विषय «सामाजिक समस्या»

विवाह आणि नीती (भाग ५)

ख्रिस्ती नीती
‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह प्राधान्याने अपत्योत्पादनाकरिता नसून तो अविवाहितांमधील लैंगिक संबंधाच्या (fornication) पापाचे निवारण करण्यासाठी आहे.
सेंट पॉलची विवाहविषयक मते कॉरिंथमधील रहिवाश्यांना त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रात पूर्ण स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप
जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. शेती नेहमीच पिकत नसे, आणि तसेच मैथुनातून अपत्यजन्मही नेहमी होत नसे. म्हणून धर्म आणि जादू (अभिचार) यांना इष्टफलप्राप्तीसाठी आवाहन केले जाई. सहानुभवात्मक अभिचाराच्या (sympathetic magic) तत्कालीन समजुतीनुसार लोक असे मानीत की मानवांतील बहुप्रसवत्व वाढले की जमिनीचेही वाढेल; आणि तसेच मानवांतील बहुप्रसवत्वाची आदिम समाजात मोठी मागणी असल्यामुळे तिच्याही वृद्ध्यर्थ विविध धार्मिक आणि अभिचारात्मक कर्मकांड सुरू झाले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ३)

पितृसत्ताक व्यवस्था
पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम आहेत आणि त्यांचे जीवन आपल्याच जीवनाचा विस्तार आहे; व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा तिच्या मृत्यूबरोबरच अंत होत नाही आणि वंशजांच्या चरित्रांतून तिचा हवा तितका विस्तार होऊ शकतो या कल्पना स्वाभाविक होत्या.

पुढे वाचा

स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल

स्त्रीचे समाजात नेमके कोणते स्थान आहे? एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून तिचा समाजात दर्जा काय आहे? या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की सामाजिक व आर्थिक स्थित्यंतराशी आणि प्रस्थापित मूल्यव्यवस्थेच्या परिवर्तनाशी तो निगडीत आहे.

प्रत्यक्ष समाजव्यवस्थेमधील सहभाग, सहभागाचे स्वरूप, स्वतःच्या भोवताली घडणाच्या घटना संबंधी निर्णय घेण्याची क्षमता व निर्णयाचे क्षेत्र यांवर स्त्रीचे स्थान अवलंबून आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा आढावा घेतल्यास आपल्या समाजातील स्त्रीचे स्थान कसे होते व ते कसकसे बदलत गेले यावर प्रकाश पडू शकेल.

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्त्रीचे समाजातील स्थान पुरुषाच्या बरोबरीचे होते असे दिसते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग २)

मातृवंशीय समाज
वैवाहिक रूढींमध्ये नेहमीच तीन घटकांचे मिश्रण आढळते: (१) साहजिक किंवा सहजात किंवा राजप्रवृत्तिमय (instinctive), (२) आर्थिक, आणि (३) धार्मिक. हे घटक स्पष्टपणे वेगळे दाखविता येतात असे मला म्हणायचे नाही; जसे ते अन्य क्षेत्रात वेगळे दाखविता येत नाहीत, तसेच ते येथेही येत नाहीत. दुकाने रविवारी बंद असतात याचे मूळ धार्मिक आहे. पण आज ही गोष्ट आर्थिक झाली आहे; आणि अंगिक बाबीतील कायदे आणि रूढी यांचीही गोष्ट अशीच आहे. धार्मिक मूळ असलेली रूढी जर उपयुक्त असेल तर तिचा धार्मिक आधार कमकुवत झाल्यावरही ती पुष्कळदा टिकून राहते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १)

बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादि विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी आपल्या प्रचलित वैवाहिक नीतीची मूलग्राही चर्चा केली असून विवेकवादी वैवाहिक नीती काय असावी याचे दिग्दर्शन केले आहे. प्राध्यापक म. गं. नातूंनी या ग्रंथाचा अनुवाद करावयास घेतला होता.

पुढे वाचा