेकी माणसांना समाजातील वाढत्या श्रद्धेची ओळख पटते. तर सणासुदीला सुट्टी घेऊन भ्रमण करणारे पाहिले; लग्न-श्राद्ध-मुंजीतील धार्मिक व्यवहारातील ढिलेपणा पाहिला की धार्मिकांना नेमकी त्याविरुद्ध जाण येते. नेमके काय घडते हे पाहण्यासाठी आजकाल सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.

पुढे वाचा

भाग एकः संकल्पनात्मक श्रद्धा प्रमाण आहे काय?

ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती. ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्य ज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत. कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.

पुढे वाचा

अब्राहम कोवूर

२० व्या शतकातील भारतातील विवेकवादी चळवळीचे पितामह म्हणून डॉ. अब्राहम कोवूर ह्यांचा उल्लेख करावा लागेल. अमोघ वक्तृत्व, वैज्ञानिक विचारसरणी, परखड टीका आणि चमत्काराची प्रात्यक्षिके ह्यामुळे त्यांची भाषणे गाजत. श्रोतृवर्गाचा त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळे. चमत्कार ही बाबाबुवांची केवळ हातचलाखी आहे हे ते दाखवीत आणि तथाकथित अध्यात्म आणि संघटित धर्मावर तुटून पडत. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी भारताच्या गावागावांतून आणि शहराशहरांतून अशी शेकडो भाषणे दिली. बाबाबुवांना चमत्कार करून दाखविण्याचे खुले आह्वान ते देत. त्या काळीही पुट्टपूर्तीच्या सत्य साईबाबांचे बरेच प्रस्थ असे. आपल्या भाषणात डॉ.

पुढे वाचा

भुकेचा जागतिक व राष्ट्रीय संदर्भ

भुकेचा जागतिक व राष्ट्रीय संदर्भ
९६३ दशलक्ष लोक सध्या जगात तीव्र उपासमारीने ग्रस्त आहेत. २००९ अखेर ही संख्या १०० कोटींवर जाऊ शकते. जगात तीव्र उपासमारीने ज्यांना आवश्यक पोषक आहार मिळत नाही, अशांपैकी दोन तृतीयांश लोक भारत, चीन, काँगो, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि इथिओपिया या देशांत आहेत. जागतिक भूक निर्देशांकानुसार पुरेसा पोषक आहार न मिळणाऱ्या, जगातील ८८, देशांमध्ये भारताचा ६६ वा क्रमांक लागतो. तथापि, संख्येच्या तुलनेत (२०० दशलक्ष) भारताचा पहिला क्रमांक लागतो. आपल्या देशात कुपोषितांची संख्या वाढते आहे.
(संदर्भ: युनोच्या अन्न व कृषी संघटनेच्या ‘जागतिक अन्न असुरक्षिततेची स्थिती २००८’ या अहवालाबाबतचा १७ डिसेंबरचा टाईम्स ऑफ इंडिया चा अग्रलेख)

रेशनचा प्रश्न व चळवळः नवे संदर्भ, नवे डावपेच

रेशनचा प्रश्न खूप महत्त्वाचा व गंभीर आहे, हे खरे. पण तो आता सर्वांचा राहिलेला नाही, हेही खरे. आणि तो सर्वांचा राहिलेला नसला तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही, हेही खरे.
वरील तीन विधाने रेशनच्या प्रश्नाच्या स्वरूपासंबंधी आहेत. एखादा प्रश्न सोडवताना त्याच्या स्वरूपाची वस्तुनिष्ठ नोंद घेणे आवश्यक असते, अन्यथा डावपेचांची आखणी फसण्याची शक्यता असते. रेशनच्या प्रश्नाची स्वरूप-निश्चिती व तो सोडवण्याचे डावपेच, यासंबंधीचे काही मुद्दे नमुन्यादाखल मी येथे मांडणार आहे. रेशन चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून आलेल्या अनुभवांच्या आधारे ते मांडणार आहे. अभ्यासकांनी, विचक्षण वाचकांनी त्यात भर घालावी, दुरुस्ती सुचवावी ही अपेक्षा आहेच.

पुढे वाचा