ज्या ऐतिहासिक प्रक्रियेने भारताला तरल, नाजुक, नखरेल दर्शने, धर्मशास्त्र, वास्तुकला आणि संगीत दिले; त्याच प्रक्रियेने उपाशी, मरगळलेली खेडी, संधीसाधू आणि हावरट ‘सुसंस्कृत’ (नागर) वर्ग, नाराज कामगार, ढासळती मूल्ये, अंधश्रद्धा यांनाही जन्म दिला. एक अंग दुसऱ्या अंगाचा परिणाम आहे. एक अंग दुसऱ्याची अभिव्यक्ती आहे.
अगदी अनघड, प्राथमिक हत्यारांमुळे अतिरिक्त उत्पादन तुटपुंजे राहिले, आणि तेही (तंत्रज्ञानाला) समरूप अशा जुन्यापुराण्या समाजव्यवस्थेने हिरावून घेतले. बहुसंख्यकांच्या दारिद्र्यावर आपला ऐषारामी सुसंस्कृतपणा रचलेला आहे, हे विसरून उच्च वर्गाला आपला उच्चपणा अंगभूत श्रेष्ठतेतून आला, असे वाटू लागले. इतिहास म्हणजे स्वैर, विस्कळीत घटनांची माळ नव्हे.