विषय «इतर»

इतिहास लेखनाची शिस्त

[गजानन भास्कर मेहेंदळे यांचा “श्री राजा शिवछत्रपती (पुणे १९९६)” हा ग्रंथ सच्चा साधनांवर आधारित इतिहास लेखनाचा आदर्श व मानदंड म्हणून गौरवला गेला आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग, विवेकवादी शिस्तीची रूपरेषाच असावा, असा.]
शिवचरित्राच्या अभ्यासाची माझी ही वाटचाल चालू असताना सुस्वातीची दोन-तीन वर्षे मी चुकून भलत्याच वाटेला लागलो होतो. मी तेव्हा जी चूक केली तीच सध्या काही इतिहाससंशोधक, विशेषतः युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करीत असलेले संशोधक, करीत असल्याचे मला आढळून आले आहे. म्हणून, ते वेळीच सावध व्हावेत अशा हेतूने, इथे त्याविषयी थोडक्यात लिहितो.

पुढे वाचा

धर्माची बुद्धिगम्यता

जानेवारीचे संपादकीय महत्त्वाच्या मुद्यांवर प्रतिक्रियांचे आवाहन करते. त्यातले काही मुद्दे धर्माच्या बुद्धिगम्यतेबद्दलचे आहेत. त्यांचे मूळ डिसेंबर २००० च्या अंकातील पाटणकरांच्या अभिप्रायात आणि त्याचेही मूळ सप्टेंबर २००० च्या अंकातील ‘डॉ. दप्तरीचा अभिनव सुखवाद’ या माझ्या लेखात आणि त्याच अंकाच्या संपादकीयात आहे. जिज्ञासू वाचकांच्या सोयीसाठी हे संदर्भ दिले आहेत.
१. डॉ. दप्तरी धर्म बुद्धिगम्य आणि बुद्धिप्रधान मानतात. श्रद्धावादी किंवा शब्दप्रामाण्यवादी समजतात तसा धर्म मानला तर तो तोकडा पडतो असे त्यांचे म्हणणे. मनुष्याच्या आत्यंतिक सुखप्राप्तीसाठी धर्म आहे हा त्यांचा दावा आहे.
२. डॉ. दप्तरी व त्यांचे विरोधक ‘धर्म’ हा शब्द भिन्न अर्थाने वापरतात हे तेथेच स्पष्ट केले आहे.

पुढे वाचा

शंका असणे-खात्री नसणे

आपण कोण आहोत? कुठे चाललो आहोत? ह्या विश्वाचा अर्थ काय? ह्या आणि असल्या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देईल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादेवेळी भ्रमनिरास होऊन तुम्ही गूढवादी उत्तरांमागे लागाल. एखादा वैज्ञानिक गूढवादी उत्तर कितपत मान्य करेल याबद्दल मला मला शंका आहे, कारण समजून घेणे हाच खरा प्रश्न आहे, नाही का? पण असो. तुम्ही कसाही विचार केलात तरी आम्ही एका शोधयात्रेत आहोत, हे जग समजून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. लोक मला विचारतात की मी भौतिकीचे अंतिम नियम शोधतो आहे का. असे नाही.

पुढे वाचा

भ्रष्टाचाराचे दृश्य स्वरूप

आपल्या दरिद्री देशामध्ये संपत्ती व वैभवाचे प्रदर्शन केल्याशिवाय सामान्य जनतेवर पकड घेता येत नाही. राजकीय पक्षांची जंगी संमेलने सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमावर उभी राहात नाहीत. मोठे उद्योगपती, कारखानदार, जमीनदार, बिल्डर, व्यापारी यांच्या आर्थिक सहाय्यावर हे प्रदर्शन घडत असते. सर्वच पक्षनेत्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा भव्य सोहळासुद्धा त्यांच्या स्वतःच्या खर्चाने होत नसतो. पण त्यामुळे त्यांना कमीपणा येत नाही आणि एकदा पक्षाच्या निमित्ताने पैसा गोळा करण्याची प्रथा मान्य झाली की, त्यामध्ये दान देणाऱ्याची दानत व उद्देश हा अप्रस्तुत ठरतो. मोठ्या श्रीमंत धार्मिक संस्था किंवा मंदिरांमध्ये दान केलेला सर्व पैसा पवित्रच समजला जातो; त्याचप्रमाणे राष्ट्रासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षाच्या उभारणीसाठी दिलेला पैसाही राष्ट्रधर्मासाठीच आहे, अशी समजूत करून घेतली जाते.

पुढे वाचा

कोटिच्या कोटि अज्ञाने!

संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच एक पाहाणी केली. जगभरातल्या लोकांना प्रश्न विचारला होता, “कृपया शेष जगातल्या अन्नाच्या तुटवड्याबद्दलचे तुमचे मत सांगाल का?”

पाहाणी ठार अयशस्वी झाली, कारण अफ्रिकेत कोणालाच ‘अन्न’ म्हणजे काय ते माहीत नव्हते. पश्चिम युरोपात कोणालाच ‘तुटवडा’ ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. पूर्व युरोप ‘तुमचे मत’ हा शब्दप्रयोग ओळखत नव्हता. दक्षिण अमेरिकेत ‘कृपया’ हा शब्द अनोळखी होता, आणि अमेरिकन संघराज्यात कोणालाच ‘शेष जगा’ची ओळख नव्हती.

[टाईम्स ऑफ इंडिया, १३ मार्च २००१]

स्वयंसिद्ध विधाने आणि परतःसिद्ध विधाने

अमुक विधान स्वयंसिद्ध आहे असे आपण अनेकदा ऐकतो, आणि आपणही म्हणतो. तेव्हा स्वयंसिद्ध विधान म्हणजे काय? आणि अशी काही विधाने आहेत काय? असे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा विचार आहे.
स्वयंसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न होत नाही, आणि ते अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न व्हावे हे आवश्यकही नाही. त्याची सत्यता उघड असते. उलट परतःसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे दुसऱ्या एका किंवा अधिक विधानांपासून निष्पन्न होते. एक विधान दुसऱ्या विधानापासून निष्पन्न होते याचा अर्थ असा की जर दुसरे विधान खरे असेल तर पहिले विधानही अपरिहार्यपणे खरेच असते.

पुढे वाचा

आर्थिक साहाय्यातून साम्राज्यवाद

[AID As IMPERIALISM (१९७१, पेंग्विन) या पुस्तकाचा परामर्श अंजली प्रकाश कुलकर्णी यांनी जाने-मार्च १९९७ च्या ‘अर्थसंवाद’ या नियतकालिकासाठी घेतला. त्या लेखाचा हा संक्षेप]
विदेशी साहाय्य हे उदार अंत:करणाने व निःस्वार्थ बुद्धीने केलेले वित्तीय साधनसंपत्तीचे विनाअटींचे हस्तांतरण होय या कल्पनेला कधीच तिलांजली मिळाली आहे. १९६१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकेचे जगावरील सार्वभौमत्व, दबाव व अंकुश राखण्यासाठी अवलबिलेली ही एक पद्धती असून विदेशी मदतीच्याद्वारे ऋणको देशांना साम्यवादी गटामध्ये समाविष्ट होण्यापासून परावृत्त केले जाते तसेच त्या देशांना अधःपतनापासून वाचविले जाते असे नमूद केले आहे.

पुढे वाचा

अवैज्ञानिक जनहितविरोध?

फेब्रुवारी २००१ (११.११) च्या अंकात मराठी विज्ञान परिषदेच्या एका स्मरणिकेचा डॉ. र. वि. पंडितांनी परामर्श घेतला आहे. विज्ञान परिषद आणि आजचा सुधारक यांची उद्दिष्टे एकमेकांशी जुळती आहेत, हे डॉ. रविपंचे निरीक्षण योग्यच आहे. ते पुढे नोंदतात की विवेकवाद, स्त्रियांचे समाजातले स्थान, धर्मश्रद्धा वगैरे विषय आ. सु.तल्या अती झालेल्या चर्चेने गुळगुळीत झाले आहेत. त्याऐवजी डॉ. रविपना सुधारणा आणि विकासाचे व्यवस्थापन यावर जास्त खल होऊन हवा आहे.
सुधारणेचा पाया सुशिक्षणात आहे, यावर दुमत नसावे. ‘प्रोब’ हा प्राथमिक शिक्षणावरचा अहवाल दाखवतो की स्त्रियांना महत्त्व न देणाऱ्या आणि जातीपातींच्या विळख्यातल्या ‘बीमारू प्रांतांमध्ये शिक्षणाचे चित्र भीषण आहे.

पुढे वाचा

नीरक्षीरविवेक?

ख्रिस्ती धर्माच्या उदयाच्या आधी यूनानी लोकांची मतेही हिंदूंच्या (सध्याच्या) मतांसारखीच होती. सुशिक्षित यूनानी लोक आज हिंदू करतात, तसाच विचार करत. सामान्य यूनानी लोकही हिंदूंसारखेच मूर्तिपूजक होते. पण यूनानींच्यात दार्शनिकही होते, आणि त्यांनी आपल्याच देशात राहून अंधविश्वासाला थारा तर दिला नाहीच, पण वैज्ञानिक तत्त्वांची पर्यायी मांडणी करून त्यांच्यावर समाधानकारक उत्तरे काढली.

हिंदूंमध्ये वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये परिपूर्णता आणायची क्षमता व इच्छा असलेले लोक नव्हते. यामुळेच हिंदूंमध्ये बहुशः असे दिसते की वैज्ञानिक प्रमेये तार्किक क्रम न लावता अस्ताव्यस्त झालेली आहेत. शेवटी तर अशी प्रमेये जनसमूहाच्या हास्यास्पद धारणांशी गल्लत झालेल्या स्पात दिसतात.

पुढे वाचा

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग ४)

प्राथमिक शिक्षणावरच्या प्रोबच्या अहवालावरील हा शेवटचा लेख. आत्तापर्यंतच्या तीन लेखांत त्यांतील पहिल्या पाच प्रकरणांचा जरा विस्ताराने आढावा घेतला. ह्या शेवटच्या लेखात उरलेल्या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे फक्त त्रोटक-पणे नोंदून हिमाचल प्रदेशामध्ये झालेल्या ‘शैक्षणिक क्रांतीची’ माहिती मात्र विस्तृतपणे देत आहे.
आतापर्यंत प्रोब अहवालात वरचेवर येणारे ‘निराशा’, ‘निरुत्साह’, ‘जबाबदारीची उणीव’ ह्या शब्दांऐवजी ‘प्रोत्साहन’, ‘उत्साह’, ‘जबाबदारीची जाणीव’ ह्या शब्दांनी ज्या शैक्षणिक व्यवहाराचे वर्णन करता येईल त्याची कदर करण्याचा हा प्रयत्न आहे, तसेच हिमाचल प्रदेशामध्ये हे का झाले हे सर्वांना समजणे अगत्याचे आहे म्हणून ही माहिती तपशीलवार देत आहे.

पुढे वाचा