विषय «विवेकवाद»

विवेकवाद – ३

कर्मसिद्धांत, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या लेखमालेतील दुसर्‍या लेखांकाच्या शेवटी आपण ‘कर्मसिद्धांत’ नावाच्या एका प्रसिद्ध उपपत्तीचा उल्लेख केला. तेथे आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करीत होतो, आणि आपण असा युक्तिवाद केला होता की जगात जे प्रचंड अशिव आढळते – म्हणजे भयानक दुःख, क्रौर्य, अज्ञान, दुष्टाचार, रोगराई इत्यादि जे आढळते, ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक आहे. या युक्तिवादाला दिल्या गेलेल्या अनेक उत्तरांचे आपण परीक्षण केले आणि शेवटी कर्मसिद्धांतापाशी येऊन ठेपलो. कर्मसिद्धांतानुसार जगातील अशिवाचे कारण आपण मानवच आहोत आणि त्याकरिता ईश्वराला जबाबदार धरणे चूक आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ३)

पितृसत्ताक व्यवस्था
पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम आहेत आणि त्यांचे जीवन आपल्याच जीवनाचा विस्तार आहे; व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा तिच्या मृत्यूबरोबरच अंत होत नाही आणि वंशजांच्या चरित्रांतून तिचा हवा तितका विस्तार होऊ शकतो या कल्पना स्वाभाविक होत्या.

पुढे वाचा

विवेकवाद – २

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण ज्ञानक्षेत्रातील विवेकित्वाचा एक नियम पाहिला. तो नियम असा होता की ज्या विधानाच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल अशाच विधानावर आपण विश्वास ठेवावा, आणि तो विश्वास पुराव्याच्या प्रमाणात असावा. तसेच विधानाचा पुरावा तपासण्याची शक्ती आपल्याजवळ नसेल तर त्या त्या ज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञाला किंवा वैज्ञानिकाला प्रमाण मानावे.
नंतर आपण कर्मक्षेत्रातील विवेकाकडे वळलो, आणि आपली कर्मे विवेकी केव्हा होतील याचा विचार करण्यास आरंभ केला. आपल्या असे लक्षात आले की कर्माचा विचार आपण जसा साध्य म्हणून करू शकतो तसाच एखाद्या साध्याचे साधन म्हणूनही करू शकतो.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग २)

मातृवंशीय समाज
वैवाहिक रूढींमध्ये नेहमीच तीन घटकांचे मिश्रण आढळते: (१) साहजिक किंवा सहजात किंवा राजप्रवृत्तिमय (instinctive), (२) आर्थिक, आणि (३) धार्मिक. हे घटक स्पष्टपणे वेगळे दाखविता येतात असे मला म्हणायचे नाही; जसे ते अन्य क्षेत्रात वेगळे दाखविता येत नाहीत, तसेच ते येथेही येत नाहीत. दुकाने रविवारी बंद असतात याचे मूळ धार्मिक आहे. पण आज ही गोष्ट आर्थिक झाली आहे; आणि अंगिक बाबीतील कायदे आणि रूढी यांचीही गोष्ट अशीच आहे. धार्मिक मूळ असलेली रूढी जर उपयुक्त असेल तर तिचा धार्मिक आधार कमकुवत झाल्यावरही ती पुष्कळदा टिकून राहते.

पुढे वाचा

विवेकवाद -१

विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती, सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी तूर्त ज्ञानक्षेत्र आणि कार्यक्षेत्र या दोघांचाच उल्लेख केल्यास पुरे होईल. सत्य म्हणजे काय? आणि सत्य ओळखायचे कसे? हे प्रश्न ज्ञानक्षेत्रातील आहेत. या आणि अशाच अन्य प्रश्नांची उत्तरे देणे हे विवेकाचे काम आहे असे म्हणता येईल.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १)

बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादि विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी आपल्या प्रचलित वैवाहिक नीतीची मूलग्राही चर्चा केली असून विवेकवादी वैवाहिक नीती काय असावी याचे दिग्दर्शन केले आहे. प्राध्यापक म. गं. नातूंनी या ग्रंथाचा अनुवाद करावयास घेतला होता.

पुढे वाचा