प्रिय वाचक,
मागील एका संपादकीय संवादात (गड्या, तू बोलत का नाही?) आम्ही वाचकांना बोलण्याचे आवाहन केले होते. थेट त्याला स्मरून बहुधा, आमच्याकडे काही पत्रे आली आहेत. ह्या अंकातील पत्रांत त्यांतली दोन आहेत. कदाचित् त्याच वळणाने असेल आमच्या एका हितचिंतक वाचकाने एका पत्रात आमच्या पुष्कळ चुका दाखवल्या आहेत. त्याने म्हटले आहे की “जून-जुलै पासून आ. सु.त शुद्धलेखनाच्या, शब्दरचनेच्या तसेच वाक्य- रचनेच्या चुका ठळकपणे जाणवत आहेत.” त्यांची काही उदाहरणे दिली आहेत. त्यातले काना-मात्रेचे किरकोळ, ज्यांच्यामुळे अर्थहानी किंवा अर्थविपर्यास न झाला तरी तांत्रिक अर्थानि ते सदोष मुद्रण झाले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.