परंपरा, रूढी आणि आधुनिकता या विषयावरील माझ्या भाषणाचा वृत्तांत आणि त्यावरील प्रा.प्र.ब.कुलकर्णी यांचे आक्षेप ‘आजचा सुधारक’च्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यापूर्वीच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अंकात, त्याच परिसंवादातील प्रा.कुलकर्णी यांचे भाषण प्रसिद्ध झाले आहे. प्रा.कुलकर्णी यांच्या अनुग्रहामुळे हे दोन्ही अंक मी वाचू शकलो. मी प्रा.कुलकर्णी यांचा आभारी आहे.
मी हे प्रारंभीच मान्य करतो की, प्रा.कुलकर्णी यांच्यासारख्या विद्वान आणि विचक्षण श्रोत्याला मी माझे म्हणणे नीट समजावून सांगू शकलो नाही, हे माझ्याच प्रतिपादनाचे न्यून आहे. मी भाषण लिहून आणलेले नव्हते. पूर्वी झालेल्या माझ्या भाषणांचा परामर्श, परिपाटीप्रमाणे मी अध्यक्षीय भाषणात घेतला.