मासिक संग्रह: फेब्रुवारी, १९९२

सहजप्रवृत्तीला पटेल तेच करावे

मी जे काही थोडे कार्य केले ते हौशीने, मनाच्या उत्साहाने. त्याग, तपश्चर्या, सेवा, दया हे शब्द उगाच माझ्यासाठी खर्च करू नका. त्यांचा मला नाद नाही. मी कुणासाठी म्हणून काही केले नाही. माझ्या स्वतःच्या आनंदाचा मोठा भाग त्यात होता. तशी मी बुद्धिप्रधान आहे. नेम वगैरे मी मानत नाही. शरीराला ज्याची जेवढी गरज आहे तेवढे मी पुरवते. अट्टाहासाने काही सोडत नाही. मनावर लादून काही करत नाही, लौकिकद्रष्ट्या करायची ती व्रतवैकल्ये मला हास्यास्पद वाटतात. परंतु शास्त्रीजींनी सुचवलेल्या सोमवाराचा उपास मी श्रद्धेने करते.

मनातल्या संयमाचे महत्त्व मला फार वाटते.

पुढे वाचा

हे विवेकवादी विवेचन नव्हे !

प्रा. दि. य. देशपांडे यांचे ‘गीतेतील नीतिशास्त्र ह्या शीर्षकाखाली दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत त्यांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर प्रखर टीका केली आहे. गीतेवर ह्यापेक्षाही प्रखर टीका इतरांनी केलेली आहे. सत्यान्वेषणाच्या दृष्टीने केलेली कोणतीही टीका स्वागताईच ठरावी; कारण त्यातून सत्य अधिकाधिक स्पष्ट होण्याला मदत होते. तेव्हा टीका कोणत्या दृष्टीने केली हे महत्त्वाचे ठरते.

गीतेतील तत्त्वज्ञानाचे आपण ‘विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करीत आहोत असे प्रा. देशपांडे म्हणतात. ह्या क्षेत्रांतील त्यांचा अधिकार मान्य करूनही त्यांचे प्रस्तुत परीक्षण विवेकवादाला धरून नाही असे नम्रपणे सुचवावेसे वाटते….

गीता हे मुख्यतः मोक्षशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र आहे हे प्रा.

पुढे वाचा

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा

सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर (उत्तरार्थ)

भारतात निर्माण झालेल्या धर्माचे अनुयायी ते सर्व हिंदू, नास्तिक मते बाळगणारेही हिंदू अशा प्रकारची व्याख्या केल्याने व्यवहारातली परिस्थिती बदलत नाही, शीख, बौद्ध, व जैन स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास तयार नाहीत. व्याख्येनुसार हिंदू असूनही आदिवासींना हिंदू धर्माच्या व संस्कृतीच्या तथाकथित मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आवजून राबविला जातोच आहे. प्रा. देशपांडे तर या भेदाभेदांचा हवाला देऊन असेही म्हणतात की, ‘हिंदुराष्ट्र धर्मनिरपेक्ष असणे अपरिहार्य आहे.’ हिंदू सेक्युलरच असतात असे जेव्हा हिंदुत्ववादी नेते म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याला खराखुरा अर्थ असतो.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक तिसरा

डॉ. आंबेडकरांनी सेक्युलॅरिझमचा आशय अगदी योग्य शब्दात कसा स्पष्ट केला आहे ते यापूर्वी आपण पाहिले. परंतु हिंदू आणि मुसलमान या दोन धार्मिक गटांचा संघर्ष हाच सेक्युलरिझमवरील चर्चेचा मुख्य प्रश्न बनला आहे. प्रस्तुत परिसंवादात उपस्थित केलेले बरेचसे प्रश्न या संघर्षाच्या संदर्भातच निर्माण झालेले आहेत. “धर्माचरणाला जीवनमार्ग मानण्याची धारणा जेथे पक्की आहे अशा भारतीय समाजात धर्माचरण घराच्या चार भिंतींपुरते सीमित ठेवण्याचा आग्रह धरणारी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या कितपत सयुक्तिक म्हणता येईल असा एक प्रश्न प्रश्नावलीत येतो. (प्र.३) धर्माचरण चार भितीपुरते सीमित ठेवणे आपल्या देशात शक्य नाही, तसेच इष्टही नाही असा भाव सूचित करून प्रश्नकर्ते सेक्युलॅरिझसची व्याख्या कितपत सयुक्तिक आहे असे विचारतात.

पुढे वाचा

विवेकवाद – १९

गीतेतील नीतिशास्त्र – आक्षेपांना उत्तरे

‘गीतेतील नीतिशास्त्र’ या माझ्या लेखावर आमचे अनेक मित्र नाराज झाले आहेत. त्यांपैकी प्रा. सुधाकर देशपांडे आणि प्रा. देवदत्त दाभोलकर यांची पत्रे जानेवारी १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली असून प्रा. श्री. गो. काशीकर यांचा लेख या अंकात अन्यत्र छापला आहे. प्रा. सुधाकर देशपांडे यांनी माझ्यावर सत्यशोधकाचा नि:पक्षपातीपणा सोडून वकिली बाणा स्वीकारल्याचा आरोप केला आहे, प्रा. काशीकर यांनी हे विवेचन विवेकवादी नव्हे असा सरळ निर्णय दिला आहे; आणि प्रा. दाभोलकर यांनी मला विनोबा भाव्यांचे ‘स्थितप्रज्ञदर्शन’ हे पुस्तक वाचण्याची आणि त्याला त्याच तोलाचे उत्तर देण्याची शिक्षा फर्मावली आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

संपादक, आजचा सुधारक यांस.
आपण गीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधारितच होते असे प्रतिपादन ‘आजचा सुधारक मधील विवेकवाद या लेखमालेतून केले आहे. (अशाच प्रकारचे प्रतिपादन मीही माझ्या ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ या पुस्तकाच्या भूमिकेत १९८३ मध्ये केले होते.) आपल्या या प्रतिपादनावर ‘आजचा सुधारक’च्या ताज्या अंकात सुधाकर देशपांडे यांची प्रतिक्रिया आली आहे. तथापि आपलीच भूमिका मला का पटते यासाठी समर्थनाचे काही मुद्दे देत आहे.

(१) गुणकर्मविभागश: मी चातुर्वर्ण्यव्यवस्था निर्माण केली आहे असे सांगताना स्वतःला ईश्वर म्हणविणाऱ्या श्रीकृष्णाने चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे कर्तृत्व स्वतःकडे घेतले आहे. गुणानुसारच माणसांचे कर्म ठरवायचे असेल तर त्यासाठी अशा “ईश्वरनिर्मित व्यवस्थेची गरज नव्हती.

पुढे वाचा