काही दिवसांपूर्वी ‘मित्र’ या सुयोग निर्मित नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. नाटकाविषयी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली परीक्षणे वाचली होती. तेव्हाच हे नाटक बघायचे असे ठरविले होते. आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. लागूंची भूमिका! इतर नाटकांप्रमाणेच ह्याही नाटकात डॉक्टरांनी अभिनयाची जी उंची गाठली आहे ती अवाक् करणारी आहे. सतत आपण काहीतरी अद्भुत अनुभवीत आहोत ही भावना मनात येत होती. त्यांना साथ देणाऱ्या होत्या ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती चांदेकर! दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक डोळे भरून पाहत होते.
नाटकाचे सादरीकरणही वेगळ्या प्रकारे केले गेले. पार्श्वभूमी म्हणून कथा-नायकाला – दादासाहेब पुरोहितांना – अर्धांगवायूचा झटका, तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जी जखम होते त्यावर उपचार करायला म्हणून दवाखान्यात ठेवलेले असते.