विषय «विज्ञान»

बाराला दहा कमीः अण्वस्त्रांचे महाभारत

एखाद्या भाषेचे सामर्थ्य त्या भाषेत ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान किती लिहिले गेले आहे यावरून दिसते. तिच्यात जर सूक्ष्म वैचारिक विश्लेषण करता येत असेल, गुंतागुंतीच्या कल्पना चोखपणे मांडता येत असतील, अमूर्तातील अमूर्त भेद दाखविता येत असतील, विचारांचे बारकावे व्यक्तविता येत असतील, तात्त्विक चिकित्सा, तार्किक मीमांसा आणि सैद्धान्तिक अभिव्यक्ती सहजपणे साधता येत असतील, तर ती भाषा समृद्ध आहे असे समजावे. मराठीला या दिशेने अजून पुष्कळ वाट चालायची आहे. म्हणून मराठीत या प्रकारच्या ग्रंथांची जेवढी निर्मिती होईल तेवढी हवीच आहे. यादृष्टीने ‘बाराला दहां कमी’ या ग्रंथाचे आपण तोंडभर स्वागत केले पाहिजे.

पुढे वाचा

मी आस्तिक का आहे?

कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.

पुढे वाचा

क्वांटम भौतिकी आणि तत्त्वज्ञान

या शतकाच्या आरंभी भौतिकीमध्ये दोन क्रांतिकारी शोध लागले. आइन्स्टाइनप्रणीत सापेक्षता-सिद्धान्ताने निरपेक्ष अवकाश, काल आणि गती याविषयीच्या जुन्या कल्पनांना तिलांजली दिली. या सिद्धान्ताने न्यूटोनीय यांत्रिकीमुळे भक्कम पायावर प्रस्थापित झालेल्या कार्यकारणभावाच्या आणि नियतिवाद (causality and determinism) या तत्त्वांना मुळीच धक्का पोहोचला नाही. परंतु क्वांटम यांत्रिकीने मात्र या तत्त्वांना प्रचंड हादरा दिला. आधुनिक भौतिकीचा आधार अनिश्चितता तत्त्व आहे ही कल्पना विसाव्या शतकातील अनेक तत्त्ववेत्त्यांना बुचकळ्यात पाडणारी आहे.

कण आणि तरंग : एक द्वैत
अभिजात (classical) भौतिकीमध्ये प्रकाश अथवा सर्व प्रकारचे प्रारण (radiation) हे तरंगस्वरूपी मानण्यात येते, कारण या संकल्पनेने व्यवहारात आढळणाऱ्या सर्व घटनांचे स्पष्टीकरण देता येते.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

खुळा प्रश्न

सगळ्या विश्वात बातमी पसरली की प्रश्नांची उत्तरं देणारं एक यंत्र निघालं आहे. यंत्र कुणी घडवलं, कसं घडवलं, काही माहीत नाही. यंत्राबद्दलची माहिती विश्वातल्या सर्व सुजाण जीवांना कशी कळली हेही माहीत नाही. फक्त येवढंच कळलं, की कोणताही योग्य आणि नेमका प्रश्न विचारा, आणि प्रश्नोत्तरयंत्र तुम्हाला उत्तर देईल. सोबत पत्ताही होता.

तरुण सेवकानं वृद्ध शास्त्रज्ञाला रॉकेटच्या खुर्चीत बसवलं. म्हणाला, “चला. प्रश्नोत्तर यंत्राकडे नेतो तुम्हाला. काय विचारायचं ते ठरवलं असेलंच, ना ?” शास्त्रज्ञ म्हणाला, “ हो तर ! दोनच प्रश्न, जीवन म्हणजे काय ?

पुढे वाचा

अध्यात्म आणि विज्ञान (उत्तरार्ध)

जापान कोवा

आपल्या भोवतालचे विश्व मानवाला अनुकूल आहे, एवढेच नव्हे तर सबंध विश्वच मानवाच्या स्वरूपाचे म्हणजे जड नसून चैतन्यमय आहे, असे ठरविण्याकरिता भारतीय आणि पाश्चात्त्य अध्यात्मात अनेक युक्तिवाद केले गेले आहेत. त्यांपैकी एक प्रसिद्ध युक्तिवाद म्हणजे इंद्रियगोचर जग भ्रामक आहे असे सिद्ध करणारा युक्तिवाद. इंद्रियगोचर जग सत् नाही. कारण ते सतत बदलणारे, परिवर्तमान आहे, आणि सत् तर अपरिवर्तनीय, त्रिकालाबाधित असते असा हा युक्तिवाद आहे. परंतु या युक्तिवादात वापरली गेलेली प्रमुख प्रतिज्ञा (premise), म्हणजे सत् त्रिकालाबाधित असते ही कशावरून खरी मानायची ?

पुढे वाचा

अध्यात्म आणि विज्ञान (पूर्वार्ध)

अध्यात्म आणि विज्ञान यांचे परस्परांशी संबंध काय आहेत ? या प्रश्नाला अनेक उत्तरे दिली गेली आहेत. एक उत्तर आहे : ती मूलतःच परस्परविरुद्ध आहेत; दुसरे उत्तर आहेः ती स्वतंत्र आहेत, आणि म्हणून त्यांच्यात कसलाही संबंध नाही; आणि तिसरे आहेः ती स्वतंत्र आहेत, पण ती परस्परपूरक आहेत. या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते ? पण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे पाहिले पाहिजे.

अध्यात्म आणि विज्ञान यांपैकी विज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर बरेच निश्चित आहे, आणि म्हणून ते देणे सोपे आहे.

पुढे वाचा

अध्यात्म की विज्ञान

आधुनिक विज्ञान हे अध्यात्माच्या जवळ चालले आहे असे मत अनेक वेळा प्रदर्शित करण्यात येते; अशा अर्थाची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. परंतु खरोखर अशी वस्तुस्थिती आहे काय याविषयी आज विचार करणे आवश्यक झाले आहे.

अध्यात्मातील काही संकल्पना :अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध! त्याचे प्रयोजन म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे तादात्म्य प्राप्त करणे, व अशा रीतीने मोक्ष मिळविणे. या ध्येयाला मुक्ती प्राप्त करणे, निर्वाणाप्रत जाणे, साक्षात्कार होऊन परमेश्वराची प्राप्ती होणे, अशा विविध प्रकारे व्यक्त करण्यात येते.

पुढे वाचा

टिपण-हसावे की रडावे?

आजच्या सुधारकच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अंकातील संपादकीयात म्हटले आहे की “आगरकरांनी शंभर वर्षापूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली. पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षानंतरही ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इत्यादी गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १७)

‘कामप्रेरणा आणि व्यक्तीचे हित’ या प्रकरणात कामप्रेरणा आणि लैंगिक नीती यांच्या व्यक्तीचे हित आणि सुख यावर होणाऱ्या परिणामांविषयी यापूर्वीच्या प्रकरणांत जे लिहिले आहे त्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा विचार आहे. या ठिकाणी मानवी जीवनाचा कामप्रेरणा प्रबळ असण्याचा काळ किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंध यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. लैंगिक नीतीचे बाल्य, कुमारावस्था(adolesence), आणि वार्धक्यही यांवर विविध प्रकारांनी परिणाम होत असतात, आणि ते प्रसंगवशात् चांगले किंवा वाईट असतात.

रूढिवादी नीतीचा व्यापार बाल्यावस्थेत प्रतिषेध (Laboos) लादण्यापासून सुरू होतो. अतिशय अल्प वयात मुलाला आपल्या शरीराच्या काही अवयवांना चार चौघांसमोर हात लावू नये असे शिकविले जाते.

पुढे वाचा