Category Archives: विज्ञान

पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे या लेखकद्वयांचा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊ या ’ हा प्रतिसादवजा लेख वाचत असताना डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या लेखातील मुद्द्यांचा त्यांनी केलेला प्रतिवाद हा आताच्या प्रचलित राजकारणातील वितंडवादासारखा आहे की काय असे वाटू लागते. काँग्रेसने केलेल्या चुका आम्हीही (पुनःपुन्हा) केल्या तर बिघडले कुठे? याच तालावर ॲलोपॅथीतही  दोष असताना (पर्यायी) देशी औषधोपचार पद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे का करतात हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे व त्यासाठी संविधानातील वाक्यांचा आधार ते घेत आहेत.  

Continue reading पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

पत्रोत्तर (अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे ह्यांच्या प्रतिसादावर डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचे उत्तर)

स. न.

माझ्या, ‘या मार्गानेच जाऊया’ (सुधारक, मे २०२०) या लेखाचा प्रतिवाद करणारे डॉ. शेवडे व अंबुजा साळगावकर यांचे टिपण वाचले.

पारंपरिक आणि पूरक उपचार हे आपोआप जसे उपयुक्त ठरत नाहीत तसे ते निरर्थकही ठरत नाहीत. पण ते उपयुक्त आहेत हा दावा करायचा तर त्याला सबळ पुरावा हवा. जी औषधे/शस्त्रक्रिया शास्त्रीय कसोटीवर उतरतात ती आपोआपच आधुनिक औषधशास्त्राचा भाग बनतात. आयुर्वेदाधारीत रिसरपीन हे औषध, भगेंद्रासाठी सूत्रचिकित्सा किंवा चिनी वनस्पतीचे अरटेमेसुर हे मलेरियासाठीचे औषध अशी काही मूळ ‘देशी’ औषधे आता आधुनिक वैद्यकीचा भाग आहेत.     अॅस्प्रिन, अॅट्रोपिन, स्कॉलीन, क्वीनीन ही औषधे आधुनिक वैद्यकीत रोज वापरली जातात. ही सर्व एकेकाळची  ‘झाडपाल्याची’ औषधे आहेत. ही काही माझ्या महितीतील उदाहरणे. आणखीही कितीतरी असतील. आधुनिक वैद्यकीने देशोदेशीच्या ‘देशी’ औषधांवरच बरेचसे संशोधन करत करत आपले कपाट भरले आहे. मुद्दा एवढाच की औषध ‘प्राचीन’, ‘नॅच्युरल’, ‘हर्बल’, ‘पारंपरिक’, ‘होमिओ’, ‘चिनी’ वा ‘आयुर्वेदिक’ असणे हा त्या औषधाच्या वापराचा  आणि उपयुक्ततेचा  निकष नाही. कोणत्याही पॅथीच्या, कोणत्याही औषधाचा स्वीकार हा शास्त्रीय मापदंडावर आधारित असावा एवढीच अपेक्षा आहे. असं म्हटलं की पर्यायीवाल्यांची एक ठरलेली पळवाट असते. आम्ही इतके थोर आहोत की शास्त्रीय मापदंडाच्या पट्ट्यांनी आमची ऊंची मोजलीच जाऊ शकत नाही; असं त्यांचे म्हणणे असते. एफ्.डी.ए.चे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत. ‘अ’ हे औषध ‘ब’ या आजारांसाठी उपयुक्त आहे असं म्हणायचं झाल्यास, ‘जुन्या ग्रंथातील संदर्भ’ एवढाच पुरावा ‘आयुष’कडून अपेक्षित असतो. याउलट आधुनिक वैद्यकीचे दावे अत्यंत काटेकोर निकष लावून सतत तपासले जातात; आणि हेच योग्य आहे.

…शिवाय जागतिक आरोग्य संघटना पारंपरिक, पूरक वैद्यकीस ‘नीटस’पणे पुढे आणण्यास प्रयत्नशील आहे.

हे योग्यच आहे. पण तिथेही प्रस्तावनेतच, ‘दर्जाची खात्री, सुरक्षितता, योग्य वापर आणि परिणामकारकतेचा’ आग्रह आहेच. (To strengthen the quality assurance, safety, proper use and effectiveness of T&C M by regulating products, practices and practitioners) मी तेच म्हणतो आहे.  

‘या संकेतस्थळावर चायनीज मेडिसिन्समध्ये आर्सेनिकसारखे जड किंवा विषारी धातू आणखीही काही असते, जे रुग्णासाठी काही समस्या निर्माण करू शकते’ इतके म्हटले आहे.

हा ‘’ जाचक आहे. इतके‘!’ म्हटले आहे, असं असायला हवं. घातक ठरू शकतील अशी रसायने अनेक देशी औषधात असतात. त्याबाबत कोणतीही माहिती लेबलवर नसते. (लेबलबाबतचे नियम वेगवेगळे असल्याने हे नियमातही  बसते.) इतकेच काय ‘पारंपरिक व पूरक’ म्हणून दिलेल्या औषधात, लेबलवर काहीही न छापता मिसळलेली, स्टीरॉईडसारखी    ‘आधुनिक औषधे’ही आढळली आहेत. जगभर आढळली आहेत. हे गैरच आहे.

पुढे असेही म्हटलेले आहे की, ‘याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या संशोधनातून काही ठोस उत्पन्न झाले नाही. गंमत म्हणजे अशा प्रकारच्या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही म्हटल्याचे तेथेच दिसेल.’

यातही आक्षेपार्ह काहीही नाही. अमुक औषध, तमुक आजाराला उपयुक्त आहे असं कोणी म्हटल्यास, आणि त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळल्यास, संशोधन गरजेचेच आहे. तरच त्या दाव्याचा शहानिशा शक्य आहे. नाही तर नुसतेच ‘आमची परंपरा’ एवढ्याच शक्तीवर शड्डू ठोकणे चालू राहील. जे कुणाच्याच हिताचे नाही. उलट मन आणि डोळे उघडे असल्याचे हे लक्षण आहे.

आता काही प्रश्नोत्तरे..

प्रश्न :- ‘म्हणजे ॲलोपॅथीलाही ते (औषध) मिळालेले नाही हे त्या बिचार्‍यांनी स्पष्ट सांगितलेले आहे.’ मग फक्त चायनीज मेडिसीनसंदर्भातला अभ्यास परिपूर्ण नाही असे का लिहावे?

उत्तर :- ह्याचे कारण असे की अपुऱ्या पुराव्यानिशी हे चिनी उंच उंच उड्या मारत आहेत. तुम्हाला तो अभ्यास परिपूर्ण आहे असं सुचवायचं आहे का?

प्रश्न :- “कोरोना रोखण्यास कोणत्याही औषधाची शिफारस नाही” यात ॲलोपॅथी औषधांचा समावेश आहे की नाही? 

उत्तर:- अर्थातच आहे.

प्रश्न :- इराणच्या दारूबाधित ४४ जणांच्या मृत्यूची केस जरूर द्यावी, सोबत ॲलोपॅथीचाही फेल्युअर रेट द्यावा.

उत्तर :- तो तर रोज वर्तमानपत्रातून दिला  जातो आहे.

प्रश्न :- झटपट फॉर्म्युला नाहीच आहे म्हणजे तो ॲलोपॅथीकडेही नाही असे स्पष्ट करायचे तेवढे राहिले आहे.

उत्तर :- ते तर स्पष्टपणे म्हटलेले आहे. असा फॉर्म्युला असूच शकत नाही, असा दावा भोंगळ आहे हे लेखात, साखर आणि पाण्याची ‘शालेय’ उदाहरणे देऊन, स्पष्ट केले आहे.
वरील  प्रश्नात आधुनिक वैद्यकीला औषध सापडलेले नाही हाच मुद्दा उगाळला आहे. हे मान्यच आहे. पण आधुनिक  वैद्यकीकडे औषध नाही म्हणजे ते इतरांकडे आहे असा अर्थ होत नाही!! आमच्याकडे औषध नाही असं म्हणायला लाज कसली? उलट भोंगळ, अवैज्ञानिक दावे करणे लज्जास्पद आहे. आपले अज्ञान आणि मर्यादा आधुनिक वैद्यकीने मान्य केल्या आहेत. अज्ञान मान्य करणे ही ज्ञानाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. त्यात शरम ती कसली? उलट प्रामाणिकपणा आहे. परवा परवापर्यंत आधुनिक वैद्यकीकडे एकाही जिवाणूविरुद्ध, विषाणूविरुद्ध औषध नव्हते. आज अनेक आहेत.

प्रश्न :- आयुष-उपचारांनी प्रतिकारशक्ती वाढल्याचा दावा सर्वोच्च नेत्याने केला आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याची गुस्ताखी करता आहात का?

उत्तर :- हो. कारण कोणा नेत्याचे मत हा पुरावा कसा काय होऊ शकतो? त्यांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी या आधीही असे अचाट दावे करून स्वतःचे हसे करून घेतले आहे. प्लॅस्टिक सर्जरी, लांडोरीचे अश्रु, इंटरनेट, उत्क्रांती वगैरे बाबतची त्यांची विधाने त्यांची विज्ञानविषयक समज स्पष्ट करतात.
आयुष उपयोगी नाही असे सरसकट विधान मी केलेले नाही. मुळात आयुष म्हणजे कोणता एकच एक वैद्यकविचार नसून आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशी ती सरमिसळ आहे. उपयुक्तता ही त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांनी सिद्ध करून दाखवायची आहे. ती मी किंवा कोणी नेत्यांनी सर्टिफाय करण्याची गोष्ट नाही.  

भारतात आयुषची गळचेपी चालू आहे असाही सूर आहे.

असेल बुवा. पण केंद्रीय संशोधन संस्था, त्यांना मिळणारा सरकारी निधी, शेकड्याने कॉलेजेस्‌, खाजगी औषधकंपन्यांचे संशोधनविभाग वगैरे वर्षानुवर्षे कार्यरत आहेत की. पण गेल्या सत्तर वर्षांत दखलपात्र संशोधन झाल्याचे दिसत नाही. होमिओवाल्यांचे सरकारी ऑनलाइन जर्नल तर गेली काही वर्षे निपचित पडून आहे.

आमच्याकडे औषध नाही तरी आम्हीच तुमच्यावर उपचार करणार आणि काय येईल तो बरा-वाईट निकाल तुमच्या पुढ्यात ठेवणार असेच चाललेले नाही का ॲलोपॅथीचे?

आधुनिक वैद्यकीचं जे काय चाललं आहे ते येणेप्रमाणे… 
रोग ‘बरा करणारे’, म्हणजे कोविडबाबतीत तो विषाणू नष्ट करणारे औषध आज नाही. पण त्यामुळे होणारे त्रास सुसह्य करणारे अनेक उपचार आधुनिक वैद्यकीकडे आहेत. तापासाठी आहेत, श्वसन-सुलभतेसाठी औषधे आहेत, फुफ्फुसाची सूज आटोक्यात रहावी म्हणून आहेत, क्षार आणि रक्तद्रव संतुलनासाठी आहेत, किडनीचे कार्य सुलभ करणारी आहेत,   उलटी, मळमळ, खोकला यांसाठी आहेतच आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी डायलेसीस, व्हेंटीलेटर असे उपचार आहेत.   हे आणि असे सर्व प्रकार वापरून रुग्णांवर लक्षण-लक्ष्यी उपचार केले जातात. उपचारांनी जंतू मरत नाहीत. उपचार सहाय्यभूत तेवढे ठरतात. यातून बरेचसे पेशंट बरे होतात. उपचारांची सामर्थ्यस्थळे आणि मर्यादा यांचे भान येत जाते. हे सारे संशोधन आज झालेले नाही. ही वैज्ञानिक विचारसरणीची इतक्या वर्षांची पुण्याई आहे.
हे सारे नाकारून एखाद्या अन्य-पॅथीय दवाखान्यात जायचे रुग्णाचे स्वातंत्र्य अबाधित आहे.

‘पूर्वग्रहविरहित, अभिनिवेशरहित राहून स्वत:ला पटेल अशा पद्धतीचा अवलंब करण्याचा’ अधिकार रुग्णाला आहेच.  अमुक औषध घेऊ नका असं कायदा कुठेही सांगत नाही. साथ पसरू नये म्हणूनची खबरदारी घेणे मात्र कायद्याने  बंधनकारक आहे. याचा अर्थ ‘आयुष’ची गळचेपी असा मात्र नाही.

एकदा बाजारात आणून, लोकांना देऊन मागे घेतलेल्या लसींची उदाहरणे गेल्या पाच वर्षांत २४ आहेत.
प्रत्येक औषधाच्या चांगल्या-वाईट सगळ्याच परिणामांचा अभ्यास करायचा चंग अॅलोपॅथीने बांधलेला आहे. बाजारात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरही असा अभ्यास निरंतर चालू असतो. अशा परिणामांच्या आंतरराष्ट्रीय रजिस्ट्री (अभिलेखागार, नोंदवह्या) आहेत. ऑनलाइन आहेत. तेंव्हा मीदेखील यात माझ्या अनुभव नोंदवू शकतो. काही कमतरता आढळली तर मग औषध बाजारातून मागे घेतलं जातं. अॅलोपॅथीची मूठ झाकलेली नाही. त्यामुळे तीत सव्वा लाख रुपये आहेत की सव्वा रुपया आहे हे तुम्ही पाहू शकता.
‘आयुष’ने असे अभ्यास केले आहेत का? अशी रचना तयार केली आहे का? मी तर उलट प्रश्न विचारेन, एकदा बाजारात आणून परत घेतलेली आयुष औषधे किती? अशी जर अजिबातच नसतील तर ते अशुभचिन्ह नाही का? 

… तेव्हा ॲलोपॅथीत सगळे योग्यच चालले आहे असे समजण्याचे कारण नाही. 

अर्थातच नाही. पण तो वेगळा विषय आहे.

वैज्ञानिकतेचा मार्ग आपल्याला तारू शकतो एवढं खरं.

कोरोना व्हायरसच्या महासाथीबद्दल काही – नर्मदा खरे

आम्ही ऐकलंय की जीवाणू सगळीकडे असतात: शरीरात, हवेत, पाण्यात. मग कोरोना व्हायरसही सगळीकडेच असणार, नाही का?

 • पहिले तर, कोरोना हा विषाणू (virus) आहे, जीवाणू (bacteria) नाही. 
 • जीवाणू हे एकपेशीय, सूक्ष्मदर्शी जीव आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे असून पृथ्वीतलावर जवळजवळ सगळीकडे (गरम झरे, खारट पाणी, अत्यंत थंड किंवा गरम प्रदेश) सापडतात.
 • काही जीवाणू माणसाच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहतात. त्यांच्यापैकी अगदीच थोडे प्रकार माणसाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ: पटकी (Cholera), क्षय रोग (TB), विषमज्वर (typhoid), मेनिन्जायटिस वगैरे.
 • विषाणू हे जीवाणूंपेक्षाही अनेक पटींनी सूक्ष्म असतात. त्यांचेही अनेक प्रकार असतात. 
 • त्यांना ‘पेशी’ म्हणायचे की नाही, त्यांना ‘जीव’ म्हणायचे की नाही, ह्यावर एकमत नाही! 
 • इतके मात्र खरं, की विषाणू स्वतःचे स्वतः प्रजनन करू शकत नाहीत. ‘विभाजन’ होण्यासाठी (एका विषाणूपासून अनेक विषाणू निर्माण होण्यासाठी) त्यांना एखाद्या प्राण्याच्या, वनस्पतीच्या किंवा जीवाणूच्या पेशीत शिरावं लागतं. 
 • म्हणूनच, आजैविक (inorganic) वस्तूंवर विषाणू फार कमी काळ तगू शकतात.  
 • विषाणूंपासूनही माणसांना काही रोग होतात. उदाहरणार्थ: HIV (एड्स), देवी, फ्लू, डेंगू, SARS CoV, SARS CoV-2, इबोला वगैरे.   

विषाणूंबद्दल जरा अजून सांगाल का?

 • विषाणू हे अत्यंत सूक्ष्म परजीवी आहेत. 
 • त्यांचे अनेक आकार असतात. कोरोना गोलाकार आहे, पण इबोला लांबुळका, आणि इतर काही तर स्फटिकासारखे अनेक कोन असलेले असतात.
 • सध्याचा कोरोना व्हायरस (CoV -2) सुमारे 0.1 मायक्रोमीटर इतक्या व्यासाचा आहे. म्हणजे, 1 मिलीमीटर वर साधारण 10,000 कोरोनाचे विषाणू एका शेजारी एक मावतील. 
 • विषाणूंची रचना आपल्या पेशींपेक्षा खूपच साधी असते.
 • विषाणूंची रचना जीवाणूंच्या पेशींपेक्षाही साधी आणि सोपी असते.

खाली दिलेल्या चित्रांमधून चार वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींच्या रचनेची साधारण कल्पना करता येईल. हे लक्षात घ्यावे, की ही फक्त चित्रे आहेत, फोटो नाहीत. तरीसुद्धा, विषाणूची क्लिष्टता सगळ्यात कमी आहे.

 • असे समजा की एक विषाणू म्हणजे काही प्रोटीन्स (प्रथिने) आणि लिपिड (स्निग्ध पदार्थ) ह्यांनी बनलेली एक डबी असून तिच्या आत DNA किंवा RNA (अनुवांशिक पदार्थ) चा एक रेणू बंदिस्त असतो.
 • आपल्या पेशींमधे असलेले पेशीद्रव्य, मायटोकोण्ड्रिया, रायबोसोम आणि इतर घटक विषाणूंमधे नसतात. ह्याचाच अर्थ असा, की विभाजनासाठी लागणारी यंत्रणा विषाणूंमधे नसते. 

विषाणूंची रचना इतकी साधी असूनही ते इतके धोकादायक कसे काय असतात?

 • आता आपल्याला पटले आहे, की विभाजनासाठी लागणारी यंत्रणा विषाणूंमधे नसते. म्हणूनच त्यांना विभाजनासाठी एका ‘यजमान’ पेशीची गरज असते. 
 • वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू वेगवेगळ्या प्रकारच्या यजमान पेशींमधे राहू शकतात. 
 • जेंव्हा एखादा विषाणू आपल्या पेशीत शिरतो, तेंव्हा आपल्याला ‘विषाणूचे संक्रमण (infection) झाले’ असे म्हटले जाते. 
 • पेशीत शिरलेला विषाणू आता त्या पेशीची यंत्रणा स्वतःच्या विभाजनासाठी लागणारी सामग्री बनवण्यासाठी वापरू लागतो. 
 • पेशी स्वतःचे काम सोडून, विषाणूच्या जास्त जास्त प्रती बनवण्यासाठी लागणारी प्रोटीन्स, लिपिड्स आणि DNA किंवा RNA तयार करायला लागते. 
 • एक वेळ अशी येते, की असंख्य नव्या विषाणूंनी भरलेली पेशी फुटते, आणि विषाणू बाहेर पडतात. 
 • हे नवे विषाणू आता शरीरातील इतर पेशींकडे वळतात, आणि वरील चक्र पुन्हा सुरु होते. 

एका अशाच विषाणूचे जीवनचक्र बघा:

आपली रोगप्रतिकार संस्था (immune system) ह्या विषाणूला का मारत नाही?

 • आपली रोगप्रतिकार संस्था अनेकानेक विषाणूंपासून आपल्याला सतत वाचवत असते. आपला विविध प्रकारचे खोकला आणि सर्दी आपल्याला कळायच्या आतच बरे होतात. 
 • कधी कधी मात्र काही काही विषाणू आपल्या पेशींना इतक्या वेगाने ताब्यात घेतात, की रोगप्रतिकार संस्थेला त्याची जाणीव व्हायच्या आताच आपण खूप आजारी झालेलो असतो. 

सर्वच विषाणू धोकादायक असतात का?

 • नाही. काही विषाणू एखाद्या विशिष्ट प्राण्यामध्ये किंवा एखाद्या वनस्पतीमध्ये अनेक पिढ्यांसाठी त्यांना आजारी न करता राहतात.  त्या प्राण्याला (किंवा वनस्पतीला) आणि विषाणूला एकमेकांची सवय झालेली असतें. यजमान पेशीला न मारता हे विषाणू तिच्यात राहतात. 
 • असे म्हणतात, की काही प्रकारचे ‘फ्लू विषाणू’ माणसांमधे राहत आहेत. वटवाघळांमध्येही असंख्य प्रकारचे विषाणू राहतात. अनेक झाडे आणि प्राणी त्यांच्या त्यांच्या विशिष्ठ विषाणूंबरोबर राहत आहेत. 
 • पण काही वेळा, जर हे विषाणू एखाद्या वेगळ्या जीवाच्या संपर्कात आले, तर मात्र ते त्याला आजारी पाडू शकतात.

कोविड-19 म्हणजे काय?

 • कोविड -19 हा नुकताच सापडलेल्या (2019 मधे) कोरोना व्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.
 • कोरोना विषाणूला ‘SARS CoV-2’ असं ही म्हणतात.  
 • डिसेंबर 2019च्या मध्ये चीनमधील ‘वुहान’ प्रांतात त्याचा उद्रेक होण्यापूर्वी या नवीन विषाणूबद्दल आणि ह्या आजाराबद्दल जगाला काहीच माहिती नव्हती.

‘सार्स’ म्हणजे काय?

 • 2002-3 साली मानवी श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग जगभर पसरला. 
 • त्याच्या तीव्रतेमुळे त्याला  Severe Acute Respiratory Syndrome किंवा SARS हे नाव दिलं गेलं. 
 • ह्या रोगाचे कारण असलेल्या SARS-CoV ह्या कोरोना व्हायरसचा शोध 2003 साली लागला.   

कोविड-19, कोरोना व्हायरस आणि  SARS एकच का?

 • नाही. हे तिन्ही वेगळेवेगळे आहेत.
 • ‘कोरोना’ ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘मुगुट’ किंवा ‘मुगुटासारखे’ असा आहे. 
 • पृष्ठभागावर कंगोरे किंवा काटे असल्यामुळे मुगुटासारखे दिसणाऱ्या विषाणूंचा एक संच (किंवा कुटुंब) आहे.
 • 2003 साली सापडलेला SARS CoV, आणि 2019-20 सालच्या साथीचे (सध्याच्या साथीचे) कारण ठरलेला विषाणू, हे दोन्हीही ‘कोरोना’ कुटुंबात मोडतात.  
 • सध्या ज्याने जगात धुमाकूळ माजवला आहे, त्या विषाणूचं नाव SARS CoV-2 असं आहे. 
 • कोविड-19 हा SARS CoV-2 मुळे होणारा रोग आहे. 
 • SARS CoV आणि SARS CoV-2. ह्या दोन्ही विषाणूंमधे काही साम्ये आहेत, परंतु काही फरकही आहेत. 
 • SARS CoV आणि SARS CoV-2 हे विषाणू जरी एकमेकांशी अनुवांशिकदृष्ट्या संबंधित आहेत, तरी त्यांमुळे होणारे रोग बरेच वेगळे आहेत.
 •  SARS CoV मुळे होणारा रोग जास्त प्राणघातक होता, परंतु त्याचा विषाणू SARS CoV-2 च्या तुलनेत खूपच कमी संसर्गजन्य होता. 
 •  2003च्या नंतर जगात कुठेही SARS CoV चा पुन्हा उद्रेक झालेला नाही.

कोविड-19 ह्या आजाराची चिह्ने काय आहेत? हा आजार झाला, तर मला कसे वाटेल? 

 • तुम्हाला गळून गेल्यासारखे किंवा अशक्तपणा आल्यासारखे वाटू शकते. कधी तापही येऊ शकतो.  
 • काही लोकांना कोरडा खोकला होऊ शकतो, तर काही जणांना सर्दी होऊन नाकही गळू शकते. 
 • कोविड-19 च्या तीव्र उदाहरणात रोग्याला श्वासोच्छवास करायला त्रास होऊन गुदमरायला होते. 

कोविड-19 झालेल्या प्रत्येक रोग्यामधे ही सगळी चिह्ने दिसतात का?

 • नाही. काही लोकांना ह्या आजाराची लागण झाली असूनही त्यांच्यात ह्यातील एकही चिह्न दिसत नाही. 
 • काही लागण झालेल्या लोकांमध्ये हीच चिह्ने अगदी सौम्य असतात, आणि थोड्याच दिवसांत ती दिसणे बंदही होते. 
 • काही रोग्यांमध्ये आजाराचे स्वरूप तीव्र असते. अशा रोग्यांना दवाखान्यात नेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.  

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेली प्रत्येक व्यक्ती स्वतः संसर्गजन्य असते का? 

 • होय. जे लोक ह्या विषाणूची लागण होऊनही कोविड-19 ची कुठलीही चिह्ने दाखवत नाहीत, ते लोकदेखील रुग्ण आहेत हे विसरू नये. तेदेखील हा रोग आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवू शकतात. म्हणूनच जरी तुमच्या मित्र परिवारात कोणीही खोकत किंवा शिंकत नसेल, तरीही त्यांच्यापासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे. 
 • शिवाय, समजा, तुम्ही स्वतः रोगाची सौम्य चिह्ने दाखवत आहेत, आणि त्यातून तुम्ही लवकरच बरेही व्हाल. पण असेही शक्य आहे, की तुमच्यापासून संसर्ग झालेली इतर कोणी व्यक्ती इतक्या सहजी बरी होणार नाही. तुमच्यापासून इतरांना धोका असू शकतो.  
 • आजूबाजूच्या लोकांपासून दूर राहणे, त्यांच्यापासून शारीरिक अंतर ठेवणे, हे तुमच्या स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

कोविड-19 किती धोकादायक मानावा? ह्या रोगाची किती भीती बाळगणे योग्य आहे?

 • कोविड-19 चा धोका अनेक घटकांवर अवलंबून आहे:  वय, आधीपासून असलेले इतर रोग आणि उपलब्ध असलेली आरोग्यसेवा, हे काही महत्वाचे घटक आहेत. 
 • रुग्णाचे वय जितके जास्त, तितकी रोगाची तीव्रता अधिक. आणि जितकी रोगाची तीव्रता अधिक, तितकी दवाखान्यात भरती करावे लागण्याची शक्यताही जास्त, आणि मृत्यू होण्याची शक्यताही तितकीच जास्त. 
 • एखाद्या व्यक्तीत आधीपासून अस्तित्वात असलेले रोग, आणि त्या व्यक्तीचे साधारण आरोग्य ह्यांचा परिणाम तिच्या कोविड-19 ला तोंड द्यायच्या क्षमतेवर होतो. ज्यांना श्वसन संस्थेचे आजार, हृदयाचे आजार (रक्तदाब वगैरे) किंवा मधूमेह आहे अशा रोग्यांना कोविड-19 मुळे न्यूमोनिया होऊन त्यांची परिस्थिती बिकट होऊ शकते.      

लहान मुले आणि तरुण ह्यांचा कोविड-19 मुळे मृत्यू होण्याची शक्यता अगदी कमी आहे असे म्हणतात. असे असताना त्यांनी नेहेमीप्रमाणे वागणे, जगणे चालू ठेवायला काय हरकत आहे?

 • त्यांनी असे करणे धोक्याचे आहे ह्याचे कारण हे लोक जरी स्वतः आजारी पडले नाहीत, तरी त्यांच्याकडून इतर (वयस्क व इतर आजार असलेले) लोकांना कोविड-19 चा संसर्ग होऊ शकतो.
 • दुसरे म्हणजे, जरी ह्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी तेदेखील खूप आजारी पडू शकतात, आणि त्यांना दवाखान्यात भरती करावे लागू शकते.
 • ह्याचा एक परिणाम म्हणजे ज्यांना जास्त धोका आहे, अशा रुग्णांसाठी दवाखान्यातील जागा आणि सोयी कमी पडू शकतात.
 • उपचारापेक्षा रोग टाळणे केंव्हाही चांगले! म्हणूनच लहान वयाच्या लोकांनी सुद्धा एकमेकांपासून अंतर ठेवणे वगैरे खबारदाऱ्या घेऊन ह्या रोगाचा संसर्ग पसरण्याला आळा घालण्यास मदत करावी.  
 • शेवटचे म्हणजे, ज्या लहान मुलांना काही विशिष्ट प्रकारच्या आरोग्यसेवेची गरज असते (special needs children) अशा मुलांवर कोविड-19 चा काय परिणाम होतो ह्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ पेडिऍट्रिक्स’ ह्या संस्थेतील एका डॉक्टरांच्या मते, ज्याप्रमाणे आपण वयस्क रुग्णांची काळजी घेऊ, त्याच स्तराची काळजी ह्या मुलांची घेणे आवश्यक आहे.

हा विषाणू कसा पसरतो?

 • जेंव्हा एखादा संसर्ग झालेला रुग्ण खोकतो, शिंकतो, किंवा बोलतो, तेंव्हा जे थुंकीचे थेंब उडतात, त्यांच्यामार्फत कोविड-19 चा विषाणू पसरतो. 
 • हे थेंब बऱ्यापैकी जड असतात, त्यामुळे ते फार काळ हवेत तरंगत राहू शकत नाहीत. ते लगेचच जमिनीवर आणि आजूबाजूच्या इतर पृष्ठभागांवर येऊन पडतात. 
 • तुम्ही कोविड-19 ने आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जवळ उभे असाल, तर व्हायरस त्याच्या श्वासातून तुमच्या शरीरात शिरू शकतो. 
 • दूषित पृष्ठभागांना लावलेला हात जर न धूता नाक, डोळे किंवा तोंड ह्यांना लावलात, तरी हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. 

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? 

 • बऱ्याच विषाणूची लागण झालेल्या लोकांमधे रोगाची चिह्ने दिसत नाहीत. म्हणूनच सर्व बाहेरच्या/बाहेरून आलेल्या लोकांपासून दूर राहणे (किमान एक मीटर किंवा तीन फूट) महत्त्वाचे आहे. 
 • हात साबणाने स्वछ, चोळून धुवावे. हातावर साबण घेतल्यानंतर हात किमान 20 सेकंद चोळावेत, आणि मग पाण्याने साबण धुवून टाकावे. साबण लावून चोळण्याची क्रिया विषाणू नष्ट करायला पुरेशी आहे. 
 • हात चोळत असताना नळ बंद ठेवावा, आणि पाणी वाया घालवू नये. उन्हाळा येतो आहे हे विसरू नये.
 • अल्कोहोल असलेले सॅनिटायझर्स वापरून हात वेळोवेळी स्वच्छ करावेत.
 • आपल्या चेहऱ्याला, नाकाला किंवा डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.
 • जेंव्हा शक्य असेल तेंव्हा बाहेर जाताना सर्जिकल मास्क वापरावा. मास्क नसेल,  तर अनेक थर असलेल्या रुमालाचा/ओढणीचा वापर करावा.
 • खोकला किंवा शिंक आल्यास आपले नाक आणि तोंड अनेक थर असलेल्या रुमालाने/ओढणीने किंवा वाकलेल्या कोपऱ्याने झाकून मगच खोकावे/शिंकावे.
 • अन्न शिजवून खावे. 
 • मोठे जमाव जेथे जमतात अशा ठिकाणी (क्रीडास्पर्धा, गायनाचे कार्यक्रम, शाळा) जाऊ नये.
 • सार्वजनिक वाहनांमधून (रिक्षा, बस, आगगाडी, विमान)  प्रवास टाळावा.
 • अस्वस्थ वाटत असल्यास, बरे वाटत नसल्यास घरात रहावे, आणि घरातील इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवावे.

स्वत:ला अलग ठेवणे (self quarantine) म्हणजे काय?

 • जे लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे आणि ज्यांना कोविड -19 होण्याचा धोका आहे त्यांनी स्वत:ला इतरांच्या संपर्कात येण्यापासून थांबवणे आवश्यक आहे. समजा तुम्ही परदेश प्रवास करून आला असाल, शहरातील कोरोनाग्रस्त भागात जाऊन आला असाल किंवा तुमच्या जवळ असलेल्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्याचे कळले असेल, तर तुम्ही स्वतःला इतरांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. 
 • अशा लोकांनी किमान 14 दिवसांसाठी स्वतःला अलग ठेवावे अशी शिफारस आरोग्यतज्ज्ञांनी केली आहे.  
 • इथे अशी आशा केली गेली आहे, की ह्या दोन आठवड्यांमध्ये ह्या लोकांना आजार झाला असेल, आणि ते स्वतः संसर्ग पसरवू शकत असतील अथवा नाही हे स्पष्ट होईल.  

स्वत:ला अलग ठेवणे ह्यात खालील बाबी समाविष्ट आहेत:

 • घरी राहणे.
 • आपल्या घरातील इतर लोकांपासून कमीतकमी 6 फूट अंतरावर राहणे.
 • शक्य असल्यास संलग्न बाथरूम असलेल्या खोलीत एकटेच बंदिस्त असणे.
 • पाहुण्यांना घरी न बोलावणे.
 • इतरांपेक्षा वेगळे टॉवेल्स आणि भांडी वापरणे.
 • शक्य असल्यास खोलीतच अन्न घेणे.
 • स्वतःची भांडी, कपडे स्वत: धुणे.
 • हा कालावधी संपल्यानंतर, आणि आपल्याला रोगाची लक्षणे नसल्यास, आपल्या नेहमीच्या दिनचर्येला कसे लागावे याविषयी डॉक्टरांच्या सूचनांचे अनुसरण करणे.

कोविड-19 वर काही औषध आहे का?

 • सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही औषधाने  हा रोग पूर्ण बरा होत असल्याचा पुरावा नाही. 
 • काही औषधांच्या उपयुक्ततेबद्दल अफवा आहेत, परंतु खात्रीलायक माहिती नाही. ह्या औषधांचे अनेक धोके असू शकतात. 
 • अनेक नव्या, आणि पाश्चिमात्य आणि पूर्वापार चालत आलेल्या औषधांच्या परिणामांवर आणि उपयुक्ततेवर सध्या जोरात अभ्यास सुरु आहे.  

कोविड-19 साठी अँटिबायोटिक्स घ्यावीत का?

 • अँटिबायोटिक्सचा उपयोग जीवाणू (bacteria) नष्ट करायला होऊ शकतो. विषाणूंवर त्यांचा थेट परिणाम होत नाही. कधीकधी विषाणूच्या संसर्गामुळे अशक्त झालेल्या शरीराला इतर संसर्ग होऊ नयेत म्हणून डॉक्टर ह्या प्रकारची औषधे देतात. 
 • डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, स्वतःच्या मनाने, कधीही अँटिबायोटिक्स घ्यायला सुरुवात करू नये. ह्याचे दुष्परिणाम बरेच आहेत.   

जर कोविड-19 वरची लस अस्तित्वात नाही, तर मग काही रुग्ण बरे कसे होत आहेत?

 • ‘लस’ ही आपल्या शरीराला विषाणूंच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार करते. लसीची टोचणी विषाणूची लागण व्हायच्या आधी व्हावी लागते. 
 • जर शरीरावर आधीच विषाणूचा हल्ला झालेला असेल, तर लस टोचल्याने फरक पडत नाही. 
 • विषाणूची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्याच्याशी लढा देण्यासाठी हळूहळू सिद्ध होऊ लागते. 
 • जर विषाणूने पेशींचा खूप मोठ्या प्रमाणावर नाश करण्याच्या आधी शरीराने त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केली, तर आजार फार पुढे न जाता रुग्ण बरा होऊ लागतो. 
 • प्रत्येक माणसाची रोगाला प्रतिकार करायची क्षमता वेगळी असते. ही क्षमता माणसाचे वय आणि आरोग्य ह्यांवर अवलंबून असते. म्हणूनच काही जण लवकर बरे होतात, तर काहींना खूप त्रास होतो. आणि इतर काही जणांचा ह्या रोगामुळे अंतही होऊ शकतो. 

कोविड-19 एखाद्याला पुन्हा पुन्हा होऊ शकतो का?  

 • ह्याचे उत्तर अजून आपल्याला माहीत नाही.