Category Archives: विज्ञान

‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’

आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्‍न केला आहे. पण केवळ कल्पनेशिवाय अन्य कोणतेही साधन जवळ नसल्यामुळे त्यांच्या हाती कांही लागले नाही. एक प्रकारची गोंधळाची स्थिती सर्व वैचारिक जगतात होती.
परंतु 1859 साली चार्ल्स डार्विनचा ” दि ओरिजिन ऑफ स्पीसीज” हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि सर्वच स्थिती पालटून गेली. नैसर्गिक निवडीच्या आधाराने सर्व सजीवांची उत्क्रांती झाली आहे असा सिद्धान्त डार्विनने मांडला. या सिद्धांताचा पुढे अनेक शास्त्रज्ञांनी सखोल व सप्रयोग अभ्यास करून विस्तार केला. अनेक ग्रंथ जगाच्या सर्वच भाषांतून ह्या विषयावर प्रसिद्ध झाले. मराठीतही बरीच पुस्तके ह्या बाबतीत उपलब्ध आहेत. त्यांतच अलीकडे एका सुंदर पुस्तकाची भर पडली आहे.”गोफ जन्मांतरीचे (अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे).” हेच ते पुस्तक. लेखिका आहेत कराडच्या डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर. विषयाचा सखोल अभ्यास करून, अनेक ग्रंथांचे परिशीलन करून व त्यांना आपल्या तर्कशुद्ध चिंतनाची जोड देऊन डॉ. ब्रह्मनाळकरांनी एक देखणे पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे.
अगदी प्रस्तावनेपासूनच पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेते. पारंपरिक दृष्टिकोन सोडून जगाकडे पाहण्याचा एक वेगळा परंतु सत्यनिष्ठ दृष्टिकोनही असू शकतो हे प्रस्तावनेमधून वाचकाच्या मनावर ठसायला सुरवात होते.
पुस्तकाच्या सुरवातील डार्विनविषयी वैयक्तिक माहिती, त्याचा जगप्रवास, त्याने केलेला सजीवांचा अभ्यास व मांडलेला सिद्धांत, डार्विनचे समकालीन तसेच त्याच्यानंतर झालेले शास्त्रज्ञ, त्यांनी मांडलेल्या उपपत्ती आणि सिद्धांताचा केलेला विस्तार इत्यादि सर्व गोष्टींचे थोडक्यात पण सर्वस्पर्शी विवेचन लेखिकेने केले आहे. त्याच बरोबर एकाच आदिपूर्वजापासून ते थेट आजच्या मानवापर्यंत सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली, जीवसृष्टीच्या वंशवृक्षाला वेगवेगळ्या फांद्या कशा फुटत गेल्या, नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून टिकून राहिलेल्या सजीवांच्या निरनिरळ्या जाती, प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे सुंदर , सचित्र वर्णन लेखिका करतात.
सूक्ष्मदर्शकासारख्या आधुनिक उपकरणांच्या अभावी डार्विनच्या काळात अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची नंतरच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली उत्तरे नेटक्या पद्धतीने लेखिकेने मांडली आहेत. आर्.एन्.ए., डी.एन्.ए., गुणसूत्रे (क्रोमोसोम्स), जनुके(जीन्स), जिनोम आदि पारिभाषिक संज्ञांचे अर्थ उत्कृष्टपणे समजावून सांगितले आहेत. क्रीक-वॅटसन ह्या शास्त्रज्ञांच्या शोधांमध्ये आनुवंशिकतेच्या कणांच्या रेण्वीय रचनेचा अंतर्भाव आहे. तर नीरेन्बर्ग-खुराणांना पेशींमध्ये असलेल्या गुणसूत्रांमधील माहितीचा माग लागला. ह्या गुणसूत्रांमध्येच सजीवाचा संपूर्ण इतिहास दडलेला असतो असे आढळून आले. ह्या इतिहासावर म्हणजेच “जिनोम” वर पुस्तकाचे रूपक कल्पून लेखिकेने ते आपल्या ग्रंथात सर्वदूर खेळविले आहे. त्यामुळे विषय समजणे वाचकांसाठी फारच सोपे झाले आहे. आपल्या नेहमीच्या पुस्तकात ज्याप्रमाणे प्रकरणे, परिच्छेद, वाक्यें, शब्द, अक्षरे असतात तशीच याही पुस्तकात आहेत. फक्त त्यांची भाषा सांकेतिक असते. ही जनुकांची भाषा आहे. अनेक शास्त्रज्ञांनी मोठ्या परिश्रमांनी ह्या संकेतांची उकल करण्यात यश मिळविले. ही उकल होऊन पुस्तकाचे “वाचन ” होताच अलीबाबाच्या गुहेचे दार उघडल्यासारखे झाले. सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा संपूर्ण इतिहास दृष्टिक्षेपात आला. पृथ्वीवरील अणुरेणु आणि त्यांची जोडणी करणारे भौतिक नियम हेच या पुस्तकाचे “लेखक” आहेत. व त्यांतील आज्ञावलींना अनुसरूनच सर्व सृष्टीचे व्यवहार चालतात. अन्य कुणाकडेही सृष्टीचे कर्तृत्व आणि चालकत्व जात नाही. असे डॉ.ब्रह्मनाळकर निक्षून सांगतात. पटवूनही देतात. ह्याच नियमांनुसार डी.एन्. ए. व प्रथिने यांचे रूपांतर सजीवांच्या शरीरात होते असे त्या वैज्ञानिक प्रयोगांचे संदर्भ देऊन सांगतात.
उत्क्रांतीच्या इतिहासाचे फारच मनोज्ञ वर्णन लेखिकेने केले आहे.”ल्यूका” (लास्ट युनिव्हर्सल कॉमन अ‍ॅन्सेस्टर) ते माणूस हा प्रवास कसा झाला हे त्यांनी सुबोध पद्धतीने स्पष्ट करून दाखविले आहे. नैसर्गिक निवडीचे तत्त्व सर्व सजीवांना लागू असून त्याला अनुसरूनच सजीवसृष्टी उत्क्रान्त झाली. ह्या ’चाळणी’तून निवडले गेलेले सजीवच टिकून राहातात. जे निवडले जात नाहीत त्यांच्या जाती-प्रजाती नष्ट होतात याविषयीं असंख्य दाखले लेखिकेने दिले आहेत. प्रत्येक प्रजाती जीवनकलहात टिकून राहण्यासाठी धडपडत असते. ही धडपड, हा संघर्षच उत्क्रांतीचा गाभा आहे. हे अधिक स्पष्ट करून दाखविण्यासाठी लेखिकेने जणू आपले बोट धरून उण्या-पुर्‍या साडेतीन अब्ज वर्षांचा प्रवास घडवला आहे. सामान्यत: आपण “स्थळां”चा प्रवास करतो. लेखिका आपल्याला “काळा” तून घेऊन चालतात. एच्. जी. वेल्स ह्यांनी संकल्पिलेल्या “कालयंत्रा (टाईम मशीन) मधून जात असल्याचा भास होतो. “वाटे”मध्ये विविध जाती-प्रजाती कशा उद्भवल्या व उत्क्रांत झाल्या ह्याचे त्यांनी काही प्रातिनिधिक उदाहरणे देऊन मनोहारी दर्शन घडविले आहे. चाळणीत अडकून पडल्यामुळे पुढे सरकू न शकलेल्या दुर्दैवी प्रजातींचे त्यांनी कारणे दाखवून उल्लेख केले आहेत. एकंदरीत हा प्रवास करीत असताना एखादा अद्भुतरम्य चित्रपट पाहात असल्यासारखे वाटते.
उत्क्रांती एकाएकी एका रात्रीतून घडत नसते. ती एक अतिशय संथपणे घडत जाणारी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपण एका उडीत पर्वताचे शिखर गाठू शकत नाही; परंतु तेच एकएक पाऊल पुढे टाकीत, हळूहळू ,चढत गेलो तर शिखरापर्यंत पोचू शकतो हे चपखल उदाहरण देऊन उत्क्रांती ही साठत-साठत जाणारी गोष्ट आहे हे लेखिका सहज पटवून देतात. “ह्या सर्व गोष्टी हळू हळू एक एक पायरीने होत होत हजारो पिढ्यांमध्ये घडल्या” असे सांगतात. “पण घाई कोणाला आहे?” असे काहीसे मिष्कील पण वास्तव असे प्रश्नरूप विधान सुलभाताई करतात. आणि लगेच, “न संपणारा काळाचा पट्टा हे उत्क्रांतीचे बलस्थान आहे.” असे सुभाषितवजा वाक्यही टाकतात.
संपूर्णपणे निसर्गाच्या आज्ञेप्रमाणे होत असलेली उत्क्रांती ही एक हेतुशून्य प्रक्रिया आहे. तिला कोणताही उद्देश नाही, ठरलेले असे गंतव्य नाही. निसर्गावर कोणत्याही भाव भावनांचे आरोप करता येत नाहीत. तो नुसता असतो. तो सुष्ट नाही की दुष्ट नाही, सुरूप नाही वा कुरूप नाही, कनवाळू नाही किंवा क्रूर नाही, त्याला कोणीही कर्ता, चालक वा नियंता नाही हे लेखिका आवर्जून सांगतात.
“मानवी जगा”विषयी चर्चा करण्यासाठी लेखिकेने एक स्वतंत्र विभाग ग्रंथाला जोडला आहे. मानवाचे या सृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान मान्य करूनच त्या ही चर्चा करतात. अर्थात ती करतानाही त्यांनी विज्ञानाचा पदर सोडलेला नाही. उत्क्रांतीच्या मूळ तत्त्वांशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. विज्ञानाच्या मध्यवर्ती धाग्याभोवतीच तर त्यांनी हा संपूर्ण गोफ गुंफला आहे. ह्या अथांग कालप्रवाहात उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या काडीचा आधार घेत वाहात आलेल्या या द्विपादाचे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे त्याचे भावविश्व.
माणसाचे मन हे परस्पर भिन्न (आणि कित्येकदा तर परस्परविरुद्धही) अशा अनेक भावभावनांची गुंफण आहे. राग, लोभ, दया, करुणा, वात्सल्य, हेवा, मत्सर, सहानुभूती, प्रेम, सहिष्णुता, कृतज्ञता, कृतघ्‍नता, क्रौर्य, आदि किती तरी विकारांनी मानवी मनाचा आश्रय घेतलेला असतो. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला कधीतरी अशा विकारांचा फायदा झाला असावा. आणि म्हणूनच त्या त्या भावना निर्माण करणार्‍या जोडण्या मेंदूत होऊन त्यांच्यात स्रवणारी रसायने उत्क्रांत झाली असावीत. ह्या भावनांना चांगले , वाईट अशी विशेषणे आपण लावतो. निसर्गात त्या फक्त “वृत्ती” असतात. काहींना सद्गुण तर काहीना दुर्गुण ठरविले जाते ते आपल्या त्याविषयींच्या प्रतिक्रियांवरून. ह्या प्रतिक्रियांमधून माणसाचे विचारविश्व विस्तारले. ह्या विस्ताराचेच नाव “संस्कृती”.
माणूस हा “माणूस” म्हणून उत्क्रांत होण्यापूर्वी “स्वार्थ” हाच सर्व सजीव सृष्टीचा पाया होता. (मानवेतर सृष्टीत तो अजूनही तसाच आहे.) परंतु कुठल्यातरी टप्प्यावर स्वार्थाबरोबरच परार्थसुद्धा प्रजाती टिकून राहाण्यासाठी फायद्याचा ठरतो हे उमगले. आणि परार्थ माणसाच्या जीवनात स्थिर झाला. अर्थात स्वार्थ पूर्णपणे सुटला नाही. एका परीने परार्थातही स्वार्थाचा भाग असतोच. ह्यामुळे एक पेच उभा राहिला. माणसाला “दुहेरी अस्तिवाला ” सामोरे जावे लागले. एक स्वत:साठी आणि एक समाजासाठी. एकीकडे तो “स्वतंत्र जीव” आहे. तर दुसरीकडे “समाजाचा घटक” आहे. त्यात त्याच्या भावविश्वाची ओढाताण होते आहे. स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या हिताची चिंता वाहात असतानाच तो समाजाच्या कल्याणाचीही सोय पाहात असतो. समाजासाठी रामराज्य आणण्याचे, महामानव बनण्याचे स्वप्न तो पाहातो आहे. ते पूर्ण होण्यासाठी संस्कृतीच्या प्रवासात विकसित झालेली जीवनमूल्ये टिकून राहणे आवश्यक आहे. कारण ती दिशादर्शकाचे दीपस्तंभ म्हणून कार्य करतात, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे आणि त्यासाठी त्या “नेचर ” आणि “नर्चर” अशा दोन्हीची आवश्यकता अधोरेखित करतात.
माणसाला हे शक्य आहे. कारण त्याला निसर्गविज्ञानाचा आधार आहे. ह्या आधाराचे मूळ मेंदूत आहे. सजीवाच्या मेंदूवर जनुकांच्या आज्ञावलींचे नियंत्रण असते. परंतु मानवी मेंदू इतर सजीवांप्रमाणे केवळ प्राथमिक अवस्थेत रेंगाळला नाही. त्याच्यात लवचिकता आहे.त्यामुळे तो विकसनशील बनला आहे. त्याच्या ठिकाणी संस्कारक्षमता आली आहे. तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. परंतु मेंदूच्या या स्वातंत्र्याचा उपयोग एका मर्यादेतच केला जातो. कारण माणूस हा समाजाचा घटक असतो. ’स्व’ तंत्राने वागण्यापेक्षा ’समाज’ तंत्राने वागणे त्याला सोयीचे व सुरक्षिततेचे वाटत असते. कधीकाळी उत्क्रांतीच्या प्रवासात फायद्याची ठरलेली “टोळीची मानसिकता ” माणसाच्या मेंदूत पक्की रुजली आहे. त्यामुळे लहानपणी मनावर झालेले संस्कार, त्यांतून रूढ झालेल्या समजुती, श्रद्धा, अंधश्रद्धा दृढ होत जातात. घट्टपणे धरून ठेवलेल्या ह्या खुंट्या सोडणे कठीण होऊन बसते. परंतु माणसाच्या स्वातंत्र्याला पडणार्‍या या सांस्कृतिक मर्यादा ओलांडण्याची क्षमताही ह्या मेंदूत आहे. तिचे नाव “विवेक प्रज्ञा “(रीझन).
गेल्या कांही लाख वर्षांत विकसनशील मेंदूत कांही गुंतागुंतीची चक्रे उत्क्रांत झाली आहेत. त्यांतूनच या विवेकप्रज्ञेची प्राप्ती झाली आहे. ही प्रज्ञा मानवाला ’योग्य-अयोग्या’ चा विचार करण्यासाठी मार्दर्शन करते. ज्ञानाचा निकष लावून त्याप्रमाणे कृती करण्याचा आदेश देते. चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा, जुन्या रूढी यांच्यावर मात करण्याचे बळ देते. थोडक्यात ही विवेकप्रज्ञासुद्धा नैसर्गिकपणे उत्क्रांत झाली असून पूर्णपणे विज्ञानसिद्ध आहे. हे सुलभाताई मोठ्या खुबीने वाचकांना समजावून देतात. “एखाद्या तत्त्वाची, व्यक्तिविरहित चिकित्सा करण्याची क्षमता ही मानवी बुद्धीची फार मोठी झेप आहे.” हे ह्या प्रज्ञेच्या संदर्भात केलेले विधान लेखिकेच्या प्रतिभेचीही झेप दर्शविते.
ग्रंथामध्ये लेखिकेने आपल्या विषयाची अगदी सांगोपांग विस्तृत चर्चा केली आहे. ती करण्याच्या ओघात त्यांनी निसर्गाचे महत्त्व विशद केले आहे. ह्या सृष्टीचा कोणी कर्ता-करविता नाही,कोणी चालक वा नियंता नाही सर्व व्यापार विज्ञानाच्या नियमांनुसार होतात. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे सर्वशक्तिमत्व, तसेच व्रत-वैकल्ये , सक्षात्कार, गूढात बोट दाखवून केलेले भविष्यकथन, अंतर्ज्ञान, चमत्कार आदि समजुती निरर्थक असून त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही हे त्या सहजपणे पण निश्चितपणे नमूद करतात. मुख्य म्हणजे त्यात कुठलाही अभिनिवेश नाही. त्यांनी केलेल्या व्यासंगपूर्ण विवेचनाचा तो अगदी सहज, स्वाभाविक निष्कर्ष आहे.
पुस्तकाची भाषा सुबोध आणि रसाळ तर आहेच, शिवाय त्यात लालित्य आहे. लाघव आहे. विज्ञानासारखा काहीसा गद्य विषय सुलभाताईंनी अतिशय प्रसन्न आणि खेळकर पद्धतीने हाताळला आहे. (हे दोन गुण बहुधा लेखिकेच्या व्यक्तिमत्वातच असावेत.) लेखनशैली इतकी वेधक आणि बोलकी आहे की जणु काही लेखिका आपल्या समोर बसून विषय समजावून सांगत आहेत असा सारखा भास होतो. उद्बोधन, प्रबोधन आणि रंजन अशा तीनही गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत. सहज लक्ष वेधून घेईल असे सुंदर मुखपृष्ठ आणि सुबक छपाई ह्या आणखी दोन जमेच्या बाजू.
थोडक्यात हे एक अप्रतिम पुस्तक असून विज्ञानाची आवड असलेल्या (आणि नसलेल्यासुद्धा) सुशिक्षित वाचकांनी आवर्जून वाचावे अशी शिफारस करणे अनाठायी होणार नाही. अल्पावधीत पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या हे त्याच्या यशस्वितेचे गमक ठरावे. वाचकप्रियतेचेही.
गोफ जन्मांतरीचे
डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर,
राजहंस प्रकाशन, पुणे.
पृ.सं. 346, किं रु 300

bhalchandra.kalikar@gmail.com

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले. हल्ली तर टेलीफोन, फैक्स, ई-मेल, सॅटेलाईट टी. व्ही. आणि रेडिओ यांमुळे विचारांचा व ज्ञानाचा प्रसार फार वेगाने व दूरगामी होतो. छपाईच्या तंत्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे कोणतेही वृत्तपत्र जगातील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापले जाऊ शकते. बावरी मशीद पाडली जात असताना त्या प्रसंगाचे धावते वर्णन आपण बी.बी.सी. रेडिओवर ऐकलेच ना!
सुमारे १५-२० वर्षांपूर्वी (म्हणजे संजय गांधी राजकारण/समाजकारणात पडण्यापूर्वी) पर्यावरण, निसर्ग-संतुलन, पर्यावरणपोपक (environmentally friendly) हे शब्द व कल्पना भारतात कोणास ठाऊक होत्या? पण पाश्चात्त्य देशांत या विचारांना चालना मिळाल्याबरोबर आम्ही भारतीय या मिरवणुकीत’ (bandwagon) सामील झालीच ना? आज शाळकरी मुलेसुद्धा वृक्ष आणि वन्यजीव संरक्षणावर बाता मारतातच! ‘नर्मदा बचाओ’ या आंदोलनाचा खूप गाजावाजा होत आहे, पण त्यात नवीन काय आहे? टेनेसी व्हॅली ऑथॉरेटीद्वारे बांधण्यात येणार्‍या धरणाविरुद्ध प्रचंड चळवळ झाली! त्या विषयावर Dunbar Cove’ नावाचे पुस्तक ४० वर्षांपूर्वी वाचलेले स्मरते!
टाटांच्या धरणाविरुद्ध सेनापती बापटांनी नव्हता का संघर्ष केला. आज मेधा पाटकर तरी काय वेगळे करीत आहेत? अगदी जवळचे लहानसे उदाहरण द्यायचे तर वर्धा जिल्ह्यातील बोर धरणाविरुद्ध झालेले आंदोलन आठवावे!
“निसर्ग आणि मानव” यावर हल्ली चर्चा करण्याची टूमच आहे असे दिसते. आजचा सुधारकही त्यात मागे नाही. सुधारकाच्या परिसंवादात मोठमोठ्या मठाधिपतींनी आहुती टाकल्या आहेत! भारतीय जनमानसांत निसर्गाविषयी कुतूहल व आदर, तसे पाहता वेदकालापासूनच व्यक्त झालेला आढळतो. वेदांतील आराध्य-देवता सर्वस्वी निसर्गशक्तीच आहेत ना? ऋषिमुनींच्या काळापासून तुकाराम, बहिणाबाई पर्यंतच्या कवींनी निसर्ग व मानव यांची एकरूपता रसाळपणे वर्णन केली आहे. परंतु याचबरोबर अगस्ती, परशुराम वगैरे मुनींनी निसर्गास जेरीस आणल्याच्या कथाही आपण पुराणात वाचतो. मूसा, ईसा या प्रेपितांनीही निसर्गाला वाकविल्याचे त्यांचे अनुयायी मानतात.
मानव हा निसर्गाचाच एक घटक आहे याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. चेतन/अचेतन, सजीव/निर्जीव अशा सर्वच घटकांचे व्यवहार विश्वातील काही मोजक्याच भौतिक तत्त्वांनुसार घडत असतात. ऊर्जेची अक्षयता, ऊर्जा व पदार्थ (mass) यातील आंतरपरिवर्तन, पदार्थाच्या पिंडातील (bodies) व कणातील आकर्षण (गुरुत्वाकर्षणासह) हीच ती भौतिक तत्त्वे होत. ज्याप्रमाणे निर्जीव मानल्या जाणार्‍या पदार्थांमधील घटना (उदा. लोखंडाचे गंजणे, प्रस्तरापासून माती तयार होणे), तसेच सजीव सृष्टीमधील प्रत्येक घटना याच भौतिक तत्त्वानुसार घडते, मग ती मानवाची पूर्वसंचित बुद्धी असो वा अनुभवाने मिळणारे ज्ञान असो. एखाद्या व्यक्तीचे सुंदर मुखकमल असो वा त्या व्यक्तीच्या उच्छ्वासाकडे त्यातील कर्बाम्ल वायू आणि मिथेनमुळे आकृष्ट होणारा डास असो, या सगळ्या गोष्टी अंततः मूलभूत भौतिक तत्त्वावरच अवलंबून असतात.
निसर्गामध्ये Adjustment, Accommodation, Adaptation आणि Aggression या चार मार्गाचा अवलंब सारेच जीव सतत करीत असतात. जीवसृष्टीतील परस्पर व्यवहाराची (interactions) ही चतुःसूत्रीच आहे.
चार्लस डार्विनने सुचविल्यानुसार जीवसृष्टीची उत्क्रांती या चार मुख्य सूत्रानुसारच झाली. विश्वातील (?), किमानपक्षी पृथ्वीवरील जीवांचा प्रारंभ “अपघाताने घडलेल्या काही रासायनिक क्रियांमुळे झाला असे मुळी आसिमॉव्हनेच म्हटले आहे” असे विधान पूर्वी सुधारकाच्या परिसंवादात आले आहे. जणू काही आसिमॉव्ह हा कोणी फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला! अहो, आसिमॉव्ह हा रसायनशास्त्राचा सामान्य प्राध्यापक होता. त्याला अमाप प्रसिद्धी व पैसा मिळाला तो त्याने लिहिलेल्या विज्ञानकथांमुळे. कोणतेही मौलिक संशोधन त्याच्या नावाने प्रसिद्ध नाही. त्याचा संदर्भ देणे हास्यास्पद आहे!
वस्तुतः पृथ्वीच्या आवरणात योग्य तापमान, मूलद्रव्यांची उपलब्धता आणि ऊर्जेचे मोठे स्रोत मिळाल्याने, केवळ अपघात म्हणून नव्हे तर विविध मूलद्रव्यामधील असंख्य पारस्परिक प्रक्रियांमुळे(varied interactions) काही मोठे महारेणू (macromolecules) उत्पन्न झाले. त्यांना त्यांच्या रासायनिक घटनेनुसार डीएनए, आरएनए आणि न्युक्लेइक अॅसिड्स अशी नावे आता देण्यात आली आहेत. इतरही असंख्य रेणू उत्पन्न झाले असणार, परंतु उपर्युक्त तीन महारेणूंना काही महत्त्वाचे गुणधर्म प्राप्त झाले. त्यांपैकी डीएनए हे अतिशय चिवट असे द्रव्य असून योग्य कच्चा माल मिळाल्यास हे महारेणु स्वनिर्मिती करू शकतात. तसेच या महारेणूंमध्ये विशिष्ट रचनेचे आरएनए रेणू उत्पन्न करण्याची क्षमता असते. आरएनए रेणु हे एकीकडे डीएनए ची प्रतिकृती असतात, तर दुसरीकडे विशिष्ट अमायनो अॅसिडसूशी त्यांचे इमानदारीचे नाते असते. या परस्पर संबंधामुळे हे तीन प्रकारचे महारेणू जीवांना जन्म देऊ शकले. अशा रीतीने उत्पन्न झालेले अतिशय साधे व सुटसुटीत जीव यथाक्रम वर लिहिलेल्या चार A द्वारे विकास पावले व जीवसृष्टीमध्ये विविधता येत गेली. यात कोणत्याही अवस्थेत अपघात वगैरे काही नसून असंख्य प्रक्रियानंतर प्रयोग-प्रमाद (Trial and Error) या पद्धतीने हजारो वर्षांच्या कालखंडात पृथ्वीवर जीव उत्पन्न झाले.
अशा या adjustable निसर्गामध्ये मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःचे जीवन अधिकाधिक उपभोगक्षम व आनंददायक करतो हे साहजिकच आहे. मधमाश्या नाही का मधुसंचय करीत? दुर्लक्षित सरकारी बागांमध्ये गाजरगवत नाही का फुलझाडांवर मात करीत? भरपूर ऊर्जा, तहानलेल्या शेतीसाठी पाणी व भरपूर अन्नधान्ये उत्पन्न करण्यासाठी नर्मदेसारख्या नद्यांतून वाया जाणारे पाणी आवश्यक झाल्यास काही लोकांचे जीवन बदलूनही, धरणाद्वारे अडविणे हेसुद्धा निसर्गातील चार A च्या चतुःसूत्रीनुसारच घडणार! हा तर निसर्गाचा मूलभूत नियमच आहे. निसर्गातील सर्वत्र आढळणार्‍या या चतुःसूत्रीचे प्रयोजन काय असा प्रश्न तत्त्वचिंतक करतील, त्यावर साधे उत्तर असे की प्रत्येक जीवाला जगण्याची व प्रजोत्पादन करण्याची प्रचंड इच्छा आणि ईर्षा असते. ही इच्छा का असते याबद्दल अध्यात्मवादी लोक काहीही सांगत असले तरी या प्रश्नाचे उत्तरही वैश्विक मूलभूत भौतिक तत्त्वावर कसे आधारलेले आहे हे सांगता येईल. पण त्यासाठी हे स्थळ नाही.
स्वतःचे जीवन अधिक सुसह्य, आनंदमय व प्रदीर्घ करण्यासाठीच मानव धडपडत असतो व त्यासाठी तो निसर्गातील सर्वच घटक अवलंबीत असलेली चतुःसूत्री वापरतो. आपल्या जीवनातील त्रुटी आणि दुःखे नाहीशी करण्याची, किमानपक्षी कमी करण्याची मानवाची अहर्निश धडपड चाललेली आहे. त्यात अधिक आणि चांगल्या अन्नाचे उत्पादन, शुद्ध जल व वायूचा पुरवठा, सुसह्य निवारा यांसारख्या मूलभूत गरजांच्या परिपूर्तीबरोबरच तो मानवी जीवन दुःखमय करणार्‍या शारीरिक व मानसिक व्याधी, गुन्हेगारी, व्यसने, दंभ आणि गर्व यांसारख्या प्रवृत्ती यांचा बीमोड करण्यासाठी प्रयत्न करतो. असंख्य शारीरिक व मानसिक व्याधींवर विजय मिळविण्यासाठी मानवाची सातत्याने धडपड चालू आहे. हिपोक्रेटिस व सुश्रुतापासून हे काम चाललेले असून आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलेल्या तंत्रविद्येचा अधिकाधिक वापर करून निसर्गतः उत्पन्न होणार्‍या सर्व प्रकारच्या विकारांवर नियंत्रण ठेवण्याची ही मानवी धडपड निसर्गातील चतुःसूत्रीचाच आविष्कार आहे.
मानवी शरीरस्वास्थ्याला निसर्गातील जंतू, विषाणू, कीटक, विषारी प्राणी व वनस्पती याचबरोबर मानवाने स्वतःच निर्माण केलेले विषारी वायू, पदार्थ, किरण या सर्वांचा उपद्रव होतो तो हे सर्व घटक aggressive असतात म्हणून. यावर4As चा वापर करून मानव नियंत्रण ठेवतो. त्यासाठी तो विविध औषधे, प्रतिजैविके (antibiotics), लसी (vaccines) आणि विषशामक रसायने तयार करून उपर्युक्त घातक घटकांवर स्वतःच aggression करतो! याखेरीज मानवी शरीर पोखरणारे शरीरातच स्वनिर्मित असे आनुवंशिक अथवा अर्जित विकारही आहेत. उदाहरणार्थ मधुमेह, कर्करोग, रक्तवाहक यंत्रणेतील दोष, मेंदूचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, शरीरावरणाचे (त्वचा, केस वगैरे) विकार, शारीरक्रियांमधील विविध प्रकारच्या त्रुटी (deficiencies). या सर्वांची जाण वैद्यकास पूर्वीपासून आहे व नव्याने अधिक चांगली होत आहे. यांपैकी अनेक विकारांवर औषधे निर्माण करण्याचे कार्य पूर्वीपासून होत असले तरी गेल्या २५-३० वर्षांत यांपैकी कित्येक व्याधींवर बाह्य औषधोपचाराखेरीज शरीरातच इष्ट बदल घडविण्यासाठी संशोधन होऊ लागले आहे. त्यासाठी शरीरातील पेशींमध्ये असलेल्या आनुवंशिक गुणसंचयाकडे (genome) वैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले आहे. मानवी शरीरपेशीमधील गुणसंचयाचे (genome) घटक असणार्‍या गुणसूत्रांची (chromosomes) संख्या व स्वरूप, आणि शरीरचनेस व शरीरक्रियेस कारणीभूत असलेल्या जीन्स (genes) याबद्दल बोध होऊ लागल्यापासूनच या दिशेने संशोधन सुरू झाले, व आता १९९४ पर्यंत या संशोधनात प्रचंड प्रगती झालेली आहे. हे सगळे ज्ञान मॉलिक्यूलर बायॉलॉजी या ढोबळ नावाने परिचित आहे.
मॉलिक्यूलर बायॉलॉजीमधील संशोधनाच्या दोन प्रमुख दिशा आहेत. (१) मानवी व अन्य प्राण्यांच्या जैविक रचनेचा संपूर्ण तपशील मिळविणे, आणि (२) गुणसूत्रे व त्यावरील जीन्स हाताळून त्यापासून शरीरात (अथवा शरीराच्या बाहेरही) इष्ट बदल घडवून आणणे. या दुसर्‍या प्रकारच्या संशोधनाला वैज्ञानिक परिभाषेत Recombinant DNA Technology असे संबोधतात, तर सामान्य भाषेत Genetic Engineering असे लोकप्रिय नाव मिळाले आहे. या तंत्रज्ञानाचा Biotechnology या आधुनिक तांत्रिकीमध्ये अंतर्भाव होतो. (Genctic Engineering ला आनुवंशिक अभियांत्रिकी म्हणण्याचा प्रघात पडला आहे, पण हे फारसे बरोबर नाही. त्यात engineering अथवा अभियांत्रिकी नाहीच. प्रयोगशाळेत काचपात्रे, विविध रसायने आणि उपकरणे वापरून गुणसूत्रातील DNA व । पेशीमधील RNA हाताळणे व त्यातून पेशीच्या रचनेत अथवा कार्यात इष्ट बदल घडवून आणणे यासच Recombinant Technology म्हणतात. Genetic Engineering मुळे काळ्याची गोरी माणसे बनविणे किंवा सर्वगुणसंपन्न प्रजा निर्माण करणे असे काहीतरी सामान्य जनांना अभिप्रेत असते, पण ते सर्वथा अतिरंजित व अवास्तव आहे.
आनुवंशिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आजपर्यंत प्रगती कोणत्या मुक्कामाला आहे हे पाहण्यापूर्वी या तंत्रज्ञानाचा पाया असलेला संशोधनाचा पहिला प्रवासमार्ग किती पुढे गेला आहे हे पाहणे उचित आहे. मानवाचा गुणसंचय (genome) हा २३ जोड्या असलेल्या ४६ गुणसूत्रांमध्ये साठविलेला असून या ४६ गुणसूत्रांवर सुमारे १००००० (एक लक्ष) विभिन्न जीन्स (genes) माळलेल्या असतात. यांतील कित्येक जीन्सच्या शेकडो अतिरिक्त प्रती (rcedundant copics) असतात. या अतिरिक्त प्रती गुणधर्म बदलण्यास, जीनिक उत्परिवर्तनामध्ये फार महत्त्वाचे कार्य करतात. पण तो थोडा वेगळ्या तपशिलाचा भाग आहे. या सुमारे एक लाख जीन्समुळे मानवी शरीराचे सर्व शारीरिक व मानसिक व्यवहार संचालित होतात. (ते कसे, हा उद्बोधक परंतु येथे अप्रस्तुत विषय आहे.) याचा अर्थ सर्व जीन्स एकाच वेळी कार्य करतात असा नसून जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये तसेच परिसरातील परिस्थितीनुसार जीन्स “चालू” किंवा “बंद असतात. याचप्रमाणे प्रत्येक जीन गुणसूत्रावर एकाच ठिकाणी सलग तुकड्याच्या स्वरूपात नसून कित्येक जीन्स वेगवेगळ्या गुणसूत्रावर वसलेल्या तुकड्यांच्या स्वरूपात असतात व अशा अनेक तुकड्यांचा परिणाम म्हणून शरीरात एखादा गुणधर्म प्रकट होतो उदाहरणार्थ मानवी डोळ्यांचा (म्हणजे वस्तुतः Iris चा ) रंग अथवा गाईच्या दुधाची मात्रा व दाटपणा इत्यादी गुणधर्म बहुजिनी (polygenic) आहेत.
मानवी शरीररचनेचे आणि शरीरक्रियांचे सम्यक ज्ञान हवे असल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या जीन्सबद्दल माहिती असणे हे आधुनिक जीवशास्त्रास आवश्यक ठरते. प्रत्येक जीन केवढी आहे, कोठे वसली (वसल्या) आहे आणि त्या जीनवरील संदेशाचा मंत्र (nucleotide Sequences) कसे आहेत हे जाणणे मूलभूत आहे. गेल्या १५-२० वर्षांत मानवी जीन्सबद्दल ही माहिती मिळविण्याचे फुटकळ प्रयत्न जगातील अनेक शास्त्रज्ञ करीत आहेत. परंतु या कार्यासाठी एक सर्वंकष, सर्वव्यापी, एकत्रित असा प्रकल्प १९९० सालापासून अमेरिकन शासनाने सुरू केला आहे. वॉशिंग्टन डी.सी. चे उपनगर बेथेस्डा येथील यू.एस्. नॅशनल इन्टिट्यूट ऑफ हेल्थ मध्ये या प्रकल्पाचे मुख्यालय आहे. “मानवी गुणसंचय प्रकल्प (Human Genome Project) चे प्रमुख डॉ. फ्रेंन्सिस कॉलिन्स हे असून १५ वर्षांच्या या प्रकल्पासाठी शासनाने ३०० कोटी डॉलर्सचे (सुमारे १०००० कोटी रुपये) अनुदान मंजूर केलेले आहे. इ.स. २००५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे असून त्यासाठी जगातील ९० ते १०० संशोधक शास्त्रज्ञांच्या गटांना या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेले आहे. (भारतातील एकही नाही). या प्रचंड प्रकल्पामुळे आतापर्यंत सुमारे ६५०० जीन्सची माहिती मिळाली असून त्यात दररोज कमीत कमी एका जीनची भर पडत आहे. या ६५०० पैकी, सुमारे ३० महत्त्वाच्या रोगांना कारणीभूत असणार्‍या जीन्सचा ठावठिकाणा कळला आहे. उदाहरणार्थः स्तनाचा कर्करोग (गुणसूत्र क्रमांक १७), आनुवंशिक बृहदांत्रकर्करोग (गुणसूत्र क्र. २), हंटिंग्टन रोग (गुणसूत्र क्र. ४), सिस्टिक फायब्रोसिस (गुणसूत्र क्र. ७), मॅलिग्नंट मेलानोमा (गुणसूत्र क्र. ९), नागपूर, भंडारा, चन्द्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील अनुसूचित जातींमध्ये व निग्रोंमध्ये आढळणारा सिकलसेल अॅनिमिया (गुणसूत्र क्र. ११). जन्मजात मानसिक दौर्बल्य अर्थात डाऊन्स सिन्ड्रोम (गुणसूत्र २१) आणि हिमोफिलीया (क्ष गुणसूत्र) या विकारांच्या जीन्सचे स्थळ पूर्वीच समजलेले होते.
अमेरिकेच्या या मानवी गुणसंचय प्रकल्पामुळे प्राप्त होणारे महत्त्वाचे ज्ञान GATT आंतरराष्ट्रीय करारातील डंकेल नियमानुसार पेटंट करण्यात येईल की काय अशी शंका आहे. परंतु पॅरिस येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ ह्यूमन पॉलिमॉर्फिझम मधील डॉ. डॅनियल कोहेन हेसुद्धा या क्षेत्रात झपाट्याने काम करीत असून आपण इ.स. २००३ पर्यंत संपूर्ण मानवी गुणसंचयाचे नकाशे तयार करू असा विश्वास डॉ. कोहेन यांना वाटतो.
आपण मिळविलेले हे अमूल्य ज्ञानभांडार, मानवजातीच्या हितासाठी युनायटेड नेशन्सना विनामूल्य अर्पण करण्याचा संकल्पही डॉ. कोहेन यांनी सोडला आहे!
मानवी गुणसंचयाचे बारकावे जसजसे ज्ञात होतील तसतसे या ज्ञानाचे उपयोजन म्हणून विविध रोगांवर उपचार शोधण्यासाठी वापर होईल. या बाबतीत अमेरिकन बाजारधार्जिणी संस्कृती फार गंमतीदारपणे स्पष्ट होते. मानवी गुणसंचय प्रकल्प हा पायाभूत संशोधन प्रकल्प शासकीय खर्चाने राबविला जात आहे, पण या ज्ञानाचे उपयोजन मात्र खाजगी क्षेत्राकडे सोडण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या जीन थेरेपी लॅबोरेटरी या स्वायत्त खाजगी संस्थेद्वारा या कार्याचे संचालन होत आहे. या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. डब्ल्यू. फ्रेन्च अँण्डरसन हे बेथेस्डा येथील सरकारी नोकरी सोडून आलेले आहेत! बेथेस्डाला त्यांनी १९९० साली एडीए डेफिशियन्सी नावाच्या आनुवंशिक रोगावर जीनमध्ये बदल घडवून सर्वप्रथम यशस्वीपणे उपचार केले व त्यांना शासनाने मान्यता दिली. शासनाच्या अतिशय कडक नियमानुसार ही जगातील पहिली जीन थेरेपी मानली जाते. याही क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असून सिस्टिक फायब्रोसिस व मॅलिग्नंट मेलानोमावर लवकरच जीन थेरेपी उपलब्ध होईल असा कयास आहे. या कामात साहजिकच खाजगी औषध कंपन्या अधिक रस घेत आहेत, कारण त्यामुळे त्यांना प्रचंड अर्थलाभ होणार आहे. आर्थिक स्वार्थासाठी हे होत असले तरी जीन थेरेपीचे तंत्रज्ञान हे मानवी कल्याणासाठीच आहे. Stinger अग्निबाण (ज्यामुळे जगाचा इतिहास गेल्या ८-१० वर्षांत बदलला! हाही एक उद्बोधक विषय आहे) अथवा Nerve Gas सारखे जनसंहारक असे हे तंत्रज्ञान निश्चितच नाही. त्यामुळे मानव आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचे शोषण करीत आहे अशी हाकाटी करणे अनाठायी ठरेल.
बदल घडविलेल्या जीन्स शरीरामध्ये टोचून रोगाचा उपचार करण्याखेरीज आनुवंशिक अभियांत्रिकीचा वापर कृषि, पशुपालन, वैद्यक, अन्नोत्पादन वगैरे क्षेत्रातही होत आहे. गेली १०-१२ वर्षे इन्सुलीन प्राण्यांखेरीज प्रयोगशाळेत यीस्टपासून निर्माण करण्यात येऊ लागले आहे. मलेरियाविरुद्ध लस तयार करण्याचे, तसेच स्त्री-पुरुषांनी वापरण्यास योग्य अशा गर्भनिरोधक लसी तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. उत्तम मांसोत्पादनासाठी कमी चरबी व अधिक मांस असणारी डुकरे, अधिक दूध देणार्‍या गाई आणि अन्नाचे अधिक किफायतशीरपणे मांसात परिवर्तन करणार्‍या कोंबड्या आनुवंशिक अभियांत्रिकीमुळे शक्य झाल्या आहेत.
निसर्गाशी अधिक चांगल्या रीतीने जुळवून घेऊन मानवी जीवन अधिक समृद्ध करणे हे या सर्व नव्या विज्ञानाचे उद्दिष्ट आहे. परंतु आत्यंतिक मोहापायी या विज्ञानाचा मानवाने गैरवापर केला तर त्यात मानवाचीच हार होणार आहे. आनुवंशिक त्रुटींचे गर्भावस्थेतच निदान करता यावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी गर्भजलपरीक्षेचा (amniocentesis) शोध लागला. परंतु भारतातील नादान श्रीमंत लोकांनी आर्थिक मोहापायी हे तंत्रज्ञान वापरून स्त्रीलिंगी गर्भ नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला. भारतात दरवर्षी हजारो स्त्रीलिंगी गर्भ पाडून टाकले जातात. त्यामुळे १९८१ ते १९९१ या दहा वर्षांमध्ये भारतीय लोकसंख्येतील स्त्रीपुरुप प्रमाण ९३३/१००० पासून ९२९/१००० इतके कमी झाले आहे!
असाच प्रकार जेनेटिक इंजिनियरिंगमुळे होईल की काय अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे. विशेषतः इंग्लंडमधील ख्रिस्ती लोक व अमेरिकेतील चळवळे नेतृत्व याबाबतीत लोकमत संघटित करीत आहेत. गुणसंचय-परीक्षणामुळे व्यक्तीस असणार्‍या अथवा भविष्यात होऊ शकतील अशा संभाव्य विकारांची माहिती मिळते. ही माहिती नोकरी मिळवितांना, टिकविण्यासाठी तसेच विमा उतरताना अडचणीची ठरू शकते. भविष्यात आपणास एखादी व्याधी जडणार आहे हे आधीच कळले तर व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. गुणसंचय -परीक्षणामुळे माणसाची अगदी “मर्मबंधातली ठेव” उघडी पडण्याची शक्यता आहे व हे मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे असेही लोकमत तयार होऊ लागले आहे. हे जरी खरे असले तरी या तंत्रज्ञानाची प्रगती बरीच नियंत्रणात आहे. हे संशोधन प्रामुख्याने पाश्चात्य लोकशाही राष्ट्रांत होत असल्याने या तंत्रज्ञानाच्या उपयोजनावर शासनाचा आणि पर्यायाने लोकमताचा अंकुश राहणार आहे. त्यामुळे विशेष चिंता करण्याचे कारण नाही! “सर्वगुणसंपन्न मानवच काय पण सर्वगुणसंपन्न बटाटाही” अजून फार दूर आहे. शिवाय या नव्या विज्ञानालाच का घाबरावे? पिकांच्या संकराच्या जुन्याच तंत्राचे भोग आपण भोगतोच आहोत. आज आपणास चवदार गावरानी पांढरी भेंडी, फ्लॉवर अथवा चवदार पालक तरी बाजारात विकत मिळते काय?

डॉ. र. वि. पंडित, पीएच्. डी. (पेनसिल्व्हानिया)
‘तेजस्’ १४६ पावनभूमी लेआऊट सोमलवाडा, नागपूर ४४००२५