IGNOU ने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल गेले काही दिवस खमंग चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने काही चिंतन –
** ज्या शास्त्रात केलेली भाकितं अचूक ठरतात तेच खऱ्या अर्थाने शास्त्र असतं हे जर मान्य केले तर ज्योतिष हे शास्त्र ठरत नाही.
हा निकषच चुकीचा आहे. असं म्हटलं तर हवामानशास्त्र, निवडणूक निकालांचे अनुमान लावणारं आणि विश्लेषण करणारं शास्त्र (psephology), वैद्यकशास्त्र अश्या अनेक ज्ञानशाखांमधल्या विद्वानांची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील भाकिते चुकतात. पण म्हणून त्या ज्ञानशाखा खोट्या ठरत नाहीत. ज्योतिषशास्त्रातही इतर शास्त्रांप्रमाणे चुकलेली मूळची गृहितके बदलून, नव्या गृहितकांना सिद्ध करून, त्याची शास्त्रोक्त मांडणी करून संकल्पनांचं पुनर्मूल्यांकन नक्कीच केलं जातं.