संघर्षाच्या वाटा आणि व्याप्ती
इंग्रज भारतात येण्याच्या आधीही संकलक समाजांच्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या समाजांचा दबाव असे. पण शेतकऱ्यांचा जंगलांवरचा दबाव सौम्य असे. मिरे, वेलदोडा, हस्तिदंत अशी उत्पादने वगळता शेतकरी जंगलांकडून फार अपेक्षा ठेवत नसत. व्यापारीकरणाने मात्र हे चित्र बदलले. स्थानिक लोकांचे वनावरील हक्क संपुष्टात आले; वनव्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्या डोक्यावरून हटली; आणि जंगलांचे स्वरूपही बदलले. ओक व बेहडा कुळातील वृक्ष सरपण, पाचोळा, फुटकळ इमारती लाकूड पुरवत असत. आता त्यांचा नायनाट होऊन सागवान– देवदारावर भर वाढला. या वृक्षांना स्थानिक उपयोगच नव्हते, ती शुद्ध व्यापारी ‘पिके’ होती.