तस्लीमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम ८७ पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळेच वाढवलेला. पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.
तस्लीमा ‘लज्जा’मुळे प्रकाश झोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी ६ महिने प्रकाशित झालेली. ‘फिट्टे फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’–‘सूड’ ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला. ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या ५ आवृत्त्या निघाल्या होत्या.