विषय «इतिहास»

नागर क्रांतीचा उगम: दोन प्रवाह

इ.स. पूर्व ४००० च्या सुमारास मेसोपोटेमिया येथे जगातील पहिले नगर उदयाला आल्याचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडले. गॉर्डन चाइल्ड यांच्या सिद्धान्तानुसार अश्मयुगाच्या अखेरच्या पर्वात शेतीचा शोध लागला. या कृषिक्रांतीच्या विस्तारासोबत आणि परिणामी भटक्या, अन्नशोधक मनुष्यप्राणी ग्रामीण वस्त्यांमध्ये स्थिरावला. कृषिक्रांतीच्या काळात विपुल होत गेलेल्या अन्नसाठ्यांमुळे काही गावांचे नगरांत रूपांतर होणे सुरू झाले. ह्या नागरी क्रांतीचा पहिला उच्च बिंदू म्हणजे मेसोपोटेमियामधील ऊरूक हे नगर. पुढे ही नागरीकरणाची प्रक्रिया वेगवान होत गेली. जागतिक नागरी क्रांतीचे स्वरूप विसाव्या शतकात अधिक स्पष्ट झाले. ग्रामीण भागातून नागरी प्रदेशांत होणाऱ्या लोकसंख्येच्या जागतिक स्थलांतराचा अनुभव या सिद्धान्ताला पोषक असाच होता.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ११

……भुईंत खंदक रुंद पडुनि शें तुकडे झाले

आपण भारताच्या पर्यावरणी-सांस्कृतिक वाटचालीच्या चित्राची रूपरेषा पाहिली. संकलक आणि शेतकरी जीवनशैलीवर औद्योगिक ठसा उमटवण्याचे आजही होत असलेले प्रयत्न आपण पाहिले. या साऱ्यांवर वसाहतवादाची विशेष छाप आहे. या अंगाने भारतीय उपखंड आशियातील इतर दोन मोठ्या राष्ट्रांपेक्षा वेगळा आहे. जपान व चीन हे योगायोगाने वसाहतवादापासून मुक्त राहिले. जपानच्या पर्यावरणाचा प्रवास तेथील लोकांच्या धोरणांमधूनच झाला, आणि आजवर औद्योगिक जीवनशैली स्वीकारण्यात यशस्वी झालेला तो एकच आशियाई देश आहे. चीनमध्ये हा स्वीकार मंदगतीने होत आहे, आणि त्यावर समाजवादी छाप आहे.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख १०

स्वातंत्र्योत्तर वनसंघर्ष

१९८० साली नव्या वनकायद्याचा मसुदा चर्चेत आला. कायदा घडवणाऱ्यांना वनखात्याचे अधिकार वाढवायचे होते, तर लोकांच्या संघटनांना हे नको होते. त्यांच्या मते आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांवर या नव्या कायद्याने जुलमी शिक्षांची तलवार टांगली जाणार होती. यातून एकूण वनव्यवहारांवर चर्चा घडू लागली. यातून काही प्रशासकीय बदल झाले आहेत. एका दिशेचे बदल उद्योगांसाठी वने राखावी, व इतर सारी वने जास्त ठामपणे खात्याच्या नियंत्रणात आणावी अशा प्रकारचे आहेत. याला खात्यातूनच विरोध आहे, कारण त्यांना हास पावलेल्या वनांवरचा अधिकारही सोडायचा नाही. खाते म्हणते की उद्योगांना आज गावठाणांसाठी राखलेली जमीन द्यावी.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ९

व्यापारी वनिकी

स्वातंत्र्याच्या चळवळीने भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि समाजाच्या पुनर्निर्माणाचे दोन ‘नमुने’ पुढे आणले. पंचायत राज, खादी ग्रामोद्योग, प्रार्थना-उपवासासारख्या लोकतंत्रांचा वापर, हा म. गांधींचा नमुना होता – अभिजात हिंदू परंपरेपेक्षा सामान्य लोकधाटीला जवळ असलेला. गांधींची जनमानसाला ‘हलते’ करण्याची हातोटीही विलक्षण प्रभावी होती. त्यांच्या आदर्शाचा भर शेतकऱ्यावर होता, पण उद्योजकाला विश्वस्त’ मानण्याच्या ढगळ कल्पनेमुळे भारतीय उद्योजक-भांडवलशहांनाही त्या आदर्शात स्थान होते.

दुसरे आदर्श घडवणारे औद्योगिकीकरणाला (पर्यायाने पाश्चात्त्यीकरणाला) पर्याय नाही, असे मानणारे होते—- ढोबळ मानाने नेहरूंचे पाठीराखे. या आदर्शाचा एक प्रवक्ता असलेले सर मोक्षगुंडम वि वे वरय्या १९२० साली म्हणाले, “(भारतीयांना) सुशिक्षित व्हायचे की अडाणी राहायचे ते ठरवावे लागेल.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ८

संघर्षाच्या वाटा आणि व्याप्ती

इंग्रज भारतात येण्याच्या आधीही संकलक समाजांच्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या समाजांचा दबाव असे. पण शेतकऱ्यांचा जंगलांवरचा दबाव सौम्य असे. मिरे, वेलदोडा, हस्तिदंत अशी उत्पादने वगळता शेतकरी जंगलांकडून फार अपेक्षा ठेवत नसत. व्यापारीकरणाने मात्र हे चित्र बदलले. स्थानिक लोकांचे वनावरील हक्क संपुष्टात आले; वनव्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्या डोक्यावरून हटली; आणि जंगलांचे स्वरूपही बदलले. ओक व बेहडा कुळातील वृक्ष सरपण, पाचोळा, फुटकळ इमारती लाकूड पुरवत असत. आता त्यांचा नायनाट होऊन सागवान-देवदारावर भर वाढला. या वृक्षांना स्थानिक उपयोगच नव्हते, ती शुद्ध व्यापारी ‘पिके’ होती.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ७

बाजारपेठेला कायदा ‘साक्षी’

संस्कृतिसंघर्ष:
जातीपातींच्या श्रेणींच्या अन्याय्य चळतीने जखडलेला, पण तरीही सुसंगत स्थैर्य पावलेला, असा भारतीय समाज कसा घडला ते आपण पाहिले. सांस्कृतिक परंपरा, निसर्गाशी कसे वागावे याबद्दलच्या वहिवाटी आणि जाती आणि जातसमूहांची वीण, अश्या साऱ्या यंत्रणेतून समाजाचे ‘शासन’ होत असे. त्या मानाने राजे कमी महत्त्वाचे इंग्रज मात्र आले तेच औद्योगिक क्रांतीने आमूलाग्र बदललेली जीवनशैली सोबत घेऊन. त्यांच्या मायदेशातही जीवनशैलीतील बदल नुकतेच अंगवळणी पडू लागले होते. याला तीन मुख्य अंगे होती.

एक म्हणजे वस्तुव्यवहार वाढले होते. मूळच्या नैसर्गिक वस्तूंपासून अनेक नवनव्या वस्तू घडवता येऊ लागल्या होत्या.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ६

जाती आणि निसर्गाचे दोहन

भारताच्या सर्वच भागांमध्ये संकलक जीवनशैलीला ‘संपवून’ स्थिर शेतीची शैली घडली नाही. गंगेच्या तीरावर पुरांचा धोका, पूर्व घाट आणि सह्याद्रीच्या आसपास समतल जमिनीचा अभाव, तराई भाग डासांनी आणि दलदलींनी ग्रस्त, काही क्षेत्रांत पाऊस बिनभरवशाचा, अशा अनेक अडचणींमुळे या ‘कठिण’ क्षेत्रांमध्ये संकलन-पशुपालन करणारे समाज तगून राहिले. इतर भागांत मात्र शेती स्थिरावली.
शेतीचा प्रसार होत असताना संसाधनांच्या वापरात ‘शहाणपण’ खूपसे ‘वरून’ येत असे. जैन आणि बौद्ध धर्मांच्या अहिंसेला राजाश्रय मिळत होता. नव्याने संकलनाकडून शेतीत येणाऱ्यांना निसर्गावर आघात न करता जगण्याची सवय होतीच.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ५

खांडववन

भारतातील सर्वांत जुने मानवसदृश प्राण्यांचे जीवाश्म (fossils) आहेत १.३ कोटी वर्षांपूर्वीचे. सत्तरेक लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्राणी वावरत. मग मात्र त्यांचे अवशेष सापडत नाहीत. ज्यांना मानव म्हणता येईल अशा प्राण्यांचा भारतातला इतिहास सुमारे सात लाख वर्षांपूर्वी सुरू होतो. तेव्हापासून ते दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात भारतभर छोटे छोटे संकलक गट पसरले. या गटांच्या संसाधन-वापराबद्दल आपण अंदाजच बांधू शकतो.

काही विशिष्ट भूप्रदेश व्यापणाऱ्या, शेजाऱ्यांशी या प्रदेशांवरून भांडणाऱ्या, आपसातच लग्नसंबंध करणाऱ्या टोळ्या, असे या गटांचे रूप असणार. निसर्गावर या गटांचा परिणाम क्षीण असणार, आणि त्या मानाने हवामान बदलाचे परिणाम तीव्र असणार.

पुढे वाचा

गीता-ज्ञानेश्वरीतील एक अनुत्तरित प्रश्न

‘ही भगवद्गीता अपुरी आहे’ हा प्रा.श्री. म. माटे यांचा एक महत्त्वपूर्ण लेख. ‘विचारशलाका’ या त्यांच्या ग्रंथात तो समाविष्ट केला गेला आहे.

त्या लेखात भगवद्गीतेच्या पहिल्याच म्हणजे मुखाध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेले दोन प्रश्न मांडले आहेतः
(१) आप्तस्वकीयांच्या मृत्यूविषयीचापहिला चिरंतन स्वरूपाचा प्रश्न.
आणि
(२) कुलक्षयामुळे स्त्रियांमध्ये येणारी दूषितता, स्वैर आचारवत्यातून होणारावर्णसंकर हा दुसरा नैतिक, सामाजिक प्रश्न

पहिल्या प्रश्नाचे उत्तर गीताभर केलेल्या आध्यात्मिक चिंतनात येऊन जाते. देहाचा मृत्यू म्हणजे अमर आत्म्याचा मृत्यूनव्हे हा चिंतनाचा मथितार्थ. त्याअनुरोधाने या जीवात्म्याचे ध्येय काय आणि ते गाठण्याचे मार्ग कोणते याचे विवरण गीतेत येते.

पुढे वाचा

औद्योगिक क्रान्तीचे पडसाद

१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन वाङ्मयाचा अभ्यास करताना नेहमी जाणवायचा तो त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे व्यापून टाकणारा औद्योगिक क्रांतीचा प्रचंड बॅकड्रॉप. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, साहित्यिक इ. कुठलेही क्षेत्र त्याच्या सर्वव्यापी प्रभावापासून मुक्त नव्हते. १९ वे शतक हा सर्वार्थाने स्थित्यंतराचा काळ. व्हिक्टोरिया राणीच्या स्थिर आणि खंबीर राजवटीच्या खांबाभोवती हे बदलाचे गोफ विणले गेले. प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या बदलांमागचे महत्त्वाचे कारण होते औद्योगिक क्रांती.

तांत्रिक-औद्योगिक क्षेत्रातील तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे क्षेत्रांतील हे बदल आमूलाग्र स्वरूपाचे होते. त्यांचे क्रांतिकारक स्वरूप लक्षात येण्याच्या आधीच माणसे ओळखीच्या जगातून अनोळखी जगात लोटली गेली होती.

पुढे वाचा