समतावाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागविणे हे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय साधताना सर्वाना समतेने वागवून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही लोकांना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समताप्रस्थापनाच्या ध्येयाला विरोध करणे होय. ह्या बाबतीत रोगी माणसाचे उदाहरण बरोबर लागू पडते. सुदृढ माणसाला जोडेभरडे अन्न चालते. पण सुदृढ माणूस व रोगी माणूस हे दोघेही सारखे मानून जर एखादा वेडगळ समतावादी’ ते जाडेभरडे अन्न रोग्याला देईल तर तो रोग्याचा प्राणदाता होण्याऐवजी प्राणहर्ता होईल.
विषय «उवाच»
आगरकरांचे अग्रेसरत्व
गोपाळ गणेश आगरकर हे कर्ते सुधारक होतेच. पण त्यांनी संतति-नियमनाचा पुरस्कार केला होता हे किती जणांना माहिती आहे? ‘केसरी’ च्या १८८२ च्या १५. व्या अंकात आगरकरांनी ‘स्त्रीदास्य-विमोचन’ हा लेख लिहिला होता. त्यावर त्यांचे नाव नसले तरी त्या लेखातील विचारसरणी आणि लेखनशैली यावरून तो लेख आगरकरांचाच आहे याविषयी शंका राहात नाही. त्या लेखात प्रारंभीच त्यांनी, नवे विचार आले की नवे शब्द बनवावे लागतात, असे सांगून स्त्रीदास्य-विमोचन’ हा शब्द आपण बनवीत आहो, असे सांगितले आहे. यावरून ‘स्त्रीदास्य-विमोचन ‘ हा शब्द प्रथम आगरकरांनी प्रचारात आणला हे दिसून येते.
अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय
अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्यांना, प्राण्यांचे आत्मे शरीराचा त्याग केल्यावर कसल्यातरी शरीराच्या आधारातूनच काही वेळ राहू शकतात, अशी खात्री झाली असली पाहिजे ……अशरीरत्व म्हणजे शरीराचा अत्यंत अभाव असे म्हणण्याचा त्यांचा आग्रह असेल तर मात्र ते काहीतरी गडबड करतात असे म्हणावे लागेल, अशरीरी वस्तू म्हणजे काय? आम्ही शरीरी मर्त्यांनी तिची कल्पना कशी करावयाची? आत्म्याशिवाय एखादी अशरीरी वस्तु आमच्या पाहण्यात आली आहे काय ? इंद्रियाला किंवा मनाला गोचर अशा वस्तूचे अस्तित्व मानण्यास कोणीही हरकत घेणार नाही. इंद्रिये ही मनाची द्वारे आहेत.
तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही!
तर्कापलीकडील जे पारलौकिकादि विषय आपल्या इकडे मानले आहेत, त्यांसंबंधीदेखील माझे तरी असे मत आहे की तर्काशिवाय दुसरे एखादे ज्ञानसाधन – वेद, श्रद्धा, सहृदयत्व, intuition, योगमार्गातील समाधी वगैरे वगैरेंपैकी एखादे ज्ञानसाधन – असले तर ते मानावे, पण एवढे लक्षात ठेवावे की या साधनाने होणारे ज्ञान आणि तर्काने होणारे ज्ञान यांची एकवाक्यता केल्याशिवाय ते ज्ञान खरे व टिकाऊ समाधान देऊ शकणार नाही. दुसरे असे की जोपर्यंत अशी एकवाक्यता झालेली नाही तोपर्यंत तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही.
सर्व जगाचे नेतृत्व फुकाचे नाही
भूतभूतकाळी आमचे धर्मविचार व आमची समाजव्यवस्था ही कितीही स्पृह्य असली व भविष्यकाली आम्ही सार्या जगाचे मार्गदर्शक होणार असलो, तथापि वर्तमानकाळ तरी प्रत्येक दृष्टीने आमची स्थिती अगदी खालावलेली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे; आणि भोवताली चाललेल्या जीवनार्थ कलहात आम्हांस सरशी मिळवावयाची असो किंवा मिसेस बेझंट सांगतात त्याप्रमाणे साच्या जगास आध्यात्मिक विचाराचा धडा घालून देणे असो. आम्हांस प्रथम आपल्या सुधारणेस लागले पाहिजे यात मुळीच मतभेद नाही. नुसते आमच बाबा असे होते आणि तसे होते म्हणून फुशारकी मारीत बसण्याने आमची सुधारणा होणे नाही. ती होण्यास आम्ही आपला आयुष्यक्रम बदलण्यास तयार असले पाहिजे…..
नीतिविचार धर्मविचाराहून निराळा
अलीकडील विद्वान लोक नीतितत्त्वांचा विचार धर्मविचारापान निळा करतात. त्यांचा असा समज झाला आहे की, नीतितत्त्वांचा अभ्यास पृथक्पणानं केला, तर आता तो फार सोपा जाता. म्हणून सर्वमान्य नीतितत्त्वांचा धर्मात समावेश न करता या तत्त्वाचे स्वतंत्र शास्त्र कल्पून, त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा. असे करण्यांत एक मी सोय आहे, ती ही कीं, धर्मात नीतितत्त्वांचा अंतर्भाव केला असतां, “अमुक गोष्ट चांगली कशासाठी?” असा प्रश्न कोणी केला तर त्यास असे उत्तर द्यावे लागते की,’ती परमेश्वरा चांगली वाटते, म्हणून ती चांगली मानणे भाग आहे.’ यावर जर कोणी असा उलट प्रश्न करील की,’अमुक गोष्ट परमेश्वरास चांगली वाटते असें कशावरून समजावयाचे?’
आगरकर म्हणतात –
एकाने दुसर्याकरतां सहज मरणें, बुद्ध्या मारून घेणे, किंवा नाहीं नाहीं ते हाल भोगणें हें सर्वथैव इष्ट असेल तर, स्त्री मेल्यावर पुरुषानेही तिच्याबद्दल प्राण सोडणे, प्राणहत्या करणे, किंवा वैधव्यव्रताचे सेवन करणे प्रशस्त होईल, किंवा झाले असते! बायको मेल्याची वार्ता येतांच बेशुद्ध होऊन परलोकवासी झालेल्या भार्यारतांची उदाहरणे कधी तरी आपल्या ऐकण्यांत येतात काय? किंवा स्त्रीबरोबर सहगमन केलेल्या प्रियैकरतांची उदाहरणे कोणत्याही देशाच्या पुराणांत किंवा इतिहासांत कोणीं वाचली आहेत काय ? किंवा बायकोस देवाज्ञा झाल्यामुळे, नित्य भगवी वस्त्रे परिधान करणारे, क्षौराच्या दिवशीं डोक्याच्या किंवा तोंडाच्या कोणत्याही भागावरील केसांची काडीमात्र दयामाया न ठेवणारे, भाजणीच्या थालिपिठाशिवाय दुसन्या कोणत्याही आहारास स्पर्श ने करणारे, अरिष्ट गुदरल्यापासून चारसहा महिने कोणास तोंड न दाखविणारे, पानतंबाखूची किंवा चिलीमविडीची त्या अत्यंत खेदजनक दिवसापासून आमरण समिध शेकणारे, व मंगलकार्यात किंवा कामासाठी घरांतून बाहेर पडणार्या इसमापुढे येण्यास भिणारे नवरे कोणी पाहिले आहेत काय?
आगरकर म्हणतात –
खरे म्हटले तर चंद्रगुप्तापूर्वीच आमचा राष्ट्रचंद्र मावळला होता. असे म्हणण्यास हरकत नाही. दोन किंवा अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारच्या राज्यविचारांनी, धर्मविचारांनी व सामाजिक विचारांनी आम्ही निगडीत झालो होतो, व त्यावेळी ज्या आचारांचे आम्ही गुलाम होतो तेच विचार आणि तेच आचार अद्यापि आम्हास बहुधा आपल्या कह्यात ठेवीत नाही काय? कोणतीही सचेतन वस्तू बहुधा दोन हजार वर्षे टिकत नाही. पण टिकलीच तर तीत जमीनआस्मानाचे अंतर झाल्याखेरीज राहावयाचे नाही. पण आमच्या शोचनीय राष्ट्रस्थितीत गेल्या दोन हजार वर्षांत म्हणण्यासारखा फेरफार झाला आहे, असे बहुधा कोणाही विचारी पुरुपास म्हणता येणार नाही!
आगरकर म्हणतात –
सोलापूरकर अपरिचिता’चा पहिला प्रश्न असा आहे की ‘समाजात एकंदर सुधारणा हव्यात तरी कोणत्या?’ सुधारकाला असा प्रश्न करणे म्हणजे काय झाले असता तू ‘सुधारक या पदवीचा त्याग करण्यास तयार होशील, असे त्यात विचारण्यासारखेच आहे! यावर त्याचे उत्तर एवढेच आहे की, बालविवाहाचे नाव नाहीसे झाले, प्रत्येक स्त्रीस शिक्षण मिळू लागले, विधवावपन अगदी बंद झाले, स्त्रीपुनर्विवाह सर्वत्र रूढ झाला, व संमतिवयाच्या कायद्यासारखे अनेक कायदे पसार झाले, तरी त्याची तृप्ती होण्याचा संभव नाही! त्याच्या सुधारणावुभुक्षेस मर्यादाच नाही असे म्हटले तरी चालेल! ज्याप्रमाणे समुद्राला नद्यांचा, लोभ्याला द्रव्याचा, कर्णाला दानाचा व धमला शांतीचा कंटाळा कधी येत नाही किंवा आला नाही, त्याप्रमाणे खच्या सुधारकाला सुधारणेचा वीट येण्याचा कधीच संभव नाही….
आगरकर म्हणतात –
हिंदु धर्मात बरीच व्यंगे आहेत म्हणून यहुदी, महंमदी, ख्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसर्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणार्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेच, आमचे काहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरे नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणे हे केवढे मूर्खपण आहे बरें?