विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
“राजन्, गेल्या खेपेत, आपल्याला आपल्या कल्पनासाम्राज्यात वास्तवाची किंवा तर्कबुद्धीची बोच कशी नकोशी वाटते आणि सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण कसं जास्त असतं, हे जे तू सांगितलंस ते तर अगदी खरं आहे. करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात तर हा अनुभव नेहमीच येतो. आपल्याकडे बहुसंख्य लोकांना कोणते चित्रपट आवडतात ते बघ. ज्या चित्रपटात निव्वळ कल्पनारंजन असेल, वास्तवाला किंवा तर्काला थारा नसेल, असेच ‘दे मार’ चित्रपट लोकप्रिय होतात.