विषय «इतर»

मी नाही केले, माझ्या मेंदूने करायला लावले ! (माय ब्रेन मेड मि डू इट : एलाजर स्टर्नबर्गच्या पुस्तकाचा परिचय)

मानवी इतिहास म्हणजे माणूस व निसर्गातील चढाओढीची कथाच. माणसाने निसर्ग आजमावण्याचा आणि त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. निसर्गाच्या चमत्कारांनी तो स्तिमित झाला आणि प्रश्न विचारू लागला. यांतल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळविताना आपण कितीतरी पुढे आलो आहोत, पण तरीही या प्रश्नांची लांबीरुंदी मात्र फारशी कमी झालेली नाही. काही बाबतीत तर आपण अश्या पायरीवर आलो आहोत, जिथे या प्रश्नांच्या उत्तरांनी आपला गोंधळ अधिकच वाढतो आहे. गोंधळात टाकायला सुरुवात केली आहे.
‘माय ब्रेन मेड मी डू इट : द राइज ऑफ न्यूरोसायन्स एण्ड द थ्रेट टू मॉरल रिस्पॉसिबिलिटी’ हे बडिस युनिव्हर्सिटीत न्यूरोसायन्स आणि तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असलेल्या एलायजर स्टर्नबर्ग या बावीस वर्षीय तरुणाने लिहिलेले पुस्तक.

पुढे वाचा

मेंदू आणि जीवनाचा अर्थ (द ब्रेन अँड द मीनिंग ऑफ लाईफ, पॉल थेगार्डच्या पुस्तकाचा परिचय)

अस्तित्वाविषयीच्या गहन प्रश्नांची उत्तरे शोधणे मानवी संस्कृतीच्या इतिहासात नवे नाही. जगभरच्या संस्कृतीत तत्त्वज्ञ आणि धर्मज्ञ यांनी ती शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. साहित्य नाट्य अशा कलाप्रकारांद्वारेदेखील असे प्रयत्न झाले आणि आजही होत आहेत. आधुनिक विज्ञानपरंपरेतून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याला मात्र एवढी दीर्घ परंपरा नाही. आपल्याला ज्ञान असलेले जग कसे अस्तित्वात आले याचा शोध वैज्ञानिक घेत आले आहेत; पण ते का अस्तित्वात आले असावे, किंवा माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, अश्या प्रश्नांना विज्ञानाच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न तुलनेने नवे आहेत. मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या मानसशास्त्रासारख्या विषयाला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून स्थान मिळणे हीदेखील तुलनेने अलीकडची, म्हणजे गेल्या शे-दोनशे वर्षांतली घडामोड आहे.

पुढे वाचा

नैतिकतेचे जीवशास्त्रीय मूलाधार (ख्रिस्तोफर शी यांच्या लेखाचे स्वैर भाषांतर)

पॅट्रिशिया चर्चलन्ड ह्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापक आहेत. ह्या तत्त्वज्ञान आणि मज्जासंस्था ह्या दोन विषयात त्या काम करतात. आजच्या नीति-तत्त्वज्ञान शाखेच्या क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. प्रचलित नीतिशास्त्रातील प्रवाहासंदर्भात त्या असमाधानी आहेत. उत्क्रान्तीला किंवा माणसाच्या मेंदूला टाळून होणाऱ्या नीतिशास्त्रातील ह्या चर्चा पोकळ आहेत असे त्यांचे मत आहे. गेली चार दशके नैतिक वर्तणूक आणि मेंदू ह्यांतील संबंधांबाबत त्या संशोधन करीत आहेत, म्हणूनच त्यांची वरील मते ही महत्त्वाची आहेत. तत्त्वज्ञांनी त्यांच्या अभ्यासामध्ये मेंदूसंशोधनाच्या क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या ज्ञानाचाही विचार केला पाहिजे अशी त्यांची धारणा आहे.

पुढे वाचा

मेंदू : व्युत्पत्ती आणि तुलनात्मक भाषाशास्त्र

सजीवसृष्टीतले सगळ्यांत गुंतागुंतीचे इंद्रिय जो मेंदू, त्याला इंग्रजी भाषेत Brain म्हणतात. Brain या शब्दाचे मूळ काय? नव्या ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये (1998) Brain ची व्याख्या, “पृष्ठवंशीय प्राण्यांच्या कवटीमध्ये असलेले, जाणिवांचा समन्वय आणि बौद्धिक व चैतीय क्रिया पार पाडणारे मृदू चेता-उतीपासून बनलेले इंद्रिय” अशी केली आहे. इ.स.पूर्व 5 व्या शतकात ‘मेंदू हा संवेदनांसाठी आवश्यक आहे.’ असे ग्रीक तत्त्वज्ञ (क्रोटनचा) अल्कमायन याने शरीरशास्त्राच्या पुराव्याधारे सुचवले होते. (डॉटी, 2007) परंतु या मर्मज्ञतेचा प्रभाव ‘विचार करण्याच्या इंद्रिया’च्या संदर्भात पुढे वापरल्या गेलेल्या शब्दांच्या व्युत्पत्तीवर पडला नाही. Brain या शब्दाचे मूळ शोधताना आपल्याला इतर इंडो-युरोपियन भाषांशी असलेले मजेशीर संबंध सापडतात.

पुढे वाचा

ब्रेन या शब्दाचा कालानुक्रमी विकास

ब्रेन या शब्दाचा विकास कसा होत गेला हे पाहणे उद्बोधक आहे. प्रथम शृब्दाची व्युत्पती होते. तेव्हा शब्दाची कळी असते. पुढे ती उमलत जाते. शब्द विकसित होत जातो. त्याच शब्दाला निरनिराळे अर्थ प्राप्त होतात. शब्द सिद्ध व समृद्ध होत जातो. शब्द बहुविध रूपात वापरला जातो. शब्दाच्या विकासाचा इतिहास हा मानवी विचारांचा, प्रज्ञेचा, प्रतिभेचा व संस्कृतीचा इतिहास असतो. इंग्लिश शब्दांचा असा मागोवा घेणारा हिस्टॉरिकल थिसॉरस
ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसने 2009 साली प्रकाशित केला आहे. त्यात ब्रेन या शब्दाचा धांडोळा घेतला. ब्रेन हा शब्दनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अशा रूपात पूर्वापार इंग्लिश भाषेत वापरलेला आहे.

पुढे वाचा

मेंदू-विज्ञान – तत्त्वज्ञान सामाईक सीमारेषा

शास्त्रज्ञ हो असती ज्ञाते बहुत / परि नाहीं चित्त हातां आलें – तुकाराम
हे शतक मेंदू-विज्ञानाचे आहे असे मानले जाते. मेंदू-विज्ञानाने इतर ज्ञानशाखांमध्येही प्रवेश केला आहे. न्यूरोइकॉनॉमिक्स,सोशल न्यूरोसायन्स, न्यूरोसायकॅट्री, न्यूरो एथिक्स अश्या उपशाखा सुरू होत आहेत. समाजावरही मेंदू-विज्ञानाचा प्रभाव वाढता आहे. लोकविज्ञानात मेंदूवरची पुस्तके, लेख तसेच वृत्तपत्रातील मेंदूसंशोधनाच्या बातम्या वाढत्या आहेत; हे त्याचेच द्योतक आहे. मेंदू-विज्ञानातील शोध, नव्या संकल्पना आपल्याला उत्तेजित करतात, प्रभावित करतात. आपण हरखून जातो. मानवी स्वभावाबाबत, समजाबाबत काही तरी वेगळे किंवा जास्त शिकवण्याचे अधिकार आपण मेंदू-विज्ञानाला बहाल करतो.

पुढे वाचा

आपण मेंदूचे गुलाम नव्हे, तर मालक!

[निर्णयस्वातंत्र्याचा प्रश्न आणि मेंदू-विज्ञान]
मेंदू-विज्ञानामुळे जे अवघड प्रश्न पुढे आणलेले आहेत त्यांतला सर्वांत कठीण प्रश्न आहे तो फ्री विलसंबंधीचा. फ्री विल म्हणजे स्वेच्छा किंवा मुक्त इच्छा. आपण आपला स्वतःचा म्हणून, स्वायत्तपणे काही निर्णय घेऊ शकतो की मेंदूतल्या पेशींच्या जुळण्या आणि मेंदूतली रसायने मिळून आपण काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, ते सगळे ठरवत असतात?
याची सुरुवात झाली पंचवीस वर्षांपूर्वी. मेंदूसंबंधी सुरू असलेल्या संशोधनामुळे फ्री विल या संकल्पनेला हादरे बसू लागले. 1983 साली बेंजामिन लिबेट (Benjamin Libet) याने काही प्रयोग केले होते.

पुढे वाचा

अभिजात भारतीय दर्शनांतील शरीर-मन समस्येचे स्वरूप

उपोद्धात
शरीर-मन-समस्या ही तत्त्वज्ञानातील अनेक मूलभूत समस्यांपैकी, प्राचीन काळापासून चर्चेत असलेली आणि आजही मेंदू-विज्ञानाच्या प्रगतीमुळेच निराळेच वळण घेतलेली अशी समस्या आहे. आणि ती बहुपेडी आहे. म्हणजे, त्या समस्येचे उत्तर शोधता-शोधता तिच्या अवतीभवतीच्या अनेक समस्या-उपसमस्या एकदम सामोऱ्या येतात व त्यांची उकल केल्याशिवाय शरीर-मन-समस्येची सोडवणूक करणेही अशक्य होते. अर्थात तत्त्वज्ञानातील प्रत्येक समस्येसंदर्भात हीच परिस्थिती आढळते, व तरीसुद्धा त्या समस्येचे ढोबळमानाने वर्णन करता येते. त्यानुसार शरीर-मन समस्येच्या अनुषंगाने उद्भवणारे काही प्रश्न पुढीलप्रमाणे –
0 चैतन्याचे वास्तव्य कुठे असते, देहात, मनात की आणखी कोठे? चैतन्य हे स्वतंत्र तत्त्व आहे की परतंत्र?

पुढे वाचा

मन, मेंदू आणि सर्ल

‘न्यूरोसायन्स’ किंवा ‘मेंदू-विज्ञान’ ह्या क्षेत्रात झपाट्याने जे नवे शोध लागत आहेत, त्यांची दखल तत्त्वज्ञान घेते का, असा प्रश्न जेव्हा ऐकला, तेव्हा नजरेसमोर नाव आलेते सर्ल यांचे. अर्थात जे. जे. सी. स्मार्ट, डेनेट, चर्चलन्ड, डेव्हिडसन, नागेल ही नावेही नजरेआड करता येणारी नाहीत; पण ‘चायनीज रूम आर्युमेंट’ मांडणाऱ्या सर्ल यांचे नाव ठळकपणे नजरेत भरते. वैज्ञानिक दृष्टी ढळू न देता त्यांनी मनाविषयी ज्या सर्वसाधारण समजुती आहेत, त्यांचीही दखल घेतल्याने सर्ल यांचा दृष्टिकोण मोलाचा ठरतो.
वैज्ञानिक दृष्टिकोणाचा वारसा सर्लना मिळाला, तो आई-वडिलांकडून. वडील इंजीनिअर तर आई डॉक्टर.

पुढे वाचा

शोध जाणिवेचा : मानसप्रत्ययशास्त्र आणि मेंदू

मानसप्रत्ययशास्त्राची उभारणी त्याचा प्रणेता जर्मन तत्त्वज्ञ एडमंड हुसर्ल (1859 ते 1938) यांच्या तात्त्विक भूमिकेमधून आणि विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून झालेली आहे.
ज्ञानाच्या शक्यतेबद्दलच शंका बाळगणारा संशयवाद, ज्ञान स्थलकालानुरूप बदलते असे मानणारा सापेक्षतावाद यांना हुसर्लचा तीव्र विरोध होता. ज्ञान वस्तुनिष्ठ (objective), निश्चित (certain) आणि शंका घेणे शक्यच होणार नाही (indubitible) असेच असले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आधुनिक विज्ञानच काय, पण गणित आणि भूमिती या अत्यंत प्रतिष्ठा असलेल्या ज्ञानशाखाही ज्ञानाच्या या कसोटीला उतरत नाहीत कारण या प्रत्येक ज्ञानशाखेची आपापली गृहीते असतात, आणि त्या गृहीतांना त्या-त्या ज्ञानशाखेत आह्वान दिले जात नाही.

पुढे वाचा