‘नियति’ म्हणजे केव्हा काय घडणार आहे हे पूर्वीपासूनच ठरलेले आहे असे प्रतिपादणारे मत. हे मत ज्याला Determinism म्हणतात त्यासारखे आहे असे वाटते, पण ते त्याहून वेगळे आहे. नियति म्हणजे जिला इंग्रजीत ‘Fate’ हे नाव आहे ती गोष्ट. नियतिवाद म्हणजे fatalism, या मतानुसार केव्हाही काय घडणार आहे ते पूर्ण तपशिलासह अनादि काळापासून पूर्वनिश्चित आहे. नियतीचे दुसरे नाव आहे भवितव्यता.
या मताहून Determinism भिन्न आहे. त्याला नियतिवाद या नावाऐवजी नियमबद्धतावाद हे नाव अधिक अन्वर्थक होईल. आपल्या सबंध जगाचे मार्गक्रमण अनेक नियमांनी बद्ध असे असून ते सर्व नियम शेवटी कारणाच्या नियमातून उद्भवले आहेत असे
आपण सामान्यपणे मानतो.
पेशवाईअखेरची खानदेशातील जनस्थिति
अगदी साध्या गोष्टीतसुद्धा खरे काय आहे, हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लौकर दाद मिळविण्याच्या आशेने ते नेहमी राईचा पर्वत करितात. लांचलुचपती व एकमेकांशी अन्यायाचे वर्तन ह्यांचे प्रमाण इतके वाढले होते की ते सांगू गेल्यास कोणी खरेसुद्धा मानणार नाही. धाकटे घराण्यात अवश्य तितकी धूर्तता आणि रोकड मात्र पाहिजे, की त्याने वडील घराण्याच्या तोंडाला पाने पुसून त्याची मालमत्ता सरकारांतून आपल्याकडे ओढलीच समजा. ह्यामुळे जिकडे-तिकडे गृहकलहाचा वणवा पेटून सरकारी दसरांतसुद्धा बनावट दस्तैवज घुसले, आणि अस्सल खरे दस्तैवज मिळविण्यासाठी मारामारी व ठोकाठोकी माजून राहिली.
संपादकीय
(१) आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
(पुढे चालू)
मागच्या लेखात आम्ही परिस्थितिशरणतेचा उल्लेख करताना ही शरणता फक्त ऋणकोची असते असे नाही, ती धनकोचीदेखील तितकीच असते असे विधान केले आहे. आम्हाला असे म्हणावयाचे आहे की धनकोच्या कल्पनाविश्वांत-मनोविश्वात दुस-या कोणत्याही शक्यतेचा, वेगळ्या परिस्थितीचा विचार डोकावत नसल्यामुळे, त्यापेक्षा निराळी परिस्थिती त्याने स्वप्नातदेखील पाहिलेली नसते त्यामुळे; इतकेच नाही तर ऋणकोची ही दुःस्थिती त्याच्या पूर्वजन्मीच्या दुष्कृतांमुळे आणि आपली स्वतःची सुस्थिती आपल्या बापजाद्यांच्या शेवटल्या जन्मातल्या आणि आपल्या पूर्वजन्मातल्या सुकृतामुळेच आपल्या वाट्याला आली आहे अशी त्याची बालंबाल खात्री असल्यामुळे धनकोच्या मनाला अन्यायाची टोचणी लागत नाही.
पत्रव्यवहार
गुणवत्ता – यादीचे कौतुक पुरे !
संपादक, आजचा सुधारक यांस,
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या म्हणीप्रमाणे १० वी, १२ वी, चे निकाल लागले की, शिक्षण आणि परीक्षा या संबंधातील चर्चा वर्तमानपत्रांतून एखादा महिना चालते व नंतर शिक्षणक्षेत्रात आणि शासनाच्या शिक्षण-खात्यात पुन्हा सामसूम होते.
लॉर्ड मेकॉलेने, भारतात शिक्षण-पद्धती सुरू केल्यावर ‘ही शिक्षण-पद्धती केवळ आज्ञाधारक सेवकवर्ग तयार करणारी आहे’ – अशी तीवर टीका झाली. परंतु दुर्दैवाने या पद्धतीत अजूनहि फारशी सुधारणा झालेली नाही.
वास्तविकरीत्या ‘परीक्षा’ याचा अर्थ परि+ईक्षण म्हणजे सर्व बाजूंनी पाहणे. बौद्धिक विकासामध्ये कार्यकारणभाव समजणे, तरतम-भाव समजणे, साम्यविरोध समजणे या सगळ्या प्रक्रिया येतात आणि याची परीक्षा घेतली गेली पाहिजे.
स्फुटलेख : महिला-आरक्षण–वरदान की शाप?
हा अंक वाचकांच्या हातात पडेपर्यंत महिला आरक्षण विधेयक बहुधा संमत झालेले असेल. त्याच्या मूळ स्वरूपात जरी नाही तरी काही तडजोडी करून ते संमत होईल अशी चिन्हे आज दिसत आहेत. ह्या आरक्षणामुळे काही मोजक्या स्त्रियांच्या हातात थोडी अधिक
सत्ता येईल हे कितीहि खरे असले तरी हे हक्क मागून स्त्रियांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आपल्या देशाच्या प्रगतीला खीळ घातली आहे. आपला देश कमीत कमी शंभर वर्षे मागे गेला आहे.
मुळात आरक्षण हीच एक भयानक गोष्ट आहे. एकदा आरक्षण मान्य केले की पुष्कळदा अयोग्य व्यक्तींना निवडून द्यावे लागते.
प्रा. लिओनार्ड आणि आजचा जर्मनी
“आपणाला आजच्या जर्मनीत काय काय कमतरता जाणवतात”? कृपया सोबतची प्रश्नावली भरून पाठवाल काय? ‘जर्मनीतल्या एका प्रख्यात नियतकालिकाने अशी प्रश्नावली काही सुप्रसिद्ध विचारवंतांना पाठविली’. प्रश्नावली अशी –
तुम्हाला जर्मनीविषयी बांधिलकी का वाटते? काही खास वैयक्तिक स्नेहरज्जू? जर्मनीच्या इतिहासातील कोणत्या कालखंडात तुम्हाला राहावयाला आवडले असते ? जर्मनीच्या इतिहासातील कोणते पराक्रम, यश ही तुम्हाला सर्वोत्तम वाटतात ? कोणती जर्मन इतिहासकालीन व्यक्ती तुम्हाला आवडते ? वाङ्मय, संगीत, कला, विज्ञान ह्या क्षेत्रांत कोणत्या जर्मन व्यक्ती तुम्हाला महान वाटतात ? जर्मन इतिहासातील सर्वांत पराक्रमी (अर्थात् लष्करी) पुरुष कोण ?
एक प्रकट चिंतन
अलीकडेच मी नथुराम बोलतोय ह्या नाटकाच्या निमित्ताने उठलेले वादळ, झालेला गदारोळ व त्यावर बंदी घालून ते शमविण्याचा झालेला प्रयत्न ह्यासंबंधी वृत्तपत्रातून वृत्त, प्रतिक्रिया वाचताना एक विचार सतत मनाला भेडसावत होता. हे सत्यान्वेषण की विकृती?
गांधींवर एकामागून एक तीन नाटके आली. पैकी गांधी विरुद्ध गांधी, गांधी आणि आंबेडकर ह्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत. गांधी विरुद्ध गांधी ह्यावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रियाही प्रसिद्ध झाल्या. ‘नथुराम’ च्या वेळी सहनशक्तीचा अंत झाला आणि गांधीवादी किंवा गांधीवादी नसले तरी ते राष्ट्रपिता आहेत हे मानणारे ह्यांनी कडाडून विरोध केला अन् तो सफल झाला.
विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या आणि त्यांतून निर्माण होणारे व्यवस्थेचे प्रश्न
१९९७-९८ ह्या कृषि वर्षात प्रथम अवर्षण व नंतर तीन वेळा अतिवर्षण घडले. त्यातून नापिकी झाल्यामुळे जी देणी देणे अशक्य झाले त्यांचा व त्यांच्याशी संबंधित कौटुंबिक बाबींमुळे शेतक-यांनी आत्महत्या केल्या, नव्हे त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही ही सत्यस्थिती आहे. ही परिस्थिती विदर्भात गेल्या ३० वर्षांत प्रथमच निर्माण झाली हे जरी खरे असले तरी त्या प्रश्नावर तितक्या गांभीर्याने उपाययोजना केली गेली नाही, हेही तितकेच खरे आहे. ह्या घटनेतून सध्याची शेतीची प्रबंधन घडवून आणणारी जी व्यवस्था आहे तिच्यासंबंधी बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे शेतक-यांसह आपण सर्वांनी शोधावयाची आहेत.
‘एकविसाव्या शतकात संतविचाराची सोबत’
‘ललित’ मासिकाचा मे ९८ चा अंक ‘संतसाहित्य आणि एकविसावे शतक’ या विषयावर विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्यात एकूण सोळा व्यासंगी विद्वानांचे लेख आहेत. त्यापैकी पाच मराठीचे प्राध्यापक असून, दहा संतसाहित्याचे अभ्यासक, हरिभक्तिपरायण, प्रवचनकार इ. आहेत. उरलेले सोळावे एकमेव वैज्ञानिक श्री. वि. गो. कुळकर्णी आहेत. त्या दृष्टीने लेखकांची ही निवड प्रातिनिधिक म्हणता येणार नाही. अशी निवड करण्यात कदाचित् अशी दृष्टी असू शकेल की संतसाहित्यावर लेख मागवायचे तर त्यांचे लेखक त्या विषयाचे अभ्यासक असले पाहिजेत. ते काही का असेना, परिणाम असा झाला आहे की हा विशेषांक संतसाहित्याच्या प्रशंसेकरिताच काढला आहे असा समज होतो; कारण श्री वि.
ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक
गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा चालवणाच्या दि. य. देशपांडे यांनी सुरू केलेल्या आजचा सुधारक ला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या नव्या संपादकांनी ‘सिंहावलोकन आणि थोडे आत्मपरीक्षण केले आहे. (आ.सु. जून ९८) त्यात त्यांनी आजचा सुधारकने केलेल्या कामाचे फलित फार अल्प आहे व पुष्कळशा चर्चा एका विशिष्ट परिघात फिरत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
संपूर्ण ग्रंथव्यवसायाला, त्यातही प्रबोधनपर व गांभीर्यपूर्ण लिखाण असलेल्या नियतकालिकांना अवकळा आलेली असताना, गेली आठ वर्षे, न चुकता (व वार्षिक वर्गणीत वाढ न करता) सकस आशययुक्त व विचारशक्तीला चालना देणारे मासिक काढत असल्याबद्दल संपादक-मंडळासहित सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत.