वैज्ञानिक व आस्तिकता यांविषयी गेल्या तीन महिन्यात ‘आजचा सुधारक’मध्ये वेगवेगळी मते मांडण्यात आली. ह्याच चर्चेचा धागा पकडून काही माहिती देत आहे. अत्याधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या व सर्व प्रकारचे ऐहिक सुख भोगत असलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांना ईश्वर व अमरत्व (life after death) यांविषयी काय वाटते याबद्दलची एक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ३ एप्रिल १९९७ च्या ‘नेचर’च्या अंकात याविषयीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे एड्वर्ड लार्सन व लॅरी विथम यांनी १९९६ मध्ये यथातथाच निवडलेल्या १००० वैज्ञानिकांची चाचणी घेण्यात आली. अशीच वैज्ञानिकांची चाचणी यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व संशोधक जेम्स ल्यूबा यांनी घेतली होती.
वैज्ञानिक रीत
डॉ. हेमंत आडारकर यांच्या पत्राच्या (आ. सु., ८:२, ५९-६१) संदर्भात थोडे विवेचन.
आपल्या पत्रातील पहिल्याच परिच्छेदात डॉ. आडारकरांनी आम्ही आमच्या लेखात (आ. सु., ८:१, २४-२५) वर्णन केलेल्या भस्मधारी तथाकथित वैज्ञानकांच्या वर्णनाची पुष्टीच केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
विज्ञान हे गृहीतकांपासूनच सुरू होते हे खरेच. सर्वप्रथम कोणा एका वैज्ञानिकाच्या (अथवा सामान्यजनांच्याही!) तल्लख डोक्यात एखाद्या भन्नाट कल्पनेचा (idea) उगम होतो. त्यानंतर, ती व्यक्ती वैज्ञानिक असली तर, अशी कल्पना उपलब्ध ज्ञानावर तपासली जाते व ती अगदीच निराधार (म्हणजे पाण्यापासून पेट्रोल सारखी) नसेल तर ती कल्पना तपासून पाहण्यासाठी (test करण्यासाठी) प्रयोगांची आणखी केली जाते व त्यानुसार प्रयोग वारंवार (हे महत्त्वाचे) केले जातात.
‘सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी’
उडत्या तबकड्यांमधून परग्रहांवरले जीव पृथ्वीवर येतात. इथल्या जीवजातींचे नमुने गोळा करून अभ्यासासाठी न्यायच्या हेतूने ही मोहीम असते. कुत्रे, झाडे वगैरेंना पकडून नेण्यात येते, तसेच माणसांनाही. पण त्या ‘परक्यांना इथल्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नसते, म्हणून सर्व ‘नमुन्यांच्या तपासण्या झाल्यावर त्यांना परत स्वगृही पोचवले जाते. मांजरे, गुलाबाची रोपे वगैरेंना या प्रकारांचे स्मरण राहत नाही, व ते जीव आपल्या भाईबंदांना सावध करू शकत नाहीत. माणसांना मात्र स्मरण राहते व ती इतर माणसांना सजग करण्यासाठी अशा अनुभवांची वर्णन करतात. कधीकधी या घटनांचे स्मरण सहजपणे मनाच्या पृष्ठभागावर येत नाही.
परंपरा, आधुनिकता व राष्ट्रवाद (पूर्वार्ध)
आधुनिकतेचा विचार राष्ट्रवादाच्या संदर्भात केला नाही तर तो अपुरा आणि अधांतरी राहतो असे मला वाटते. म्हणून त्या दोहोंचा संबंध तपासण्याचा हेतू मनात धरून हा लेख लिहीत आहे.
मानवतेवर आधारलेला नीतिविचार आणि बुद्धिवाद ही दोन ‘‘आधुनिक’ म्हटली जाणारी मूल्य आहेत. प्र. ब. कुळकर्णीच्या शब्दांत (आ. सु. मार्च १९९७) “विवेकनिष्ठ मानवता हेआधुनिकतेचे बीज आहे.” “मानवता”म्हटले की राष्ट्रवाद बाद होतो. राष्ट्रवाद बाद होणे मला रुचणारे नाही. तेव्हा प्रथम राष्ट्रवादाची गरज मला का वाटते आणि त्याचे स्वरूप काय हे अत्यंत सक्षेपाने सांगून नंतर राष्ट्रवादाचा नीतिविचाराशी व बुद्धिवादाशी कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो याचा शोध मी घेणार आहे.
श्री रिसबूड यांना उत्तर
याच अंकात पत्रव्यवहार या सदरात श्री माधव रिसबूड यांचे मला आलेले पत्र छापले आहे. या पत्राचा सूर उघड उघड अनादराचा, अधिक्षेपाचाही आहे. माझी विचारसरणी साचेबंद आहे असा त्यांचा आरोप आहे. ते मला हटवादीही म्हणतात. त्यांच्या सप्टेंबर ९३ च्या पत्राला दिलेल्या उत्तरात मी जाणीव कल्पनेची थट्टा केली आहे, समर्पक उत्तर दिले नाही अशी त्यांची तक्रार आहे. असे जर आहे तर त्यांनी त्याच विषयावरील विचार पुन्हा माझ्यापुढे का मांडावेत? माझ्या साचेबंद हटवादी भूमिकेतून त्यांना हवे ते उत्तर मिळाल्याची आशा नसल्यामुळे या पत्राचे प्रयोजन काय असा प्रश्न मला पडला आहे.
प्लेटोचे आदर्श राज्य
प्लेटोच्या Republicच्या राज्यशास्त्रीय मतांची भल्या लोकांनी प्रशंसा करावी हे वाङ्मयीन भद्रमानी वृत्तीचे (snobbery) चे अत्यंत आश्चर्यकारक उदाहरण आहे. या एकतंत्री हुकूमशाही प्रबंधाविषयीच्या काही गोष्टी पाहा. शिक्षणाचे मुख्य प्रयोजन युद्धात धैर्य निर्माण करणे हे असून अन्य सर्व गोष्टी त्याला साधनीभूत मानल्या पाहिजेत. याकरिता माता आणि आया यांच्याकडून बालकांना सांगितल्या जाणार्यास गोष्टींची कडक तपासणी केली पाहिजे. होमरचे वाचन बंद केले पाहिजे, कारण तो भ्रष्ट लेखक वीरांना रडवतो आणि देवांना हसवतो. नाटकाला मनाई केली पाहिजे, कारण त्यात खलपुरुष आणि स्त्रिया असतात. संगीत काही विशिष्ट प्रकारचेच असले पाहिजे, म्हणजे आजच्या परिभाषेत Rule Britannia सारखे.
पत्रव्यवहार
श्री. दि. य. देशपांडे यांना स. न.
मे ९७ च्या आ. सु. मधील आपल्या लेखावरील माझे विचार कळवितो.
आपण असे म्हटले आहे की श्री आडारकर यांनी त्यांना काय अनुभव आले ते सांगितलेले नाही; ते नेमके काय होते हे कळेपर्यंत त्यांचे महत्त्व निश्चित करणे अशक्य आहे. पण मला असे वाटते की जरी ते अनुभव त्यांनी लिहिले असते तरी आपण बहुधा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असते, कारण आपली जी एक साचेबंद विचारसरणी आहे तिला ते गैरसोयीचे वाटले असते. मी हे म्हणतो त्याला कारण आहे.
मी नास्तिक का आहे
या प्रश्नाचे उत्तर ‘मी आस्तिक नाही म्हणून’ या चार शब्दांत देणे शक्य आहे हा विचार बाजूला सारला तरी मी जन्मतःच नास्तिक नव्हतो. कोणतीही व्यक्ती तिला थोडेफार कळायला लागल्यावर तिच्या अवतीभवतीच्या वातावरणानुसार, उदा. घरातील संस्कार, शाळेतील शिक्षण, ती व्यक्ती वावरत असलेल्या समाजाचा सर्वसाधारण विचार, इत्यादि कारणांमुळे आस्तिक किंवा नास्तिक बनत असते. संपादकांनी सुचविलेला विषय फक्त ईश्वराचे अस्तित्व किंवा नास्तित्व या संबंधात आहे असे मी समजतो. लहानपणी घरी दारी देव, देव. शाळेतील पाठ्यपुस्तकातही देव,देव.
(१) पाहूं जातां एक देव, तेणें निर्मीयले सर्व
पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे, सर्व त्याचींच लेकुरें।
अन्नपाणी तोचि देतो, प्रेमें सर्वा सांभाळीतो
चित्तीं धरी जो हे बोल, त्याचे कल्याण होईल।।
(२) कारे नाठवीसी कृपाळू देवासी
पोषितो जगासी एकलाची
(३) देवाजीने करुणा केली.
मी आस्तिक का आहे?
मी आस्तिक आहे का नास्तिक आहे, याबद्दल निश्चितपणे काही सांगायला मी कचरतो. माझी हिंमत होत नाही. तरीपण, पुढील कारणांस्तव मी मला स्वतःला ‘आस्तिक’ म्हणणेच योग्य ठरेल.
‘मी आहे’ म्हणजे, माझा देह आहे व ह्या देहात ‘देह नसलेली’ एक शक्ती आहे, म्हणजेच देहात आत्मा आहे.
देह ही जड वस्तू आहे. आत्म्याशिवाय देह ही जड वस्तू नाश पावते. Matter is indestructible हा नियम मान्य करूनच ‘नाश’ हा शब्द मी वापरला आहे.
आत्मा ही चेतक शक्ती आहे. पण ती शक्ती स्वतंत्रपणे दिसत नाही. भासत नाही.
लोकेश शेवडे यांच्या पत्राला उत्तर
आजच्या सुधारकातील हुसेन साहेबांच्या चित्राविषयीच्या लेखासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करणारे लोकेश शेवडे यांचे पत्र एप्रिल १९९७ च्या अंकात प्रसिद्ध झालेले आहे. पत्रातील आमच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे लेखनशैली. स्वभावाने आम्ही उद्दाम किंवा बेरड नसून खिलाडी वृत्तीने टीकाकाराचेही महत्त्व मान्य करण्याची आमची वृत्ती आहे. प्रा. के. रा. जोशी यांनीआमच्या विचारांसंबंधी वेळोवेळी उपहास केला आहे. त्यांचा तो अधिकारही मान्य आहे. आमची मते अंतिम सत्य आहेत असा आमचा आग्रह नाही. के. रा. जोशी म्हणतात त्याप्रमाणे भड़क भाषाशैली, बेदरकार विवेचन यासाठी वापरले जाते की परंपरावादी थोडे हलतील.